Sunday, 5 February 2017

आघाड्यांचा राजकारणाचा शेवट?

गोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.

उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही. 

भाषाव्रती

यंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.

यास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.

कपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे

आज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.