Tuesday 28 December 2010

दादोजी कोंडदेव आणि शिवसेना


जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेना आमच्याबरोबर येऊन हा मुद्दा जोरात उचलेल असं वाटलं होतं, मराठा संघटनांच्या राजकारणात आघाडीवर असलेले एक मोठे नेते एकदा सांगत होते. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत होते. राष्ट्रवादीपेक्षा सेनेला हा मुद्दा फायद्याचा होता. आता आम्ही त्यांना संपवणार. वगैरे बरंच काही बोलले.

असं असलं तरी शिवसेनेने दादोजी कोंडदेव प्रकरणात पुतळा न पाडण्याची भूमिका घेतली. यावेळच्या दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. मीडियात कुणीच त्याची दखल घेतली नाही. दसरा मेळाव्यानंतर मी नवशक्तित लेख लिहिला होता, दसरा, दादोजी आणि शिवसेनाप्रमुख. शिवसेनेची याविषयीची भूमिका फायद्याची ठरेल की नुकसानीची हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा आता लवकर संपण्याची शक्यता नाही. तो धुमसत ठेवला जाणार. महाराष्ट्रात पुन्हा जात हा सगळ्यात मोठा अजेंडा बनणार. 

Sunday 26 December 2010

मॉडर्न महात्मा

ठाण्याच्या साहित्य संमेलनात पुन्हा एकदा त्यांचे किडे वळवळलेच. असे कुणाला नथुरामविषयी कढ आले की आपण गांधीजींविषयी बोलायला हवं. त्यांच्या शेपट्या वाकड्याच राहणार आहेत. ते सूर्यावर थुंकतच राहणार आहेत. आपण बापूंच्या मोठेपणाविषयी बोलू. परवाच्या गांधी जयंतीला नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला हा लेख. 

गांधी जयंती आली की आपल्या सगळ्यांना गांधीजींची आठवण होते. कारण बँक हॉलिडे आणि ड्राय डे. बाकी पाचशेची नोट वगळता तसे बापू आपल्याला आठवत नाहीत. फार तर ते कुठे सरकारी ऑफिसांतले फोटो नाहीतर काँग्रेसच्या प्रचारसभांमधे चुकून दिसतात. त्या वातारवणात सूट न होणारे. उगाच अंग चोरून भिंतीवर अडकलेले असतात ते. त्यामुळे तिथेही क्वचितच लक्षात येतात.

मुंबई महापालिकेत युती तुटणार का?

राज ठाकरेंचं भाजप प्रदेश कार्यालयात जाणं, हे काही चुकून आणि सहज येताजाता घडलेली घटना नाही. यामागे राजकारण निश्चितच आहे. त्यातून सेना आणि भाजप युती तोडून मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार का? हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.

या प्रश्नाचं उत्तर शोधताना शिवसेनेच्या नजरेतून याकडे पाहायचा प्रयत्न केलाय या लेखात. कारण यातली निर्णायक भूमिका सेनाच घेणार आहे. पण ते विश्लेषण मला काही नीट करता आलेलं नाही. लेख फसलाय. त्यापेक्षा सेना, भाजप आणि मनसे या तिघांचं एकूण विश्लेषण करायला हवं होतं. काहितरी हाती लागलं असतं.

श्याना कव्वा

शनिवारच्या लोकसत्ताबरोबर एक फाल्तू पुरवणी असते, वास्तुरंग नावाची. त्यात वास्तुशास्त्र वगैरे विनोदी विषयांवरचे चिरकूट लेख असतात. कालच्या अंकात अशाच एका लेखाखाली एक चांगला लेख आलाय. उमेश वाघेला यांचा चतुर कावळा नावाचा. त्याच्या मथळ्याची कॅलिग्राफीही छान आहे आणि कावळ्याविषयी चांगली माहितीही आहे.

कावळ्याविषयी फार कोणी लिहित नाही. मी लिहिलं होतं, गेल्या वर्षीच्या श्राद्धाच्या दिवसांत. कावळेपुराण नावानं. खूप लोकांना आवडलं होतं. प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे एसेमेस आले होते, त्या रविवारी. आता पुन्हा एकदा त्या कावळ्यांची आठवण. आपल्यासारख्यांचा पितृपंधरवडा वर्षभर सुरू असतो.

Thursday 23 December 2010

किरोडी सिंग बैंसलांविषयी

आदिवासी ठरवा या मागणीसाठी गु्ज्जरांचं आंदोलन पुन्हा सुरू झालंय. राजधानी दिल्ली वारंवार जाम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. आधी २००८ साली यापेक्षाही भयंकर आंदोलन केलं होतं. तेव्हा गुज्जरांचे नेते किरोडी सिंग बैंसलांचं व्यक्तिचित्र मटाच्या रविवार पुरवणीसाठी लिहिलं होतं. आता बैंसलांना पुन्हा पाहिल्यावर त्याची आठवण आली. सर्च करून शोधून काढलं. दिल्लीत दिडेक वर्षं राहिल्यामुळे गु्ज्जर माहीत होते. त्याचा लिहिताना फायदा झाला होता. पण त्याहीपेक्षा गुरू गुगलच कामाला आला. पण हे कर्नलसाहेब कोणत्या विचारधारेने प्रभावित आहेत, हे मात्र कळलं नाही. 

Tuesday 21 December 2010

सनातन संस्था, भगवा दहशतवाद वगैरे

सध्या भगव्या दहशतवादाची चर्चा सुरूय. घोटाळ्यांवरची चर्चा झाकण्यासाठी काँग्रेसने टाकलेला डाव यशस्वी झालाय. तरीही इथे थोडीशी भगव्या दहशतवादाची चर्चा करुयाच. कारण माझा एक जुना लेख. सनातन संस्थेच्या लोकांनी गेल्या वर्षी दिवाळीत गोवा मडगाव इथं बॉम्बस्फोट घडवले होते, तेव्हा लिहिलेला.

खरं तर हा आणखी जुना लेख आहे. सनातन संस्थेच्याच लोकांनी पहिल्यांदा गडकरी रंगायतन वगैरे ठिकाणी बॉम्ब फोडले होते, तेव्हा मटा ऑनलाईनसाठी लेख लिहिला होता, तुम्ही सनातन्यांच्या बाजूचे की संतांच्या तोच लेख पुन्हा थोडी भर घालून मटातल्या माझ्या विंडो सीट या कॉलमात बॉम्ब आपल्या आसपासचे म्हणून लिहिला होता. दुस-यांदा लिहिताना त्यात काही चांगली भर मात्र घालता आली नाही. पण दोन्हीदा चांगलं कौतुक झालं. सडकून टीकाही झाली. नेटवरच्या प्रतिक्रियाही खूप तिखट होत्या. सनातनवाल्यांनी कोर्टात खेचण्याची धमकीही दिली होती.

Sunday 19 December 2010

फ्रॉड मार्गशीर्षातल्या गुरुवारांचा

सध्या मार्गशीर्ष सुरूय. दर गुरुवारी लक्ष्मीच्या व्रताची पूजा होते. गेले आठदहा वर्षं माझ्याही घरी पूजा होतेय. सहज म्हणून त्याचं पुस्तक बघितलं. लक्षात आलं, हे पुस्तक लिहून कशीबशी पन्नास वर्षच झालीत. पहिली आवृत्ती आलेल्याला तर पस्तीस वर्षंही झालेली नाहीत. हे व्रत प्रकाशकांनी आपले खिसे भरण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माथी मारलंय. हा घोटाळा आहे. टूजी स्पेक्ट्रमपेक्षाही मोठा फ्रॉड आहे. सोबत माझा लेख नेहमीप्रमाणे जोडलाय.कालच्या शनिवारी नवशक्तित माझ्या समकालीन कॉलमात छापून आला होता

वेगळ्या विदर्भ राज्याचा विजय असो!

नुकतंच नागपूरात हिवाळी अधिवेशन पार पडलं. नेहमीप्रमाणे यातही विदर्भाच्या हातात काहीच आलं नाही. वेगळं विदर्भ राज्य बनलं, तर यात काही फरक पडेल का? माहीत नाही. पण आता विदर्भाच्या विकासासाठी अन्य कोणताच मार्ग उरलेला नाही, हे ही तितकंच खरंय.

जानेवारीच्या शेवटी हा लेख नवशक्तित माझ्या समकालीन या कॉलमात लिहिला होता. लेख त्यांच्या ऑफिसात पोचताच, तेव्हा संपादक असणा-या महेश म्हात्रेंचा टाकोटाक फोन आला. त्यांनी लेख आवडल्याचं सांगितलं. ते स्वतः काही वर्षं नागपुरात तरुण भारतचे संपादक होते. त्यामुळे त्यांची दाद मला महत्त्वाची वाटली.

Tuesday 14 December 2010

एक होती वाडी

गेल्या पावसाळ्यात मटातल्या माझ्या विंडो सीट कॉलमात हा लेख लिहिला. पण गेल्या वर्षी आमच्या वाडीत पाणीच भरलं नाही. यंदा तर तुफान पाऊस झाला. तरीही पाणी भरलं नाही. महापालिका यंदा तयारीत होती. तिने मुंबईत फारसं पाणी भरू दिलं नाही. ट्रेन एकदाही बंद झाली नाही. पण त्यामुळे वाडीला थोडी मुदतवाढ मिळालीय. पण तरीही वाडीसंस्कृती संपतेय हे खरं.

एक होती वाडी याच नावानं छापून आलेल्या माझ्या लेखाचा इण्ट्रो असा होता, पुण्याच्या वाडा संस्कृतीच्या -हासाची खूप चर्चा होते. सार्वजनिक हळहळ व्यक्त होते. पण मुंबईच्या वाडीसंस्कृतीचं काय ?  आधीच संपत चाललेल्या वाड्यांवर एसआरएने वर्मी घाव घातला आणि आता दरवर्षी तुंबणा-या पाण्याने या मुलखावेगळ्या कल्चरची तिरडी बांधली जातेय. 

नव्या मुंबईकरांना हे वाडीकल्चर फारसं माहीत नाही. त्यांना या झोपडपट्टयाच वाटतात. जुन्यांची वाडीपब्लिककडे बघायची नजर फारशी चांगली नाही. त्यांना ते लोअर स्टँडर्ड वाटतात. मी परळ लालबागचा आहे, असं चारदोन नव्या मुंबईकरांनी मला सांगितलं. मला बरं वाटलं. कारण, आमची वाडीसंस्कृती चाळसंस्कृतीच्या जवळ जाणारी. आमच्या बापजाद्यांची मंबईतली पहिली पावलं तिकडचीच. पण वाड्या या चाळींपेक्षाही गावांतली आपली मूळं शोधत राहिल्यात.

Monday 13 December 2010

जाऊ दे गं, बरखा!


कालच्या रविवारी नवशक्तिच्या रविवार पुरवणीत माझा लेख छापून आला, मीडिया राडिया नावाचा. त्यासाठी दोन तीन दिवस नेटवर बसून बरंच वाचलं त्याविषयी. गरुडांची गिधाडं होताना बघतोय आपण, असं वाटलं. लेख फार चांगला नाही, बरा झालाय. वाचून बघा. जाने भी दो, बरखाचं भाषांतर केलंय जाऊ दे गं, बरखा म्हणून. 

Wednesday 8 December 2010

हगायचं नि जगायचं?

सालं तू मटाला बाटवलं होतंस, कालच माझा मित्र श्रीरंग गायकवाड म्हणाला. संदर्भ होता माझ्या शी!’ या लेखाचं. श्रीरंगच्याच गावच्या प्रगती बाणखेलेनं मुंबई टाइम्समधे मनातलं हा कॉलम सुरू केला होता. त्यात आम्ही मटातलीच माणसं काहीतरी नॉस्टॅल्जिक ललित लिहायचो. त्यातला हा दुसराच लेख होता. शी!

जागेत बसवण्यासाठी तो छोटा लिहिला होता. पण अजून बरंच आहे. लेख लिहिलेल्याला अडीचेक वर्षं उलटून गेलेत. त्यानंतर मी बरंच लिहिलं. पण अजूनही या एकाच लेखामुळे मला ओळखणारे काहीजण आहेत. बोरिवलीचे एकजण तर मी दिसलो की हसायलाच लागतात. मी लिहिलेला पहिला आणि शेवटचा चांगला लेख, असंही काहीजणांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमचंही मत बनवायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलेला हा लेख.

Monday 6 December 2010

व्यवस्थेचा जय भीम!

हा लेख गेल्या वर्षी सहा डिसेंबरला महाराष्ट्र टाइम्समधे छापून आला होता. रविवार असल्यामुळे विंडो सीटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे पानात सर्वात तळाची जागा होती. तरीही दिवसभर फोन खणाणत होते. माझा सहा डिसेंबर पावन झाला. आजही चळवळीतले अनेक जण पहिल्यांदा भेटले की आवर्जून या लेखाची आठवण काढतात. हा लेख लिहिताना मी अनेक लोकांशी बोललो होतो. पण शुद्धोधन अहिरांशी बोलल्याचा खूप फायदा झाला होता. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. आज सहा डिसेंबरनिमित्त हा लेख इथे कटपेस्ट.

बाबासाहेबच बेस्टसेलर!

कालच देहू आळंदीला गेलो होतो. आज चैत्यभूमीवर जाणार आहे. आपल्यासाठी तिघेही माऊलीच. चैत्यभूमीवर जाऊन कधीही दर्शन घेत नाही मी. पण मैदानात भरलेल्या पुस्तकांच्या जत्रेत मात्र जातोच जातो. अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर हे राज्यातलं पुस्तकांचं सर्वात मोठं प्रदर्शन आहे, असा माझा एक दावा आहे. त्याचं रिपोर्टिंग मी गेल्या वर्षी केलं होतं. जागेअभावी बातमी खूप कापून लागली होती. ती इथे कट पेस्ट केलीय.

Saturday 4 December 2010

बाबासाहेब आणि प्रबोधनकार

गावागावात दलितांवर हल्ले होतात, दलित सवर्ण दंगे होतात, तेव्हा दलितांचा तो संघर्ष पूर्वीसारखा ब्राम्हणांशी किंवा देशमुख मराठ्यांशी नसतो. तो असतो मधल्या जातीसमूहांशी. उदाहरणार्थ खैरलांजी. हे टाळण्यासाठी दलित आणि ओबीसींनी एकत्र यायला हवं. आज रिपब्लिकन आंदोलन आणि शिवसेना त्यांचं प्रतिनिधित्व करतेय. म्हणून शिवशक्ती भीमशक्ती एकत्र यायची गरज आहे. त्याचं राजकारण यशस्वी होईल किंवा नाही, माहित नाही. पण त्यातून महाराष्ट्रात जातीय सलोखाही येऊ शकेल. शिवाय काही बलिष्ठ जातींच्या माजाचा नंगानाच वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू आहे. त्याला वेसण बसू शकेन. कदाचित हे सारं केवळ विशफुल थिंकिंगही असू शकेल. आज नवशक्तित माझ्या आठवड्याच्या कॉलमात छापून आलेला हा लेख.