Thursday 19 October 2017

शूद्रसुक्ताची लढाई

गोव्यात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी? गोवा वरून इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण घातले.

वाघ भाजपचे आमदार झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी भूमिका ठामपणे मांडत राहिले.

Monday 16 October 2017

वेड्यांच्या बाजारातली टीवी नाईनची जगबुडी

माझे सध्या दोन पेपरांत कॉलम सुरू आहेत. एक आठवडा दिव्य मराठीत आणि दुसऱ्या आठवड्यात गोवन वार्ता. काही महत्त्वाचा विषय असला की दोन्हीकडे एकाच विषयावर लिहितो. दोन्हीकडचे वाचक वेगळे आहेत. त्यामुळे त्यानुसार बदल करावे लागतात. त्यामुळे विषय एकच असला तरी दोन वेगवेगळे लेख होतात. त्याच्या प्रेक्षकांचा प्रतिक्रियेचा पॅटर्नही वेगळा आहे. गोव्यातल्या लेखांवर व्हॉट्सअपवर चर्चा जास्त होते. तर दिव्य मराठीतल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभर फोन येतात.

दिव्य मराठीतल्या लेखावर फोन आले नाहीत, असं कधीच झालेलं नाही. किमान २० -२५ फोन तरी येतातच. ईमेल मेसेज वेगळे. ८ ऑक्टोबरचा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. टीवी नाइनने २३ सप्टेंबरला जगबुडीची जत्रा भरवली होती, त्यावर लिहिलं होतं. टीवी नाइनचं नाव लेखात दिव्य मराठीने काढल्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ वाचकांना कळला नसावा. प्रेक्षकसंख्येची आकडेवारी येण्यासाठी एक आठवडा थांबावंच लांगणार होतं. त्यामुळे उशीरही झाला असावा. टीव्ही पत्रकारिता हा विषय लोकांना फार सिरियस घेणं सोडलं असावं. लेखही चांगला उतरला नसावा. पण कधीच फोन न करणाऱ्या पाच सहा जणांनी आवर्जून केला होता. त्यात स्वाभाविकपणे पत्रकार होते. माझा मित्र अविनाश दुधेही होता.

लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटो अथवा न वाटो, मला कायम वाटत आलंय की आपण पत्रकारितेविषयी लिहीत राहायला हवं. मी तसं लिहीत बोलत आलोयही. आम्ही पत्रकार जगाविषयी लिहितो, पण आपल्याविषयी लिहीत नाही. त्यामुळे संवादाच्या या धंद्याविषयी कोणताही संवाद होत नाही. आता सोशल मीडियामुळे थोडाफार संवाद होतो. पण तोही तुटकच.
अशा टीआरपीच्या खेळांचा खूप वाईट परिणाम चॅनलांमधे काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असतो. वरवर त्याचं समर्थन करावंच लागतं. पण मुळात पत्रकार म्हणून घडलेल्या मनोभूमिकेच्या विरोधात असतं सगळं. मन खात राहतं. इतर अनेक स्ट्रेस असतातच. पण हा स्ट्रेसही कमी नाही. तरुण वयात अकाली निधन झालेल्या आमच्या अनेक मित्रांचा बळी या स्ट्रेसने घेतलाय. त्याची पत्रकारितेतल्या धुरिणांनी चर्चा करायला हवी.

Tuesday 10 October 2017

१२०८ बेस्ट सेलर


गुरुनाथ नाईकांच्या आजारपणाची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियातून त्यांना मदत करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना चांगली मदत केलीय. या मदतीमागे नाईकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेल्या कामाचीही पार्श्वभूमी कारणीभूत असू शकते. या सगळ्याच्या बातम्या येत होत्या. ते सगळं वाचताना मला सारखी सारखी त्यांची `गाठभेट` आठवायची. गोव्यात `गोवादूत`ला असताना मी `गाठभेट` नावाचा कॉलम चालवायचो. एखाद्या मान्यवराला भेटून त्याचं व्यक्तिचित्र लिहायचो. मजा आली त्यात.

गुरुनाथ नाईकांचीही `गाठभेट` चांगली झाली. आमच्या पुष्पराज पोपकरांकडून मुद्दाम तो मजकूर मागवून घेतला. या कॉलमात फक्त पांढरी बाजू असायची. परिचय करून देण्यापलीकडे यात काही नसायचं. नाईकांच्या कौटुंबिक गुंतागुंतीविषयी मला नंतर अनेकांनी मुद्दामून माहिती दिली. मला त्यात रस नव्हता. मी त्यांच्या कादंबऱ्या फक्त पाहिल्यात. कधीच वाचल्या नाहीत. एक कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या जडणघडणीत मला इंटरेस्ट होता. तेच फक्त या लेखात आहे. गेल्या पिढीतल्या पत्रकारांची होणारी फरफट त्यात आलीय. या लेखानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार करून मदत दिली होती.