Monday 29 November 2010

बंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही !

आज जगन रेड्डीनं बंड केलं. त्याची एकूण स्टाईल बघितली की आपल्याला राज ठाकरेंच्या बंडाची आठवण होते. पण जगनचं बंड खूप मोठं आहे. वीस ते पंचवीस खासदार आजच त्याच्या खिशात आहे, असं म्हणतात. राज एकही खासदार निवडून आणू शकलेले नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे, ते दोघांचंही वय ३८ आहे. फक्त हे दोघेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अगदी महात्मा गांधीही... यांच्यात हाच एक समान दुवा आहे. पस्तिशीचा. ही यादी यशवंतरावांपासून कांशीरामांपर्यंत कितीही लांब खेचता येईल. या प्रत्येकाच्या बंडाची जातकुळी निराळी. त्यांच्यातला समान दुवा त्यांनी ज्या वयात बंड केलं त्याचाही आहे. ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. राजच्या बंडाच्या वेळेस म्हणजे डिसेंबर २००५ ला मी लिहिलेला हा लेख. बंड पस्तिशीचं.

Saturday 20 November 2010

जुनी विटी, नवं राज्य

पृथ्वीराज चव्हाणांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला मी मोठ्या उत्साहाने गेलो होतो. त्यात त्यांचा उत्साह दिसला होता. मंत्रिमंडळाची रचना करण्यात हा उत्साह मावळलेला दिसतोय. असं काहीसं माझं निरीक्षण आहे. नवशक्तिच्या माझ्या आठवड्याच्या कॉलमसाठी पाठवलेला हा लेख त्यावरचाच. लेखाचं नाव म्हणे स्वच्छ आणि समतोल मंत्रिमंडळ.

Wednesday 17 November 2010

गांधींजींना तुकोबाराया भेटले होते

आज कार्तिकी. एक जैतुनबीवरचा लेख टाकलाय. हा आणखी एक लेख. मटाने ३० जानेवारी २००९ ला एडिट पेजवर छापला होता. या गांधी पुण्यतिथीनंतर दुस-याच दिवशी तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती होती. गांधी आणि तुकारामांचं अद्वैत मला सर्वात आधी अनुभवायला मिळालं ते तुकाराम डॉट कॉम मुळे. मला वाटतं २००८च्या आषाढीत मी त्यावरूनच वारीच्या काळात गांधीजींचा तुकाराम ही सोळा लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर लिहिली होती. 

खुदा पंढरीचा

आज कार्तिकी एकादशी. आजच बकरी ईद. आज आम्ही मी मराठीवर एक स्पेशल केलंय, खुदा पंढरीचा. मुस्लिम मराठी संतकवींची परंपरा टीवीवर दाखवण्याचा एक प्रयत्न केला. थोडं वेगळं डॉक्यमेंटेशन झालंय ते, आजवर न झालेलं. कबीर, श्रीगोंद्याचे शेख महंमद, जैतुनबी, राजूबाबा शेख अशांवर पॅकेज आहेत त्यात. काम करताना मजा आली. एकादशी आणि उपवास साजरा झाला म्हणायचा. आणि ईदही. 

Friday 12 November 2010

चव्हाण ते चव्हाणः एका बंडाचा प्रवास


हा माझा एकदम ताजा फडफडीत लेख. उद्या नवशक्तीत छापून येईल. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमत्री बनले. त्यांची मंत्रालयात झालेली पहिली पत्रकार परिषद ऐकायला मुद्दामून गेलो होतो. नारायण राणेंचं मंत्रिपद बहुदा कापलं जाणार, ही त्यात मिळालेली बातमी होती. पण त्याच्याही पुढेमागे पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून बघताना खूप काही डोक्यात सुरू होतं. यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात कराडमधे राहून राजकारण होऊ शकतं हे आनंदराव चव्हाणांनी दाखवून दिलं होतं. त्यांच्याविषयी थोडं मांडावसं वाटत होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या धारेविषयी लिहिलंय. वाचून बघा जमल्यास. नवशक्तित छापून आलेला हा लेख  पुढे कटपेस्ट केलाय.

Sunday 7 November 2010

ओबामा मुंबईत आलेत का ?

भाऊ पाध्येंचं 'होमसिक ब्रिगेड' वाचलंय का? नसेल तर वाचाच. भाऊने लिहिलेलं कुठेही कसंही मिळालं तर वाचायलाच हवं. कारण त्याच्याएवढ्या ताकदीचा लेखक मराठीत मी तरी दुसरा वाचलेला नाही. होमसिक ब्रिगेडमधे त्याने हुमायू मकब-याचं छान वर्णन केलंय. त्यामुळे मी दिल्लीत असताना तो एक आकर्षणाचा विषय होता. मी ई टीवीतून दीडेक वर्षं दिल्ली प्रतिनिधी होतो. अनेकदा तिथे गेलोय मी. आज ओबामाही गेलेत तिकडे. त्यांच्या भारतभेटीतला तो एकच स्पॉट मला आवडला. बाकी बकवास. म्हणून एक आर्टिकल लिहून टाकलं. नवशक्तित छापून आलं होतं ते. 

Thursday 4 November 2010

भय्येः मुंबईतले आणि ऑस्ट्रेलियातले

नम्रता रंधवा म्हणजेच निकी हॅले. त्या साऊथ कॅरोलिना नावाच्या अमेरिकेतल्या प्रांताच्या गवर्नर बनल्या. आपल्याला आनंद झाला. एक भारतीय मुळाची बाई अमेरिकेत एवढ्या मोठ्या पदावर निवडून आली. मग संजय निरुपम खासदार झाल्याचं आपल्याला दुःख का होतं? लंडनमधले भारतीय इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट मॅच मधे तिरंगा कसा फडकवतात, मला कधीच कळलं नाही.

सचिन मला भेटला

जवळपास वर्षभरापूर्वी लिहिलेला हा लेख. सचिनवरचा. सचिन, आपला सचिन तेंडुलकर.आज कदाचित त्याची टेस्टमधली पन्नास शतकं पूर्ण होतील.  माझ्या अनेक मित्र खटपटी लटपटी करून सचिनला भेटलेत. पण मला नाही वाटलं कधी त्याला भेटावंसं. थोडा प्रयत्न केला असता तर अशक्य नव्हतंच. पण नाही तसं करावंसं वाटलं. 


कारण, माहीत नाय. कदाचित जेव्हा त्याला खेळताना टीवीवर बघितलं की त्याला भेटल्यासारखंच वाटतं. खरंच. त्याच्याविषयी बोलताना. गप्पा मारताना तो भेटत असतो. आतून भेटत असतो. सचिनचे रेकॉर्ड झाले. त्याला पुरस्कार मिळाला की एकमेकांना काँग्रॅट्स करणारी माझी पिढी त्याला स्वतःपेक्षा वेगळं मानतंच नाही. काहीतरी गेल्याजन्माची पुण्याई म्हणूनच सचिन खेळत असताना मी जिवंत आहे, असं वाटणारे माझ्यासारखे कितीतरी. मी नेहमी राजकारणावर लिहिणारा. त्यामुळे सचिनवर लिहिण्याचा फारसा प्रसंग आला नाही. पण एकदा आयपीएल टू मधे मुंबई इंडियन्स हरली तेव्हा सडकून मुंबई टाइम्सची लीड लिहिली होती. पण आयपीएल थ्री मधे त्याने नेहमीप्रमाणे असं लिहिणा-यांचे दात तोडले. आपले दात तुटले याचं खूप बरं वाटलं होतं. कारण आपला सचिननेच तोडले होते ते.  

हॅपी दिवाळी!

पाऊस येतोय हे इतरांना चातकामुळे कळत असेल, आम्हा मुंबईकरांना नालेसफाईमुळे कळतं. आणि दिवाळी आलीय ते  बोनसच्या मोर्च्यांनी. या वाक्यानं जवळपास तेरा चौदा वर्षांपूर्वी मी एका लेखाची सुरुवात केली होती. पण आता बोनसचे मोर्चे निघत नाहीत. पण दिवाळी आलीय हे सांगायला सेल असतात, पोस्त मागणारे असतात. पोस्त या विषयावर गेल्या वर्षीच्या दिवाळीत एक लेख लिहिला होता. मॉसची ती कवर स्टोरी होती. मुंबई टाईम्सच्या नेहमीच्या  पठडीपेक्षा वेगळी अशी मांडणी होती. पण त्यादिवशी खूप एसेमेस आले वाचकांचे. लेख आवडल्याचं खूप जणांनी आवर्जून सांगितलं. दिवाळीत आणखी काय पायजे.