Monday, 7 November 2011

आणखी सालं काय हवं?


काल कार्तिकी एकादशी झाली. कोकणातले वारकरी पाऊस आणि भाताच्या शेतीमुळे परंपरेने आषाढीपेक्षा कार्तिकीला पंढरीला जातात. मला माहीत आहे तोवर माझी आजी नियमित कार्तिकी करायची. ती थकल्यावर आई वडील नेमाने कार्तिकी करू लागले. पण एकादशीच्या जत्रेची गर्दी झेपत नाही म्हणून दिवाळीच्या आगेमागे त्यांची कार्तिकी साजरी होऊ लागली. चारेक वर्षांपूर्वी पप्पांना पंढरपूरलाच माइल्ड हार्ट अटॅक आला. तेव्हापासून गेली तीन वर्षं आम्ही, म्हणजे मी आणि मुक्ता, दोघे कार्तिकीला जातोय.

दोन वर्षांपूर्वी आमची पहिली कार्तिकी होती. रिझर्वेशन होतं, पण ठाण्याला रेल्वेरुळांवर पाण्याच्या पायपांचा पूल पडल्याने अचानक सगळ्या ट्रेन रद्द झाल्या होत्या. म्हणून सकाळच एस्टीने जायचं ठरवलं. त्यामुळे थेट पंढरपूरला न जाता देहू आळंदी करायची ठरवली. आमचा रूद्र सोबत होताच. पहिल्यांदाच असं ओळीने देहू आळंदी आणि पंढरी करणार होतो. चार दिवस खूप आनंदात गेले. काय ठरवलं काहीच माहीत नाही. पण या चार दिवसांत नोकरी सोडायचा निर्णय झाला आपोआप. महाराष्ट्र टाइम्समधे मानाच्या मेट्रो एडिटर पदावर काम करत होतो. कॉलम सुरू होता. तसं काहीच कमी नव्हतं. पण मनासारखं काम करता येत नव्हतं. परतून घरी आलो. सकाळी नाश्त्याला बसल्यावर बायकोला हळूच सांगितलं. आज नोकरीचा राजीनामा देतोय. कंटाळा आलाय. ती लगेच हो म्हणाली. ऑफिसात आलो. रोजची कामं केली. संपादकांशी बोललो. राजीनामा लिहून दिला. खांद्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटलं.

आजही त्या निर्णयाचा खूप आनंद आहे. नोकरी सोडली तेव्हा पुन्हा नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं. काय करायचं याची मोठी यादी बनवली होती. पण ती कामं करता येतील अशी नोकरी मिळाली तर चांगलंच होतं. अशावेळेस माझा जुना दोस्त रवी तिवारी देवासारखा धावून आला. मी मराठीच्या बातम्यांचा कार्यकारी संपादक म्हणून जॉइन झालो. त्याला पावणेदोन वर्षं झाली. आजवरच्या करियरमधली आणि वेगवेगळ्या नोक-यांतली ही सगळ्यात आनंदाची वर्षं होती. खूप उपद्व्याप करता आले. त्यातला प्रबोधनकार डॉट कॉमचा उपद्व्याप यशस्वी झाला. मी मराठीच्या बातम्यांसाठी काही चांगलं करता आलं. नवशक्तितला कॉलम आणि ब्लॉग नियमित लिहिला गेला. पण त्याशिवायचे जवळपास सगळे उपद्व्याप आतबट्ट्याचे ठरले. पण या सगळ्या उपद्व्यापांनी खूप काही दिलं. खूप खूप अनुभव दिले. अनेक नवे मित्र भेटले. जुने मित्रं रिफ्रेश झाले. घराला खूप वेळ देता आला. आई वडिलांची इच्छा म्हणून गावी एक छोटं घर बांधलं. अनेक अंगांनी विकसित करणारा अनुभव होता ही दोन वर्षं. मी मराठी ऑफिसात गीता, संतोष, दीपक, भाग्यश्री, नीतिन, शिल्पा, शशी, नेहा अशी कितीतरी आपली माणसं भेटली. रवी तिवारी, श्रीरंग गायकवाड, अजय कुमार, नरेंद्र बंडबे, प्रेम शुक्ला, इम्तियाज खलिल अशा जीवाभावाच्या सोबत्यांसोबत घालवलेले तास्नंतास समृद्ध करून गेले. या सगळ्याचं श्रेय रवी तिवारीलाच द्यायला हवं. तो नसता तर काहीच झालं नसतं.

सगळं छानच सुरू होतं. कंपनीत थोड्या आर्थिक अडचणी होत्या. पण ते माझ्यासाठी फारसं काही चिंतेचं नव्हतं. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक विनायक पात्रुडकर यांचा फोन आला. मी ट्रेनमधे बसलो होतो. मी पुढारीत चाललोय, तुम्हाला माहीत असेलच, त्यांनी विचारलं. मला खरंच माहीत नव्हतं. तुम्ही माझ्याजागी नवशक्तित यायला इच्छुक आहात का. असेल तर आपण प्रयत्न करूया. मी एक दिवस मागून घेतला. ऑफिसात थोड्या अडचणी सुरू असल्यामुळे रवीशी बोलणं आवश्यक होतं. त्यानंतर मी पात्रुडकरांना फोन करून हो कळवलं. भेटीगाठी झाल्या. मधे महिनाभर तरी निघून गेला. त्या काळात अचानक माझ्याकडे आणखी दोन ऑफर आल्या होत्या. पुन्हा अचानकच नवशक्तितून फोन आला. आमचं फायनल झालंय. पैशांचं बोलण्यासाठी या. चांगला पगार दिला. मला ऑफर लेटर मिळालं. मी इथला राजीनामा दिला.

आज संध्याकाळपासून मी नवशक्तिचा संपादक म्हणून रुजू होतोय. ७७ वर्षं जुना पेपर. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या जडणघडणीवर स्वतःचं योगदान देणारा पेपर. तिथे माझ्यासारखा अवघ्या ३४ वर्षांचा पोरगा संपादक बनणार आहे. हे अद्भूत आहे. अनेक मोठमोठे लोक या खुर्चीवर बसले होते. मोठी जबाबदारी आहे. माझे खांदे तेवढे मजबूत नाहीत. पण यापैकी कशाचाही विचार न करता नवं आव्हान स्वीकारण्यासाठी चाललो आहे. सगळा पेपर हातात मिळणार आणि नवी माणसं भेटणार याचाच आनंद आहे. आजवर खूप नोक-यांची धावपळ केली. पण आता इथे काही वर्षं थांबायचंय. मनासारखं काम करायचंय. लोक वर्षानुवर्षं लक्षात ठेवतील असं काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी तुमच्या सगळ्या मित्रांचं पाठबळ हवंय. त्याशिवाय हे शक्य नाही.

नवशक्तित चाललोय म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर भाऊ पाध्ये येतोय. त्याच्यावरच्या ब्लॉगवर त्याचा एक फोटो आहे. पाय टेबलावर टाकून नवशक्तिच्या ऑफिसात बसलेला भाऊ. भाऊ आपला खूप सगळ्यात आवडता लेखक. त्याने जगायचं नवं भान दिलं. लिहायचा नवा हात दिला. तो जिथे अकरा वर्षं काम करत होतो. तिथे संपादक बनून चाललोय. आणखी सालं काय हवं?

Wednesday, 26 October 2011

पैसा सिर्फ पैसा नही है


आज लक्ष्मीपूजन. दिवाळीतला हा दिवस मला लहानपणापासून रिकामा रिकामा वाटत राहिला. म्हणजे नरकचतुर्दशीला कारटं फोडणं. पहिली आंघोळ. पाडव्याला साल मुबारक. भाऊबीजेला ओवाळणं ओवाळणी. पण लक्ष्मीपूजनाला आमच्या घरात काही घडत नसायचं. घरात लश्र्मीची पूजा झालेली मला तरी आठवत नाही. कदाचित घरात पुजण्याइतकी लक्ष्मी नसल्यामुळे असेलही कदाचित. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या काही आठवणी माझ्याकडे तरी नाहीत.

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला भलतीच गोष्ट आठवली. एक जाहिरात. आयएनजी लाईफ इन्शुरन्सची. 'पैसा सिर्फ पैसा नही हैं.' या जाहिरातीशी माझ्या एका कॉलमाच्या आठवणीही जोडलेल्या आहेत. मुंबई टाइम्समधे मीच माझा एक कॉलम सुरू केला होता. 'अॅड्यात्म' नावाचा. नव्या पानांमधे काहीतरी मोटिवेशनल मजकूर हवा होता. म्हटलं आपणच लिहूया. ही कल्पना बरेच दिवस डोक्यात होती. सारंग दर्शने फार पूर्वी काही दिवस मुंटामधेच काही दिवस ताओ ताऊ या टोपणनावाने छोटे छोटे तुकडे लिहायचे. ते डोक्यात होतं. पण हे स्पिकिंग ट्री पेक्षाही वेगळं हवं होतं. अॅड्यात्मला पर्याय नव्हता.

कधीतरी असाच अध्यात्म या शब्दाशी अध्यातमध्यात... अर्ध्यात्म... असं मनातल्या मनात खेळता खेळता अॅड्यात्म या शब्दापर्यंत आलो. नवा शब्द भेटला. मजाच आली. नागडं होऊन युरेका युरेका म्हणत नाचणंच बाकी होतं. टीव्हीवरच्या जाहिरातींनी आजवर आपल्याला खूप काही दिलंय. नवे विचार. वेगळ्या मांडण्या. बरंच काही. टीव्हीवरच्या बातम्या कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच आवडीने बघत आलोय. अशा जाहिरातींविषयी, त्याच्या टॅगलाईन पंचलाईनींविषयी सांगताना अध्यात्म मांडता येईल का? हे शोधायचं होतं. म्हटलं मजा येईल. करून तर बघुया. लोकांचा रिस्पॉन्स नाही आला तर करू बंद. त्यात काय.

Wednesday, 19 October 2011

वेड्यांचा सत्कार होतो आहे


अचानक ठरवलं आणि परवा चौदा तारखेला अमरावती एक्स्प्रेस पकडली. पंधराला सकाळी अमरावतीला पोहोचलो. अमरावती, मला आवडलेलं खूप छान शहर. निमित्त होतं चंदूभाऊंचा, चंद्रकांत वानखडेंचा एकसष्टीनिमित्त सत्कार. शहरातला सगळ्यात मोठा हॉल तुडुंब भरला होता. अख्ख्या विदर्भातून साधे साधे लोक आले होते. त्यात कार्यकर्तेच खूप. सगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या संघटनांचे. दिवाकर रावते आणि अनंत दीक्षित यांची भाषण सोडून कार्यक्रम अप्रतिम झाला. मायाताई, अमर हबीब, बच्चू कडू आणि चंदूभाऊ अशा सगळ्यांनीच छान भाषणं झाली. जीव लावण्याचाच तो सोहळा होता. समृद्ध करणारा दिवस होता तो.

उद्धव ठाकरे येणार होते. ते येऊ शकले नाहीत. कारण माहीत नाही. पण बरं झालं ते आले नाहीत ते. नाहीतर तुडूंब गर्दीचं श्रेय त्यांना गेलं असतं. चंदूभाऊंसाठी अबालवृद्धांची गर्दी हेवा करणारी होती. आज त्यांच्याकडे रुढार्थाने कोणतंही प्रतिष्ठेचं पद नाही. तरीही लोक आले. लोहचुंबकाने आकर्षून घ्यावं, तशी लोकांची रीघ होती. चंदूभाऊंच्या कृतार्थ आयुष्याची ती पावती होती. एका भणंग कार्यकर्त्यासाठी आणि ध्येयनिष्ठ पत्रकाराला आणखी पाहिजे तरी काय?

Wednesday, 21 September 2011

महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार


आपल्या सगळ्यांची वेबसाईट prabodhankar.com च्या उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.

गेल्या वर्षभरात आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे.गांधर्ववेद प्रकाशनाने महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य सरकारच्यालोकराज्यया मासिकाच्या वाचन विशेषांकात आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.

Saturday, 10 September 2011

हे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना?


आम्ही अस्सल मुंबईकर. पण शहरातले सार्वजनिक गणपती बघायला फिरायची पद्धत आमच्या घरात नाही. कारण घरातच गणपती. घरचा गणपती गेला तरी वाडीतला सार्वजनिक गणपती असायचा. त्याची रोजची पूजा, नैवेद्य, आरती हे आमच्या घरातून व्हायचं. त्यामुळे अकरा दिवस घरातच लगबग असायची. आम्ही घरातले सगळे मुंबईभर फिरायचो ते देवी बघायला. आजही जातो. 

त्यामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली याविषयी ऐकलं भरपूर होतं. पण प्रत्यक्षात दर्शनाला गेलो ते टीव्हीत पत्रकारिता सुरू केल्यावर. ईटीव्हीत असताना गणपतीत दिवसभर घरी राहता यावं म्हणून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो. तेव्हाच म्हणजे मला वाटतं २००० किंवा २००१ साली पहिल्यांदा राजा आणि गणेशगल्लीच्या दर्शनाला कामाचा भाग म्हणून गेलो. मी पहिल्यांदा राजाकडे गेलो तेव्हा दर्शनासाठी रांग नव्हतीच. जी होती ती नवसाचीच रांग. गणेशगल्लीत मात्र देखावा बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती. पण हळूहळू सगळंच बदलत गेलं. लालबागचा राजा गर्दीचा राजा बनला. साधारण २००५ आणि ०६ ला गर्दीत चेंगरत दर्शनाला जावं लागलं होतं. त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत लांबून दर्शन घेण्याचा सोपा मार्ग निवडला. दोनेक वर्षांपूर्वी दर्शनाला गेलो आणि दर्शन न करताच परत आलो होतो. हे सगळे बदल डोळ्यासमोर घडताना बघत होते. माझे मीडियातले मित्रच हे बदल घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावत होते. तेही जवळून बघत होतो.

Saturday, 3 September 2011

बाप्पा बदलले, आपण कधी बदलणार?


आठवड्याचा कॉलम गणपतीबाप्पावर लिहायचं हे नक्कीच होतं. कारण आसपासच्या वातावरणाला टाळून काही लिहावं असं मला नाही वाटत. गणपती हा आदर्श नेत्याचं प्रतीक कसा आहे, हे लोकपालच्या पार्श्वभूमीवर लिहायला बसलो होतो. पण लिहिता लिहिता भलतच लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडा सामाजिक अंगाने मांडणी करायचा प्रयत्न केलाय. पण तो तोकडा आहे. कारण ती फक्त वरवरची निरीक्षणं आहेत. त्याहीपेक्षा अधिक अभ्यासाने याकडे पाहायला हवंय. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाने देवतांमधले बदल कसे घडले हे सर्वसामान्य मराठी माणसाला समजावून सांगितलं. ते इतिहासात जसं शोधता येतं. तसं काही वर्तमानात शोध करता येऊ शकेल का, या अंगाने हा प्रयत्न झालाय. मला वाटतं बाप्पा बदलताहेत. पण त्याचे भक्त आपण बदलतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

Monday, 29 August 2011

इथे गांधीजी भेटतात अधूनमधून


अण्णा किती यशस्वी झाले. त्यांचं जनलोकपाल खरंच येणार का. त्यामुळे भ्रष्टाचार खरंच संपेल का. हे सारे प्रश्न माझ्यासाठी तरी फिजूल आहेत. खरं सांगायचं तर मला अण्णांचं कौतुक फारसं नव्हतंच. आताही इतरांइतकं नाही. तरीही मला त्यांचं आंदोलन महत्त्वाचं वाटलं. ज्यांना स्वतःशिवाय काहीच माहीत नव्हतं असे लाखो तरुण वंदे मातरम म्हणत रस्त्यावर उतरले. मला वाटतं सगळं भरून पावलं. मी गेली काही वर्षं राजकारणी, प्रशासनाची यंत्रणा तसा जवळून बघतोय. दिल्लीतही दीडेक वर्षं राहिलोय. तो अनुभव जमेस धरून मला वाटतं या आंदोलनानं खूप काही मिळवलंय. 

त्यामुळेच मी थोडा चक्रावलोयसुद्धा. आपण सगळे ज्याला फारसं महत्त्वही देत नव्हतो, असा एक माणूस देशात एवढी जागृती घडवतो. आपल्या डोळ्यासमोर सगळं घडतं, पण आपल्याला कळतही नाही. हे धक्कादायक होतं आणि आहे. त्यातून मी माझ्यापरीनं अण्णांच्या चमत्काराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा फक्त त्या शोधातला एक छोटासा कोन आहे. पण महत्त्वाचा आहे. मी त्यांच्यातला गांधीजी शोधायचा प्रयत्न केला. तो लेख पुढे कटपेस्ट करतोय. 

Tuesday, 23 August 2011

मीडियाचं काय चुकलं?


अण्णा हजारे आगे बढो. वंदे मातरम. भारतमाता की जय. अशा आरोळ्या आमच्या घराबाहेर ऐकू आल्या. आमच्या वाडीत असे आवाज येतील असं वाटलं नव्हतो. कारण वाडीत जवळपास सगळ्यांना ओळखतो. इथे अण्णा कोणाला भावला? आमच्या वाडीतलीच पंधरा वीस पोरं. कुणीही बारा तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही. मी तोंडात बोट घालायचंच बाकी होतं.

रुद्र. माझा पाच वर्षांचा मुलगा. पहिलीत आहे. अजून स्वतःचं ढुंगण धुता येत नाही. परवा खेळता खेळता भारतमाता की जय ओरडला. अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, हे ऐकून मला धक्काच बसला. अण्णा हजारेंचं आंदोलन सुरूय तेव्हापासून त्याचे भाईआजोबा रोज न्यूज चॅनल लावून बसतात. त्याचा परिणाम असावा. तुला अण्णा हजारे माहिती आहेत का, मी विचारलं. रुद्र हो म्हणाला. कसे दिसतात, मला अजूनही शंका होती. टोपी घालतात, तो म्हणाला. कोणत्या रंगाची, माझा प्रश्न. सफेद त्याचं उत्तर. माझा पुढचा प्रश्न येण्याआधी त्याने टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे अण्णा दाखवले.

हे घडायच्या आधी लिहिलेला एक लेख ब्ल़ॉगवर टाकतोय.

Saturday, 6 August 2011

माझे वडील भारताचा द्वेष का करतात?


आंतरराष्ट्रीय वगैरे विषयांवर मी फारसं लिहित नाही. मला त्यातलं काही कळतही नाही. राष्ट्रीय विषयांच्या भानगडीतही फारसा पडत नाही. आपल्या आसपासच्या विषयांवर आपण जमिनीवरचं वास्तव स्वतः पडताळून पाहू शकतो. तसं आंतरराष्ट्रीय विषयांवर करता येत नाही. रोजच्या पेपरांतल्या बातम्या वाचल्या तरी बहुदा त्याची एकच बाजू आपल्यासमोर येत असते. पण भारत पाकिस्तान विषयावर मी बहुदा पहिल्यांदाच लिहिलं. त्याचं कारण होतं आतिश तासिर. मी त्याच्याविषयी पूर्वीही वाचलं होतं. त्याचं लाईफ आपल्याला खूप आवडलं. त्याचं लेखनही. आता त्याच्या एका लेखावर मी लिहिलंय. त्याचा लेखच मराठीत अनुवाद करून टाकलाय. बघा वाचून. 

काही लोकांचं जगणं हे कादंबरीच असते. आतिश तासिरचं तसंच काहीतरी. त्याच्या आई इंग्रजीतल्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंग. वडील पाकिस्तानातले ज्येष्ठ राजकीय नेते सलमान तासिर. आई भारतातली तर वडील पाकिस्तानातले. पण आतिशचा जन्म लंडनचा. प्राथमिक शिक्षण आईबरोबर दिल्लीत. पण लेखक पत्रकार म्हणून करियर इंग्लंडमधलं. त्याने सादत हसन मंटोच्या कथा उर्दूतून इंग्रजीत आणल्यात. पुढे टाइम मॅगझिनमधलं त्याचं लिखाण गाजलं. त्याची इंग्लंडच्या राजघराण्यातली गर्लफ्रेण्डही चर्चेत होती. पण त्या सगळ्यापेक्षा त्याचं पुस्तक गाजलं. स्ट्रेंजर टू हिस्टरीः अ सन्स जर्नी टू इस्लामिक लँड्स. त्यात पाकिस्तानात राहणा-या त्याच्या वडिलांच्या शोधाचा प्रवास होता. त्याहीपेक्षा त्यात होता तो या शोधादरम्यान त्याच्या स्वतःच्या मानसिकतेचाही प्रवास.

Wednesday, 3 August 2011

मनसे + भाजप = ?


सध्या राज ठाकरे गुजरातेत पोहोचलेत. नरेंद्र मोदींचे ते सरकारी पाहुणेही आहेत. मनसे आणि भाजप या नात्यावर जितकं लिहावं तितकं कमीच. एक लेख दोन आठवड्यांपूर्वीचा.

कधी, कुठे आणि कसं बातम्यांत राहायचं ते राज ठाकरेंना बरोबर कळतं. आणि त्यातून शिवसेनेची खोडी काढायची असेल तर मग पाहायलाच नको. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी केलेला विकास समजून घेण्यासाठी आखलेला आगामी दौरा असो, किंवा नाशकात राजनाथ सिंग यांच्याबरोबर एका व्यासपीठावरून भाषण देणं असो. गुजरातच्या दौ-याच्या बातम्या ब-याच बनत आहेत. पण राजनाथ सिंग यांच्यासोबतचा कार्यक्रम एकूण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.