काल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश
कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा
कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण
भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते
अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.
मला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच
होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा
रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं
वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात
असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम
म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला
ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी
इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण
सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या
तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही
लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता.
त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.