माझी जीवनगाथा या आत्मचरित्रातून मला प्रबोधनकार भेटले. मला एक खजिनाच भेटला. त्यात प्रबोधनकारांनी आपल्या अनेक दोस्तांचीही गाठ घालून दिलीय. श्रीधरपंत टिळकही त्यातलेच एक. लोकमान्यांचा हा बंडखोर मुलगा अवघ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली आत्महत्या करतो, हे वाचून धक्का बसला. यात वैचारिक, भावनिक मोठाच संघर्ष. पण कधी त्यावर कुणी कादंबरी लिहिली नाही, कधी कुणी नाटक लिहिलं नाही. का?
मटाच्या वेबसाईटमधे आम्ही सगळ्यांनी बहुदा १ ऑगस्ट २००७ ‘ग्लोबल टिळक’ हे सेग्मेंट केलं होतं. तेव्हा हरिलाल गांधींवरच्या ‘गांधी, माय फादर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. त्या धर्तीवर आम्ही श्रीधरपंतांविषयी ‘टिळक, माय फादर’ या नावाने काही लेख मांडले होते. त्याला जोरदार रिस्पॉन्स मिळाला. त्यात मी श्रीधरपंतांची ओळख करून देणारा लेख लिहिला होता. 'ओळख सिंहाच्या छाव्याची'. तो कटपेस्ट करतोय. आज टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त.