गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या ‘बातमीमागची बातमी’ या साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.
कसा काय आठवत नाही, पण चर्चेत ‘थ्री इडियट्स’चा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.
अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं? अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.