आंतरराष्ट्रीय वगैरे विषयांवर मी फारसं लिहित नाही. मला त्यातलं काही कळतही नाही. राष्ट्रीय विषयांच्या भानगडीतही फारसा पडत नाही. आपल्या आसपासच्या विषयांवर आपण जमिनीवरचं वास्तव स्वतः पडताळून पाहू शकतो. तसं आंतरराष्ट्रीय विषयांवर करता येत नाही. रोजच्या पेपरांतल्या बातम्या वाचल्या तरी बहुदा त्याची एकच बाजू आपल्यासमोर येत असते. पण भारत पाकिस्तान विषयावर मी बहुदा पहिल्यांदाच लिहिलं. त्याचं कारण होतं आतिश तासिर. मी त्याच्याविषयी पूर्वीही वाचलं होतं. त्याचं लाईफ आपल्याला खूप आवडलं. त्याचं लेखनही. आता त्याच्या एका लेखावर मी लिहिलंय. त्याचा लेखच मराठीत अनुवाद करून टाकलाय. बघा वाचून.
काही लोकांचं जगणं हे कादंबरीच असते. आतिश तासिरचं तसंच काहीतरी. त्याच्या आई इंग्रजीतल्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंग. वडील पाकिस्तानातले ज्येष्ठ राजकीय नेते सलमान तासिर. आई भारतातली तर वडील पाकिस्तानातले. पण आतिशचा जन्म लंडनचा. प्राथमिक शिक्षण आईबरोबर दिल्लीत. पण लेखक पत्रकार म्हणून करियर इंग्लंडमधलं. त्याने सादत हसन मंटोच्या कथा उर्दूतून इंग्रजीत आणल्यात. पुढे टाइम मॅगझिनमधलं त्याचं लिखाण गाजलं. त्याची इंग्लंडच्या राजघराण्यातली गर्लफ्रेण्डही चर्चेत होती. पण त्या सगळ्यापेक्षा त्याचं पुस्तक गाजलं. ‘स्ट्रेंजर टू हिस्टरीः अ सन्स जर्नी टू इस्लामिक लँड्स’. त्यात पाकिस्तानात राहणा-या त्याच्या वडिलांच्या शोधाचा प्रवास होता. त्याहीपेक्षा त्यात होता तो या शोधादरम्यान त्याच्या स्वतःच्या मानसिकतेचाही प्रवास.