Saturday, 19 February 2011

हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप, नक्की ना?

सचिन आज लवकर आऊट झाला. पण आता चिंता नाही. आठव्या नंबरपर्यंत आपली बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. अशावेळेस पाकिस्तानविरोद्धची टेस्ट आठवते. समोर एकामागून एक विकेट पडत होत्या. सचिन एकटा उभा होता. त्याने सेंच्युरीही केली. पण तो आऊट झाला. आणि जिंकण्यासाठी हवे असलेले वीस पंचवीस रनही पुढचे बॅट्समन करू शकले नव्हते.

आपल्या टीममधे किलर इन्स्टिंक्ट का नाही, असं तेव्हा आपण विचारायचो. कारण तो एकटाच टिच्चून खेळायचा. पण आता त्याचा खेळ बघत वाढलेली पिढी जन्माला आलीय. ती त्याच्यासोबत खेळतेय. म्हणून आज टीम इंडिया जे काही आहे, त्यात सचिनचा वाटा मोठा आहे.

फक्त त्याच्या टीममेंबरच कशाला सगळा भारत त्याच्यासोबत मोठा झालाय. तीनेक पिढ्यांनी तरी त्याला आपल्या घरातलाच एक मानलाय. त्याच्या आनंदात सगळा भारत खुष असतो. त्याच्या दुःखात सगळा भारत सुतकात असतो. इतकं प्रेम मिळेल असं कर्तृत्व बाकी कुणाचं आहे का? नाही आठवत नाव. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळो अथवा नाही, आपल्याला फारसं काही घेणंदेणं नाही. तो या सगळ्याच्या खूप पुढे पोहोचलाय. आणि त्याच्याबरोबर आपल्यासारखे त्याचे चाहतेही.

Thursday, 17 February 2011

वी फॉर वजायना


काल अचानक दादर स्टेशनावर वंदना खरे भेटल्या. त्यांच्या योनीच्या मनीच्या गुजगोष्टीचा ७५ वा प्रयोग होतोय. एकूण नव्या मराठी संस्कृतीसाठी हा एक मोठा ठेपा मानायला हवा. वजायना मोनोलॉगसारख्या अनेक दृष्टीने क्रांतिकारक नाटकाचा मराठीत प्रयोग यशस्वी होतोय. हे मराठी माणूस बदलतोय याचंच द्योतक मानायला हवं. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीच्या प्रवासात माझाही एक छोटासा वाटा आहे. खारीपेक्षाही लहान.

मुंबई टाइम्समधे असताना वॅलंटाइन डे च्या दिवशी काहितरी वेगळं करावं, असं डोक्यात होतं. आठवलं. १४ फेब्रुवारीलाच जगभर वी डे साजरा होतो. इथे वी म्हणजे वॅलेटाइन नाही तर वजायना. वजायना म्हणजे योनी. वजायना मोनोलॉगवर लिहायचं ठरवलं. वीकेण्ड पुरवणीची कवरस्टोरी करायचं ठरवलं. नेटवर सर्च केला. वी डे डॉट ऑर्ग नावाची वेबसाईटच मिळाली. त्यावर सविस्तर माहिती मिळाली. शिवाय यंदाच्या वी डे निमित्त जगभर कोणते कार्यक्रम होणार याची यादीही. त्यात मुंबईत वंदना खरे या नाटकाचा मराठी प्रयोग करणार असल्याची नोंद होती.

Tuesday, 15 February 2011

एका संपादकीय पानाचा मृत्यू


डीएनए पेपर मला आवडतो. परवडतो. मुंबईत तो लॉन्च झाल्यापासून ब-यापैकी नियमित वाचतोय. टाइम्सला त्याने दिलेली टक्कर मानायलाच हवी. त्याचा टवटवीतपणा ही सगळ्यात आवडीची गोष्ट. हा ताजेपणा त्यातल्या प्रयोगांमुळे. त्यांचा नवीन प्रयोग आहे, एडिट पेज- संपादकीय पान गायब करण्याचा. एका मोठ्या पेपराचं संपादकीय पान संपलं, पण त्यावर काही प्रतिक्रिया निदान मला दिसल्या नाहीत. आवडो न आवडो, त्यावर चर्चा घडायला हवी. म्हणून आठवड्याच्या कॉलमात त्यावर लिहिलंय. नवशक्तित छापून आल्यावर त्याला चांगल्या प्रतिक्रियाही आल्या.

पण डीएनएच्या या प्रयोगाचं स्वागत करायचं की विरोध, मला अजुनही कळलेलं नाहीय. तरीही लिहिलं. जे वाटलं ते लिहिलं. जबाबदार माणसांनी यावर अधिक चांगलं लिहायला हवंय. पण का शांत बसतात ही मोठी माणसं, नाही माहीत. आजूबाजूला एवढी स्थित्यंतर घडत असताना डोळे का बंद करून घ्यायचे, कळत नाही.

Tuesday, 8 February 2011

गणपती टॉप टेन


गणपतीबाप्पा वर मी लिहिलेला हा आणखी एक लेख. यात बाप्पाच्या गाण्यांवर लिहिलंय. मुंबई टाइम्स ऑन सॅटर्डे म्हणजेच मॉसची ही कवरस्टोरी होती. लिहिताना खूप लोकांशी बोललो होतो. छान गंमत आली. नवीन माहिती मिळाली.

यातही माझी बायलाइन दिली नव्हती. तरीही लेख आवडल्याचे दोन चार एसेमेस आले होते. काल माघी गणपती म्हणजे गणेशजयंती झाली. मुंबई कोकणात अनेक ठिकाणी घरात आणि सार्वजनिक गणपती आलेत. ते निमित्त हा लेख अपलोड करण्याचं.

Monday, 7 February 2011

बाप्पा आणि लीडरशीपचे फण्डे

आज गणपती बाप्पाचा हॅप्पी बर्थ डे. आपण आस्तिक असो, वा नास्तिक. सगळ्यांनी तो सेलिब्रेट करायलाच हवा. कारण बाप्पा हा फक्त देव कुठेय? तो आपल्याला रोजच जगताना कुठे कुठे भेटत असतो. कम्प्युटर वॉलपेपरांपासून पेपरांच्या मास्टहेडपर्यंत कुठेही.

खुदा नहीं न सही, आदमी का ख्वाब सही,
कोई हसीन नज़ारा तो हो, नज़र के लिए

असं दुष्यन्त कुमारनं लिहून ठेवलंय. ते मला बाप्पाच्या बाबतीत खूप खरं वाटतं. दरवर्षी तो घरी येतो. आठवडाभर पाहुण्यासारखा थांबतो. आवडीने पाहुणचार घेतो. जन्मभराचा सोबती होऊन जातो.

Monday, 31 January 2011

मुंबईचे भय्ये


परवा घरी हळदीकुंकू होतं. मोग-याचे गजरे आणायचे होते. त्यासाठी ऑफिस सुटल्यावर दादर गाठलं. श्रीरंगच्या बाईकची सोबत होती. गजरे बनत होते. श्रीरंग म्हणाला आईस्क्रीम खाऊया. मला सर्दी होती. तेवढ्यातच मला समोरून एक नत्थुलालसारख्या मिशांचा माणूस दिसला. मला आठवलं. तू मुछवाला महादेव बघितलायस, मी श्रीरंगला विचारलं. चल, गरम दूध पिऊया, मी त्याला कबुतरखान्याच्या कोप-यावर घेऊन आलो.

दुकानाचं नाव नाही लक्षात राहत. पण लहानपणापासून मी ते दुकान बघतोय. मध्यंतरी चहाशिवाय करमायचं नाही, म्हणून चहा कॉफी सोडली होती. तेव्हा दादरमधे आल्यावर दूध आणि जिलेबी खायला प्यायला तिथेच जायचो. तेव्हा गल्ल्यावर बसणारे काका आता हारवाल्या फोटोफ्रेममधे गेलेत. त्यांच्याच शेजारी जुन्या जमान्यातला शंकर महादेवाचा फोटो आहे. चेह-यावर फार काही तेज नसलेल्या साध्या माणसाच्या चेह-यातला आपला वाटणारा महादेव आहे त्यात. त्याला छान मिशापण आहेत. बाजुलाच रविवर्मा, मुळगावकर यांच्या प्रभावातला शंकर पार्वतीचाही फोटो आहे. त्यातले शंकर अगदी क्लिन शेव्ड आणि मस्त डोले शोले बिल्टवाले आहेत. महादेव ते शंकर असं ट्रान्झिशन तिथं अगदी समोर दिसतं.

Sunday, 30 January 2011

जय शिवभीम!

कुणाही धर्माने हिंदू असलेल्याला विचारावं, तुझा कुणी मुसलमान मित्र आहे का? उत्तर हो येतंच. त्याला पुढे विचारावं, कसा आहे तो? उत्तर येतं, चांगला, मेहनती, विश्वासू, सुसंस्कृत वगैरे. दुसरा कुणी मुसलमान दोस्त आहे का? उत्तर येतं, हो आहे. तोही चांगला असतो. असं आणखी दोन चारदा विचारूनही उत्तर तेच येतं. मग विचारावं, मुसलमान कसे असतात? उत्तर येतं, आक्रमक, विश्वासघातकी, असंस्कृत, वाईट वगैरे
.
तसंच कुणा धर्माने मुसलमान असलेल्याला विचारलं की हिंदूंबद्दल अशीच उत्तरं येतात.

Tuesday, 25 January 2011

बच्चू कडूंचं काय चुकलं?

मोठा गॅप झालाय. गेले नऊ दिवस नवा ब्लॉग टाकलेला नाही. थोडा गडबडीत होतो. हा उपास तोडायचा असं रोज ठरवायचो. जुळून येत नव्हतं. आज ठरवलेलंच. गेल्या आठवडयात हा लेख लिहिला होता. नवशक्तित छापूनही आला होता. विषय होता बच्चू कडू. 

मला वाटतं २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी पहिल्यांदा बच्चू कडूंचं नाव ऐकलं. त्याच्या प्रचाराचा धुमाकूळ एवढा होता की इथे मुंबईत त्याचे पडसाद ऐकायला मिळत होते. एखादा अपक्ष उमेदवारासाठी, तेही लोकसभेच्या निवडणुकीत असं घडणं, ही मोठीच गोष्ट. पुढे बच्चूभाऊची भाषणं विधानसभेत ऐकली. तिथे विझलेल्या लोकांच्या गर्दीत आगीची धग लक्ष वेधून घ्यायची.

Monday, 17 January 2011

निमित्त संक्रांतः सध्याच्या राजकीय संक्रमणांविषयी

सदराची भूक खूप असते. दर आठवड्याला काहितरी द्यावंच लागतं. कधीतरी काही सूचत नसतं. विषय असतात पण त्यावर थोडाफार हवा तेवढा तरी अभ्यास करायला वेळ नसतो. मूड नसतो. दुसरी अधिक महत्त्वाची कामं असतात. अशावेळेस पाटी टाकावी लागते. तो कामाचा भाग असतो. पण ती पाटीपण थोडी नीट टाकायला हवी.

पाटी टाकलेले दोन लेख आठवताहेत. एक मुंबईतल्या थंडीवर लिहिलेला. हा लेख लिहिण्याआधी काही तासच आधी राडिया आणि मीडियावर एक लेख लिहिला होता. त्यामुळे वेळेची आणि जागेची गरज म्हणून एक लेख नवशक्तिला लिहून पाठवला. तसंच परवा शुक्रवारीही झालं. असीमानंदाच्या कबुलीजबाबावर लेख लिहिल्यावर लगेचच काही तासांत लेख लिहायचा होता.

Friday, 14 January 2011

संक्रांतीचा उत्सव रोजच्या रोज



नवशक्तित ‘समकालीन’ हा कॉलम लिहायला लागल्याला एक वर्षं झालं. दर आठवड्याला हजारेक शब्दांचा लेख लिहिणं, हे काम माझ्यासारख्या आळशी माणसासाठी जास्तच जिकिरीचं होतं. पण हा एक वर्षाचा प्रवास आनंदाचा गेला. वेगवेगळे विषय हाताळायला मिळाले. हात लिहिता राहिला. नव्या विषयांचा अभ्यास झाला. नव्या माणसांशी ओळखी झाल्या. आणखी काय हवं?


मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड सुरू होता. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक महेश म्हात्रेंचा फोन आला. आमच्याकडे आठवड्याला कॉलम लिहिशील का, त्यांनी विचारलं. पहिल्या लेखाच्या इण्ट्रोत त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबई आणि सर्वच महानगरांना एक संस्कृती असते. ही संस्कृती त्या शहरातील समाजजीवनाचे दर्शन घडवत असते. जसा काळ बदलतो, तशी शहरे आणि त्यांची संस्कृतीही कात टाकते. या बदलांचा आढावा घेणारे, व्यासंगी पत्रकार सचिन परब यांचे हे नवे कोरे सदर.’ वाचून बरं वाटलं. व्यासंगी वगैरे म्हटल्यावर मूठभर मास चढलं.