Monday, 7 November 2011

आणखी सालं काय हवं?


काल कार्तिकी एकादशी झाली. कोकणातले वारकरी पाऊस आणि भाताच्या शेतीमुळे परंपरेने आषाढीपेक्षा कार्तिकीला पंढरीला जातात. मला माहीत आहे तोवर माझी आजी नियमित कार्तिकी करायची. ती थकल्यावर आई वडील नेमाने कार्तिकी करू लागले. पण एकादशीच्या जत्रेची गर्दी झेपत नाही म्हणून दिवाळीच्या आगेमागे त्यांची कार्तिकी साजरी होऊ लागली. चारेक वर्षांपूर्वी पप्पांना पंढरपूरलाच माइल्ड हार्ट अटॅक आला. तेव्हापासून गेली तीन वर्षं आम्ही, म्हणजे मी आणि मुक्ता, दोघे कार्तिकीला जातोय.

दोन वर्षांपूर्वी आमची पहिली कार्तिकी होती. रिझर्वेशन होतं, पण ठाण्याला रेल्वेरुळांवर पाण्याच्या पायपांचा पूल पडल्याने अचानक सगळ्या ट्रेन रद्द झाल्या होत्या. म्हणून सकाळच एस्टीने जायचं ठरवलं. त्यामुळे थेट पंढरपूरला न जाता देहू आळंदी करायची ठरवली. आमचा रूद्र सोबत होताच. पहिल्यांदाच असं ओळीने देहू आळंदी आणि पंढरी करणार होतो. चार दिवस खूप आनंदात गेले. काय ठरवलं काहीच माहीत नाही. पण या चार दिवसांत नोकरी सोडायचा निर्णय झाला आपोआप. महाराष्ट्र टाइम्समधे मानाच्या मेट्रो एडिटर पदावर काम करत होतो. कॉलम सुरू होता. तसं काहीच कमी नव्हतं. पण मनासारखं काम करता येत नव्हतं. परतून घरी आलो. सकाळी नाश्त्याला बसल्यावर बायकोला हळूच सांगितलं. आज नोकरीचा राजीनामा देतोय. कंटाळा आलाय. ती लगेच हो म्हणाली. ऑफिसात आलो. रोजची कामं केली. संपादकांशी बोललो. राजीनामा लिहून दिला. खांद्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटलं.

आजही त्या निर्णयाचा खूप आनंद आहे. नोकरी सोडली तेव्हा पुन्हा नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं. काय करायचं याची मोठी यादी बनवली होती. पण ती कामं करता येतील अशी नोकरी मिळाली तर चांगलंच होतं. अशावेळेस माझा जुना दोस्त रवी तिवारी देवासारखा धावून आला. मी मराठीच्या बातम्यांचा कार्यकारी संपादक म्हणून जॉइन झालो. त्याला पावणेदोन वर्षं झाली. आजवरच्या करियरमधली आणि वेगवेगळ्या नोक-यांतली ही सगळ्यात आनंदाची वर्षं होती. खूप उपद्व्याप करता आले. त्यातला प्रबोधनकार डॉट कॉमचा उपद्व्याप यशस्वी झाला. मी मराठीच्या बातम्यांसाठी काही चांगलं करता आलं. नवशक्तितला कॉलम आणि ब्लॉग नियमित लिहिला गेला. पण त्याशिवायचे जवळपास सगळे उपद्व्याप आतबट्ट्याचे ठरले. पण या सगळ्या उपद्व्यापांनी खूप काही दिलं. खूप खूप अनुभव दिले. अनेक नवे मित्र भेटले. जुने मित्रं रिफ्रेश झाले. घराला खूप वेळ देता आला. आई वडिलांची इच्छा म्हणून गावी एक छोटं घर बांधलं. अनेक अंगांनी विकसित करणारा अनुभव होता ही दोन वर्षं. मी मराठी ऑफिसात गीता, संतोष, दीपक, भाग्यश्री, नीतिन, शिल्पा, शशी, नेहा अशी कितीतरी आपली माणसं भेटली. रवी तिवारी, श्रीरंग गायकवाड, अजय कुमार, नरेंद्र बंडबे, प्रेम शुक्ला, इम्तियाज खलिल अशा जीवाभावाच्या सोबत्यांसोबत घालवलेले तास्नंतास समृद्ध करून गेले. या सगळ्याचं श्रेय रवी तिवारीलाच द्यायला हवं. तो नसता तर काहीच झालं नसतं.

सगळं छानच सुरू होतं. कंपनीत थोड्या आर्थिक अडचणी होत्या. पण ते माझ्यासाठी फारसं काही चिंतेचं नव्हतं. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक विनायक पात्रुडकर यांचा फोन आला. मी ट्रेनमधे बसलो होतो. मी पुढारीत चाललोय, तुम्हाला माहीत असेलच, त्यांनी विचारलं. मला खरंच माहीत नव्हतं. तुम्ही माझ्याजागी नवशक्तित यायला इच्छुक आहात का. असेल तर आपण प्रयत्न करूया. मी एक दिवस मागून घेतला. ऑफिसात थोड्या अडचणी सुरू असल्यामुळे रवीशी बोलणं आवश्यक होतं. त्यानंतर मी पात्रुडकरांना फोन करून हो कळवलं. भेटीगाठी झाल्या. मधे महिनाभर तरी निघून गेला. त्या काळात अचानक माझ्याकडे आणखी दोन ऑफर आल्या होत्या. पुन्हा अचानकच नवशक्तितून फोन आला. आमचं फायनल झालंय. पैशांचं बोलण्यासाठी या. चांगला पगार दिला. मला ऑफर लेटर मिळालं. मी इथला राजीनामा दिला.

आज संध्याकाळपासून मी नवशक्तिचा संपादक म्हणून रुजू होतोय. ७७ वर्षं जुना पेपर. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या जडणघडणीवर स्वतःचं योगदान देणारा पेपर. तिथे माझ्यासारखा अवघ्या ३४ वर्षांचा पोरगा संपादक बनणार आहे. हे अद्भूत आहे. अनेक मोठमोठे लोक या खुर्चीवर बसले होते. मोठी जबाबदारी आहे. माझे खांदे तेवढे मजबूत नाहीत. पण यापैकी कशाचाही विचार न करता नवं आव्हान स्वीकारण्यासाठी चाललो आहे. सगळा पेपर हातात मिळणार आणि नवी माणसं भेटणार याचाच आनंद आहे. आजवर खूप नोक-यांची धावपळ केली. पण आता इथे काही वर्षं थांबायचंय. मनासारखं काम करायचंय. लोक वर्षानुवर्षं लक्षात ठेवतील असं काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी तुमच्या सगळ्या मित्रांचं पाठबळ हवंय. त्याशिवाय हे शक्य नाही.

नवशक्तित चाललोय म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर भाऊ पाध्ये येतोय. त्याच्यावरच्या ब्लॉगवर त्याचा एक फोटो आहे. पाय टेबलावर टाकून नवशक्तिच्या ऑफिसात बसलेला भाऊ. भाऊ आपला खूप सगळ्यात आवडता लेखक. त्याने जगायचं नवं भान दिलं. लिहायचा नवा हात दिला. तो जिथे अकरा वर्षं काम करत होतो. तिथे संपादक बनून चाललोय. आणखी सालं काय हवं?