कुठे कार्यक्रमाला गेलं की ओळखीचे भेटतात. मग ते ओळखीचे त्यांच्या ओळखीच्यांशी ओळख करून देतात. मग समोरचे सांगतात, मी वाचलंय तुमचं. आता ब्लॉग, फेसबुकामुळे सगळ्यांची आठवण लगेच जुळते. त्यांना आठवणा-या लेखात गुढीपाडव्यावरचा आणि माधुरीवरचा लेख असतात. आता नेटवर आणि पेपरात सगळीकडेच फोटो असतो. पण आधी तुम्ही तर खूपच तरुण आहात, ही प्रतिक्रिया नेहमी असायची. अशा भेटणा-यात पत्रकारिता, समाजकारणाशी संबंध नसलेल्या नोकरपेशा माणसं आजही अँड्यात्म या कॉलमाची आठवण काढतात. त्यासोबत हगण्यावरचा लेख हसत हसत सांगितला जातो. त्यात कुणी पत्रकारितेतलं असेल तर मग कणकवलीतलं रिपोर्टिंग नाहीतर राज ठाकरेंवरचं लिखाण आठवतं. आणि चळवळीतल असेल तर मग एक लेख वारंवार आठवणीने सांगितला जातो, तो विनोद कांबळीवरचा.
सच का सामना या वादग्रस्त टीव्ही रिऍलिटी शो मधे तेव्हा विनोद कांबळी आला होता. आपल्यावर जातीमुळे अन्याय झालाय, असं त्याने म्हटलं होतं. माझ्या विंडो सीट नावाच्या कॉलमात मी त्यावर लेख लिहिला होता, ‘जेंटलमेन्स गेम’ नावाचा. कांबळी हे आडनाव भंडा-यांमधलं, मग त्यासाठी विनोद नक्की दलित ना, याचा शोध सर्वात आधी घ्यावा लागला. ज्येष्ठ क्रीडापत्रकार शरद कद्रेकरांनी ते कन्फर्म केलं. मग आतापर्यंत कोण कोण दलित भारतीय संघातून कसोटीपटू झालेत त्याचा शोध घ्यायचा होता. या अंगाने बोरिया मुजुमदारांचं थोडं फार वाचलं होतं. म्हणून त्यांचा ईमेल आयडी शोधून काढला. मेल केला. त्यांचा लगेच रिस्पॉन्स आला. आजवर विनोद आणि डो़डा गणेश हे दोनच दलित कसोटीपटू झालेत, हे त्यांनी सांगितलं. त्यांची मेलमधे हिंदू दलित अशा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ नंतर कळला कारण ख्रिश्चन दलितांपैकी चंदू बोर्डे आणि विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवलाय. आमदार कपिल पाटील यांनी ही माहिती नंतर दिली.
विनोद कपिलजींच्या जवळचा. त्याने पुढे त्यांच्या पक्षातून निवडणूकही लढवली. कपिलजींनी विनोदची बाजू सांगितली. थोडे रागावले. तो त्यांचा अधिकार आहेच. कारण मी त्यांच्याच हाताखाली आज दिनांकमधे पत्रकारितेला सुरुवात केली होती. पुढे विनोदनेही क्रिकेट अकादमी सुरू करायची घोषणा केली, त्यात या लेखाचा खारीचा वाटा असेलही नसेलही. बाकी रिस्पॉन्स जबरदस्त आला. क्रिकेटकडे सामाजिक अंगाने इंग्रजीत लिखाण झालंय. पण मराठीत फारसं झालेलं नाही म्हणतात. त्यामुळे ते थोडं नवं होतं. पण माझ्यासाठी हा विषय खेळापेक्षाही वेगळा होता. बहुजनांमधलं टॅलण्टचं काय, कसं आणि का होतं, यावर थोडं डोकं घासायचा प्रयत्न केला. त्या संदर्भात खूप प्रतिक्रिया आल्या. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सोनावणे यांनी यातल्या डिकास्ट भूमिकेचं कौतूक केलं होतं. ते वेगळं वाटलं. माझ्या बहुजन संत साहित्य संमेलनातल्या भाषणाचं कौतुक होतंय. मला वाटतं त्याचं मूळ या लेखात कुठेतरी आहे.
सध्या ग. प्र. प्रधानांचं ‘साता उत्तराची कहाणी’ वाचतोय. तुम्ही वाचलंच असेल. त्यातला श्रीपतराव यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं चांगलं विश्लेषण करत असतो. त्याची दोन विश्लेषण मला आवडली. एका ठिकाणी हा इस्लामपूरचा मराठमोठा कार्यकर्ता म्हणतो, ‘यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यावर आमचे लोक नाचायला लागले, आपलं राज्य आलं! पण अद्याप राज्य करताय तुम्ही छत्रपतींना पेशव्यांनी गुंडाळून टाकलंय!’ दुसरीकडे एका ठिकाणी श्रीपतराव यशवंतरावांच्या भाषणांचं सार सांगतो, ‘मनात कडवटपणा येऊ देऊ नका. मागचं विसरा. आज पराक्रम करा. उद्या तुमचाच आहे.’ यातलं पहिलं विश्लेषण यशवंतरावांच्या मर्यादा दाखवतं तर दुसरं त्यांचं शक्तिस्थळ सांगतं. आज पराक्रम करा, उदया तुमचाच आहे, हा विचार साध्यासुध्या माणसांमधे रुजायला हवा.
कालच अमर हबीबांशी ब्लॉगविषयी चर्चा सुरू होती. त्यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं होतं, ते म्हणाले, ‘ जात संपते, तिथे विचार सुरू होतो. आपल्या जन्मजात संस्कारांना आपण प्रश्न विचारू लागतो, तेव्हाच तर विचारांना सुरुवात होते. ’ मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. आपण सगळ्यांनीच तसा विचार करायला हवा. कारण आज आपण सचिनच्या शंभराव्या सेंच्युरीची वाट बघतोय. तेव्हा त्याच्यापेक्षाही टॅलेण्टेड असणारा विनोद स्टारवर त्यावर पोपटपंची करतोय. हे आपल्या सगळ्यांचंच दुर्दैव आहे.
अझरुद्दिन फिक्सिंगच्या गर्तेत अडकत होता. तेव्हा त्याने मुसलमान असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा कांगावा केला होता. धर्माच्या नावाने सहानुभूती मिळवायचाच तो प्रकार होता. आता त्याची आठवण विनोद कांबळीमुळे आलीय, कारण जातीमुळे आपल्यावर क्रिकेट बोर्डाने अन्याय केलाय, असं त्याचं मत प्रसिद्ध झालंय.
विनोदने सचिनविषयी आपण वादग्रस्त बोललो नसल्याचं सांगितलंय. पण जातीमुळे डावलल्याच्या मताचा त्याने इन्कार केलेला नाही. सच का सामना या गेम शोवरून ही बोंबाबोंब सुरू आहे. विनोदचा एपिसोड अजून दिसायचाय. या शोमध्ये स्पर्धकाच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन त्याच्या मनातलं जाणून घेतलं जातं. या टेस्टवर विश्वास ठेवला तरच विनोद कांबळीचं मत खरं मानावं लागतं. कारण तसा आरोप त्याने बोलून केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम बघूनच त्याला अझरुद्दिनच्या रांगेत बसवायचं का ते ठरवावं लागेल.
पण कसंही असलं, तरी त्याच्यामुळे भारतीय क्रिकेटची जात हा मुद्दा चर्चेला आला आहे. विशेषत: ब्लॉगच्या दुनियेत यावर चर्चा घडतेय. त्यावरच्या प्रतिक्रियांची चळत पाहण्यासारखी आहे. यात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट ही की एका मोठ्या वर्गातून विनोदला सहानुभूती मिळतेय.
पण या सगळ्यावर चर्चा करण्याआधी विनोदने स्वत:च्या कर्माने करिअरची आत्महत्या करून घेतली, हे निर्विवाद सत्य मान्यच करायला पाहिजे. फक्त टॅलेंटचा विचार कराल तर विनोद हा सचिनपेक्षा उजवा आहे, असं रमाकांत आचरेकर सरांनीही ईटीव्ही मराठीवर एका मुलाखतीत सांगितलं होतं. विनोदनेही हे टॅलेंट दाखवून दिलं. आधी रणजीतल्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारून. नंतर झिम्बाब्वे दौऱ्यात दोन बॅक टू बॅक डबल सेंच्यु-या मारून. पण अडनिड्या वयात अचानक आलेला पैसा, ग्लॅमर, मित्रमैत्रिणी यापैकी त्याला काहीच पचवता आलं नाही. तो आपल्या मस्तीत कुणालाही ऐकत नव्हता. त्याच्या डोळ्याची पारणं फिटवणाऱ्या खेळींची नाही, तर कानातल्या डुलांची चर्चा होत होती. या सगळ्याला सर्वस्वी तोच जबाबदार होता. याबाबत कुणीही त्याला माफ करणार नाही. तो स्वत:ही.
अठराविश्व दारिद्यातून बाहेर पडलेली त्याची ती पहिलीच पिढी होती, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अशी पिढी क्वचितच जबाबदारीने वागते. त्याच्यावर इतरांनी जेवढा अन्याय केला. त्यापेक्षाही त्यानेच स्वत:तल्या गुणवत्तेवर अन्याय केला. स्वत:च्या चुकांकडे न पाहता केवळ 'बामणी कावा' म्हणत जातीच्या नावाने गळा काढणं सोपं असतं. त्यात ब-याचदा तथ्यही असू शकते. पण त्यामुळे निगेटिव्ह आवर्तात बहुजन आणि अल्पसंख्याक तरुणांचं टॅलेंट वाया जाताना दिसतं. विनोद अशांचा प्रतिनिधी असावा, असं त्याची आत्ताची मतं ऐकून वाटतं. आपल्या समाजाची एकूण मानसिकता लक्षात घेता अधिक मेहनत घेऊन टॅलेण्टला न्याय द्यायला पर्याय नसतो, हे त्याला समजलं नसावं.
शिक्षण आणि माहितीचे दरवाजे माहीत असलेले समाजगट नवनव्या क्षेत्रांवर पकड मजबूत करतात आणि तिथे आपलं कल्चर निर्माण करतात. अशावेळेस वेगळ्या कल्चरमधल्या टॅलेंटला स्वत:ला प्रेझेंट करणं कठीण जातं. ती व्यवस्था उलथवून टाकण्याची ताकद नसेल तर स्वत:ला तसं मोल्ड करण्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यातून प्रस्थापितांच्या मानसिकतेतले अनेक गंड आणि ग्रह यांचाही सामना करावा लागतो. विशेषत: आपल्यासारख्या उच्चनीचतेच्या संस्कार रुजलेल्या समाजात कळत नकळत पूर्वग्रह काम करत असतात. त्यावर गॉडफादरगिरी आणि गटबाजीचा फाल्गुन मास सतत सुरू असतो. हे नेहमीच जाणून बुजून होतं असं नाही, पण दुर्लक्षित समाजघटकांमधील टॅलेंट आपल्या देशात कायमच मार खात आलंय. क्रिकेटसारख्या सर्वाधिक ग्लॅमर आणि पैसा असलेल्या क्षेत्रात तर हे सिद्धच झालंय.
१९३२ साली भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून आजपर्यंत फक्त दोनच दलित खेळाडू आपल्या देशाकडून क्रिकेट खेळलेत. १९९३ साली पदार्पण करणारा विनोद पहिला दलित कसोटीपटू होता. आणि कर्नाटकचा डोडा गणेश हा दुसरा. क्रिकेटपटूंकडे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन पाहण्याची सवय असलेल्या आपल्याला हे धक्कादायक असेल, पण ती वस्तुस्थिती आहे. सोशो-हिस्टॉरिकल दृष्टिकोनातून क्रिकेटचा अभ्यास फारसा झालेला नाही. पद्मभूषण रामचंद गुहा आणि त्यानंतर बोरिया मजुमदार हेच अपवाद. 'ट्वेंटी टू यार्डस टू फ्रिडम: ए सोशल हिस्टरी ऑफ इंडियन क्रिकेट' सारखी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिणाऱ्या मजुमदारांनी हा बॅकलॉग निर्विवाद मांडलाय.
विनोद हा दलितच. त्याचं करिअर अडू नये, या भीतीने त्यांच्या वडिलांनी आपलं आडनाव बदलून घेतलं. डोडा गणेशची कहाणी तर अधिक दुर्देवी. थोडा तिरपा पाय करून मिडियम पेस बॉलिंग टाकणारा गणेश अनेकांना आठवत असेल. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने संघसहकारी श्रीनाथ, प्रसाद, कुंबळे आणि सुनील जोशी यांच्याहून चांगली कामगिरी करत ३६७ विकेट मिळवल्या. पण ९७ साली आफ्रिका आणि विंडिज असे अवघे दोन दौरे आणि चार टेस्ट त्याच्या वाट्याला आल्या. तो तर विनोदसारखा चमकेशही नव्हता. या दोघांच्याही आधी पुण्याच्या पी. बाळू आणि त्यांच्या तीन भावांनी भारतीय संघात स्थान मिळवले होते. पण तेव्हा भारताला कसोटी दर्जा मिळाला नव्हता.
भारतीय क्रिकेटच्या या चेहऱ्यातही आता बदल होतोय. ग्लोबलायझेशनच्या वाऱ्याने प्रोफेशनल अॅटिट्यूड दिसून येऊ लागलाय. झारखंडचा ढोणी आज भारताचा कर्णधार आहे. प्रदेशांचा असमतोल ठिसूळ झालाय. उद्या जाती आणि वर्णांचंही तेच होईल. ज्ञानाच्या स्फोटात मक्तेदारीचं राज्य खालसा होणार, हाच टेक्नॉलॉजीचं हात धरून येणाऱ्या नव्या युगाचा मंत्र आहे. टायगर वूड्स आपल्याकडेही निर्माण होणार आहेतच. पण हे सगळं असलं, तरी विनोदने याविषयी काही बोलू नये. त्याला तसा अधिकारही नाही. कारण आजही त्याच्यासारखेच कितीतरी टॅलेंटेड क्रिकेटपटू फर्स्ट क्लासमध्ये येण्याच्या आत करपून जात आहेत. विनोद त्यांच्यासाठी काय करतोय? त्यामुळे त्याने कसल्या कसल्या टीव्ही शोमध्ये जात राहावं. एन्जॉय करावं. एवढंच.
धन्यवाद! फारच छान आर्टिकल! सर्व दलित-बहुजन जातीतील सेलिब्रिटीज,श्रीमंत जेव्हा टॉपवर असतात तेव्हा त्यांना जातीची आठ्वण येत नाही. तेव्हा ते आपल्याच शत्रुना खरे मित्रा समजतात आणि खर्या मित्रांना शत्रु! संकट आल्यावर सत्याची जाणीव होते असे नाही. हे सत्य त्यांना तेव्हाही माहीत असते परंतू तेव्हा ते गैरसोयीचे असते म्हणून ते स्विकारीत नाहीत एव्हढेच! संकट काळात ते फायदेशिर असते म्हणून त्याचा ते स्विकार करतात.
ReplyDelete---- प्रा. श्रावण देवरे, 9422788546
good one.
ReplyDeleteAbhyaspurna aani vivechantmak...aavdale....
ReplyDeletelekh aprtim zhla ahe. khrach.... hich vel ahe atmprikshan karnyachi.
ReplyDeleteVery nice
ReplyDelete