Friday, 12 December 2014

सर्वजनवादाचे प्रणेते

सदानंद मोरे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पहिल्या फेरीतच ते जिंकले. चांगलं झालं. ते पडले असते तरीही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणात काही बाधा आली नसती. कारण त्यांचे माझ्यासारख्यावरचे उपकार मोठे आहेत. मी आज जे मोडकंतोडकं लिहितो त्यातलं बरचसं सरांनीच लिहिलेल्यातलं वाचलेलं असतं. किंवा त्यावरून सुचलेलं असतं. सरांमुळेच वर्तमानावर लिहिताना इतिहासाचं भान ठेवण्याचं भान आलं. त्यांच्यामुळेच `रिंगण` झालं. ब्लॉगवरच्या लिखाणात मोरे सरांचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे.

मी महानगरात वाढलेलो. त्यामुळे एक बरं झालं, माझ्या मागे कोणतीच ओळख नव्हती. ना जात, धर्म, कूळ, वंश, काहीच नाही. माझ्या पणजोबांच्या आधी आम्ही मूळ नक्की आमच्या गावीच राहत होतो का, मला शंका आहे. माझ्या पूर्वजांची बोली मालवणी मलाच काय माझ्या आईबाबांनाही बोलता येत नाही. माझी ओळख असलेलं फक्त माझं शहर, मुंबई. मी महाराष्ट्रीय, मी भारतीय म्हणजे काय, याचा अद्याप शोधच चाललेला. असाच चाचपडताना मला `तुकाराम दर्शन` भेटलं. माझ्या मुळांपर्यंतचा रस्ता लख्ख दिसल्यासारखं झालं. मोरे सरांचं जसजसं वाचत गेलो तसतसं डोळे उघडत गेले.