Saturday 21 March 2015

संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण वगैरे

संमेलनाच्या अध्य़क्षाचं भाषण देताना मी. सोबत विचारपीठावर महेश थोरवे
श्रीपाल सबनीस, हरि नरके, विनोद शिरसाठ आणि भूषण कदम
कधी कोणत्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणी परिसंवादासाठी वगैरे बोलावलं तरी मिळवलं, असं अजूनही वाटतं. तरीही माझासारखा पत्रकार पहिल्या अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनला. आयोजकांशी माझी ओळखदेख नव्हती, तरीही. दोन दिवसांचा हा अनुभव समृद्ध करून जाणारा होता. अनेक नवे मित्र जोडले. नवं ऐकता आलं. समजून घेता आलं. स्वतःला दुरुस्त करून घेता आलं. त्यात माझाही पीआर वगैरे झाला.

संमेलन सुरू असताना माझ्याशी फोनवर बोलताना आई म्हणाली की माणसं आहेत, म्हणजे तुझं पोट भरलं असेल. मी अध्यक्ष म्हणून हरि नरके सर मुद्दामून भाषण ऐकण्यासाठी आले होते. मला पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहणारे पराग पाटील आणि सुनील कर्णिक मुंबईहून आले होते. सोबत नारायण बांदेकरही होते. आमचे दत्ताभाऊ बाळसराफ मुंबईहून आले.

Saturday 21 February 2015

आदरणीय कॉम्रेड,

`तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले.` पानसरे सरांवर हल्ला झाला तेव्हा गोवादूतच्या अग्रलेखात लिहिलं होतं. विश्वास होता की सर बरे होतील. पण ते होणं नव्हतं.
सरांचा खून झालाय. खून करणाऱ्यांनो, तुमचे दिवस भरले. तुम्ही जे कुणी असाल, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. पानसरे सरांचा खून तुम्हाला महाग पडेल. फार महाग. किती जणांना मारणार तुम्ही?
यावर एकच उपाय. प्रतिगामी विचारांचा पगडा दूर करायला हवा. उजेडाने काळोख संपतो. त्यासाठी गांधीजी, दाभोलकर आणि पानसरे सरांचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा. पानसरे सरांचे शिवाजी महाराज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायलाच हवेत.
आता आणखी गाफील राहून चालणार नाही. आता टंगळमंगळ करून चालणार नाही. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण स्वतः ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःला धार लावायला हवी. स्वतःचं सर्वस्व द्यायला हवं आता. दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नाही मारणाऱ्यांनीच.
दिवस जातील तसे विसरू आपण पानसरे सरांच्या हौतात्म्याला. गांधीजींना विसरलो तसे. दाभोलकरांना विसरलो तसे. पण हे होता कामा नये. तो सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जागं करत ठेवायला हवं. आणखी कुणी पानसरे होऊ नये म्हणून आता जागं राहायलाच हवं. जागं ठेवायला हवं.

आम्हाला संपवल्यानंतर तुम्ही आम्हाला जाळणार असाल
तर आम्ही सोनं आहोत. उजळून निघू.
आम्हाला संपवण्यानंतर तुम्ही खोल पुरणार असाल
तर आम्ही बिया आहोत. नव्याने उगवू.
मारा आणखी किती मारायचंय ते.
मरायला तयार आहोत आम्ही.
लढायला तयार आहोत आम्ही.
तुम्हालाही बदलायला तयार आहोत आम्ही.

Thursday 1 January 2015

यंदाचं `रिंगण` जनाबाईंवरचं

मला वाटतं नोव्हेंबरात मुक्ता, रुद्र आणि मी पंढरपुरात गेलो होतो. दत्तघाटाशेजारचा कबीर मठ फक्त बाहेरूनच बघितला होता. तिथे गेलो. आत संत कबीरांची सहा सातशे वर्षं जुनी मूर्ती पाहिली आणि कमालाची समाधीही. लाखो मैल अंतरावरच्या कबीरपुत्र कमालाने चंद्रभागेच्या किनाऱ्यावर शेवटचा श्वास घेतला, याची ती निशाणी. त्या समाधीला नमस्कार करताना अंग शहारलं.

तिथे आताचे कबीरदास महाराज भेटले. थोडी घाई होती त्यांना, तरीही त्यांनी वेळ देऊन गप्पा मारल्या. कबीरपंथी साधूंची दिंडी पालखी वाराणशीहून पंढरपूरला येत होती. कबीरही पंढरपुरात आले होते. पण ते पांडुरंगाला भेटण्यासाठी आले नव्हते. ते इथे आले ते संत जनाबाईंचं दर्शन घेण्यासाठी. जनाबाईंनी त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवलं. महाराजांनी त्यांच्या परंपरेतली आख्यायिका सांगितली. मी उडालोच.

संतांचं संत म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी ज्याचा डंका आहे ते कबीर एवढ्या लांबून आमच्या जनाबाईंना भेटण्यासाठी येतात, ही गोष्टच अद्भूत आहे. `जनी सब संतनकी काशी `असं कबीरांनी लिहून ठेवल्याचे संदर्भ सापडतात. जनाबाईंची ही थोरवी समजून घ्यायलाच हवी. एका शिंप्याच्या घरची ही मोलकरीण त्या काळातल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या अध्यात्माच्या क्षेत्रात इतकं अत्युच्च स्थान मिळवते, हाच मोठा चमत्कार आहे.

संत नामदेवांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या जनाबाई. चोखोबांना आधार देणाऱया जनाबाई. ज्ञानेश्वर नामदेवांमधला समन्वय घडवणाऱ्या जनाबाई. सर्व समकालीन संतांच्या नेटवर्किंगमधला ओलावा असणाऱ्या जनाबाई. सहजसुंदर काव्याचं मराठी साहित्यातलं सर्वात मोठं शिखर असणाऱ्या जनाबाई. `जनी म्हणे देवा, मी झाले वेसवा` असं अगदी सहज म्हणत स्त्रीशक्तीचा आणि स्त्रीमुक्तीचाही अविष्कार घडवणाऱ्या जनाबाई. प्रत्येक बाईला आपल्या दुःखाचं प्रतीक वाटू शकेल अशा आख्यायिकांमधून सापडणाऱ्या जनाबाई. शेकडो वर्षं जात्यावरच्या ओव्यांमधून लोकसाहित्याचा मानबिंदू झालेल्या जनाबाई. शोधायलाच हव्यात जनाबाई. त्यानिमित्ताने वारकरी परंपरेतलं बाईचं स्थान शोधता येईल. अन्य महिला संतांचाही वेध घेता येईल. गंगाखेड आणि पंढरपुरात जनाबाईंच्या आठवणींचा शोध घेता येईल. मराठवाड्यातली वारकरी परंपरा शोधता येईल. मोलकरीण किंवा घरगडी या व्यवसायाचाही इतिहास शोधता येईल.

म्हणून यंदाचा `रिंगण` हा आषाढी विशेषांक संत जनाबाईंवरचाच. संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यावरच्या `रिंगण`ने आम्हाला भरभरून दिलं. दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंक का नकोत? आणि संतपरंपरेची सामाजिक सांस्कृतिक अंगाने मांडणी करता येऊ शकते का? या आमच्या मनात आलेल्या प्रश्नांमुळे `रिंगण`चा प्रवास सुरू झाला. पहिल्या दोन्ही अंकांनी आम्हाला आनंद दिला. समाधान दिलं. औकातीपेक्षा खूप मानसन्मानही दिला. पण आमच्याकडून `रिंगण`मधे अनेक चुका राहिल्या. शुद्धलेखन नीट तपासता आलं नाही. लेखकांचा चांगला फॉलोअप करता आला नाही. काही वेगळे आयाम शोधायचेही राहून गेले. आर्थिक गणित नीट बांधायचं राहून गेलं. यंदा हे जमेल तेवढं टाळावं म्हणून लवकर सुरुवात करतो आहे. त्यात तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे.

जनाबाईंवरची पुस्तकं कोणती? त्यांच्यावरचं लिखाण कोणी केलं आहे का? कोणाला त्यांच्यावर लिहायचं आहे का, आम्हाला काही सांगायचं आहे का? त्यांच्यावर कुणी अभ्यास केला आहे का किंवा पीएचडी वगैरे आहे का? तुमच्या गावात त्यांचं कुठे देऊळ आहे का? त्यांचे वेगळे संदर्भ कुठे सापडत आहेत का? आम्हाला या क्षणाला तरी यापैकी काहीच माहीत नाही. ते तुमच्याकडूनच हवंय. कारण हे `रिंगण` फक्त आमचं आहे, असं आम्ही कधीच मानलं नाही. ते आमच्याइतकंच तुमच्या सगळ्यांचं आहे. आपलं हे `रिंगण` समृद्ध करण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

आणखी एक छोटीशी गोष्ट. चोखोबांवरचं `रिंगण` लवकरच पुस्तकरूपात येतं आहे. त्यात काही नवे लेखही आहेत. अंकातल्या चुका टाळल्या आहेत. मायबापहो!, `महानामा`ला तुम्ही डोक्यावर घेतलंत. आता `जोहार चोखोबा`ला देखील आपलं माना, हे मनापासून मागणं.