Friday, 29 June 2012

रिंगणचा पहिला कार्यक्रम

रिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण. 
 
थोडी अधिक माहिती 

डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत 

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे. 

सर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, तुकाराम दर्शन साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, लोकमान्य ते महात्मा मधून इतिहासाची बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!


मी परवाच काही मित्रांना पाठवलेला मेल इथे देतोय,

मित्रांनो, दिवाळी अंक निघतात, तसा आषाढीचाही अंक असावा, अशी कल्पना गेली काही वर्षं डोक्यात होती. यावर्षी ती प्रत्यक्षात येतेय. रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.

सोबत सविस्तर प्रेस नोट, कव्हर आणि लोगो अटॅच केले आहेत. शक्य होत असेल तर कृपया आपल्या वर्तमानपत्रात, टीव्हीत, रेडियोत किंवा वेबसाईटमधे प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती. जेणेकरून अंक लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि आषाढी अंकांची दिवाळी अंकांसारखीच परंपरा निर्माण होईल.

येत्या काही दिवसांतच www.ringan.in या नावाने याची वेबसाईटही येत आहे.

धन्यवाद,
आमच्या या धडपडीत तुम्ही आमच्यासोबत आहातच, या खात्रीसह,

आपला नम्र,

सचिन परब
९९८७०३६८०५

Thursday, 14 June 2012

तुझा माझा तुका


काल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.

मला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता. त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.