Saturday, 10 June 2017

रॉक ऑन कबीर

यावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता  ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.

त्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठीच्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.

Thursday, 8 June 2017

सचिन... सचिन...


सचिनसोबत सेल्फी
काढताना रुद्र आणि मी
सचिन तेंडुलकर आपल्याला आवडतो. मनापासून आवडतो. त्याच्यावर आपण फिदा आहे. त्याच्या खेळावर तर आहेच. पण त्याच्या वागण्यावरही आहे. तो आपला होता, आहे आणि राहील. त्याच्याविषयी चिकित्सा, टीका करता येणार नाही का? नक्कीच करता येईल. करायलाच हवी आणि केलीयही. सचिन त्याच्या पलीकडे आहे. तो माझ्यासारख्या त्याच्या फॅनसाठी क्रिकेटच्याही पलीकडे आहे. सचिनवरचे दोनतीन तरी लेख मी वेळोवेळी भरभरून लिहिलेत. शिवाय विनोद कांबळीवरही लिहिलंय आणि धोनीवरही.

दिव्य मराठीतल्या माझ्या कॉलममध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न केलाय.  त्यात हाही एक लेख. मला तो आवडला मनापासून. रुद्रसोबत सिनेमा बघताना जे डोक्यात येत होतं, ते या लेखात शेअर केलंय. चळवळील्या माझ्या अनेक मित्रांना सचिन भांडवलशाहीचा प्रतिनिधी वाटतो. त्यांना हा लेख आवडणार नाही. पण सचिन सचिन आहे. त्याच्यासाठी कायपण! याच विषयावर दिव्य मराठीत लिहिलं आणि पाठोपाठ गोवन वार्ताच्या कॉलमसाठीही. दोन्ही लेखांतलं थोडं थोडं एकत्र केलंय, ते ब्लॉगसाठी.

Monday, 29 May 2017

आम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज

सत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी लोकमतमध्ये वाचली आणि धक्काच बसला. महाराज मुलाचं नाव धर्मपाल ठेवण्याइतके धार्मिक आहेत. ते लोकांमध्ये राहतात. आधुनिक पुरोगाम्यांसारखे लोकांना तोडत नाहीत. जय गुरुदेव म्हणत परंपरेशी नातं घट्ट पकडून ठेवतात. ते देवाधर्माच्या नावाने शिव्या देत नाहीत, त्यामुळे सनातन्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताच येत नाही. राज्य सरकारने त्यांना प्रबोधनकार पुरस्कार दिलाय, इतके ते सगळ्यांना स्वीकारार्ह आहेत. प्रबोधनाचा खरा मार्ग त्यांना सापडला आहे. म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं अधिक धक्कादायक आहे.

महाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट आहे. त्याने हल्ला का केला, आपल्याला कळलेलं नाही. त्याचं बॅक्ग्राऊंड काय, कळलेलं नाही. ती शोधण्याइतकी तसदीही आपण घेत नाही. आमच्या संवेदना मेल्यात कधीच्याच. आमचे हात, पाय, डोकं, मन सगळं बधीर झालंय. सत्यपाल महाराज, हल्लेखोरापेक्षा जास्त आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला माफ करा. इतर कुणाला नसेल तर निदान मला तरी माफ करा. मी काहीच कामाचा नाही हो. सॉरी.
गोवन वार्तामधे लिहिलेला लेख थोडे बदल करून पुढे कटपेस्ट करतोय.
...

Monday, 22 May 2017

मनात पूजीन रायगडा

कालचा दिवस जोरदार होता. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीच्या कॉलमात छापून आलेल्या लेखावर फार प्रतिक्रिया येतील, असं वाटलं नव्हतं. दिवसभर सतत फोन वाजत होता. बहुतेकांना लेख खूपच आवडला होता. आम्ही इतिहासाकडे असं बघितलंच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं होतं. लेख वाचताना गहिवरून आलं असं सांगता सांगता औरंगाबादचे पैठणे नावाचे एक निवृत्त इंजिनियर काका फोनवरच पुन्हा गहिवरले. आयपीएल टोकाला आलेली असताना साडेदहाच्या सुमारासही न राहवून एका प्राध्यापकाने फोन केला होता. वगैरे वगैरे. 

लेख न आवडल्याचे दोन फोन सकाळी आले होते. ते दोघेही राजपूत समाजाचे होते. पण मी त्यांच्याशी बोललो. माझी मतं सांगितली. त्यांना काही पटली, काही पटली नाहीत. चांगली चर्चा झाली. संध्याकाळी पाच नंतर अचानक फोन येऊ लागले. अरे तुरेची भाषा. लेखात नसलेले संदर्भ सांगणं. ठेवणीतल्या शिव्या. तुला मुंबईला येऊन बघतो. असं लिहायला पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्यांना कुणीतरी उचकवल्यामुळे एकामागून एक फोन येत होते, हे कळत होतं. त्या बिचाऱ्यांनी लेखही वाचला नव्हता. पण लेख आवडल्याचे फोन त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त होते. त्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती. 

माझं अज्ञान होतं की राजपूत स्वतःला मराठ्यांपैकीच एक समजतात. महाराष्ट्रात शेकडो वर्षं राहिल्यामुळे त्यांनी राजस्थानच्या इतिहासाविषयी ममत्व बाळगण्याचं कारण नसेल, हाही माझा गैरसमज होता. अकबराला तुम्ही ग्रेट म्हणूच कसं काय शकता, हा आक्षेप प्रमुख होता. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराविषयी लिहिलेल्या पत्रात आदर्श म्हणून अकबराचा दाखला दिलाय. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. अर्थात या लेखाविषयी कुणी आक्षेप नोंदवणं अगदीच स्वाभाविक मानायला हवं. आपल्या अस्मितेविरोधात लिहिल्यामुळे राग येऊ शकतोही. काही कारण नसताना महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात शिवाजी महाराजांना आणल्यामुळे मी मराठा कार्ड चालवल्याचं कुणाला वाटलं असेल, तर ते समजून घ्यायला हवं. आजकाल कुणाच्याही हेतूंविषयी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे खरी. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणालाही खोडसाळपणा समजण्याची स्थिती आहे खरी. चूक ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांची आहे. 

Friday, 12 May 2017

शाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक

जवळपास एका वर्षाने गोव्याला गेलो. २२ एप्रिल शनिवारी समृद्धीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जायलाच हवं होतं. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकरांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. गोव्याच्या सत्त्व टिकवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून राजेंद्रभाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पौर्णिमाताईंचाही त्यात हातभार आहे. त्यांची मुलगी समृद्धी आता १६ वर्षांची झालीय. ती कधीच शाळेत गेली नाही. निसर्गाच्या शाळेतच शिकली. कॉलेजलाही शिकायचं नाही म्हणते. पण शिकणं थांबलेलं नाही. मी संपादक म्हणून तिच्याकडून करून घेतलेल्या कॉलमचं पुस्तक झालंय. पुस्तकाची प्रस्तावना या साऱ्या प्रक्रियेविषयीच आहे प्रामुख्याने. गोव्यात जाऊन तू काय केलंस, असं कुणी विचारलं तर माझ्याकडे आता समृद्धीचं पुस्तक आहे.
सोबत प्रस्तावना जोडलीय. कुणाला हे पुस्तक हवं असेल तर संपर्कः तुळशीदास राऊळ – 9049912168,  8999421974
...

टिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण

`टिळकबाई, काय हे!` नावानं या रविवारी दिव्य मराठीत लेख छापून आला. तीन दिवस तरी फोन खणखणत होता. मेल आणि एसेमेस आले ते वेगळेच. जास्त फोन अभिनंदन करणारे होते. कुणीतरी झोडून काढायला हवं होतंच. किती दिवस यांची गुलामगिरी सहन करायची? एवढं तिखट लिहू नका, अडचणीत याल. श्रीधरपंतांचा उल्लेख आवडला. छान मुद्देसूद लिहिलंत, तोल जाऊ न देता, असं लिहिण्याची गरज आहे. आम्ही ब्राह्मण नाही, पण आरक्षणाला आमचा विरोध होता, आता तुम्ही म्हणताय त्यावर विचार करू. असे प्रतिक्रियांमधले सूर होते.

चित्पावनी आडनाव असणारे चार पाच फोन आले. तुम्ही ब्राह्मणांना कितीही दाबलंत तरी काही बिघडत नाही, आम्ही पुढेच जाणार. छान लिहिलंत, मग मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध बोलायची हिंमत आहे का? आणखी कुणाच्या वक्तव्यांविषयी का नाही लिहित? माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्याला आरक्षणामुळे अडमिशन मिळालं, मला नाही. मला जावंसं वाटतं परदेशात. काय चुकलं टिळकबाईंचं? तुम्ही ब्राह्मणांविषयी काहीही बोला, पण गणेशोत्सवाविषयी बोलायचं नाही. देवाधर्माला विरोध करता येणार नाही. मात्र ब्राह्मणांमधली अमरावतीहून आलेली एक प्रतिक्रिया लेख आवडल्याचीही होती. 

Friday, 28 April 2017

हॅपी बर्थडे एसपी

वी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची नजर घडली.

सर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई एडिशनमधे आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.

शर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.

कोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.

एसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी अभिलेख` या निर्मलेंदू यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच!

थँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.
आणि हॅपी बड्डे एसपी.
एसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर तुम्हाला भेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून. 

शिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास. 

Saturday, 15 April 2017

दर्द मिल सके तो ले उधार

द हिंदू वाचणाऱ्या सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...

`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक मानावा.
सचिन, एक गंमत उघड करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का बोलला?` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही?... तो असो न्हीच, हाव म्हळे.

कन्स्ट्रक्टिव कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`

Friday, 14 April 2017

धर्म जागो कबीराचा

पंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी
आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणापासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.

बाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.

Sunday, 9 April 2017

कार्यकर्ता आहे तरी कुठे?

विषय चुकवून चालत नाही आणि तसा वेळ मात्र नसतो, असं सदराचे लेख लिहिताना अनेकदा होतं. मागेही असंच झालं महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल गुरूवारी लागणार होते. रविवारच्या पुरवणीत छापून येणारा लेख बुधवारीच द्यायचा होता. लिहायचं तर निकालांवरच होतं, पण निकाल माहीत नव्हते. अगदीच काही सूचत नव्हतं. टीव्ही लावला. झी २४ तासवर चर्चा सुरू होती. त्यात औऱंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख होते. ते उस्मानाबादमधे होते तेव्हापासूनच मित्र. छान बोलत होते कार्यकर्त्यांच्या फरफटीविषयी. लेखाला विषय मिळाला.

यावेळेस महानगरपालिका निवडणुकांत एका उमेदवाराला चार वॉर्डात निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे एकेका वॉर्डपुरती निवडणूक लढवणारे छोटे कार्यकर्ते स्पर्धेतूनच बाद झाले. हे लक्षात आल्यावर लिंक लागली. पण हाच मुद्दा लेखात मांडायचा राहून गेला. रात्री उशिरा बसून लेख लिहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साम टीव्हीवर निवडणूक निकालांवर चर्चेसाठी होतो. चर्चा सुरू असतानाच दिव्य मराठीचे पुरवणी संपादक शेखर देशमखांचा मिस कॉल येऊन पडला होता. ब्रेकमध्ये त्यांना फोन केला. लेख त्यांना आवडला होता. जीव भांड्यात पडला. दिव्य मराठीत लेख छापून आल्यावर कुठच्या कुठच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. आमच्या मनातलंच मांडलंत, असं ते सांगत होते.