Friday, 12 December 2014

सर्वजनवादाचे प्रणेते

सदानंद मोरे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पहिल्या फेरीतच ते जिंकले. चांगलं झालं. ते पडले असते तरीही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणात काही बाधा आली नसती. कारण त्यांचे माझ्यासारख्यावरचे उपकार मोठे आहेत. मी आज जे मोडकंतोडकं लिहितो त्यातलं बरचसं सरांनीच लिहिलेल्यातलं वाचलेलं असतं. किंवा त्यावरून सुचलेलं असतं. सरांमुळेच वर्तमानावर लिहिताना इतिहासाचं भान ठेवण्याचं भान आलं. त्यांच्यामुळेच `रिंगण` झालं. ब्लॉगवरच्या लिखाणात मोरे सरांचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे.

मी महानगरात वाढलेलो. त्यामुळे एक बरं झालं, माझ्या मागे कोणतीच ओळख नव्हती. ना जात, धर्म, कूळ, वंश, काहीच नाही. माझ्या पणजोबांच्या आधी आम्ही मूळ नक्की आमच्या गावीच राहत होतो का, मला शंका आहे. माझ्या पूर्वजांची बोली मालवणी मलाच काय माझ्या आईबाबांनाही बोलता येत नाही. माझी ओळख असलेलं फक्त माझं शहर, मुंबई. मी महाराष्ट्रीय, मी भारतीय म्हणजे काय, याचा अद्याप शोधच चाललेला. असाच चाचपडताना मला `तुकाराम दर्शन` भेटलं. माझ्या मुळांपर्यंतचा रस्ता लख्ख दिसल्यासारखं झालं. मोरे सरांचं जसजसं वाचत गेलो तसतसं डोळे उघडत गेले.

Friday, 24 October 2014

हॅपी दिवाळीदिवाळी आली की दिवाळी अंक येतात. दिवाळी अंक करणाऱ्यांना दिवाळीची भूणभूण सगळ्यात आधी लागते. मग ते लेखकांच्या मागे भूणभूण करतात. माझ्यासारख्या आळशी माणसाच्या मागे बरीच भूणभूण करावी लागते. यंदा आजारपणामुळे एकाही दिवाळी अंकात लिहिणं जमलं नाही. पण गेल्यावर्षी तीन चार ठिकाणी लिहिलं होतं. यंदाही पाच सहा अंकवाल्यांनी सांगितलं होतं. आमच्या `गोवादूत`च्या अंकातही लेख लिहिता आला नाही.

गेल्या वर्षीच्या `गोवादूता`त लेख लिहिला होता. परिवर्तन की आवर्तन नावाचा. लोकसभा निवडणुकांत काय होणार, असा धांडोळा घेतला होता. मोदी लाटेने एकदम तोंडघशी पाडलं. त्यामुळे ते काही शेअर करत नाही. पण त्याच अंकात एक संपादकीय लिहिलं होतं. फेसबूकवर काय काय हळवं हलकंफुलकं वाचत राहण्याचे दुष्परिणाम काय असतात त्यासाठी हे छोटं संपादकीय वाचायला हरकत नाही.
सगळ्यांना हॅपी दिवाळी...

Wednesday, 10 September 2014

अमर हबीबः साधेपणाची साधना

आमच्या गावच्या घरी काढलेला अमरजींचा फोटो
आज खरं तर अंबाजोगाईत असायला हवं होतं. जायचं ठरलं होतं. बऱ्याच महिन्यांपूर्वी अमरजींना तसं सांगितलंही होतं. एकतर माझ्यासारखा आळशी माणूस उद्याचंही काही ठरवत नाही. ठरवलं की असं होतं. आजारी पडलो. अंबाजोगाईला जाणं शक्यच नाही. अमरजींचा आज साठावा वाढदिवस. तो त्यांच्या फक्त सोबत राहून साजरा करायचा होता. त्यांच्यासोबत राहायचं म्हणजे समृद्ध होणं असतं. तसं अधिक श्रीमंत व्हायचं होतं. आता झालं नाही तरी त्याचं चक्रवाढ पद्धतीनं उट्ट काढावंच लागणार.

अमरजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच हा अनुभव आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी समृद्ध केलंय. मी २००२ वगैरे साली दिल्लीत होतो. ईटीव्हीचा दिल्ली प्रतिनिधी. मराठी पत्रकार एकमेकांना भेटायचे. त्यात एक विचित्र नाव कानावर यायचं, अमर हबीब. फोनवर एकदोनचा बोलणं झालं पण भेट झाली नव्हती. अशीच कधीतरी भेट झाली. बहुतेक प्रमोदसोबत. मग आम्ही अमरजींच्या मागे लोकचुंबकासारखे आपोआप चिटकलो. अमर हबीब, प्रमोद चुंचूवार आणि मी. किती रात्री आणि किती दिवस आम्ही चर्चा केल्या असतील, गणतीच नाही. त्या अनोळखी शहरात ते आमचे पालकच होते. पण कधी पालक असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही. ते आम्हाला घडवत होते, पण त्याचा वासही आला नाही. त्यांचे दोस्त म्हणवून घ्यायला आम्ही खूपच लहान आहोत. पण तरीही ते आमचे दोस्त होते आणि आहेत.

आज मी संपादक वगैरे आहे. लोक कौतुक वगैरे करतात. त्यातलं खूप काही अमरजींनी दिलेलं आहे. त्यांनी माझ्यासारख्या पोरांना नव्याने विचार करायला शिकवलं. नव्याने प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हाला जगायला शिकवलं. गोष्टींच्या मूळात शिरायला शिकवलं. त्यांच्यामुळे जगण्यातली मजा वाढली. त्यांच्यामुळे जगण्यात श्रीमंत झालो. जगजीतने गायलेली एक गझल आहे, मुझ में जो कुछ अच्छा हैं सब उसका हैं, मेरा जितना चर्चा हैं सब उसका हैं. उसका मेरा रिश्ता बडा पुराना हैं, मैंने जो कुछ सोचा हैं सब उसका हैं. असंच काहीसं तरी. असं असणारा मी एकटा नाही. खूपजण आहेत. आता तर सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या घडवण्याचा परिघ आणखी वाढलाय. ते सगळीकडे पसरलेत.

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या आम्ही सारे फाऊंडेशनने त्यांना कार्यकर्ता पुरस्कार दिला. कार्यक्रम घरचा होता. जाऊ शकलो नाही. आता अमरजींचा वाढदिवस आहे. ठरवूनही जाऊ शकलो नाही. अविनाश दुधेच्या आग्रहामुळे तेव्हा अमरजींवर एक लेख लिहिला होता. प्रयत्न करूनही कितीतरी वेळ लिहिता येत नव्हतं. तरीही लिहिलं. लेख कसा झालाय माहीत नाही. पण त्यात अतिशयोक्ती एका पैशाचीही नाही. लेख नेहमीसारखा कटपेस्ट

Friday, 14 February 2014

मला भेटलेले लोकनाथ

दिल्लीत असताना प्रमोद चुंचूवारच्या पुस्तकांच्या कपाटात पहिल्यांदा लोकनाथ यशवंत भेटले. त्या कवितेनं हादरवून टाकलं. तेव्हापासून लोकनाथ मनाचा एक भाग झालेत. पुढे आम्ही भेटलो. मित्र झालो. वर्षभरापूर्वी मी त्यांच्यावरचा हा लेख लिहिला. त्यांच्या कवितांवरच्या समीक्षालेखांचा संग्रह आला. `लोकनाथच्या यशवंत कविता` नावाचा. त्यासाठी हा लेख लिहिला होता. मला भेटलेले लोकनाथ असं या लेखाचं स्वरूप होतं. लोकनाथजींना लेख आवडला. बरं वाटलं. मूळ लेखाचं नाव एकदम कडक असं होतं. तो लेख ब्लॉगवर टाकतोय.

Wednesday, 12 February 2014

आपल्या जननायकांसाठीचं युद्ध

क्रांतिवीर दीपाजी राणेंचं हे रेखाचित्र 
गोव्यात येऊन आता मला दहा महिने होऊन गेलेत. मी बराच गोंयकार झालोय. फिरतोय, लोकांना भेटतोय, वाचतोय. जमेल तेवढा गोवा समजून घेतोय. मजा येतेय. सगळ्यात आधी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचला. त्यात सत्तरीच्या राण्यांचं बंड सापडलं. गोव्यात गेल्यावर सगळ्यात आधी साखळीच्या विठ्ठलमंदिरात गेलो होतो. राणे घराण्याचा कुणीतरी पूर्वज याच पांडुरंगाला घेऊन गोव्यात स्थायिक झाला होता. त्या विठ्ठलानं सत्तरीतल्या वाळवंटी नदीच्या पाण्यात चंद्रभागेतल्या `पाईकां`चे जीन्स मिसळले असावेत बहुदा.
पोर्तुगिजांनी सत्तरी तालुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत राणे अखंड त्यांच्याशी लढत होते. त्यातले क्रांतिवीर दीपाजी राणे आणि खूप नंतरचं दादा राणेंचं स्वातंत्र्यसंगर सर्वात आकर्षक आहे. दीपाजींच्या स्मृती जागवण्यासाठी २६ जानेवारीला नाणूसच्या किल्ल्यावर तरुण एकत्र झाले होते. दीपाजींचं कर्तृत्व मोठं असूनही त्यांच्या नावानं कुठेच काही नाही. शाळेत धडे नाहीत, फार चांगली पुस्तकं नाहीत, स्मारक वगैरेही नाही.त्यांच्याविषयी चांगलं बोलायला आजही काही लोकांची तयारी नाही, हे फेसबुकावरच्या चर्चेत दिसतंय. त्यावर गोवा पुढारीचे कार्यकारी संपादक प्रभाकर ढगेंनी दीपाजींवर पुस्तक लिहायचा संकल्प फेसबुकावर सोडलाय. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
मी लागोपाठच्या गेल्या दोन शनिवारी दोन लेख लिहिले. पहिला लेख दीपाजींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यात एकूणच लोकनायकांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी कसे प्रयत्न सुरू असतात, त्यावर लिहिलंय. दोन्ही लेख इथेच पाठोपाठ टाकलेत.

Friday, 31 January 2014

सूर्यबाप !

नामदेव ढसाळांची तब्येत ढासळल्याचं व्हॉट्सॅपवरून कळत होतं. आता ती बरी होण्याच्या पलीकडे असल्याचंही कळत होतं. त्या रात्री उशिरापर्यंत मित्रांशी संपर्कात होतो. सकाळी उठलो आणि एसेमेस बघितला. सगळं अपेक्षित होतं तरीही आपण एकदम रिकामे झालो आहोत, असं वाटलं.
कॉलेजात असताना `आज दिनांक`मधे असायचो. तेव्हा नामदेव पहिल्यांदा भेटले. मी आज दिनांकमधे सिनेमा टीव्हीवर लिहायचो. ते तुकडे नामदेव सत्यतामधे घ्यायचे. माझ्या लेखांत काहीही संबंध नसताना डेबोनेअरमधले फोटो स्कॅन करून टाकलेले मी बघितले. मी उडालो. बाकीच्या पानांत नामदेवांचं लिखाण असायचं. ते काहीतरी वेगळंच होतं. कपिल पाटलांनी त्याच काळात नामदेवांचं या सत्तेत जीव रमत नाही काढलं होतं. मी वाचून पुन्हा उडालो. हादरलो. मी त्यांचं मिळवून वाचत राहिलो. बरचसं वाचलं. मी वाचत राहिलो. बदलत राहिलो. आपल्याकडे बघायचे नवे डोळे देणारा तो अनुभव होता.

Friday, 10 January 2014

आपल्या ब्लॉगचं पुस्तक आलंय

गेलं वर्षभर मी माझ्या ब्लॉगला विसरूनच गेलो होतो. माझा ब्लॉग मला सतत हाका मारत होता. जिवाच्या आकांताने बोलावत होता. शर्टाचा कोपरा खेचत आपल्याकडे ओढत होता. पण मी कृतघ्न. त्याने मला इतकं दिलं आतापर्यंत. तरीही मी त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हतो. आता तर त्याने मला आणखी एक गोष्ट दिलीय. नवं पुस्तक. ब्लॉगचं नवं पुस्तक आलंय. त्याचंही नावही हेच माझं आभाळ. आता आणखी कृतघ्नपणा नको.
`मी मराठी`त होतो तोवर ब्लॉगवर खूप लिहिलं. त्यानंतर नवशक्तिला गेलो. तिथे थोडंफार लिहिलं. त्यानंतर बऱ्याच उलथापालथी झाल्या. इथेतिथे बरंच लिहिलं. पण लिहिणं प्रामुख्यानं होत होतं ते श्रीलिपीतून. त्याचं युनिकोडात चांगलं कन्वर्ट होत नव्हतं. कंटाळ्याला नवं कारण मिळालं होतं. पण आता सगळा आळस झटकून ब्लॉगवर नव्या वर्षाची पहिली पोस्ट टाकतो आहे.