Friday 17 November 2017

शिवसेना@५०

शिवसेनेवर लिहायला नेहमीच मजा येते. शिवसेना हा मला माझी समकालीन गोष्ट वाटते. त्याचा वेगवेगळ्या अंगांनी विचार मांडायला हवा खरंतर. पण माझ्या आळसामुळे तो लिहून काढणं नेहमीच राहून जातं. नेत्यांपासून मित्रांपर्यंत अनेकजण माझ्याशी शिवसेनेवर बोलत असतात. सेनेच्या पन्नाशीनिमित्त ते लिहून काढावं आणि पुस्तक छापावं अशी सूचना काही मित्रांनी केली. पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. आमचे मित्र राज्यशास्त्राचे अभ्यासक किशोर रक्ताटे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लिहिण्यासाठी सांगत होते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते किडे वळवळायला लागले. पण ते माझ्यामुळेच मागे पडलं.

दिवाळीच्या आधी अचानक गिरीश अवघडेचा फोन आला. त्याला प्रभातच्या दिवाळी अंकासाठी शिवनेवर लेख हवा होता. लिहून व्हावं म्हणून मी हो म्हटलं. पण त्याला मी अट घातली होती की फॉलोअप घे. तो त्याने भक्कम घेतला. त्यामुळे हा लेख होण्यात त्याचं माझ्यापेक्षा जास्त योगदान आहे. खरं तर या लेखाला आमच्या दोघांची जॉइण्ट बायलाइन हवी होती.

Wednesday 8 November 2017

गूगलची डूडल दुनिया



चित्रलेखात लिहायला सुरुवात केली त्याला आता जवळपास वर्षं होत आलंय. गेले सहाएक महिने तर जवळपास दर अंकात लिहितोय. त्यातले लेख अजूनपर्यंत कधीच ब्लॉगवर टाकला नाही. अनेकदा अनेक लेख टाकावेसे वाटले. पण फॉण्ट कन्वर्टचा प्रॉब्लेम होता. इतक्यातच बेगम अख्तर आणि अब्दुल कवी दसनवी यांची डूडल पाहिल्यावर एक लेख ब्लॉगवर टाकायला हात सुरसुरले होते. आज नृत्यसम्राज्ञी कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं डूडल पाहिल्यावर राहावलंच नाही. थोडा वेळही मोकळा होता आणि प्रयोग करता करता श्रीलिपीच्या एक्स्चेंज युटिलिटीमध्ये लेख कन्वर्ट झालादेखील.

६ फेब्रुवारीच्या चित्रलेखाच्या अंकात मी गुगलच्या डूडलवर लेख लिहिला होता. त्याचा इण्ट्रो होता, `क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिवसभर गूगलने प्रकाशित केलेलं डूडल गाजलं. त्यादिवशी पंधरा लाखांहून अधिक जणांनी सावित्रीबाईंविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्च केलं. फक्त भारतातच नाही तर जगभर ही डूडल चर्चेचा विषय बनली आहेत.`

Monday 6 November 2017

एका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते?

कॉ. संपत देसाई संपर्क - ९९७५०९८५१४
कॉम्रेड संपत देसाईंविषयी लिहावं तितकं कमीच आहे. ते कॉम्रेड आहेत, विद्रोही आहेत, त्यांचा व्यासंगही दणकट आहे, तरीही ते दिलखुलास हसत असतात. कायम आपल्या माणसांमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना धमकी देणारं पत्र आलं. त्यात कॉम्रेडने आजरेकर फडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. एखादा कॉम्रेड विवेकाची मशाल घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात शिरतो, तेव्हा धर्मांध त्याला घाबरतात आणि घाणेरड्या शिव्या देणारी, धमक्या देणारी पत्रं लिहितात. म्हणून या धमक्या महत्त्वाच्या आहेत. धर्मांधांना विरोध करणाऱ्यांनी कोणत्या ट्रॅकवर काम करायला हवं, याची दिशा देणारी ही घटना आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबरला आजऱ्यात निषेध रॅली आणि सभा आहे. राज्यभरातून मान्यवर येत आहेत.