आज रविवार ५
फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर
अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं
सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा
निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून
आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.
आपली संस्कृती ही कोड्यासारखी आहे. थोडा वेळ आत शिरलं की ती चकव्यासारखी फिरवत ठेवते.
श्रद्धेपोटी डोळे आणि डोकं मिटून घेतलं नाही तर मस्त प्रश्न पडत राहतात. त्यातल्याच एका प्रश्नातून हा लेख आलाय. आपल्याला संस्कृतीच्या नावाने तोकडे कपडे
घालायला बंदी केली जाते. पण आपल्या इतिहासात अंगभर कपड्याची परंपरा खूप नवी आहे.
आपले पूर्वज कमीत कमी आणि आज सेक्सी ठरतील असेच कपडे घालायचे, प्राचीन चित्र शिल्प
ग्रंथ त्याचे दाखले देतात. या लेखात तेच मांडलंय. त्यामुळे पुन्हा एकदा फोन आले.
सकाळीच एक फोन सोलापुरात वेदपाठशाळा चालवणाऱ्या गुरुजींकडून आला. ते खुलासे देत
होते. रामचरितमानस, वाल्मिकी रामायण वाचलंय का, असं विचारत होते. मी दोन्ही ग्रंथ
छान भक्तीभावानेही वाचलेत. नंतर आलेले फोन संस्कृतीच्या नावानेच पूर्ण कपडे
घालण्याचं समर्थन करत होते. त्यात एक फोन बीड-पाटोड्याहून एका मुस्लिम
दुकानदाराचाही होता.
बाकी लेख आवडल्याचेही
बक्कळ फोन होते. थोडक्यात, मजा आली. ती मजा शेअर करावी म्हणून मी पाठवलेला लेख थोडे
बदल करून कट पेस्ट करतोय. बघा वाचून.
.......
शंभर वर्ष झाली
त्याला. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी १९१६ साली महिलांच्या उच्चशिक्षणासाठी एसएनडीटी
विद्यापीठ उभारलं. इतक्या वर्षांत घडलं नाही, ते अचानक घडू लागलंय. आधी पुण्याच्या
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतल्या परिसरातली अमंगल नकारात्मक कंपनं दूर करण्यासाठी
होमहवन करण्यात आलं. आता मुंबईतल्या चर्चगेट कॅम्पसमधे मुलींनी कसे कपडे घालावेत,
याचा फतवा निघालेला आहे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात म्हणे. सरकारमधली डोकी
फिरली की शिक्षणामधलीही फिरतात असं मानून चालावं किंवा तो केवळ एक योगायोग समजावा.
पेपरात छापून आलेल्या बातम्यांना खरं मानायचं, तर ड्रेसकोडचा फतवा
महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला निघावा, हा आणखी एक योगायोगच.
शंभर वर्षांच्याही
आधी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या बहिणीला महर्षी कर्वेंनी त्यांच्या संस्थेत
प्रवेश दिला नव्हता. त्याचं कारण जात होतं. शिंदे मराठा. त्यामुळे त्यांना फक्त ब्राह्मण
विद्यार्थिनी असलेल्या संस्थेत प्रवेश दिला गेला नव्हता. ती चूकच होती. पण
संस्थेच्या उभारणीच्या काळात तिच्या अस्तित्वासाठीच संघर्ष सुरू असताना घेतलेला हा
व्यावहारिक निर्णय होता. या एकाच घटनेला लोंबकळत कर्वेंना जातीवादी ठरवायचं की
त्यांनी दीर्घ आयुष्यभर दिलेला मुक्तीसाठीचा लढा मोठा मानायचा, हे ज्याचं
त्याच्यापाशी. मात्र महर्षी कर्वेंच्या एसएनडीटीने बहुजन समाजातल्या मुलींच्या
अनेक पिढ्यांच्या पंखात आभाळात झेपावण्याची ताकद भरली, याविषयी कुणी शंका बाळगायचं
कारण नाही.
महर्षी कर्वेंच्या
पुढच्या पिढीने, र. धों. कर्वेंनी त्यांचा स्त्रीमुक्तीचा वारसा अधिक आक्रमकतेने
पुढे नेला. त्यांनी स्त्रीमुक्तीच्या लढ्याला नवे अर्थ दिले. त्यांच्या `समाजस्वास्थ्य` या
मासिकाने काळाच्या पुढे जाऊन संततीनियमनाचा पुरस्कार केला. समाजाला विवेकी लिंगभानाचा
विचार दिला. पुरुषी समाजाने लैंगिक दमनाच्या जोखडाखाली बांधून ठेवलेल्या स्त्रीजाणीवेला
नव्या जागृतीचा विचार दिला. `समाजस्वास्थ्य`ला तेव्हा असभ्य म्हटलं गेलं. त्याला अश्लील
मानलं गेलं. त्याला संस्कृतीच्या विरोधी ठरवलं गेलं. आता एसएनडीटीतल्या विद्यार्थिनींना
एसएनडीटीकडूनच असभ्य, अश्लील आणि असंस्कृत ठरवलं जातंय तसंच.
रघुनाथराव कर्वे
खूपच थोर होते. एनएसडीटीमधल्या मुलींकडे तशी कोणतीही थोरवी नाही. पण या दोघांनाही
असभ्य म्हणण्याची मानसिकता मात्र बदललेली नाही. आम्ही आखून दिलेल्या मर्यादांमधेच
तुम्ही राहायचं, ही जबरदस्ती तीच आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळवलं तरी मोकळेपणाचं
मोल काही आपल्याला कळलेलं नाही. तरुण असोत, महिला असोत की शेतकरी, सर्व सर्जकांनी
थोडं चौकटीबाहेर गेलं की समाजधुरिण अस्वस्थ होतात. त्याला स्वैराचार ठरवलं जातं.
त्यांच्या ऊर्मी संपवून टाकाव्यात यासाठी आटोकाट प्रयत्न होतो. त्यांना हात पाय
तोडून चौकटीत बसवण्यासाठी संस्कृतीच्या नावाने तलवारी उपसतात. नव्या विचारांचे
गर्भपात करण्याचीही वेळ यायला नको, म्हणून तरुणांचं वैचारिक निर्बिजीकरण करण्याला
सामाजिक बांधिकली मानलं जातं.
हा काही सुतावरून
गाठलेला स्वर्ग नाही. कपड्याच्या गोष्टी म्हटल्या तर छोट्या आहेत. म्हटल्या तर
मोठ्या. धर्म, संस्कृती, सभ्यतेच्या नावाने अशा छोट्या छोट्या बेड्यांची सवय अंगवळणी
पडते. कुणी काही वेगळं करतो म्हणजे फार तर छोटी बेडी तोडून मोठी बेडी घालतो एवढंच.
इतकी बंधनं आहेत की आपल्याला खरोखर मोकळं होताच येत नाही. आम्हाला स्वतंत्र होताच
येत नाही. म्हणून जिथे जिथे गळचेपी होत असेल, तिथे तिथे विरोध व्हायला हवा.
एसएनडीटीच्या ड्रेस कोडचा निषेध करण्यासाठी चार दोन जरी तरुण रस्त्यावर उतरत
असतील, तरी त्यांचं स्वागतच आहे.
एसएनडीटीच्या
सर्क्युलरमधे शब्द नाहीत तसे, पण गोष्ट संस्कृतीचीच आहे. एरव्ही भारतीय
संस्कृतीच्या नावाने आपल्याला हजार वर्षांच्या तरी मागे खेचलं जातं. प्राचीन
काळातल्या भारताच्या महान वैभवाच्या, जगावर राज्य करणाऱ्या वारशाचे दाखले दिले
जातात. त्याच संस्कृतीचा विचार करणाऱ्यांनी कपड्यांच्या बाबतीतही असं हजार वर्षं
मागे जायला हवं. हडप्पा- मोहोंजोदडोतल्या उत्खनातात सापडलेली एका बाईची शाळेच्या
पुस्तकातली मूर्ती आठवतेय? आपल्याला माहीत असलेली मूळ लोकमाताच ती. ती आहे
तशी एनएनडीटीत आली तर ड्रेस कोडमध्ये नाहीच बसणार. सगळ्या प्राचीन शिल्प,
चित्रातल्या आपल्या अशाच आया आहेत तशा एसएनडीटीला चालणारच नाहीत.
आपली शब्दप्रमाण
मानणारी संस्कृती आहे. वेद शोधुया, पुराणं शोधुया. इतिहास शोधुया. वेदांग शोधुया.
पुराणं शोधुया. महाकाव्य शोधुया. जे काही संस्कृत, पाली, अर्धमागधीमध्ये लिहिलंय
ते सारं शोधुया. वाल्मिकी रामायणात सीतामाईच्या सुंदर शरीराचं जे रसरशीत वर्णन
केलंय, ते वाचलं तरी कळतं अंगभर कपडे घालणारी आपली संस्कृती नाहीच नाही. क्रौंच
पक्ष्यांचा प्रणय मोडल्याच्या वेदनेने महाकाव्य रचणाऱ्या ऋषी वाल्मिकींचं रामायण
सोडून आम्ही स्त्रीला तुडवायलाच हवं असं सांगणाऱ्या गोस्वामी तुलसीदासांच्या
रामचरितमानसात आदर्श शोधले, की हेच होणार. ही आमची खरी संस्कृती नव्हती, हे माहीत
असूनही फक्त आम्हाला सोयीचं आहे म्हणून हे
स्वीकारलं गेलं.
सिनेमा, नाटक,
टीव्हीतही भारतीय संस्कृतीचा प्राचीन काळ मांडायची वेळ आली, तेव्हा सगळ्या
हिरोइनींना अर्धवट छाती उघडी दिसणाऱ्या कंचुक्याच घालाव्या लागल्या. एका मुलीनं
तसंच काहीतरी घातलं होतं, म्हणून आता एसएनडीटीच्या कुलगुरूंना सभ्यतेचा पुळका
आलेला आहे. आपल्या देशात अंगभर कपडे घालण्याची संस्कृती आली ती परकीय आक्रमणानंतर.
मुसलमानांनंतर ब्रिटिशांच्या काळात ती पक्की झाली. ते थंडगार प्रदेशातून आलेले
होते. आपण समशीतोष्ण कटिबंधातले. इतर गोष्टींसाठी संस्कृतीचे मापदंड हजार
वर्षांपूर्वी नेऊन जोडले जातात. त्यासाठी परकीय संस्कृतीचा प्रभाव ही पराभूत
मानसिकता मानली जाते. तसं इथे केलं तर एसएनडीटीच्या मुली कुलगुरूंपेक्षा जास्त
सुसंस्कृत मानायला हव्यात.
बायकांच्या
कपड्यांच्या बाबतीतला संस्कृतीचा न्याय पुरुषांच्या बाबतीत मात्र उलटाच असतो.
कोणतंही धर्मकार्य करायचं म्हटलं की पुरुष हजार वर्षं मागे जातो. संस्कृतीच्या
नावावर पुरुषाच्या अंगावरचे कपडे उतरतात. तो अंगप्रदर्शन करत एका धोतरावर येतो.
फक्त लंगोट घालणारी इतिहासातली धार्मिक व्यक्तिमत्त्वं पौरुषत्वाचं प्रतीक बनतात.
नागव्या बाबांचे कुंभमेळ्यात लाड होतात. दिशा हेच आपलं कापड आहे, असं म्हणत जैन
साधू अंगप्रदर्शनाचं उदात्तीकरण करतात. हे साधू नाहीत, तर अशा वस्त्रहिनांकडे
लैंगिक पूर्वाग्रहांशिवाय बघत नमस्कार करणाऱ्या आयाबायाच खरं तर नमस्काराच्या
जास्त अधिकारी असतात.
पुरुषांच्या
केसांचंही असंही आहे. पुरुषांनी लांबलचक केस वाढवावेत, असेच दाखले आपल्या संस्कृतीने
सापडतात. भगवान श्रीकृष्णांपासून शिवरायांपर्यंत आपले सर्व आयकॉन हिप्पीटाइप भरपूर
केस वाढवणारे. आम्हाला मात्र आज संस्कृतीच्या नावाने युरोपातून आलेल्या
स्टाइलनुसार केस कापायला सांगितलं जातं. फक्त केसच नाहीत, आमच्यावर थोपलेली
संस्कृतीची बरीचशी प्रतीकं आपली नाहीतच. आज उच्चरवात सांगितल्या जाणाऱ्या
राष्ट्रवादाची प्रतीकं आणि विचारही असेच परके. तरीही त्याच परक्या शस्त्रांनी आज
आपल्यावर तथाकथित स्वकीय राष्ट्रवादाची सांस्कृतिक सत्ता राबवली जातेय. एसएनडीटीचा
ड्रेस कोड त्याचाच जाणते अजाणतेपणी झालेला परिणाम असावा.
पण आता अशा
कुंपणांचे दिवस संपले आहेत. ज्ञानाची कवाडं उघडी झाली आहेत. जग एक खेडं बनतं आहे.
धर्म, जात, भाषा, लिंग, संस्कृतीच्या नावाने सुपरस्टोअर चालवणाऱ्या संकुचितांचे
दिवस आता संपणारच आहे. नव्या जगाची तुतारी वाजू लागली आहे. तिचा आवाज ऐकू येऊ नये
म्हणून संकुचितांनी बोंबाबोंब सुरू केली आहे. तुम्ही कोंबडा झाकला म्हणून नवा
सूर्य उगवायचा राहणार नाही. कपड्यांवरची बंधनं तर त्याच्या पावलांच्या आवाजानेच उडून
जाणार आहेत.
Very well said Sachin
ReplyDeleteI do not know the reason for the restrictions on sndt students and though the dress code should not be forced upon, the students should exercise restrain while dressing up in an educational institute.
ReplyDeleteDon't think it's correct to justify scantily clad students in the name of our old culture. Nothing of those days is prevalent today. Let us be proud of our culture for right reasons.
https://www.youtube.com/watch?v=fL-1kHxsavI Just because you may go nude at nudist beach doesn't mean you go nude to office. You will get fired. So use some sense and dress accordingly. This justification in this article is bull-shit
ReplyDeleteNo wonder u r posting as anonymous .. एवढा लेख वाचून सुद्धा काही डोक्यात शिरत नसेल तर तुमच्या खांद्यावर तुमचे डोके खचितच नसणार !
DeleteShetkari kamavar sutabutat jato ka? Kay boltay te tumch tumhala tari kaltay ka? Ki ugich uchalali jibh n lavali talyala..
ReplyDelete