Saturday, 10 September 2011

हे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना?


आम्ही अस्सल मुंबईकर. पण शहरातले सार्वजनिक गणपती बघायला फिरायची पद्धत आमच्या घरात नाही. कारण घरातच गणपती. घरचा गणपती गेला तरी वाडीतला सार्वजनिक गणपती असायचा. त्याची रोजची पूजा, नैवेद्य, आरती हे आमच्या घरातून व्हायचं. त्यामुळे अकरा दिवस घरातच लगबग असायची. आम्ही घरातले सगळे मुंबईभर फिरायचो ते देवी बघायला. आजही जातो. 

त्यामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली याविषयी ऐकलं भरपूर होतं. पण प्रत्यक्षात दर्शनाला गेलो ते टीव्हीत पत्रकारिता सुरू केल्यावर. ईटीव्हीत असताना गणपतीत दिवसभर घरी राहता यावं म्हणून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो. तेव्हाच म्हणजे मला वाटतं २००० किंवा २००१ साली पहिल्यांदा राजा आणि गणेशगल्लीच्या दर्शनाला कामाचा भाग म्हणून गेलो. मी पहिल्यांदा राजाकडे गेलो तेव्हा दर्शनासाठी रांग नव्हतीच. जी होती ती नवसाचीच रांग. गणेशगल्लीत मात्र देखावा बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती. पण हळूहळू सगळंच बदलत गेलं. लालबागचा राजा गर्दीचा राजा बनला. साधारण २००५ आणि ०६ ला गर्दीत चेंगरत दर्शनाला जावं लागलं होतं. त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत लांबून दर्शन घेण्याचा सोपा मार्ग निवडला. दोनेक वर्षांपूर्वी दर्शनाला गेलो आणि दर्शन न करताच परत आलो होतो. हे सगळे बदल डोळ्यासमोर घडताना बघत होते. माझे मीडियातले मित्रच हे बदल घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावत होते. तेही जवळून बघत होतो.


रविवारी मीडिया आणि लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांत झालेला राडा कानावर आला आणि या सगळ्या बदलांवर लिहायचं ठरवलं. तो लेख आजच नवशक्तित छापून आला. मूळ लेखात पेपरांची आणि माणसांची नावं नव्हती. पण आता जबाबदारी माझीच आहे. इंटरनेटसारखा मोकळ्याढाकळ्या मीडियात काय कशाला लपवायचं. सगळं सरळच लिहिलंय.

रविवारी ४ तारखेला अमिताभ बच्चन आणि शंकर महादेवन लालबागच्या राजाच्या आरतीला होते. या सेलिब्रेटी आरतीनंतर मी़डियावाले थोडे सैलावले. तेवढ्यात मंडपातच गडबड गोंधळ ऐकू आला. टीव्ही कॅमेरा त्याचा शोध घेऊ लागले. राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते एका पोलिसाला मारहाण करत असताना त्यांना दिसलं. मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी येऊन ते भांडण सोडवलं. पण तेवढ्यात कॅमेरांनी आपलं काम केलेलं होतं. मारामारी करणा-या कार्यकर्त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी मीडियाला शिव्या आणि धमकी द्यायला सुरुवात केली. त्यात महिला पत्रकारांनाही नको नको ते बोललं गेलं. पुन्हा ज्येष्ठांनी येऊन माफी मागितली. प्रकरण मिटवलं. त्यामुळे टीव्ही चॅनल्सनी दोनेक दिवस बहिष्कारही घातला होता. आता टीव्हीवाल्यांचा राग ओसरला आहे. तरीही अनेक चॅनल्सनी आपल्या ओबी वॅन्स लालबागच्या राजाकडून काढून घेतल्यात. सगळ्या चॅनल्सवर पूर्वीसारखा राजाच्या विज्युअल्सचा रतीबही दिसत नाहीय.

हे सारं घडत होतं, नवसाला पावणा-या लालबागच्या राजासमोर आणि त्याच्या भक्तांच्या गर्दीसमोर. पण कुणालाच हे नवीन नाहीय. अशा घटना राजाच्या मंडपात गेली काही वर्षं सातत्याने घडतच आहेत. अगदी परवाच काळाचौकी पोलिस ठाण्यात एका महिला पोलिस कर्मचा-यानेच लालबागचा राजा मंडळाच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदवलीही आहे. पण मंडळ आणि पोलिस दोघेही मीडियाशी त्याविषयी काहीही बोलत नाहीत. मीडिया आणि राजाचं मंडळ दोघांचं भांडण खरंतर दोघांनाही परवडणारं नाही. तरीही हे सुरू आहे.

खरं तर लालबागचा राजा गणपतीच्या मुंबईतल्या इतर प्रसिद्ध गणपती मंडळांमधलाच एक होता. गणेशगल्ली, तेजू काया मेन्शन, रंगारी बदक चाळ, खेतवाडी गल्ली नंबर तेरा आणि चेंबूरचा टिळक नगर या गणपतींसोबत राजाही कव्हर व्हायचा. त्याचे फोटो इतर गणपतींच्याच रांगेत दोन कॉलमात छापून यायचेय. लालबागच्या राजाचे कार्यकर्ते फोटो घेऊन पेपरांच्या ऑफिसांमधे फिरत असायचे. पण या सगळ्यांतही जास्त भाव असायचा तो गणेशगल्लीचाच. गणेशगल्लीतच तुफान गर्दी असायची. भरपूर खर्च करून केलेला देखावा बघण्यासाठी पास विकत घ्यायला झुंबड उडायची. परळ, लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकीपर्यंतचे इतर गणपती बघायला जितका वेळ लागायचा तितकाच वेळ एका गणेशगल्लीत लागायचा. पण नवं शतक लालबागच्या राजासाठी नवं स्थित्यंतर घेऊन आलं.

२००३ साली मुंबईतल्या एका नव्या स्थानिक पण सॅटेलाईट न्यूज चॅनलने लालबागचा राजा चोवीस तास दाखवला. हे चॅनल विश्वाचा सहारा असलेल्या राजाच्या मंडळाचाही सहारा बनलं. तेव्हा ओबी वॅन नवीन होत्या. चोवीस तास एक गणपती टीव्हीवर दिसणं ही खरंच नवी आणि वेगळी संकल्पना होती. इतर कार्यक्रम सुरू असतानादेखील खाली छोट्या चौकटीत राजा दिसत राहायचा. पण दिवसतला जास्तीत जास्त काळ स्क्रीनभर बाप्पाचंच दर्शन होत राहायचं. आरत्या, पूजा, मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तांचे इंटरव्यू दाखवून झाले. आता चोवीस तास दाखवायचं काय, हा प्रश्न होता. मग संध्याकाळी प्राईम टाईमच्या वेळेत छोटे मोठे कलाकार, राजकीय पुढारी यांना मंडपात आणण्यात या चॅनलनेच पुढाकार घेतला. शेजारच्या चिवडा गल्लीत इंग्रजी सिनेसाप्ताहिक स्क्रीनचं ऑफिसही नुकतंच आलं होतं. तिथे सिंनेमा आणि टीव्हीतल्या कलाकारांचा राबता होता. त्यांनाही मच्छी मार्केटच्या शॉर्टकटने मंडपात आणलं जात होतं. सहज टीव्हीवर झळकायला कलाकारांची ना नव्हतीच. सोबत देवदर्शनही होऊन जायचं. असं सांगितलं जातं की त्या चॅनलच्या तेव्हाच्या प्रमुखाला लालबागच्या राजा मंडळाने तेव्हा दिवसाचे दीड लाख दिले होते. खरं खोटं लालबागचा राजाच जाणे.

त्या काळात सगळंच जुळून आलं होतं. लालबागच्या राजाच्या पदाधिका-यांना मीडियाचं महत्त्व कळलं होतं. त्यासाठी ते नीट प्रयत्नही करत होते. एका मोठ्या एक्स्प्रेस ग्रुपचं ऑफिस लालबागच्या राजाच्या शेजारीच आलं होतं. कधी गिरणगाव जवळून न पाहिलेल्यांना तिथल्या गर्दीने चक्रावून टाकलं होतं. गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी लोकसत्तेच्या पहिल्या पानावर लालबागच्या राजाचे पानभर फोटो झळकायला लागले. महाराष्ट्र टाईम्सने मुंबईकरांच्या सणांचं एक बीटच बनवलं होतं. त्यात गोविंदापासून झेवियर्स कॉलेजच्या मल्हारपर्यंतचे सगळी सेलिब्रेशन सविस्तर कव्हर होत असत. त्यात लालबागच्या राजाच्या बातम्या तर महत्त्वाच्या होत्याच. शिवाय त्याच काळात चोवीस तास हिंदी टीव्ही चॅनल्स नव्याने आली होती. विशेषतः आज तक आणि नंतर स्टार न्यूज यांनी लालबागच्या राजाच्या बातम्या सविस्तर दाखवायला सुरुवात केली होती.

हे सारं होत असताना बहुदा २००३ सालीच एका बिल्डरने लालबागच्या राजाला नवस पू्र्ण झाला म्हणून पाच किलो सोनं दिलं होतं. हा आकडा डोळे पांढरं करणाराच होता. शिवाय तो बिल्डर लालबागच्या राजासमोरच अगरबत्ती हार विकत असे हे कळल्यावर तर लोकांना धक्काच बसला. टीव्ही चॅनल्सवर नवसाच्या रांगेतल्यांचे इंटरव्यू सुरू असत. लालबागच्या राजाच्या कृपेने कुणाला मूल झालं होतं. कुणाला नोकरी लागली होती. कुणाच्या मुलीचं लग्न झालं होतं. लोक बघत होते. खरं तर मुंबईतली सगळीच जुनी मंडळं भाविकांच्या श्रद्धेचं स्थान होतीच. बाप्पा सगळीकडेच लोकांच्या नवसाला पावत असल्याच्या कथा ऐकू येत असत. पण तिथे या कथा मीडियासमोर क्वचितच आल्या. तिथले देखावा, चलचित्रं कौतुकाचा विषय ठरली. पण लालबागच्या राजाकडे दाखवण्यासाठी देखावा नव्हता, चलचित्र नव्हती. होत्या त्या नवसाच्या कथा. तरीही भक्तांच्या या कथा ऐकून नव्या भक्तांची रांग राजाच्या मंडपात लागली. लोक देशाच्या कानाकोप-यातूनही येऊ लागले. कारण लालबागच्या राजा नवसाला पावतो याचे दाखले त्यांनी टीव्हीवरच पाहिले होते.

लालबागचा राजा जुनाच. त्याचं गिरणगावातल्या इतर गणपतींहून वेगळी वैशिष्ट्यही आहेतच. तो नवसाला पावतो ही मान्यताही जुनीच. पण तरीही मरणाची गर्दी तिथे नव्हतीच. मार्केटला येताजाता नमस्कार करायचा गणपती म्हणून लालबागचा राजा गिरणगावाला माहीत होता. मार्केटच्या गल्लीत चार पाच पावलं टाकली की राजाचं मन प्रसन्न करणारं दर्शन पोटभरून घेता येत असे. पुढे गर्दी वाढली तेव्हादेखील सुरुवातीच्या दिवसांत पंधरा वीस मिनिटांत सहज दर्शन होऊन जायचं. गौरीविसर्जन झालं की जास्त वेळ लागायचा. तरीही तासा दोन तासात दर्शन होऊन जायचं. लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं राजाच्या दर्शनाला यायचे. रात्री कधीतरी चूपचाप गर्दी टाळून हे दर्शन व्हायचं. पण मीडियाने चमत्कार घडवला होता. तुफान गर्दी वाढली. राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींची मांदियाळी दिसू लागले. त्याचे इंटरव्यू टीव्हीवर दिसू लागले. फोटो पेपरांत झळकू लागले.

गर्दी प्रचंड वाढली. विशेषतः २००६ पासून. अकरा दिवस चोवीस तास लोक थांबत नसत. किती तास रांग लावून लालबागच्या  राजाचं दर्शन घेतलं हे मित्रमंडळींत सांगणं हा कौतुकाचा विषय बनला. लालबागच्या राजाचा दर्शनाचा पास मिळवला हे स्टेटस सिंबल बनलं. लालबागच्या  राजाच्या स्टेजवर सत्कार होणं, हा वीआयपी किंवा सेलिब्रेटी बनल्याचा पुरावा मानला जाऊ लागला. आता लालबागच्या राजाच्या मंडळाला मीडियाची गरज उरली नव्हती. परवापरवापर्यंत मंडळ त्यांना पंचपक्वान्न देत असे. त्यांची तसेच त्याच्या पैपाहुण्यांची विशेष सरबराई होत असे. पण आता चक्र फिरली होती. गर्दीत दर्शन घडवणं अधिक कठीण बनलं होतं. कार्यकर्ते आणि तिथे ड्युटीवर असणारे मीडियावाले आपल्या पाहुण्यांना दर्शन घडवणं हा स्वतःचा हक्कच मानत होते. काऱण दोघेही गर्दीचं क्रेडिट स्वतःकडे घेत होते. त्यात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही भर होती. त्यात भांडणं होऊ लागली. वारंवार गोष्ट हमरीतुमरीवर येऊ लागली. २००८ साली स्टार न्यूज आणि स्टार माझाने कार्यकर्त्यांची मुजोरी बातम्यांवर दाखवली होती. लालबागच्या राजाच्या समोरच महिलांना केली जाणारी धक्काबुक्की पाहून अनेकांना धक्का बसला होता. पुढे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. पण यावर्षी ते घडलंच आहे.

यावर्षीच्या जांबोरी मैदानातल्या गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या दहिहंडी गोविंदा उत्सवातला एक किस्सा. लालबागच्या राजाचं गोविंदा पथक आलं. त्यांचा प्रसिद्ध नाशिक बाजा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. म्हणून अहिर यांनी त्या पथकाला स्टेजवर बोलावून घेतलं. त्यांच्या वाजपाचं खूप कौतूक झालं. गोविंदा पथकाने हंडीला सलामीही दिली. त्यांना त्यांचं बक्षिस दिलं. सचिन अहिर यांनी त्यांचं कौतूक केलं. निरोप दिला आणि म्हणाले, लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना फक्त एकच विनंती आहे, आता एक सप्टेंबरला आमचा फोन उचलावा. ही गंमत होती. पण गंमतीत का होईना पण राज्याच्या मंत्र्याला हे म्हणावं लागतं. यातंच सारं आलं. राजकारणी, मीडिया, सेलिब्रेटी सगळे आपल्याला विनंती करतात यामुळे कार्यकर्त्यांचा अहंकार सुखावलेला असतो. हम करे सो कायदा हेच राजासमोर सुरू असतं.

आता हा माज आवरायची वेळ आलीय. कार्यकर्ते म्हणवून घेणा-या नव्या बडव्यांना आवरायला हवंच आहे. पण मीडियाने स्वतःला आवर घालून घ्यायला हवाय. कदाचित आता त्याची सुरुवात होण्याची चिन्हही आहेतच. त्याआधी आवर घालायला हवाय तो भक्तांनी. तासन्तास रांगा लावल्याने खरंच बुद्धीची देवता पावणार आहे का? आणि त्याहीपेक्षा या तासन्तास रांगेत उभ्या राहणा-या भक्तांवंर अन्याय करून मधे घुसणा-यांना गणराय पावण्याची बिल्कूलच शक्यता नाही, हेदेखील आपल्याला कसं कळत नाही? याचा साधा विचार आपण सगळे कधी करणार आहोत

19 comments:

  1. shabdaanchi sansanit sixer....

    tuza likhanaa-madhala flow kunahi lekhakaalaa heva vaataavaa asaach aahe.

    sachin naav asel tar six maaraayachi savay aapoaap laagate kaay ?

    abhijit uday tilak
    9765113344

    ReplyDelete
  2. सचिनभाऊ याला आपण पत्रकारच जबाबदार आहोत. लहानपणी काळाचौकीला गणपतीच्या सुटीत नातेईकांकडे गेलं की परिसरातले सगळे गणपती दोन-तीन तासांत पाहिले जात. (नंतर नंतर देवावरची श्रद्धा उडाली)पण आता माझे काही मित्र लालबागच्या राजाला नवसाच्या रांगेत २२ तास उभा राहिलो. राजाचे तोंड बघितले आणि सगळा थकवा गेला, असे सांगतात, तेव्हा या मित्रांच्या देवभोळेपणाचं वाईट वाटतं. यांनी २२ तास वाया घालवले, त्याबद्दल सुनवावं वाटतं. पण असो. या राजाला आपणच मोठा केलाय, तेव्हा त्याबद्दल काय बोलणार पुढे?

    ReplyDelete
  3. आजच्या घडीला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खुप गर्दीचा सामना करावा लागतो, पण नवसाला पावणा-या राजादरबारी शिस्त ना भाविक पाळतात, ना पोलिस, ना मंडळाचे कार्यकर्ते म्हणतात ना ज्याचं आहे वशिला त्याचचं घोडं काशीला..या उक्ती प्रमाने तासंतास राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहणा-या भाविकांपेक्षा vip रांगेतुन वशील्याने दर्शन अगदी अर्ध्या तासातही होतं.....आणि यात म्हातारी माणसं आणि लहानमुलं यांचे माञ हाल....
    हा माझा कालचाचं अनुभव आहे

    ReplyDelete
  4. आजच्या घडीला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खुप गर्दीचा सामना करावा लागतो, पण नवसाला पावणा-या राजादरबारी शिस्त ना भाविक पाळतात, ना पोलिस, ना मंडळाचे कार्यकर्ते म्हणतात ना ज्याचं आहे वशिला त्याचचं घोडं काशीला..या उक्ती प्रमाने तासंतास राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहणा-या भाविकांपेक्षा vip रांगेतुन वशील्याने दर्शन अगदी अर्ध्या तासातही होतं.....आणि यात म्हातारी माणसं आणि लहानमुलं यांचे माञ हाल....
    हा माझा कालचाचं अनुभव आहे

    ReplyDelete
  5. सर, अगदी सनसनीत लेख लिहिला आहे. खरं पहिलं तर देव सगळीकडे सारखेच..मानले तर देव नाही तर दगड. आणि काही तरी मागणे घेऊन मागायला जायचे मग त्याच कसली आली भक्ती तो तर एक व्यवहार झाला. मला अमुक दे मी तुला सोने,नाणे आदी चढवेन.........नाही का.?

    ReplyDelete
  6. devidas sudam koyande13 September 2011 at 08:02

    Sachin, sagale mazya manatale mandales. dhanywad!

    ReplyDelete
  7. kharach lekh changala aahe. Ya gosti mihi eklya hotya.......tyamule patrakarita kay aste he kaltahi hote va aahe. Devavar shradha asavi pan tyasathi 10 te 20 tas vaya ghalvun, policana tras devun aapanach ashya mandalana va devana mothe karit asto hehi khare aahe. Tyamule kharech yala doosara koni rokhu de athava na rokhu de survat aapanch keleli bari........ media kay kinva nokrshah va rajkit nete kaay... jyakade laksh dile pahije tyapeksha aaplyala kinva aaply bossla pass kinva anya kahi milvun det khush thevnyasathi he sagal karit astat hehi khote aahe ka ?

    ReplyDelete
  8. Tumhi jya builder cha ullekh kela ahe to builder ata hayat nahiye pan tyane jey kahi kel tyache fal tyala milale even aple pot bharnyasathi lalbaugh chya rajacha vapar jyani jyani karun ghetla tya servana bappa ne changlech fal dile ahe aaj na to builder ahe na tithe loksatta ch office tumhi je mhanalat ki tyane itke sone dile pan tya builder ne nantar magchya darvajane tey son parat magun ghetla n tyache fal tya builder la milalech pahila paralysis cha attack ala n khichpat padun tras sahan karat shevati swargavasi jhala

    ReplyDelete
  9. दादा, यंदा मी देखील लालबागच्या राजाचे थेट वशिल्याने दर्शन घेतले. लांबच लांब रांगा आणि थकलेले भक्तांचे चेहरे मी बघत होतो, पण केवळ मुखदर्शनासाठी १० आणि १४ तास रांगेत उभे राहणे मला पटत नव्हते. २००३-०४ च्या आसपास मुंबईतील प्रत्येक गल्लीत जसा गणपती असायचा तसाचे लालबागचा राजा होता.. मीही तेव्हा ३-४ वेळा थेट दर्शन घेऊन आलो आहे.. आज जसा तो राजा आहे तसाच पूर्वीही होताच. पण मिडीयाला कुठे थांबायचे हे कळत नसल्याने अशी काही प्रसिध्दी दिली गेली की गणेशोत्सवात फक्त लालबागलाच गणपती येत असावा अशी कोण बाहेरच्या माणसाची समज झाल्यास ती गैर मानता येणार नाही.

    ReplyDelete
  10. नमस्कार,

    लेख तर चांगला झाला आहेच. सर्व सामान्यांना माहित नसलेला घटनाक्रम विस्तृत पणे मांडल्याबद्दल धन्यवाद.
    पण या सा-या घटना क्रमवार आणखीन थोडे भाष्य - जास्त परखडपणे - करावे असे मला वाटते.

    काही मुद्दे..:
    १. मी पत्रकारिता शिकत होतो तेव्हा बातमी म्हणजे घडलेल्या घटनेचे वर्णन.. अग्रलेख अथवा अन्य विशेष सदराद्वारे त्यावर साधक बाधक असे सर्व अंगाने भाष्य.
    पण आजकाल झाले असे आहे सर्व वृत्त वाहिन्याकडे लालबागचा राजा हीच एकमेव बातमी असते.. त्यावर भाष्य वैगरे तर विरळाच.. सारे लक्ष टी आर पी व खपाच्या आकड्यावर... मग आपण दाखवतोय त्यात अंधश्रद्धा किती वैगरे तर प्रश्न दूरच..
    २. आपला सारा समाज विरोधाभासाने ठासून भरला आहे.. एकीकडे आपण तुकारामाचे गोडवे गातो आणि दुसरीकडे त्यांनी अंधश्रद्धे वर केलेला प्रहार विसरून जातो..
    मुल होणे, नोकरी लागणे, वैगरे गोष्टी लालबागचा राजा करत असेल तर मग आंपण सारी कामे त्यालाच देऊ... भ्रष्ट्राचारपण दूर करेल.. कशाला हव्यात बाकी सारी व्यवस्था...... असो आपण महासत्तेच्या गप्पा मारू.... तेव्हढाच विरंगुळा..
    ३. राजाला कोणी मोठे केले यावर चर्चेचे गु -हाळ कितीही काळ चालू राहील... हापण टी आर पीचा विषय होऊ शकतो..
    ४. राजाच्या चरणी जमा होणारी अफाट संपत्ती हादेखील मोठा विषय आहे. यात काळी किती आणि पांढरी किती हे जरा शोधता आले तर पहा.. शोध पत्रकार याचा विचार करोत..
    ५. या संपत्तीचा सामान्यांना होणार एक फायदा मात्र दुर्लक्षून चालणार नाही....या मंडळाकडून गोरगरिबांना हॉस्पिटल साठी मिळणारी मदत खरच चांगला उपक्रम आहे..

    सुहास जोशी
    dongarwadi.blogspot.com

    ReplyDelete
  11. देवावर सर्व सोपवून देण्याची कला आपण व्यस्थित अंगवळणी करून घेतली आहे. म्हणजे आपण जबाबदारीतून मोकळे होतो. हे शहणपण आहे की धूर्तपणा, याविषयी सांगणे अवघड आहे. देवभोळ्यांना शहाणपणच वाटेल. त्याशिवाय ते दर्शनासाठी 24 तास रांगेत उभे राहू शकणार नाहीत. गणपतीच्या पुजेसंदर्भातीलच एक किस्सा काल-परवा फेसबूकवर टाकला तो असा- गणपतीनिमित्त सत्यनारायणाच्या (मला आकर्षण नसले तरी) पूजेचे निमंत्रण म्हणून एका मित्राकडे गेलो होतो. तिथं एक दहा-अकरा वर्षांची मुलगी होती. ती दिवसभर कोमजलेल्या फुलासारखी दिसत होती. इतर मुलं-मुलींची दंगा-मस्ती सुरू होती. चौकशी केल्यावर कळलं की ती कामवाल्या बाईची मुलगी होती. म्हणून काय झालं? आईच्या कामाच्या ओझ्याने जणू तिचं बालपण दबून गेलं होतं. मला प्रश्न पडला की, कामवाली बाईची मुलगी म्हणून तिला कुणी आपल्यात सहभागी करून घेत नव्हतं का? की तिलाचा सहभागी होताना संकोच वाटत होता? हे प्रश्न मी माझ्या मुलीलाही विचारले. अर्थात तिला उत्तरे देता आली नाहीत. आता जातीभेदाची जागा वर्गभेद घेतो आहे का?
    आणखी चौकशी केली असता ती मुलगी शाळेतच जात नाही. आई-वडील मोलमजुरी करतात. त्यांना नाईलाजास्तव फ्लॅटमध्ये राहावे लागते. कारण त्यांच्या परिसरात म्हणे झोपडपट्टी नाही. मुलांसाठी जवळपास महापालिकेची शाळाही नाही. अन्य शाळा परवडत नाहीत. हे कुटुंब मुळचं बिहारी. ते परप्रांतिय असले तरी माणसं आहेत; पण चुक कुणाची त्यांची, सिस्टिमची, अथवा दगडा-मातीच्या देवाच्या छतासाठी लाखो रुपये उधळणाऱ्या आणि रस्त्यावरच्या जीवंत माणसाकडे डोळेझाक करणाऱ्या आपल्या सर्वांची?

    ReplyDelete
  12. Mla vatat ata devach hi lokanni " Brand Marketing " kely n honari gardi hi tyachach ek parinam ahe..ky te navas n ky te crores mdhe milnare DAAN..jo paryant mansat dev ahe MURTIT nhi he kalanar nhi toparyant he asch honar as mla vatat..

    ReplyDelete
  13. सचिनजी, अतिशय परखडपणे आपण 'लालबागच्या राजाच्या दर्शनाचा बाजार' उलगडून दाखविल्यात. आता खरोखरच मिडिया आणि कार्यकर्ते यांना आवरण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  14. जो पर्यंत भक्त हा भाक्तासारखा आणि माणूस हा माणसासारखा वागेल तेव्हा खरा 'देव ' या शब्दाचा अर्थ कळेल. नवस, देव आणि भक्त हि त्री सूत्री आहे ज्यामध्ये देव हा माणसाने केलेला केवळ 'दगड' आहे.

    ReplyDelete
  15. गणपती या तत्वाचा आदर राखून मी असे म्हणतोय की विघ्नहर्ता , सुखकर्ता वगैरे वगैरे या सर्व गोष्टी पूर्वीपासून गणेशोत्सवासाठी खास तयार केलेल्या मार्केटिंग हाइप्स आहेत. आता नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती ही एक नवीनच टुम गेल्या १५ /२० वर्षात सुरु केली/झाली आहे.

    लालबागच्या गणपतीला १९८२ साली गिरणगावचा अभूतपूर्व संप मिटून कामगारांना योग्य ती न्याय मिळावा आणि त्यांचा विजय व्हावा म्हणून नवस आणि बऱ्याच ब्राह्मण पुजार्यांनी/भिक्षुकांनी मंत्र-जप-यज्ञ याग असे काहीतरी केले होते म्हणे. काय झाले शेवटी?? गिरण गावातील कामगार विशेषतः कोंकणातील गिरणी कामगार देशोधडीला लागला. गेल्या २/३ वर्षात या मंडळांच्या परिसरात कितीतरी मोबाईल चोरीला गेलेत. पाहिजे असेल तर जवळच्या काळाचोकी पोलिस स्टेशन कडे चौकशी केल्यास समजतील. सार्वजनिक गणेशोत्सव हा निव्वळ बाजार झालाय .

    काय करणार? आपण टीका केलीत तर उगाच अपमान केलात म्हणून हिंदू धर्मातील काही लोकांच्या (सर्व हिंदू धर्मियांच्या न्हवे, दक्षिणेकडे तेथील लोक कार्तिकेय स्वामीला गणपतीपेक्षा श्रेष्ठ मानतात) भडकतील आणि मग गणपतीचा कोप होईल "विघ्नहर्ता" :)

    ReplyDelete
  16. प्रथमतः तुमच्या लेखाबद्दल तुमचं अभिनंदन. फारच अभ्यासपूर्ण आणि सुसंगत विचार मांडत आपण लिहिले आहे. जवळपास करोड भाविकांनी गेल्या वर्षी लालबागच्या राजाला हजेरी लावल्याचं नुकतंच एका वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. एक करोड. खरंच प्रत्येकानं थोडं अंतर्मुख होऊन काही (तुम्ही सुचवलेले) प्रश्न स्वतः लाच विचारण्याची आज गरज आहे. खरंच हा उत्सव आपण कशासाठी करतो? आपल्या श्रद्धेसाठी? आणि आपल्या श्रद्धेसाठी नेमके काय गरजेचे आहे? मूर्तीची जास्तीत जास्त उंची? गर्दी खेचण्याचे विविध उपाय? ५०-१०० स्पॉटलाईटस्? डी-जेच्या मोठ्या आवाजात अश्लील गाणी, त्या गाण्यांवर नाचणं? ..... हे सगळं श्रद्धेसाठी? देवासाठी? कि आपल्यासाठी?......

    ReplyDelete