Monday, 22 May 2017

मनात पूजीन रायगडा

कालचा दिवस जोरदार होता. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीच्या कॉलमात छापून आलेल्या लेखावर फार प्रतिक्रिया येतील, असं वाटलं नव्हतं. दिवसभर सतत फोन वाजत होता. बहुतेकांना लेख खूपच आवडला होता. आम्ही इतिहासाकडे असं बघितलंच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं होतं. लेख वाचताना गहिवरून आलं असं सांगता सांगता औरंगाबादचे पैठणे नावाचे एक निवृत्त इंजिनियर काका फोनवरच पुन्हा गहिवरले. आयपीएल टोकाला आलेली असताना साडेदहाच्या सुमारासही न राहवून एका प्राध्यापकाने फोन केला होता. वगैरे वगैरे. 

लेख न आवडल्याचे दोन फोन सकाळी आले होते. ते दोघेही राजपूत समाजाचे होते. पण मी त्यांच्याशी बोललो. माझी मतं सांगितली. त्यांना काही पटली, काही पटली नाहीत. चांगली चर्चा झाली. संध्याकाळी पाच नंतर अचानक फोन येऊ लागले. अरे तुरेची भाषा. लेखात नसलेले संदर्भ सांगणं. ठेवणीतल्या शिव्या. तुला मुंबईला येऊन बघतो. असं लिहायला पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्यांना कुणीतरी उचकवल्यामुळे एकामागून एक फोन येत होते, हे कळत होतं. त्या बिचाऱ्यांनी लेखही वाचला नव्हता. पण लेख आवडल्याचे फोन त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त होते. त्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती. 

माझं अज्ञान होतं की राजपूत स्वतःला मराठ्यांपैकीच एक समजतात. महाराष्ट्रात शेकडो वर्षं राहिल्यामुळे त्यांनी राजस्थानच्या इतिहासाविषयी ममत्व बाळगण्याचं कारण नसेल, हाही माझा गैरसमज होता. अकबराला तुम्ही ग्रेट म्हणूच कसं काय शकता, हा आक्षेप प्रमुख होता. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराविषयी लिहिलेल्या पत्रात आदर्श म्हणून अकबराचा दाखला दिलाय. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. अर्थात या लेखाविषयी कुणी आक्षेप नोंदवणं अगदीच स्वाभाविक मानायला हवं. आपल्या अस्मितेविरोधात लिहिल्यामुळे राग येऊ शकतोही. काही कारण नसताना महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात शिवाजी महाराजांना आणल्यामुळे मी मराठा कार्ड चालवल्याचं कुणाला वाटलं असेल, तर ते समजून घ्यायला हवं. आजकाल कुणाच्याही हेतूंविषयी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे खरी. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणालाही खोडसाळपणा समजण्याची स्थिती आहे खरी. चूक ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांची आहे. 


मला दोन मेल आले होते. त्याला उत्तर देताना मी म्हटलं, तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. कारण तुम्ही वाचक आमचे मायबाप आहात. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतूही नव्हता. मी लिहितो तेच अंतिम सत्य असंही मला वाटत नाही. पण आता तरी मी जे लिहिलंय त्याविषयी ठाम आहे. अगदी ठाम. 

दिवसभरात आपल्या लेखकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे रसिकचे संपादक प्रशांत पवार यांचे आभार. त्यांना झालेल्या त्रासासाठी माफी. त्यांना पाठवलेला लेख पुढे जोडलाय. 
...
राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री बनण्यापेक्षा वॉइस ओवर आर्टिस्ट झाले असते तर बरं झालं असतं. देशाचे गृहमंत्री बनून नाही तरी त्यांना काहीच करता येत नाहीय. त्यांच्या सध्याच्या कर्तृत्वाऐवजी धीरगंभीर आवाजासाठी त्यांना जास्त लोकांनी जास्त काळ त्यांना लक्षात तरी ठेवलं असतं.

करणी बोगस ठरते तेव्हा त्यापेक्षा जास्त बोगस कथनी करावी लागते. राजनाथ सिंगांनी नुकतंच ते केलं. महाराणा प्रतापांच्या जन्मदिनानिमित्त राजस्थानातल्या खारोकाडा नावाच्या गावात त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे ते बऱ्याच दिवसांनी चर्चेत आले. `अकबराला द ग्रेट म्हणणारे इतिहासतज्ज्ञ महाराणा प्रतापांना ग्रेट का म्हणत नाहीत, याचं मला आश्चर्य वाटतं. महाराणा प्रतापांना ग्रेट म्हणता येत नाही अशी कोणती खोट त्यांना दिसते?` काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी राजनाथ सिंगांच्याही पुढे गेले होते. `अकबर आणि राणाप्रताप दोघे एकमेकांचे शत्रू होते. त्यामुळे दोघांपैकी एकच ग्रेट असू शकतो. अकबर का ग्रेट आहे ते तुम्ही मला सांगाच. अकबर ग्रेट नाहीच. ग्रेट आहेत ते राणाप्रताप.`

आधी तू बोल, मग मी बोलतो, असं ठरवून ही जुमलेबाजी होते, हे आपल्यालाही आता अनुभवानं कळू लागलंय हळूहळू. राजस्थान विधानसभेची निवडणूक जवळ असावीच. त्याचा अजेंडा तयार झालेला आहे. महाराष्ट्रातही निवडणुकांच्या आधी छत्रपतींचा आशीर्वाद घेणारी भाजप राजस्थानचे अस्मितापुरुष असणाऱ्या महाराणा प्रतापांच्या नावाने मतं मिळवण्याची तयारी करतेय. आता देशातही भाजपची सत्ता आहे आणि राज्यातही. त्यांना आता तक्रार करण्याचा अधिकार नाही. महाराणा प्रतापांच्या थोरवीला साजेसं स्थान मिळवून देणं हे त्यांचं कामच आहे. ते त्यांनी शाळेच्या पुस्तकांमध्ये द्यावं, स्मारकं उभारावीत किंवा त्यांच्या नावाने योजना सुरू कराव्यात. खरंच या किंवा इतिहासातल्या कोणत्याही वादाचा सोक्षमोक्ष लावायचा असेल, तर त्यांनी बोलवावी इतिहासाच्या अभ्यासकांची आंतरराष्ट्रीय परिषद. घडवावी सर्व बाजूंनी चर्चा. टीवीवर लाइव दाखवावी. होऊ द्यावं खऱं खोटं. 

राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत, वाद मिटवण्याऐवजी चिघळवण्यातच त्यांना रस असतो. त्यामुळे इतिहासातले वाद संपवणाऱ्या परिषदा नाही होत आपल्याकडे. भाजपमध्ये कुणाला तसं वाटलं तरी त्यांना ते करता येणार नाही. कारण संघ परिवार देशाची सत्ता मिळवू शकला पण एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचा उजवा इतिहासतज्ज्ञ देशात घडवू शकला नाही. एक आर. सी. मझुमदार होते, पण त्यांची जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळात संघाच्या स्थापनेच्याही आधीची. आमदारांसारखे इतिहासतज्ज्ञही इतर पक्षांतून फोडता आले असते, तर भाजपने नक्कीच घडवल्या असत्या इतिहासावर अशा परिषदा. मग एसएमएस मागवून ठरवलं असतं इतिहासातलं सत्यही. 

काही चॅनलवाल्यांनी थोडंफार असं केलंही. त्यांनी राजनाथ सिंगांच्या विधानावर चर्चा करण्यासाठी धर्मगुरू बोलावले होते. इतिहासाशी त्यांचा काय संबंध? पण टीवीवरच्या तीन खिडक्यांत हिंदूंचे साधू आणि तीन खिडक्यांत मुसलमानांचे मौलवी. त्यांची विषयाला सोडून विष पेरणारी चर्चा चॅनलच्या लोकप्रियतेचे आकडे वाढवत राहिली. चॅनलवाल्यांचंही काय चुकलं म्हणा, ग्रहताऱ्यांच्या स्थानापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि रोगावरच्या उपचारापासून व्याकरणातल्या चुकांपर्यंत सर्वच बाबतीत त्या त्या धर्मांतली पुरोहितमंडळीच सर्वोच्च अधिकारी मानली गेली वर्षानुवर्षं. आता आधुनिकेतीची चाकं उलटी फिरवायची आहेतच आपल्याला, तर हेही होणारच. 

खरं तर या गोष्टींवर वाद व्हायची गरजही नाही. अकबर आणि महाराणा प्रताप दोघेही ग्रेट आहेतच. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाच्या दुर्दम्य अभिलाषेचं महाराणा प्रतापांसारखं उदाहरण दुसरं नसेल. त्यांचा प्रचंड त्याग, गनिमी काव्याने केलेला संघर्ष आणि आदिवासींमध्ये केलेली स्वातंत्र्यपेरणी या गोष्टीही तितक्याच प्रेरणादायी. त्यांची महानता सगळ्यांनीच मान्य केलीय. त्यामुळे प्रश्न पडतो की त्यांना ग्रेट कोण मानत नाही? त्यांच्या नावाचा एक भागच बनलेल्या महाराणा या पदवीतच ग्रेटपणा आहे. महाराणाचा इंग्रजीत अनुवाद सोपाय, द ग्रेट किंग. आता इंग्रजीत ग्रेट म्हटल्यानंच ग्रेट होत असेल आणि भारतीय भाषांतलं ग्रेट समजत नसेल. तर चूक राजनाथजींची आहे. 

पण मुळात राजस्थानाचा इतिहास हा पोकळ अभिमानापोटी आपापसात केलेल्या लढायांचा आहे. त्यानंतर मोगलांना आणि इंग्रजांना एकामागून एक शरण जाण्याचा आहे. परकीयांविरुद्ध केलेल्या लढायांत सतत पराभवांचा आहे. आपल्या किमती शौकांसाठी राजांनी रयतेवर केलेल्या अत्याचारांचा आहे. त्याविरोधात लोकांनी बंड करू नये म्हणून खोट्या इभ्रतीचा, बिनडोक व्रतवैकल्यांचा, कट्टर जातिभेदाचा अफू देऊन गुंगवण्याचा आहे. तो शौर्याचाही आहे, पण मुत्सद्दीपणाचा अभाव असलेल्या मठ्ठपणाचाच अधिक आहे. लढण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य संपवणाऱ्या जोहारांचा आणि त्याचं उदात्तीकरण करण्याचा हा इतिहास आहे. पृथ्वीराज चौहान, राणा संग, महाराणा प्रताप, दुर्गादास राठोड अशा स्वातंत्र्यवीरांचा हा इतिहास आहेच, पण त्यापेक्षाही तो स्वराज्य संपवण्यासठी औरंगजेबाकडून सुपारी घेणाऱ्या मिर्झाराजे जयसिंगांचा आहे. हा इतिहास संत मीरा,  मोइनुद्दीन चिश्ती आणि दादू दयाल यांनी केलेल्या सांस्कृतिक बंडाचा आहे, पण त्याच्यापेक्षाही हा सतींचा, घुंघटांचा आणि सांस्कृतिक दमनाचा जास्त आहे. चार दोन अपवाद सोडले तर १८५७च्या युद्धात होलसेलच्या भावाने इंग्रजांच्या बाजूने राहण्याचा आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या भल्यामोठ्या राज्यातून देशावर प्रभाव टाकू न शकणारा एकही नेता नसण्याचा हा इतिहास आहे. 

सगळा लाचारीचा आणि पराभवांचा इतिहास असला तरी सगळ्या देशाला राजस्थानच्या शौर्याचं आणि तत्त्वाचं फारच कौतूक आहे. आपलं मूळ राजस्थानातल्या राजवाड्यांशी जुळावं आणि आपली कुळं धन्य व्हावीत, यासाठी इतिहास वापरण्याची स्पर्धा देशभर सुरू आहे. टीवीवरच्या खंडीभर मालिका तर इथल्या जुनाट परंपरांना झिलई लावून विकण्यासाठीच बनतात जणू. परंपराभिमानाच्या भ्रामक कल्पनेतून आपला मुलगा दूर राहावा यासाठी झगडणाऱ्या आईच्या पराभवाची हताश कहाणी सांगणारा सिनेमा `जाने तू, या जाने ना` आपल्यापैकी कुणालाच खटकत नाही. त्यामुळे राजनाथ सिंग सांगतात त्या ग्रेटपणाची नाही, तर या सगळ्या कथित महान परंपरेच्या ग्रेटपणाचीच मोजदाद करायची गरज जास्त आहे. 

आणि समजा कुणाला तशी मोजदादच करायची असेल तर एक मापदंड महाराष्ट्राकडे आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. राजस्थानातले महाल वास्तुरचनेचे, सौंदर्याचे अप्रतिम नमुने असतीलही, पण शत्रूसमोर लोटांगणं घालणाऱ्या या महालांची मान कायम शरमेने झुकलेली आहे. शत्रूच्या हल्ल्यात आमचे किल्ले उद्ध्वस्त झालेले असतीलही. पण त्यांचा कणा ताठ होता आणि आहे. आमच्याकडे छप्पन भोग असलेली राजस्थानी थाळी सजवण्याची परंपरा नसणारच. कारण आमचा राजा मावळ्यांबरोबर मिसळून कांदा भाकरी खायचा, त्याचा आम्हाला अभिमान आहे. इंग्रज इतिहासकारांनी राजस्थानच्या इतिहासाला ग्रेट ठरवलं आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलालसेला लुटारूंच्या टोळ्यांचं कौर्य मानलं. आता राजनाथ सिंगना इतिहास नव्याने मांडायचा असेल तर हेदेखील तपासून घ्यावं लागेल. छत्रपती शिवराय आणि मिर्झाराजे जयसिंग यांना एकाचवेळेस ग्रेट मानून चालणार नाही. `भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा. गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडा.` 

(महत्त्वाची नोंदः गणेश काबरा यांच्याशी फेसबूकवर झालेल्या चर्चेनंतर लक्षात आलं की सेकंड लास्ट पॅरेग्राफमधल्या राजपूत या शब्दाने गोंधळ झालेला आहे. त्याजागी मी राजस्थानच्या हा शब्द वापरला आहे. मी राज्याविषयी बोलत होतो आणि महाराष्ट्रातले राजपूत समजाचे काही वाचक ते जातीच्या अर्थाने घेत होते. आता त्यांच्या शंका दूर होतील, अशी अपेक्षा आहे. हा लेख कोणत्याही एका समाजाच्या विषयी नाही.) 

23 comments:

  1. सुंदर लेख...मनापासून आवडला...शेवटचा परिच्छेद अभिमानास्पद..

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लेख!
    -प्रसाद शिरगावकर

    ReplyDelete
    Replies
    1. नेहमीप्रमाणेच अतिशय आभार

      Delete
  3. अतिशय स्पष्ट, परखड व सत्य मांडणी. आपल्या लिखाणात समस्त राजपुतांचा उपमर्द व्हावा असे काहीही नाही. आपण महाराणा प्रतापांच्या कर्तृत्वाला यथार्थ मुल्य दिलं. प्रत्येक समाजात, जातीत, गटात काही चुकीची मंडळी असते. मराठ्यांमध्येही होती व आहे. त्यामुळे राजपुतांच्या काही चुकांचे केलेले विश्लेषण अजिबात चुकीचे नाही. ९५ टक्के राजपुत समाज हा स्वाभिमानी आहे. मात्र ५ टक्के अभिजन राजपुतांनी समाजाचे नुकसान केले. जसे मराठ्यांमध्येही झाले.

    ReplyDelete
  4. अप्रतिम आणि अचूक....

    ReplyDelete
    Replies
    1. आभार दोनदा.
      आणि अभिनंदन मुंबई जिंकल्याबद्दल.
      पार्टी हवीय.

      Delete
  5. अप्रतिम आणि अचूक....

    ReplyDelete
  6. विषय वेगळया पद्धतीने मांडण्याची तुमची कळा उत्तम साधली आहे

    ReplyDelete
  7. सचिनजी अतिशय वेगळ्या पध्दतीने विषय मांडलाय.यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्नच नसावा, सत्य स्विकारायला हवे राजपुतांनी.

    ReplyDelete
  8. खुप छान लेख ! आवडला.शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम आहे.खरंच शिवरायांचे हे पैलू फ़ारच कौतुकास्पद आणि आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत.शेवटी हेच अंतिम सत्य आहे.
    कित्येक झाले आणिक होतील राजे असंख्य जगती
    परी न शिवबा समान होईल या अवनीवरती

    ReplyDelete
  9. लेख छान आहे. राजस्थानच्या इतिहासाचा मला फार अभ्यास नाही.त्याविषयी आपण लिहिलंय ते अभ्यासपूर्णच असणार. त्यांच्या इतिहासातल्या ठळक चुका स्पष्ट मांडल्यात व शेवटी छत्रपतींशी तुलना करून आपण श्रेष्ठ हेही मांडलेत. पण महाराजांनंतरची पेशवाईमधली आपली अधोगती व अनागोंदीही मोठीच होती.त्याचा संदर्भ लावला तर महाराजांनंतरचा आपला इतिहास तरी फार श्रेष्ठ कुठे ठरतो ? आणि हिंदवी स्वराज्यातही शत्रूला जाऊन मिळणारे दगाबाज मराठ्यांमध्येही होतेच ना. त्यामुळे मला हा लेख जरा एकांगी वाटला. 😊

    ReplyDelete
  10. वाह आजच्या वातावरणात असे लिहायला धाडस लागते, हल्ली आपल्या सोयीचा इतिहास लिहिला जात आहे!

    ReplyDelete
  11. राजस्थानच्या इतिहासाबद्दल गैरसमज राजस्थानात अथवा इथे महाराष्ट्रातही दिसले नाहीत.

    ReplyDelete
  12. राजस्थानच्या इतिहासाबद्दल गैरसमज राजस्थानात अथवा इथे महाराष्ट्रातही दिसले नाहीत.

    ReplyDelete
  13. राजस्थानचा इतिहासात गुलमगिरीच जास्त आहे. राजेरजवाड्यांनी परकिय आक्रमकांची केली. आणि रयतेनं राजेरजवाड्यांची केली. अपवाद सर्वच ठिकाणी असतात. पण, फक्त त्यामुळेच एखादी प्रथा महान ठरु शकत नाही. जोहार हा फक्त एक अस्मिता आणि अभिमानापुरता मर्यादित शब्द आहे. त्यामध्ये कोठेही राजकिय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याची प्रेरणा नाही. आजही त्या राज्यामध्ये या राजेरजवाड्यांचे बरच मोठ प्रस्थ मानलं जातं. त्यांचा बडेजाव ही दिसतो.

    ReplyDelete
  14. एकीकडे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहीजे ते जोहर अभिमानाने मिरवणारे राजपुत, आणि दुसरीकडे मराठा साम्राज्यावर घातक वेळ आलेली असताना हाती तलवार घेवुन मुकाबला करणा-या माँ जिजाऊ आणि माँ ताराराणी.

    तरीही मराठ्यांपेक्षा राजपुत म्हणुन गौरविण्यात कसला अभिमान वाटतो मला कळत नाही.

    ReplyDelete
  15. GOOD

    प्रा. श्रावण देवरे

    ReplyDelete
  16. खरंच, लेख उत्तमच झालाय. मग प्रॉब्लेम काय त्यांचा? असो, असे सोमे-गोमे असतातच. ते आपलें
    काम करतीलच...मूर्खपणाचे दर्शन घडवतीलच. आपण लिहीत राहणे.....!!!! बाकी लेख खरंच छान...!!!👌👌👌👌

    ReplyDelete
  17. सचिन सर एकाम्यानात जश्या दोन तलवारी बसत नाहीत, तसेच दोन वेगवेगळ्या पार्टीचे नेते कधीच सरळ सोपे सत्य बोलू शकत नाहीत, केवळ विपर्यस्त करणे आणि जनतेला झुलवणे त्यांना कळते.वाईट याचे वाटते की ज्या पिडीने वाचन करून आपला विचार पक्का करणे गरजेचे आहे ती तरुण पिढी राजकारण्यांच्या थिल्लर वक्तव्याला स्वीकारून आंदोलनाची भाषा वापरते आणि राजकारणी त्याला रसद पुरवून निवडणुकीचा मुद्दा बनवतात...वाईट आहे हे सारे...आपण अभ्यास पूर्वक लेखन केले आहे सध्याच्या पीडिला याची गरज आहे...राजकारण्यांचे पितळ एकणाएक दिवस उघडे पडणार आहे, आपल्या लेखाचा कोणी विपर्यास्त करून चुकीचे बोलत असल्यास सडेतोड उत्तर द्या कोण लावून देत असेल तर थेट पोलिसात तक्रार द्या , आमच्या सारखे हजारो वाचक आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत, हाक द्या या बेगडी लोकांचे डोके ठिकाणावर आणल्या शिवाय शांत बसणार नाही, आपल्या समवेत सदैव आहोत...राहणार...जय भारत

    ReplyDelete
  18. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही असा एकही सद्सद्विवेकबुद्धीचा माणूस किमान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. छत्रपती महानच होते कोणत्याही मापदंडाशिवाय. आपण जे ''अतुलनीय'' म्हणतो ते त्याच साठी. मग मला प्रश्न पडतो कि त्यांना इतर हिंदू राजे मग ते राजपूत असोत कि दक्षिणेकडची इतर राजे असोत त्यांच्याशी तुलना करण्याची गरज काय. असं करून तुम्हाला नेमक काय सिद्ध करायचं आहे?
    छत्रपती जातीने मराठा असल्यामुळे सर्वश्रेष्ठ नव्हते, ते श्रेष्ठ होते त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्यावर असलेल्या माँ जिजाऊंच्या संस्कारांमुळे. केवळ जातीमुळे ते महान असते तर त्यांना देखील स्वयकीयांशी एव्हढा संघर्ष करावा लागला नसता.
    लढणं हे आपल्या हातात असतं, वृत्तीत असतं पण जिंकणं हे नेहमीच आपल्या हातात असतं अशातला भाग नाही. म्हणून लढणारे आणि यशस्वी होणारे दोघेही तितकेच वंदनीय आहेत.
    कोणत्याही मुबलक साधनसामुग्रीशिवाय रानोमाळ भटकून सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या अकबराशी आत्मसम्मानासाठी वैर घेणारे महाराणा प्रताप जर यशस्वी झाले असते तर तुमचं म्हणणं कदाचित वेगळं असतं.
    मांडलिकत्व फक्त राजपुतांनीच स्वीकारलं होत असही नाही, बऱ्याच मराठा सरदारांनी देखील स्वीकारलेलं होत आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य होऊ नये यासाठी जिकिरीचे प्रयत्न देखील केले. ज्या प्रमाणे मिर्झा राजे मुघलांचे चाकर होते, त्याच प्रमाणे शहाजीराजे देखील चाकर होते. शहाजीराजेंना बिजापूरच्या गादीसाठी राणादुल्ला खान याच्याशी हातमिळवणी करून बंगळुरूच्या तिसऱ्या केम्पे गौडा (हिंदू सेनापती) चा पराभव करून बंगळूरूची जहागिरी पदरात पाडून घेतली होती हा देखील इतिहास आहे. लढाई मध्ये साम दाम दंड भेद याचा योग्य वेळी जो वापर करतो तो श्रेष्ठ असतो. महाराजांनी देखील अनेकदा तह केले होते ते याच साठी. फक्त आपल्या वाचक वर्गाला खुश करण्यासाठी इतिहासाच्या निवडक अंगावर प्रकाश टाकण्याच्या सवयीमुळेच आजची पत्रकारिता बदनाम आहे कि काय असा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य वाचकाला पडतो फक्त जिंकणंच सर्वस्व असतं तर मग राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे यांचं बलिदान व्यर्थ गेलं असंच म्हणावं लागेल. असो तुमच्या एवढा माझा इतिहासाचा अभ्यास नाही जेवढं वाटलं तेवढं बोललो

    ReplyDelete