Wednesday, 23 August 2017

मोरेसरांची ऐतिहासिक पाचर



सदानंद मोरे सरांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांचा माझ्या लिखाणावर प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे, असं मी मानतो. त्यानुसार मी याआधीही त्यांच्यावर भरभरून लिहिलंय आणि मनापासून टीकाही केलीय. विशेषतः घुमानमधल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा निषेध केला नाही, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. संत नामदेवांनी असं केलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत मी तेव्हा मांडलं होतं. 
 
मोरे सर भाजप सरकारच्या विविध कमिट्यांवर आहेत, यातही मला काही चुकीचं वाटत नाही. वस्तुस्थिती स्वीकारून त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, असा प्रयत्न ते करत असावेत. इतिहासाच्या पुस्तक निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यंदा साववी आणि नववीची नवी पुस्तकं आणली. नववीच्या पुस्तकात बोफोर्स घातलं आणि बाबरीविध्वंस टाळला, तेव्हा मला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली नाही. एकतर मी पुस्तक वाचलं नव्हतं आणि विरोधकांचे मुद्दे मला फार अयोग्य वाटले नाहीत. सातवीच्या पुस्तकावरच्या टीकेविषयी मात्र माझं मत होतं. कारण मी ते पुस्तक वाचलं होतं. मोरे सर आजवर जी भूमिका वारंवार लिहित आलेत, त्यालाच अनुसरून यातल्या इतिहासाची मांडणी होती. त्यानुसार मी माझं म्हणणं माझ्या लेखांमध्ये मांडलं. ते सगळ्यांना पटायलाच पाहिजे, असं नाही. पण एकदा सातवीचं पुस्तक वाचायलाच हवं. 

दिव्य मराठीत लेखाचं हेडिंग मोरेसरांची ऐतिहासिक पाचर असं केलं होतं. ते ब्लॉगमध्ये कायम ठेवलंय. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.
........

माझा मुलगा सातवीत शिकतो. मराठी मीडियम. एसएससी बोर्ड. आजकाल शाळेची पुस्तकं दुकानात मिळत नाहीत. त्याला ती शाळेत मिळाली, त्याचदिवशी सर्वात आधी इतिहासाचं पुस्तक घेतलं. वाचून काढलं. एका बैठकीत त्याची साठ पानं वाचून होतात. याचं कारण, डॉ. सदानंद मोरे. 

महाराष्ट्राच्या इतिहासावर सदानंद मोरे लिहित असतील, ते वाचायलाच हवं. त्यांनी आपल्या आजवरच्या मांडणीतून महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिलाय. तो साधार आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यांच्या `तुकाराम दर्शन` या ग्रंथाआधी वारकरी परंपरेचा महाराष्ट्री संस्कृतीवरचा प्रभाव कधीच इतक्या जोरकसपणे मांडला गेला नव्हता. `लोकमान्य ते महात्मा` या दोन जाड्या खंडांमधल्या ग्रंथाचा अनुवाद दि. पु. चित्रेंनी इंग्रजीत करायला घेतला होता, इतका हा ग्रंथ मोलाचा आहे. महाराष्ट्रातल्या जातवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या टोळक्याची मानसिकता गांधीहत्येसारख्या घृणास्पद दहशतवादी घटनेपर्यंत कशी ढासळत गेली, याचा तारतम्याने पुराव्यांसह लिहिलेला इतिहास त्यात येतो. बाबासाहेब पुरंदरेंचे आजोबा ठरावेत अशा इतिहासाचार्य राजवाडेंच्या आदर्श मानल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची चिरफाड आणि नवी पर्यायी मांडणी मोरेंच्या `गर्जा महाराष्ट्र`मध्ये येते. `जागृति`कार पाळेकरांविषयी त्यांनी केलेल्या संशोधनातून ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासातलं लखलखतं पान समोर आलंय. त्यांनी एक विचारवंत म्हणून केलेली विद्रोही बहुजनवादाच्या जागी उदारमतवादी बहुजनवाद असणाऱ्या सर्वजनवादाची मांडणी सध्याच्या काळात उपयोगाची आहे. 

याचा अर्थ मोरे सरांचं सगळंच बरोबर असतं असंही नाही. नववीच्या इतिहासात त्यांनी राजकीय मुद्दा बनलेलं बोफोर्स आणलं असेल आणि देशाच्या एकतेला धक्का लावणाऱ्या बाबरी मशीद विध्वंसाचा उल्लेख टाळला असेल, तर त्यावर टीका व्हायलाच हवी. संशोधक असतानाही ते वारकरी असल्याचं ओझं बाळगतात, हा कुणाला त्यांच्यावरचा आरोप वाटेलही. बहुसंख्य पुरोगाम्यांना अपेक्षा असते तेव्हा आणि त्या विषयात ते भूमिका घेत नाहीत. घुमानच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करायलाच हवा होता. त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर निवडून जाताना राजकीय पक्षाच्या पॅनेलमधून जायला नको होतं. अशी टीका सोशल मीडियावर होत होती. त्यावर चर्चाही व्हायलाच हवी. मोरे सरांची मांडणी तितकी महत्त्वाचीच आहे. त्यात आता सातवी इतिहासाच्या पुस्तकावरच्या आरोपाची भर पडलीय. भाजपच्या सरकारात सातवीच्या पुस्तकातून मुगलांचा इतिहास दीड दोन पानांत संपवण्यात आला, असा मुख्य आरोप आहे.

अर्थात सातवीचं पुस्तक काही सदानंद मोरेंनी लिहिलेलं नाही. ते इतिहास विषय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पांडुरंग बलकवडे, सावरकरवादी अभिराम दीक्षित आणि इतरही चार पाच जण आहेत. बलकवडे, दीक्षितांची आजवरच्या भूमिका उघड आहेत आणि मोरेंच्याही. लाल महालात दादोजी कोंडदेवांचा आणि संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा असणं योग्य नाही, असं मोरेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहेच. फॅसिझमपेक्षा भ्रष्टाचार परवडला, असं सांगत नरेंद्र मोदींना निवडणुकांच्या आधी टीव्हीवरच्या चर्चेत विरोध केल्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मराठे शूद्र असल्याची भूमिका त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतली होती. हे सारं उजव्या मंडळींना माहीत असणारच. त्यामुळे त्यांना असं काही पुस्तकात करू न देण्यासाठी बलकवडे, दीक्षितांसारख्या चाणाक्ष लोकांचा समावेश समितीत असणार. तरीही मोरे सरांनी सातवीच्या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवलंय ते भारीच आहे. 

आजवर सातवीत आलेला मध्ययुगीन इतिहास हा देशभरातला इतिहास सांगणारा होता. खरं तर तो फक्त दिल्लीकेंद्री होता. त्यामुळे त्यात मुगल सविस्तर होते. आता सातवीच्या पुस्तकात येणारा इतिहास हा महाराष्ट्रकेंद्री आणि त्यातही शिवरायकेंद्री आहे. त्यामुळे त्यात मुगल थोडक्यात आहेत. पुस्तकात `शिक्षकांविषयी` नावाची एकपानी प्रस्तावना आहे. त्यातला इतिहासविषयक भाग मोरेंनी लिहिला असावा, `आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान समोर ठेवून समजून घेतला तर विद्यार्थ्यांची राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल. त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले हे समजेल आणि त्यातूनच आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भानही विकसित होईल. पुढे ते म्हणतात,`ब्रिटिशांनी भारत जिंकला व त्याच्यावर राज्य केले हे सर्वांनाच ठावूक आहे. परंतु या प्रक्रियेत ब्रिटिशांना रोखण्यात महाराष्ट्र कसा आघाडीवर होता हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांची स्पर्धा मराठ्यांशी होती आणि त्यांनी भारत जिंकून घेतला तो मराठ्यांशी मुकाबला करूनच. ही जाणीव आपल्या सामर्थ्याची व कर्तव्याची आहे. अध्ययन-अध्यापन करताना ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे.` आपल्या मुलांना आपला इतिहास आधी कळायला हवा, ही भूमिका चुकीची ठरू नये. असं करताना मुगल किंवा अदिलशाहीचं योगदान आहे त्यापेक्षा अधिक सविस्तर आलं असतं, तरी काही बिघडत नव्हतं.

अटकेपासून कटकेपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचा झेंडा फडकला, असं आपण नेहमीच सांगतो. ते अटक आणि कटक तसंच दक्षिण टोकावरचं महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा सांगणारं जिंजी आणि तंजावर नेमकं कुठे आहे, हे सांगणारा नकाशाच सातवीच्या पुस्तकाचं कव्हर म्हणून आलाय. केवळ अभ्यास म्हणून नाही, तर इतिहास समजून घेण्यासाठी इतर कुणीही वाचावं असं हे पुस्तक आहे. परगणा, जहागीर, बारा मावळ या शेकडो वेळा इतिहासात येणाऱ्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत? बुद्रुक आणि खुर्द यात काय फरक असतो? अशा प्रश्नांची उत्तरं यात सापडतात आणि आनंद देऊन जातात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत आजवर कधीच न आलेली अनेक माणसं, ठिकाणं आणि घटना पहिल्यांदाच इथे भेटतात.

या पुस्तकात संत नामदेवांना वारकरी परंपरेतले आद्यसंत म्हणून सन्मान मिळतो. शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक म्हणून येतात. शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, हे त्यात येतं. महात्मा फुले ते रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार त्यात येतात. संभाजीराजेंच्या `बुधभूषण` ग्रंथातले उतारे येतात. `भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कुणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली`, असं पानिपताच्या निमित्ताने यात जाणीवपूर्वक येतं. नागपूरकर भोसल्यांना घाबरून कोलकत्ता शहराभोवती इंग्रजांनी खोदलेल्या खंदकाचा, `मराठा डिच`चा, उल्लेख इथे येतो. 

मुस्लिमद्वेष म्हणून मुगलांचा इतिहास गाळण्यात आला असा आरोप असला तरी पूर्ण पुस्तकात कुठेही मुस्लिमांनी महाराष्ट्रावर अत्याचार केले, अशी एक ओळही येत नाही. उलट संत एकनाथांच्या हिंदू मुसलमान संवादातल्या धार्मिक समन्वयाचं उदाहरण येतं. सुफी संप्रदायाचा सन्मानाने उल्लेख होतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुस्लिम सरदारांचा आणि महाराजांच्या धर्मसहिष्णू धोरणाविषयीही नेमके उल्लेख येतात. यात अकबर येत नसेल पण महाराष्ट्रातला बहामनी राज्यकर्ता मोहम्मद गोवानने केलेल्या लोकोपयोगी कामांचा उल्लेख येतो. 

इतिहासाची साधने या पहिल्याच धड्यात नाण्यांविषयी दोन वाक्य मुद्दाम सांगावीत अशी आहेत, `सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदरअलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो.` धार्मिक सहिष्णुतेसंबंधात ही वाक्य येत नाहीत. येतात ती इतिहास साधनांच्या संदर्भात. त्यामुळे त्यात कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण जे सांगायचंय ते मात्र नीट पोहोचतं. ही सदानंद मोरेंची खास शैली आहे. भाजपच्या सरकारने नेमलेल्या मंडळातील हिंदुत्ववादी मंडळींसोबत अध्यक्ष बनून मोरेंनी अशी पाचर सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात ठिकठिकाणी मारून ठेवलीय. आता ते महाराष्ट्रातल्या सहिष्णुतावादी म्हणवणाऱ्या मंडळींना कळत नसेल, तर ती चूक कोणाची?
 
मोरे सर अध्यक्ष नसते तर माझ्या मुलाला सातवीत कोणता इतिहास शिकावा लागला असता, याचा विचारही मला करवत नाही.