Wednesday, 10 September 2014

अमर हबीबः साधेपणाची साधना

आमच्या गावच्या घरी काढलेला अमरजींचा फोटो
आज खरं तर अंबाजोगाईत असायला हवं होतं. जायचं ठरलं होतं. बऱ्याच महिन्यांपूर्वी अमरजींना तसं सांगितलंही होतं. एकतर माझ्यासारखा आळशी माणूस उद्याचंही काही ठरवत नाही. ठरवलं की असं होतं. आजारी पडलो. अंबाजोगाईला जाणं शक्यच नाही. अमरजींचा आज साठावा वाढदिवस. तो त्यांच्या फक्त सोबत राहून साजरा करायचा होता. त्यांच्यासोबत राहायचं म्हणजे समृद्ध होणं असतं. तसं अधिक श्रीमंत व्हायचं होतं. आता झालं नाही तरी त्याचं चक्रवाढ पद्धतीनं उट्ट काढावंच लागणार.

अमरजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच हा अनुभव आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी समृद्ध केलंय. मी २००२ वगैरे साली दिल्लीत होतो. ईटीव्हीचा दिल्ली प्रतिनिधी. मराठी पत्रकार एकमेकांना भेटायचे. त्यात एक विचित्र नाव कानावर यायचं, अमर हबीब. फोनवर एकदोनचा बोलणं झालं पण भेट झाली नव्हती. अशीच कधीतरी भेट झाली. बहुतेक प्रमोदसोबत. मग आम्ही अमरजींच्या मागे लोकचुंबकासारखे आपोआप चिटकलो. अमर हबीब, प्रमोद चुंचूवार आणि मी. किती रात्री आणि किती दिवस आम्ही चर्चा केल्या असतील, गणतीच नाही. त्या अनोळखी शहरात ते आमचे पालकच होते. पण कधी पालक असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही. ते आम्हाला घडवत होते, पण त्याचा वासही आला नाही. त्यांचे दोस्त म्हणवून घ्यायला आम्ही खूपच लहान आहोत. पण तरीही ते आमचे दोस्त होते आणि आहेत.

आज मी संपादक वगैरे आहे. लोक कौतुक वगैरे करतात. त्यातलं खूप काही अमरजींनी दिलेलं आहे. त्यांनी माझ्यासारख्या पोरांना नव्याने विचार करायला शिकवलं. नव्याने प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हाला जगायला शिकवलं. गोष्टींच्या मूळात शिरायला शिकवलं. त्यांच्यामुळे जगण्यातली मजा वाढली. त्यांच्यामुळे जगण्यात श्रीमंत झालो. जगजीतने गायलेली एक गझल आहे, मुझ में जो कुछ अच्छा हैं सब उसका हैं, मेरा जितना चर्चा हैं सब उसका हैं. उसका मेरा रिश्ता बडा पुराना हैं, मैंने जो कुछ सोचा हैं सब उसका हैं. असंच काहीसं तरी. असं असणारा मी एकटा नाही. खूपजण आहेत. आता तर सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या घडवण्याचा परिघ आणखी वाढलाय. ते सगळीकडे पसरलेत.

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या आम्ही सारे फाऊंडेशनने त्यांना कार्यकर्ता पुरस्कार दिला. कार्यक्रम घरचा होता. जाऊ शकलो नाही. आता अमरजींचा वाढदिवस आहे. ठरवूनही जाऊ शकलो नाही. अविनाश दुधेच्या आग्रहामुळे तेव्हा अमरजींवर एक लेख लिहिला होता. प्रयत्न करूनही कितीतरी वेळ लिहिता येत नव्हतं. तरीही लिहिलं. लेख कसा झालाय माहीत नाही. पण त्यात अतिशयोक्ती एका पैशाचीही नाही. लेख नेहमीसारखा कटपेस्ट