आमच्या गावच्या घरी काढलेला अमरजींचा फोटो |
आज खरं तर अंबाजोगाईत असायला हवं होतं. जायचं ठरलं होतं. बऱ्याच
महिन्यांपूर्वी अमरजींना तसं सांगितलंही होतं. एकतर माझ्यासारखा आळशी माणूस
उद्याचंही काही ठरवत नाही. ठरवलं की असं होतं. आजारी पडलो. अंबाजोगाईला जाणं शक्यच
नाही. अमरजींचा आज साठावा वाढदिवस. तो त्यांच्या फक्त सोबत राहून साजरा करायचा
होता. त्यांच्यासोबत राहायचं म्हणजे समृद्ध होणं असतं. तसं अधिक श्रीमंत व्हायचं
होतं. आता झालं नाही तरी त्याचं चक्रवाढ पद्धतीनं उट्ट काढावंच लागणार.
अमरजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच हा अनुभव आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी
समृद्ध केलंय. मी २००२ वगैरे साली दिल्लीत होतो. ईटीव्हीचा दिल्ली प्रतिनिधी.
मराठी पत्रकार एकमेकांना भेटायचे. त्यात एक विचित्र नाव कानावर यायचं, अमर हबीब. फोनवर
एकदोनचा बोलणं झालं पण भेट झाली नव्हती. अशीच कधीतरी भेट झाली. बहुतेक प्रमोदसोबत.
मग आम्ही अमरजींच्या मागे लोकचुंबकासारखे आपोआप चिटकलो. अमर हबीब, प्रमोद चुंचूवार
आणि मी. किती रात्री आणि किती दिवस आम्ही चर्चा केल्या असतील, गणतीच नाही. त्या
अनोळखी शहरात ते आमचे पालकच होते. पण कधी पालक असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही.
ते आम्हाला घडवत होते, पण त्याचा वासही आला नाही. त्यांचे दोस्त म्हणवून घ्यायला
आम्ही खूपच लहान आहोत. पण तरीही ते आमचे दोस्त होते आणि आहेत.
आज मी संपादक वगैरे आहे. लोक कौतुक वगैरे करतात. त्यातलं खूप काही अमरजींनी
दिलेलं आहे. त्यांनी माझ्यासारख्या पोरांना नव्याने विचार करायला शिकवलं. नव्याने
प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हाला जगायला शिकवलं. गोष्टींच्या मूळात शिरायला
शिकवलं. त्यांच्यामुळे जगण्यातली मजा वाढली. त्यांच्यामुळे जगण्यात श्रीमंत झालो. जगजीतने
गायलेली एक गझल आहे, मुझ में जो कुछ अच्छा हैं सब उसका हैं, मेरा जितना चर्चा हैं
सब उसका हैं. उसका मेरा रिश्ता बडा पुराना हैं, मैंने जो कुछ सोचा हैं सब उसका
हैं. असंच काहीसं तरी. असं असणारा मी एकटा नाही. खूपजण आहेत. आता तर सोशल
नेटवर्किंगमुळे त्यांच्या घडवण्याचा परिघ आणखी वाढलाय. ते सगळीकडे पसरलेत.
काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या आम्ही सारे फाऊंडेशनने त्यांना कार्यकर्ता
पुरस्कार दिला. कार्यक्रम घरचा होता. जाऊ शकलो नाही. आता अमरजींचा वाढदिवस आहे.
ठरवूनही जाऊ शकलो नाही. अविनाश दुधेच्या आग्रहामुळे तेव्हा अमरजींवर एक लेख लिहिला
होता. प्रयत्न करूनही कितीतरी वेळ लिहिता येत नव्हतं. तरीही लिहिलं. लेख कसा झालाय
माहीत नाही. पण त्यात अतिशयोक्ती एका पैशाचीही नाही. लेख नेहमीसारखा कटपेस्ट
`काजळ
डोळ्यांच्या इतकं जवळ असतं म्हणूनच ते माणसाला दिसत नाही. दिसण्यासाठी एक अंतर
असावं लागतं. ते इतक्या जवळ होते की त्यांच्यावर काय लिहावं अन् कसं लिहावं?`,
असं अमर हबीबांनी एका
ठिकाणी लिहिलंय. त्यांच्याबाबतीतही माझ्यासारख्या त्यांच्या लहानमोठ्या मित्रांचं असंच होत असणार.
कारण अंतर राखून वागणं अमरजींच्या स्वभावात नाही. माणूस जोडला की तो जवळचा झालाच.
तोही कायमचा. तेही नुसतं जवळ नाही आरपार जवळ.
हे अंतर संपवायचं श्रेय अमरजींनाच.
कुणी त्यांच्या संपर्कात आला की तो त्यांचा होतोच. कुणी नावाजलेला वगैरे असेल तर
ते थोडं संकोचून असतात. पण थोडावेळच. समोरच्याला मोकळं करण्याचं अद्भूत कसब त्यांच्यापाशी आहे. ते कुणाशीही
सहजपणे बोलू शकतात. वागू शकतात. अगदी कुणाशीही. तो शेतमजूर असो की प्राध्यापक.
कार्यकर्ता असो की उद्योजक. मराठवाड्याचा असो की विदर्भाचा. महाराष्ट्राचा की
महाराष्ट्राबाहेरचा. भारतातला की अमेरिकेतला. हिंदूचा, मुसलमानाची की ख्रिश्चनाचा. कोणत्याही जातीचा. समाजवादी की
कम्युनिस्ट. गांधीवादी की हिंदुत्ववादी. बाई असो की पुरुष. लहान, तरुण किंवा म्हातारा.
कुणी ओळख करून दिली. कुणी भेटायला आलं की त्याचा आगापिछा न बघता हे मिसळले
त्याच्यात. गप्पा मारत मारत बसले जाऊन त्यांच्या मनात.
तुम्ही अमरजींना ओळखत असाल तर तुमचा अनुभव असाच असेल. तुम्ही हे असंच होताना
कितीतरी जणांच्या बाबतीत बघितलं असेल. माणूस एवढा मोठा. जमिनीवर पाय गच्च ठेवून
आभाळाला कवेत घेईल असा डोंगराएवढा. समज आली तेव्हापासून त्यांचं इतरांसाठी राबणं सुरूच आहे. लोकांसाठीच्या चळवळींत
सगळी उमेद ओतणं सुरूच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतली मोठमोठी माणसं त्यांना
मानणारी. लेखक, विचारवंत म्हणून मान
वेगळाच. इतकं मोठेपण. पण ते इतरांसारखं मिरवणं नाहीच. नावालाही अहंकार शिवण्याची
शक्यता नाही. त्यातून आलेलं सोपेपण, साधेपण. म्हणजेच इतर सगळ्या ओळखी बाजुला ठेवलेलं
माणूसपण. त्यांना भेटल्यावर सगळी ओझी बाजुला
पडतात. मोकळं आकाश बघून मनमोकळं व्हावं. तसं त्यांना भेटणार्या माणसाचं होतं. एक माणूस सहज दुसर्या
माणसाची गळाभेट घेतो. समोरचा
माणूस उजळून जातो. ही उजळलेली माणसं मग एकमेकांच्या संपर्कात येतात. अमरजी
त्यांच्यातला दुवा असतात.
त्यामुळे सगळी माणूसपणाच्या जवळ जातात. सुनील यावलीकरांच्या शब्दांत सांगाचं ते सुंदर माणसांची सुंदर रांगोळी घालतात.
अमरजींच मोठेपणात त्यांचं साधेपण आहे. साधेपणात मोठेपण आहे. त्यांचाइतका त्याग केलेले, चळवळी केलेले, भाषणं
केलेले, लेख लिहिलेले बरेच जण
असू शकतील. पण इतके मोठे असून साधे असलेले
एखादेच. या साधेपणामागे एक मोठी साधना आहे. कोणताही, कशाही प्रकारचा प्रस्थापितपणा
टाळण्याची ही साधना आहे. आपल्यामागे कोणतंही अवडंबर लागू नये म्हणून हसत हसत बिल्ले दूर फेकून
देण्याचा हा वर्षानुवर्षांचा
सराव आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा हा गोड हव्यास आहे. त्यासाठी जगण्यात एकामागून एक प्रयोगांची रांग आहे. हे जगण्यातले प्रयोग फसत
नाहीतच. ते सफल
झाले तर नवा दृष्टिकोन सापडतोच. पण रूढार्थाने फसले तरी नवा अनुभव देऊन जातात. नव्या अनुभवांसाठीची ही धडपड सतत सुरू
आहे.
अंबाजोगाईतल्या
सांस्कृतिक वातावरणात लहानपणापासूनच अमरजींची इतरांसाठीची धडपड सुरू झाली. त्यातून कधी मित्रांसोबत वेगवेगळ्या संस्थांमधला सहभाग आहे. पुस्तकाचं दुकान सुरू करणं आहे. त्यातून मग कधीतरी राष्ट्र सेवा दलातल्या एका शिबिरात खरी सुरुवात झाली. एसेम जोशींच्या आवाहनानुसार वसुधाताई धागमवारांसोबत अक्कलकुव्यात आदिवासींच्या हक्कासाठी काम केलं. त्यातच मग
आणीबाणीला विरोध. अटक. तुरुंगवास. लोकनायक जप्रकाश नारायणांच्या राष्ट्र युवा संघर्ष वाहिनी या तरुणांच्या संघटनेत ते जोडले गेले. पुढे देशाचं विविध विधायक क्षेत्रांत नेतृत्व करणारी मंडळी यातून घडली. त्या संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख
संघटक या
सर्वोच्च पदापर्यंत जाण्याचा सन्मान मिळाला. त्यातून संपूर्ण देशात संघटना बांधण्याचा आणि माणसं जोडण्याचा नवा अनुभव. त्यानंतर शेतकरी आंदोलन. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनांत सहभाग
आणि नेतृत्वही. कार्यकर्ता प्रशिक्षणाची जबाबदारी. दरम्यान पत्रकारिता. मराठवाडाच्या लातूर आवृत्तीचं संपादन. पत्रकारितेतच ‘लोकमन’,
‘बळीराजा’,
‘परिसर’सारखे प्रयोग. ‘केसरी’साठी दिल्लीत बातमीदारी.
लोकसत्ता,
लोकमत, पुण्यनगरीसारख्या वर्तमानपत्रांमध्ये सदरलेखन. अंबाजोगाईत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या आयोजनात सततचा सहभाग. ‘आंतरभारती’सारख्या
अनेक संस्थांशी जवळून संबंध. ‘दुष्काळदेशी’, ‘नाते’, ‘कलमा’, ‘संवाद’, ‘आकलन’, ‘डंकेल
प्रस्ताव आहे तरी काय?’, ‘खुल्या व्यवस्थेत मुस्लिमांचे
स्थान’ अशी
पुस्तकं. ‘एका साध्या सत्यासाठी’, ‘दादा’, ‘बेहोष
चालताना’, ‘शशी’, `धुनी तरुणाई` अशा
पुस्तकांचं संपादन. अनेक दर्जेदार पुस्तकांचं प्रकाशन.
हे सगळं सुरू असताना नव्या इंटरनेट या माध्यमातून चळवळीचे नवनवे प्रयोग. नवनव्या माणसांशी, तरुणांशी सातत्याने संपर्क. ब्लॉगमधून
विचारांची मांडणी. फेसबूकमधून घडवून आणलेल्या चर्चा. अनेकांच्या धारणांना दिलेल्या धक्का. समाजाचं
नव्याने केलेलं आकलन.
आंदोलनाचं एक नवंच माध्यम. या सगळ्यातून अनेकांची आयुष्य उजळवून टाकण्याचं असिधाराव्रत. त्याच्यामुळे घडलेले नव्या पिढीचे कित्येक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, अधिकारी आणि राजकारणीही. तरुणांमध्ये राहून त्यांच्यात तरुणाई पेरणारा हा तरुण. पुढच्या वर्षी त्यांना साठावं लागतंय. तब्येत अधूनमधून
बरी नसते म्हणून म्हातारपण म्हणावं. बाकी त्यांचं जगणं अखंड तारुण्याची प्रेरणाच आहे. त्यांनी अगदी घरचा म्हणून ‘आम्ही सारे फाऊंडेशन’चा कार्यकर्ता पुरस्कार स्वीकारला आहे. नाहीतर त्यापासूनही ते दूर राहत आले आहेत.
पुरस्कारांना ओलांडून ते कधीच पुढे गेलेले आहेत.
खूप छान लेख....
ReplyDeleteNice article on Great Man Amarkaka
ReplyDeleteBhari
ReplyDelete