सदानंद मोरे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पहिल्या फेरीतच ते जिंकले.
चांगलं झालं. ते पडले असते तरीही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणात काही बाधा
आली नसती. कारण त्यांचे माझ्यासारख्यावरचे उपकार मोठे आहेत. मी आज जे मोडकंतोडकं
लिहितो त्यातलं बरचसं सरांनीच लिहिलेल्यातलं वाचलेलं असतं. किंवा त्यावरून सुचलेलं
असतं. सरांमुळेच वर्तमानावर लिहिताना इतिहासाचं भान ठेवण्याचं भान आलं.
त्यांच्यामुळेच `रिंगण` झालं. ब्लॉगवरच्या लिखाणात मोरे
सरांचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे.
मी महानगरात वाढलेलो. त्यामुळे एक बरं झालं, माझ्या मागे कोणतीच ओळख नव्हती.
ना जात, धर्म, कूळ, वंश, काहीच नाही. माझ्या पणजोबांच्या आधी आम्ही मूळ नक्की
आमच्या गावीच राहत होतो का, मला शंका आहे. माझ्या पूर्वजांची बोली मालवणी मलाच काय
माझ्या आईबाबांनाही बोलता येत नाही. माझी ओळख असलेलं फक्त माझं शहर, मुंबई. मी
महाराष्ट्रीय, मी भारतीय म्हणजे काय, याचा अद्याप शोधच चाललेला. असाच चाचपडताना
मला `तुकाराम दर्शन` भेटलं. माझ्या मुळांपर्यंतचा
रस्ता लख्ख दिसल्यासारखं झालं. मोरे सरांचं जसजसं वाचत गेलो तसतसं डोळे उघडत गेले.
`रिंगण`ने आयोजित केलेल्या सरांच्या साठीच्या कार्यक्रमात मी बोलत होतो त्याचा फोटो. खुर्च्यांवर सरांसोबत बाबा आढाव, राजीव खांडेकर, दत्ता बाळसराफ आणि अरविंद पाटकर |
ज्यांच्या आरशात स्वतःची ओळख शोधावीशी वाटली, त्यात मोरे सरांचं नाव आघाडीवर आहे.
त्यासाठी इतरही मोठी बहुजनवादी विचारवंत मंडळी आहेत. पण त्यातले बरेसचे आमच्यासारख्यांना
उचकावतात फक्त. त्यांना खरं सांगण्यापेक्षा चळवळ वगैरे बांधायची असते. ते
शाळेतल्या मास्तरांसारखं आपलंच खरं असल्याचं लादतात. ते कुणाला तरी शत्रू मानतात
आणि कुणालातरी मित्र. मग शत्रूचं चांगलं झाकतात आणि मित्राचं नसलेलं चांगलंही
ओरडून सांगतात. शिव्या वाचून क्षणभर फुरफुरायला होतं. पण हवा निघून गेल्यानंतर
त्याचा फोलपणा कळतो. अशावेळेस मोरे सराचं मोठेपण कळतं. ते कधीच टोकाला जाताना दिसत
नाहीत. त्यांच्या मांडणीत एक साधेपणा आहे. हे बघा हे असं आहे, तुम्हाला मान्य असेल
तर बघा वाचून, असं आहे त्यांचं लिखाण. त्यात दोन्ही बाजूंनी संवाद होतो. इथे घेणंदेणं
होतं. ब्राह्मणांना शिव्या न देताही बहुजनवाद असू शकतो, हे द्वेषाच्या गोंगाटात
तेच सांगत होते. धर्माचा मार्ग धरा, असं दोन्ही हात उंचावून सांगणाऱ्या
वेदव्यासांची आठवण होते त्यांचं वाचताना.
रामदासांना शिव्या दिल्या तरच तुकाराम मांडता येतात. लोकमान्यांना शिव्या
दिल्या तरच जोतिबा मांडता येतात. ब्राह्मणांना शिव्या दिल्या तरच बहुजनांची थोरवी
गाता येते. असा गलबला बहुजनवादाच्या नावाने आजही सुरू आहे. त्यात मोरे सरांनी
सर्वजनवाद दिला. असं करताना ते रामदासांच्या, लोकमान्यांच्या आणि ब्राह्मणांच्या
पदरात त्यांचं दान द्यायला कचरलेले दिसत नाहीत. तसंच बहुजनांना त्यांनी उगाच
गोंजारलेलंही नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ते `जातिनया`पासून दूर आहेत. असं करता येऊ
शकतं, यासाठी ते आदर्श आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या बरोबरच गांधीजी, विठ्ठल
रामजी शिंदे, न्यायमूर्ती रानडे, राजारामशास्त्री भागवत, लोकमान्य टिळक, सयाजीराव
गायकवाड, यशवंतराव चव्हाण यांनाही आपल्यासोबत घेता येतं हे त्यांनी समजावलं.
प्रत्यक्ष भेटल्यावर तर त्यांचं मोठेपण खूपच जाणवलं. माणूस अगदी साधा आणि
पारदर्शक. सगळ्यांना सोबत घेऊन जायचं हा स्वभाव. गळ्यातल्या तुळशीच्या माळेसोबत
सुवर्णमध्य जोडला गेलेला आहे. त्यामुळे कुणाला तोडता येत नाही. विरोधकाचंही सहजपणे
ऐकता येतं. विरोधकाला संपवण्याचा विचार येत नाही. कुणी त्याला वारकरी असल्याचं ओझं
मानतात. ओझं असेलही ते कदाचित. पण छान आहे. असं ओझं बाळगायला आवडावं सगळ्यांना.
साहित्य संमेलन घुमानमध्ये झालं नसतं तर ते साहित्य संमेलनाच्या भानगडीत पडले
नसते. वारकरी परंपरेचा योग्य तोच विचार जगभर जावा, यासाठीच त्यांचा खटाटोप होता.
ते गोव्यात प्रचाराला आले होते. प्रचार कसा नसावा याचं ते उत्तम उदाहरण होतं.
लोकांना देण्यासाठी पुरेशी प्रचारपत्रकंही नव्हती त्यांच्याकडे. पत्रकार परिषदेतही
काही बातमी न देणारं साधं बोलले. त्यामानाने इतरांचा प्रचार आखीवरेखीव होता. पण जे
इतरांच्या बाबतीत होत नव्हतं ते सरांच्या बाबतीत झालं. त्यांच्या प्रचारासाठी
अनेकजण स्वतःहून पुढे सरसावले होते. तीही अशी मंडळी होती, ज्यांना साहित्य संमेलन
वगैरे गोष्टींमधे एरव्ही बिलकूल रस नसतो.
सर निवडणूक जिंकल्यावर अनेकांनी फोन करून माझं अभिनंदन केलं. बरं वाटलं. मी
त्याच दिवशी सरांवर अग्रलेख लिहिलाय. तो कटपेस्ट. फक्त भाषा थोडी ओघवती केलीय. त्यातला
नथुरामच्या नावावर तुंबड्या भरणाऱ्या नटाचा संदर्भ शरद पोंक्षेचा आहे. तो आदल्याच
दिवशी गोव्यात आला होता आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषदा घेऊन गेला.
आज विचारवंत हे लेबल कुणालाही चिटकवण्याची ‘सुमारांची सद्दी’ आहे. अशांच्या जमान्यात
एखादी अस्सल विचारधारा मुळातून मांडणारे खरे विचारवंत दुर्लक्षित राहिले तर आश्चर्य
नाही. तरीही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मातीत तीन विचारधारांनी आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव
टाकला. भालचंद्र नेमाडेंचा देशीवाद, कॉ. शरद पाटलांचा मार्क्स फुले आंबेडकर म्हणजे माफुआवाद
आणि डॉ. सदानंद मोरेंचा सर्वजनवाद. बहुजनवादाच्या आजच्या द्वेषाधारित गुंत्यातून एक पाऊल पुढे टाकत
समाजातील सर्व स्तरांना सोबत घेऊन जाणारा सर्वजनवाद मांडणारे विचारवंत म्हणून
सदानंद मोरे यांचं
योगदान मोठं आहे. असा एक विचारवंत
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच अध्यक्ष म्हणून निवडला जातो,
हे एकूण मराठी वाङ्मयीन जगत प्रगल्भ झाल्याचं लक्षण मानायला हरकत नाही.
कदाचित गेल्या वेळेस फ. मुं. शिंदेंसारख्या सत्ताशरण उथळ साहित्यिकाला निवडून दिल्याचं प्रायश्चित्त मतदारांनी केलं असावं. संत नामदेवांची पंजाबातील
कर्मभूमी असलेल्या घुमान येथे साहित्य संमेलन होत असण्याला एक वेगळा अर्थ आहे. अनेक राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय प्रभाव पचवत महाराष्ट्रातील नव्या पिढीने मराठी संस्कृतीच्या
मुळांचा घेतलेला हा शोध आहे. वारकरी संतपरंपरा हा काही टाळकुट्या भक्तांचा धर्म अध्यात्मापुरता अडकलेला वारसा नाही.
आठशे वर्षांपासूनच्या या पुरोगामी परंपरेने आज एकविसाव्या शतकातही मराठी म्हणून आपलं असणं, जगणं, बोलणं, लिहिणं, वाचणं यावर उमटवलेला ठसा
स्पष्ट दिसून येतो. याची जाणीव ज्या प्रतिभावंत विचारवंतांनी महाराष्ट्रात नव्याने घडवली, त्यात डॉ. मोरेंचं नाव आघाडीवर घ्यायला हवं. म्हणूनच घुमानला निघालेल्या या
पालखी सोहळ्याचे चोपदार होण्याचा मान आणि अधिकार त्यांचाच होता. ते जगद्घुरू तुकाराम
महाराजांचे कितवे तरी वंशज आहेत म्हणून त्यांनी अध्यक्षपदाच्या ‘गादी’वर बसावं, असं कुणी म्हणत असेल तर वारकरी परंपराच त्याला
धुडकावून लावेल. तुकोबारायांची क्रांतीची पताका नव्या काळाच्या क्षितिजावर अधिक
तेजाने फडकावण्याचं काम
त्यांनी केलेलं आहे.
आता तो विचार सातासमुद्रापार नेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली आहे.
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक या एका विशेषणात डॉ. सदानंद मोरे यांना अडकवून
ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांचं कर्तृत्व त्याच्याही पलीकडे खूप मोठं आहे. त्यांचं लिखाण हे प्रामुख्याने
बहुविद्याशाखीय इतिहाससंशोधनाचं आहे. त्याचबरोबर कवी, नाटककार, कीर्तनकार, प्रवचनकार, वक्ते म्हणून त्यांचं स्थान वरचं आहे. ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या ग्रंथाने
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाकडे बघण्याच्या नव्या दृष्टिकोनालाच जन्म दिला.
‘लोकमान्य ते महात्मा’ ही महाराष्ट्रातल्या
स्थित्यंतराची द्विखंडीय कहाणी
म्हणजे पूर्वग्रहविरहीत संशोधनाचा वस्तुपाठ ठरला आहे. नथुराम गोडसेच्या नावाने
तुंबड्या भरणाऱ्या
नटाने पत्रकार परिषद घेऊन महात्मा गांधींना शिव्या देण्याचे विचित्र प्रकार डोक्यावर घेण्याच्या काळात या
ग्रंथाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. त्यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या महाग्रंथात वि. का. राजवाडेकृत महाराष्ट्राच्या
इतिहासाची अभ्यासपूर्ण चिरफाड करत मराठीपणाचा शोध घेतला गेला आहे. या तिन्ही
ग्रंथांना मान्यता
आणि लोकप्रियता लाभली, तरी
त्यातुलनेत त्यांचा श्रीकृष्ण आणि गीतेवरील अभ्यास अद्याप दुर्लक्षित राहिला आहे.
तसंच सुरुवातीच्या काळात
त्यांनी `जागृती`कार पाळेकरांवर केलेलं महत्त्वाचं कामही फार प्रकाशात आलेलं नाही. ‘उजळल्या दिशा’ आणि ‘शिवचरित्र’ ही नाटकं, तीन चार कवितासंग्रह,
नुकतंच प्रकाशित झालेलं लोकमान्य टिळकांचं चरित्र, संतसाहित्यावरची पुस्तकं, महत्त्वाची संपादनं या त्यांच्या चतुरस्र
लिखाणावरही आता अधिक प्रकाश पडू शकेल. त्यांनी पुणे विद्यापिठाच्या तत्त्वज्ञान
विभागाचं आणि तुकाराम अध्यासनाचं प्रमुखपद भूषवलेलं आहे. साहित्य अकादमीसह
साहित्यक्षेत्रातले जवळपास सर्वच महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना लाभले
आहेत. या सगळ्याच्या पलीकडे आपल्या कामातून नव्या पिढीच्या अभ्यासकांना आत्मभान मिळवून देणारे भाष्यकार म्हणून त्यांची नोंद
इतिहासाला करावी लागत आहे. काही समाजकंटक वारकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना
अंधश्रद्धा निर्मूलन
कायद्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत होते. डॉ. मोरे यांनी त्यांना चोख
उत्तर तर दिलंच,
शिवाय त्या
कायद्यासाठी खऱ्या
वारकऱ्यांचं संघटन करून दाखवलं. आता अध्यक्ष म्हणून निवड
झाल्यानंतर त्यांच्यातल्या या ‘क्रियाशील पंडिता’ला मोठाच वाव आहे. कारण आपलं समाजजीवन आणि समाजचिंतनही जात
आणि धर्माच्या मर्यादांमध्ये आक्रसत चाललेले आहे.
त्यामुळे आधीच अंधारात चाचपडणाऱ्या सर्वसामान्यांना खोल काळोखाच्या गर्तेत खेचून नेण्यासाठी सभोवती आटापिटा
सुरू आहे. अशा वेळेस सर्वजनवादाची व्यापक वाट चोखाळणारा चिंतक आपल्यासमोर आला आहे.
त्याचे सगळ्यांनी स्वागत करायलाच हवे.
No comments:
Post a Comment