`तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा
एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे
आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले.` पानसरे सरांवर हल्ला झाला तेव्हा गोवादूतच्या अग्रलेखात लिहिलं होतं. विश्वास
होता की सर बरे होतील. पण ते होणं नव्हतं.
सरांचा खून झालाय. खून करणाऱ्यांनो, तुमचे दिवस
भरले. तुम्ही जे कुणी असाल, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. पानसरे सरांचा
खून तुम्हाला महाग पडेल. फार महाग. किती जणांना मारणार तुम्ही?
यावर एकच उपाय. प्रतिगामी
विचारांचा पगडा दूर करायला हवा. उजेडाने काळोख संपतो. त्यासाठी गांधीजी, दाभोलकर
आणि पानसरे सरांचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा. पानसरे सरांचे शिवाजी
महाराज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायलाच हवेत.
आता आणखी गाफील राहून चालणार
नाही. आता टंगळमंगळ करून चालणार नाही. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण स्वतः
ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःला धार लावायला
हवी. स्वतःचं सर्वस्व द्यायला हवं आता. दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नाही
मारणाऱ्यांनीच.
दिवस जातील तसे विसरू आपण
पानसरे सरांच्या हौतात्म्याला. गांधीजींना विसरलो तसे. दाभोलकरांना विसरलो तसे. पण
हे होता कामा नये. तो सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जागं करत ठेवायला हवं.
आणखी कुणी पानसरे होऊ नये म्हणून आता जागं राहायलाच हवं. जागं ठेवायला हवं.
आम्हाला संपवल्यानंतर तुम्ही
आम्हाला जाळणार असाल
तर आम्ही सोनं आहोत. उजळून
निघू.
आम्हाला संपवण्यानंतर तुम्ही
खोल पुरणार असाल
तर आम्ही बिया आहोत. नव्याने
उगवू.
मारा आणखी किती मारायचंय ते.
मरायला तयार आहोत आम्ही.
लढायला तयार आहोत आम्ही.
तुम्हालाही बदलायला तयार आहोत
आम्ही.