Saturday, 21 February 2015

आदरणीय कॉम्रेड,

`तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले.` पानसरे सरांवर हल्ला झाला तेव्हा गोवादूतच्या अग्रलेखात लिहिलं होतं. विश्वास होता की सर बरे होतील. पण ते होणं नव्हतं.
सरांचा खून झालाय. खून करणाऱ्यांनो, तुमचे दिवस भरले. तुम्ही जे कुणी असाल, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. पानसरे सरांचा खून तुम्हाला महाग पडेल. फार महाग. किती जणांना मारणार तुम्ही?
यावर एकच उपाय. प्रतिगामी विचारांचा पगडा दूर करायला हवा. उजेडाने काळोख संपतो. त्यासाठी गांधीजी, दाभोलकर आणि पानसरे सरांचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा. पानसरे सरांचे शिवाजी महाराज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायलाच हवेत.
आता आणखी गाफील राहून चालणार नाही. आता टंगळमंगळ करून चालणार नाही. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण स्वतः ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःला धार लावायला हवी. स्वतःचं सर्वस्व द्यायला हवं आता. दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नाही मारणाऱ्यांनीच.
दिवस जातील तसे विसरू आपण पानसरे सरांच्या हौतात्म्याला. गांधीजींना विसरलो तसे. दाभोलकरांना विसरलो तसे. पण हे होता कामा नये. तो सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जागं करत ठेवायला हवं. आणखी कुणी पानसरे होऊ नये म्हणून आता जागं राहायलाच हवं. जागं ठेवायला हवं.

आम्हाला संपवल्यानंतर तुम्ही आम्हाला जाळणार असाल
तर आम्ही सोनं आहोत. उजळून निघू.
आम्हाला संपवण्यानंतर तुम्ही खोल पुरणार असाल
तर आम्ही बिया आहोत. नव्याने उगवू.
मारा आणखी किती मारायचंय ते.
मरायला तयार आहोत आम्ही.
लढायला तयार आहोत आम्ही.
तुम्हालाही बदलायला तयार आहोत आम्ही.

गोवादूतच्या १८ तारखेच्या अंकात लिहिलेला अग्रलेख `आदरणीय कॉम्रेड` आणि १९ तारखेच्या अंकातला `आज शिवजयंती` जसेच्या तसे सोबत जोडले आहेत. हे लेखन गोव्याच्या वाचकांसाठी आहे. तिथे महाराष्ट्रासारखी विचारांची परिवर्तनवादी पार्श्वभूमी नाही. पानसरे सर महिन्याभरापूर्वीच दोनदा गोव्यात आले होते तेव्हा म्हणाले होते, `कन्विन्सिंग द कन्विन्स्ड` पुरे झालं आता. त्या दिशेने हा प्रयत्न आहे. त्यामुळे भाषा थोडी वेगळी वाटू शकते. बघावं काय ते.

आदरणीय कॉम्रेड, (अग्रलेख १८ फेब्रुवारी, गोवादूत)

वयाच्या ८२व्या वर्षी तुमच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. तुम्ही आयसीयूत जगण्यावाचण्याची लढाई लढता आहात, आजवर रस्त्यावरच्या लढाया लढलात त्याच जिकिरीने. स्वतः मनातून हरत नाही तोवर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, असे गांधीजी म्हणाले होते. गांधीजी कधीच हरले नाहीत. त्यांच्यावरही अशाच गोळ्या झाडल्या होत्या. आज एकविसावे शतक जुने होते आहे, तो तो हा म्हातारा तरुण आणि ताजा होऊ लागला आहे. गांधीजी संपलेले नाहीत. ते हरलेले नाहीत. उलट त्यांचे विचार जग जिंकत चालले आहे. गांधीजींना मारणार्याने ज्या विचारांचा असल्याचा दावा केला होता, त्या विचारांचे पुढारीही आज गांधीजींसमोर लोटांगणे घालत आहेत. कॉम्रेड, तुम्ही गांधीजींच्याच विवेकाचा वारसा पुढे नेत आहात. तुम्हीही कधीच हरला नाहीत. हरणे शक्यही नाही. बंदुकीच्या पाच गोळ्या तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले. त्या प्रेमाचा इतका धसका घेतला की तुमच्यावर जीवघेणा हल्लाच केला त्यांनी. एरव्ही ब्याऐंशीव्या वर्षी तुम्हाला मारण्यासाठी बंदूक उचलण्याचा षंढपणा झाला नसता. तुमचे विचार स्फटिकापेक्षा स्वच्छ आहेत. साध्या भाषेत साध्या माणसाला विचार करायला लावणारे आहेत. त्या विचारांना विचारांनी उत्तर देण्याची क्षमता अविवेकी लोकांमध्ये नाही. त्यात तीच अविवेकी मंडळी वारंवार उघडी आणि उताणी पडत आली, हे सगळ्यांनीच पाहिलेले आहे. तुम्हाला विचारांत हरवणे शक्य नव्हते. तुमचे आयुष्यदेखील इतके आरपार की तुमची बदनामीही शक्य नाही. त्यात तुम्ही कायम लोकांशी जोडलेले. सर्व विचारांच्या विवेकवाद्यांमध्ये तुमच्याबद्दल आदर आहे. दहा दिशांना दहा तोंडे असलेल्या त्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात. तुम्ही गेली काही वर्षे सातत्याने शत्रुमित्रविवेकाचे तत्त्वज्ञान शांत पण ठामपणे मांडत होतात. तुमच्याच शब्दांत सांगायचे तर त्यासाठी तुमची व्यूहरचना तयार होती. मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रातले विचारवंत आणि कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचे तुमचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी तुम्ही कार्यक्रम देत होतात. काळाची पावले ओळखणारी आणि त्यावर प्रॅक्टिकल उत्तर असणारी दोनचारच नावे आज महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तुम्ही एक. तुम्हाला हे करता येऊ नये म्हणूनच तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता तरी विवेकवाद्यांचा विवेक जागृत होणार आहे का? आता तरी परिवर्तनवादी परिवर्तनासाठी तयार होणार आहेत का?

कॉम्रेड, दीड वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला. तो खून पचवणारे आता माजले आहेत. त्यांनी तुम्हाला तसेच संपवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्यांना पुरून उरणार, यात वादच नाही. तुम्ही बरे व्हाल तेव्हा कोल्हापुरातल्या बिंदूचौकात तुमच्या सत्काराची सभा होईल. तेव्हा महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपर्यांतून विवेकवादी तरुणांची गर्दी तुमच्यासमोर कान टवकारून उभी असेल. या अग्निदिव्यातून तुमच्या शब्दांना नवे सामर्थ्य आलेले असेल. परिवर्तनाचा नवा वणवा पेटवण्यासाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. कॉम्रेड, आठवत असेल तुम्हालाही, एकदा अभाविपच्या मुलांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बराच आगाऊपणा केला होता. सबंध कोल्हापुरातून त्यावर टीका होत होती. तुम्ही डावे, त्यामुळे तुम्हीही टीका करणार्यांची री ओढाल असे सगळ्यांना वाटले होते. आंदोलनाच्या जोशात असे कधीकधी होऊन जाते. ते विसरायचे असते. मीही तरुण असताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या गळ्यात साप घातला होता. आता मला त्याचा पश्चात्ताप होतोय, ही तुमची त्यावरची प्रतिक्रिया भल्याभल्यांना पचवता आली नव्हती. कॉम्रेड, ही तुमची मोठी ताकद आहे. पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या, विचारधारांच्या पलीकडे पाहण्याची तुमची दृष्टी तुम्ही तपश्चर्येने मिळवली आहे. तुमचा कोणी वैयक्तिक शत्रू असण्याची शक्यता नाही, टोलवाले तर नाहीच नाही. कारण कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात तुमच्यापेक्षा सक्रिय अनेकजण होते. तुमच्या अजेंड्यावरचे विषय खर्या परिवर्तनाचे आहेत. समाजपरिवर्तनासाठी लढणारे बहुसंख्य जण आज हताश, दिशाहीन किंवा विकाऊ तरी झालेले दिसतात. अशावेळेस तुमचे असणेही प्रतिगाम्यांना सलत आहे, हे तुमचे फारच मोठे यश आहे. कॉम्रेड, तुमच्यावर हल्ला झाला म्हणून तुमची लढाई थांबणार नाही. तुमच्यावर हल्ला करणार्यांनी आता लक्षात ठेवावे, आता कुणी घाबरणार नाही. तुमच्यावरच्या हल्ल्याने आमचे काळीज वाघाचे बनले आहे. तुमच्यावर हल्ला करणारे जे कोणी आहेत, त्यांना आता सोडता कामा नये. गांधीजींचा, दाभोलकरांचा आणि कॉम्रेड तुमचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा आतामग त्या बंदूकवाल्यांनी असतील नसतील तेवढ्या सगळ्या गोळ्या संपवल्या तरी बेहत्तर. विवेक संपणार नाही. त्यासाठीची नवी लढाई सुरू झालेली आहे. अंधाराच्या रखवालदारांनो, तुमच्यामुळेच मावळलेला सूर्य नव्याने क्षितिजावर डोकावू लागला आहे.

आज शिवजयंती (अग्रलेख १९ फेब्रुवारी, गोवादूत)

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यानंतर स्वराज्य बेवारस पडले होते. राजाराम महाराजांना दूर तामिळनाडूतल्या जिंजीत लपावे लागले होते. अशावेळेस अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश अशा त्यावेळच्या कदाचित जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याची ताकद घेऊन आलमगीर औरंगजेब मराठ्यांचे राज्य संपवण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. ते राज्य तरी केवढे, आजच्या महाराष्ट्रातल्या तीन चार जिल्ह्यांएवढे. पण त्या टीचभर राज्यातला प्रत्येक मावळा आपल्या शिवाजी महाराजांचे राज्य टिकवण्यासाठी औरंगजेबाशी झुंजत राहिला, तेदेखील कोणी राजा किंवा सेनापती नसताना. एक दोन वर्षे नाही, तर अडीच दशकांहून अधिक काळ. आणि याचा शेवट काय झाला तर फाटक्या मावळ्यांसमोर शहेनशाह औरंगजेब खुरडत खुरडत मेला. त्याची कबरही याच मराठी मातीत बांधली गेली. भारताच्या ज्ञात इतिहासातला हा बहुदा पहिलाच लोकलढा होता. रयतेचे आपल्या राजावरचे इतके प्रेम भारतात याआधी कधीच दिसले नव्हते. ते प्रेम फक्त तेव्हाच नव्हते तर आजही आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेतल्यावर आजही अभिमानाने छाती फुलून येते. पण त्या प्रेमाचा आणि अभिमानाचा वापर स्वार्थी नेत्यांनी आपापली पोळी भाजण्यासाठीच केला गेला. कुणाला त्याचे राजकारण करायचे होते तर कुणाला धर्मकारण. आपल्या शत्रूचे शत्रू म्हणूनच महाराजांना सर्वसामान्यांसमोर आणले गेले. त्यांची विधायक बाजू आग्रहाने समोर आणलीच गेली नाही. त्यावर पहिला महत्त्वाचा प्रहार कॉ. गोविंदराव पानसरेंनी केला. त्यांचे पुस्तक शिवाजी कोण होता? याने छत्रपतींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. या अवघ्या सत्तर पानी पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक भाषांत त्याची भाषांतरे झालेली आहेत ती वेगळीच. या पुस्तकाला जवळपास समकालीनच असलेली शरद जोशी यांचे शेतकर्यांचा राजा शिवाजी आणि कॉ. शरद पाटील यांचे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण? ही छोटेखानी पुस्तकेही तितकीच महत्त्वाची होती. पण लोकांपर्यंत पोहोचवून वर्मी घाव घालणारे पानसरेच. छत्रपती हे मुसलमानांचे शत्रू ही मांडणी आज इतिहासाने ठोकरून लावली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी महानाट्य जाणता राजा आणि पुस्तकाच्या नव्या आवृत्तांमध्ये महाराजांच्या ललकारीतून गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द काढून टाकला आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या पुस्तकांतून दादोजी कोंडदेव हे गुरू असल्याचे उल्लेख काढून टाकण्यात आलेले आहेत. १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जवळपास सर्वमान्य झाली आहे. शिवसमर्थांच्या चित्रामधील समर्थ रामदासांची जागा जिजामातेने घेतली आहे. कारण नव्या पिढीने शिवछत्रपतींचा इतिहास पुराव्यांनिशी तपासून बघायला सुरुवात केली आहे. त्यातून इतिहासाला मान्य नसणार्या गोष्टी आपोआप कालबाह्य ठरू लागल्या आहेत.
  
शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पूर्वग्रहविरहीत आणि प्रामाणिकपणे मांडणार्या गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असताना आज शिवजयंती आलेली आहे. यातले शिवराय आपल्यावर बिंबवण्यात आलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळे आहेत. गावाची वेठबिगारी करावी लागणार्या अस्पृश्यांना किल्लेदार बनवून ब्राह्मण, प्रभू, देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून उभे करणारे शिवराय यात भेटतात. मराठ्यांच्या पराक्रमाला त्यांनीच साद घातली. शेतकर्यांच्या नांगरालाही त्यांनीच तलवारीची धार मिळवून दिली. आगरी, भंडारी, कोळ्यांना जिवाला जीव लावून लढायला त्यांनीच शिकवले. सगळ्या जाती भेद मिटवून स्वातंत्र्यासाठी लढू लागल्या. अन्याय करणारा कोणीही असो, हिंदू की मुसलमान, ब्राह्मण की मराठा, याची पर्वा न करता त्याला उभा चिरला. स्वराज्यासाठी गरज पडली तेव्हा समुद्रबंदी आणि ब्रह्महत्येसारखी पातकेही अभिमानाने केली. शिवछत्रपतींनी सगळ्या धर्मांच्या तीर्थस्थळांचा, धर्मग्रंथांचा, संतांचा सन्मान राखला. एक मुसलमान पोरगा मदारी मेहतर आग्र्याच्या कैदेत महाराजांच्या जागी झोपलेल्या हिरोजी फर्जंदांचे पाय चेपत जीव धोक्यात घालतो आणि आपण त्याच महाराजांना धर्माच्या संकुचितपणात अडकवून ठेवतो, हे बरोबर आहे का? बहलोलखानाला हरवणारा सिद्दी हिलाल, विश्वासू अंगरक्षक सिद्दी इब्राहीम, सरनोबत नूरखान बेग, स्वराज्याच्या तोङ्गखान्याचे प्रमुख इब्राहीम खान अशी शिवरायांवर जीव ओवाळून टाकणार्या मुस्लिमांची यादी इतिहासाच्या पानांत शोधता येईल. शिवरायांनी वेठबिगारी बंद केली. गुलामांची खरेदीविक्री हा राजरोस चालणारा धंदा बंद केला. जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या लांड्या बजाजी निंबाळकरांना आपली पोटची मुलगी दिली, जावई करून घेतली. तशी घरवापसी करण्याची छाती त्यांच्याकडे होती. जमिनी मोजून शेतकर्यांच्या कराला नियमात बसवले. गावे वसवली. तलाव, विहिरी खोदल्या. कारखाने खोलून उद्योजकांना प्रोत्साहन दिले. राजकारभाराची भाषा मराठी बनवली. लुटालूट होऊ नये म्हणून सैनिकांना पगार दिले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी सैन्याला ताकीद दिली. झाडे जगवण्याचे संदेश अधिकार्यांना दिले. असा जाणता राजा दुसरा कुणी झाला का? 

2 comments:

  1. सचिन साहेब आपण खूप छान लिहीताय. आम्हा वाचकांना विचार करायला लावताय. आपल्या ब्लॉग वर आल्यावर खूप दिवसांनी
    खूप सशक्त, चांगले काही वाचल्याचे समाधान मिळाले. साप्ताहिक 'साधना' तील आपले लेख आवडतात. दाभोलकर, पानसरे यांचा
    विवेक विसरायचा नाही, मात्र आक्रोश जिवंत ठेवायचा, धर्माची पताका विवेकवाद्यान्नी हाती घ्यायला हवी. या सारखी विचार
    मौक्तिके आवडलीत. धन्यवाद

    ReplyDelete