Saturday, 10 June 2017

रॉक ऑन कबीर

यावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता  ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.

त्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठीच्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.

...

द अनहद. सीमित असीमित. 
हद अनहद दोनों तपे, वाको नाम फकीर. सीमेपल्याड जातो आणि असीमेच्याही, त्याचं नाव फकीर. 
कबीरांनी फकीराचा सांगितलेला हा पत्ता. त्या पत्त्यावर कबीरांनाच शोधत एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शबनम विरनानी निघतात, काखोटीला कॅमेरा बांधून. 

अमेरिकेत बिमेरिकेत शिकलेल्या या फिल्ममेकर रिपरिप पावसात अयोध्येला पोचतात. अस्मितेचा आणि त्याचवेळेस द्वेषाचा मानबिंदू झालेला राम त्यांना भेटतो. तो त्यांना हवा असलेला कबीरांचा राम नसतो. तो त्यांना सापडतो माळव्यातल्या लुनयाखेडी गावात. तिथे लोकगायक प्रल्हाद तिपानिया भेटतात, कबीरांच्या शेजारी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणारे. तिथून राजस्थानातल्या पुगल गावात मिरासी गायक मुख्तियार अली. त्यांना कुराणाच्या, रामायणाच्या पलीकडचा कबीरांचा राम शोधायचाय. शबनमबाईंचा कॅमेरा कबीरांचा जन्म झाला त्या वाराणशीत जातो आणि निधन झालं त्या मगहरमध्येही. छत्तीसगढमधल्या धरमदासी कबीरपंथाच्या मठातही तो जातो आणि भोपाळमध्ये कबीरांवर होणाऱ्या नाटकाच्या तालमीतही. 

मग कॅमेरा अनहद होतो. बाघा बॉर्डरीपल्याड. कराचीत त्यांना फकरुद्दीन अयास भेटतात. कबीरांना कुणी काही बोललं तर आपल्याला सहन होणार नाही, असं सांगणारा हा अवाढव्य आक्रमक कव्वाल. दुसरीकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुफी मुळाकडे घेऊन जाणारे सौम्य शांत शफी फकीर. सीमेपल्याडचा असीमेपल्याडचा कबीर आलिंगन देत कडकडून भेटतो या डॉक्युमेंट्रीत. हद अनहद नावाच्या.  

२००९ साली ही डॉक्युमेंट्री बनली. दिल्लीत त्याचं स्क्रीनिंग होतं. तिथे एक तरुण आला ते बघायला. नीरज आर्या नाव त्याचं. तो मंझिल नावाच्या एनजीओबरोबर काम करायचा. जंतरमंतरच्या आंदोलनांत जोश यावा म्हणून इंडियन ओशन या बँडची गाणी गायची, हा त्याचा छंद. तो सांगतो, `डॉक्युमेंट्रीत मुख्तियार अली एक दोहा गातात. पोथी पढ पढ जग मुआ पंडित भया न कोय. ढाई आखर प्रेम के पढे तो पंडित होय. मी आतून हललो. त्या क्षणाने मला कबीराचा शोध घेण्याच्या वाटेवर आणून सोडलं.` पद्मश्री प्रल्हाद तिपानिया, मंझिलचे प्रमुख रवी गुलाटी आणि शबनम विरनानी हे त्याचे वाटाडे बनले. तो आता त्याच्या गिटारवर कबीर गाऊ लागला. त्याच वर्षी विरनानींच्या कबीर प्रोजेक्टमध्ये एका दिवसासाठी तो मध्य प्रदेशात गेला होता. सतत नऊ दिवस तो तिथे कबीर गात राहिला. त्यानंतर एक दोन नाही, तर सतत सहा वर्षं नीरज कबीरांना गाण्यातून शोधत फिरला. 

`नॅचरल स्ट्रीट्स फॉर परफॉर्मिंग आर्ट्स` नावाची एक संस्था मुंबईत आहे. रेल्वे स्टेशन, मॉल, बागा अशा ठिकाणी कलेच्या सादरीकरणाची संस्कृती वाढीला लागावी, म्हणून ती काम करते. तिच्यामुळे नीरज दिल्लीहून मुंबईला आला. एकदा तो वांद्रे स्टेशनावर कबीर गात होता. त्याच्यातल्या मोकळ्या ढाकळ्या ऊर्जेने मुकुंद रामस्वामीला ओढून घेतलं. संगीत मुकुंदसाठी नवीन नव्हतंच. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो कर्नाटकी शैलीत वायोलिन शिकला होता. शास्त्रीय संगीतातल्या मोठमोठ्या कलाकारांना त्याने साथ दिली होती. आणि इथे समोर होता संगीताचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेला नितळ गाणं गाणारा नीरज. खरं तर नीरज काय गातोय ते तेव्हा त्याला कळलंही नव्हतं. पण तो नीरजबरोबर नेहमीसाठी जोडला गेला. आज आपला गब्दुल देह सांभाळत मनसोक्त नाचता नाचता वायोलिन वाजवणाऱ्या मुकुंदला पाहणारा कुणीही यावर विश्वास ठेवू शकत नाही की त्याने कळायला लागल्यापासून वायोलिन खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षं शिस्तीत रियाज केला असेल. `कबीराने मला शास्त्रीय संगीताच्या पलीकडे पाहायला शिकवलं. संगीताच्या खळाळत्या प्रवाहाची त्याने मला ओळख करून दिली. एक मित्र म्हणून नीरजशी जोडलं जाताना मी कधीच विचार केला नव्हता की कबीर माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग बनेल`, मुकुंद सांगतो. 

नीरज आणि मुकुंदने एकत्र केलेले कार्यक्रम लोकांना आवडू लागले होते. एका जाहिरात कंपनीत क्रिएटिव डायरेक्टर असणाऱ्या रमन अय्यरनेही त्यांचे काही विडियो पाहिले होते. तो नीरजला भेटायचं ठरवतच होता. तेवढ्यात २०१५च्या मुंबई कबीर फेस्टिवलचं विडियो शूट करताना बोरिवलीत त्याला हे दोघे परफॉर्म करताना दिसले. तो त्यांना भेटला आणि त्यांचाच झाला. रमन सांगतो, `मी लहानपणी मैसूरच्या रामकृष्ण मिशनमध्ये शास्त्रीय संगीत शिकलो होतो. मी मेंडोलिन मात्र स्वतःहूनच शिकलो. हे वेगळं वाद्य नीरजला खूप आवडलं आणि दुसऱ्या दिवशी मीही त्यांच्याबरोबर स्टेजवर होतो. कबीर हा काही फावल्या वेळेचा छंद असू शकत नाही, हे मला जाणवू लागलं. मी नोकरी सोडून पूर्णवेळ हेच करू लागलो.`

ड्रमर विरेन सोलंकी या सगळ्यांमध्ये वयाने सगळ्यात लहान. तो मुंबईचाच. त्याचे वडील गुजराती लोककलाकार. घर कबीरपंथी. तो सांगतो, `कबीर मी लहानपणापासून ऐकलेले. पण वांद्र्याच्या कार्टर रोडवर फिरताना या तिघांना गाताना ऐकलं तेव्हा मला माझ्या पिढीचा कबीर भेटला. मी आठ वर्षं वयाचा असल्यापासून तबला शिकतोय. उस्ताद झाकीर हुसेन आणि उस्ताद तौफिक कुरेशी यांचा मी शिष्य. मी ड्रमर बनून या तिघांशी जोडलो गेलो. माझं शिक्षणही अर्धवट राहिलं. पण माझी ओढ इतकी होती की त्यासाठी माझे घरचेही तयार झाले.` विरेन जोडला गेल्यानंतर रमनने बँड म्हणून ओळख उभी करण्याची सूचना केली. ती सगळ्यांनाच आवडली. त्याचा आग्रह होता की त्याचं नाव असावं, नीरज आर्याज् कबीर कॅफे. 

रमन सांगतो, `कॅफे अशी जागा असते, तिथे कुणी वर नसतो आणि कुणी खाली नसतं. तिथे सगळे समान पातळीवर असतात. तिथे कुणीही येऊ शकतं आणि मनमोकळा संवाद होऊ शकतो. इथे आम्ही आमच्या संगीतातून कबीरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. कबीर ज्या सर्वसमावेशकतेचं तत्त्वज्ञान सांगतो त्याचं कॅफे हे प्रतीक आहे, म्हणून कबीर कॅफे. आणि आम्ही जर प्रामाणिकपणा, सचोटीविषयी बोलत असू तर आम्ही नीरजला त्याचं श्रेय द्यायला हवं. तो आमचा मुख्य गायक आहेच. आमच्या बँडचा कणाच आहे तो. शिवाय आता लोकप्रिय असलेल्या `कबीर रॉक` या प्रकाराची सुरुवात त्याने केलेली आहे,  हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आम्ही नीरज आर्याज कबीर कॅफे आहोत`

रूढ अर्थाने आता बँड पूर्ण झाला होता. पण या चार जणांना एकत्र आणणाऱ्या कबीरांच्या मनात काही वेगळंच असावं. नेहमी दिवसाच्या मानधनावर येणाऱ्या बास गिटार वाजवणाऱ्याने त्यांना अचानक टांग दिली. साऊंड इंजिनियर जॉन्स्टन डिसोजांनी ब्रिटो केसीशी त्यांना जोडून दिलं. पहिल्याच दिवशी डोळे मिटून मन ओतून बास वाजवणारा ब्रिटो त्यांना आपला वाटला. ब्रिटो सांगतो, `मी आठ वर्षं पुण्यात संगीत शिकवत होतो. मला माझा रस्ता सापडत नाही, असंच सतत वाटत राहायचं. माझे वडील मणिपूरला शिलाँगमध्ये एका रॉक बँडमध्ये गिटार वाजवायचे. तो वारसा पुढे चालवण्यासाठी मी मुंबईत आलो. मी संगीतामुळे यांच्याशी जोडलो गेलो. आता मला कबीर माझा वाटू लागलाय.`  हे पाचही जण मुंबईत एकत्र गातात, खातात, हुंदडतात, सिनेमे बघतात. हे सगळं करताना बोलतात कबीरांविषयी. 

गेली तीन वर्षं कबीर कॅफे थांबलेला नाही. देशभर त्यांचे कार्यक्रम होत असतात. आता परदेशातही त्यांचे कार्यक्रम होतात. तरीही आम्ही फक्त कबीर गाणार, असं ते ठणकावून सांगतात. हा निओ फ्युजन रॉक बँड तरुणांना चिरतरुण कबीरांशी गाठ घालून देतो. कबीराचं पंधऱाव्या शतकातलं गाणं आज एकविसाव्या शतकातल्या संगीतातून सांगणं हा प्रयोग म्हणूनच मोलाचा ठरतो. नवतेतून परंपरा मांडण्याची ही त्यांची खास मोकळी शैली आहे. माळवा लोककला प्रकारातल्या कबीर गायनाला त्यांनी रॉक, पॉप, रेग, फ्युजन यांचा नवा साज चढवला आहे. नीरज टाहो फोडून गात असतो. रमन मेंडोलिन वाजवताना गरज पडेल तेव्हा तेव्हा श्रोत्यांशी संवाद साधत असतो. मुकुंद वायोलिनच्या सुरांवर मस्तमौला बनून नाचतो. विरेन ड्रमच्या तालावर श्रोत्यांवर डोलायला लावतो. ब्रिटो सर्वात शांत. त्याचं धीरगंभीर आवाजातलं बास गिटारवरचं सोलो गाणं बँडचा वेगळेपणा दाखवून देतं. इथे बँड म्हणजे धांगडधिंगा आहेच. श्रोत्यांना गाण्याबरोबर मनसोक्त नाचायला लावणं आहेच. पण नाचता नाचता विचार करायला लावणं, हे कबीर कॅफेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. 

नीरज म्हणतो कबीर आमच्या सोबतच आहे, `कबीर आमच्यासाठी आध्यात्मिक संत नाही. त्याच्या मनात आहे ते बोलण्याची हिंमत असलेला तो एक साधा माणूस आहे. तो आमच्या बँडचा पहिला सदस्य आहे. त्याच्यामुळेच आम्ही जोडलेलो आहोत. लोक आमच्यावर टीकाही करतात. तेव्हाही कबीर आमच्या पाठिशी ठामपणे उभा असतो. तो पंधराव्या शतकात जितका रिलेवंट होता, आता त्याहीपेक्षा जास्त आहे. आम्ही स्वतःला संगीतकार मानतच नाही. संगीत हे आमच्यासाठी फक्त माध्यम आहे. आम्हाला त्यातून कबीराची कविता आणि विचारांचा वारसा आमच्या पिढीपर्यंत पोहोचवायचाय.` मन लागो मेरो यार फकिरी में, चदरियां झिनी रे झिनी, हल्के गाडी हाको, होशियार रहना, सुनता नहीं धून की खबर अशी त्यांची गाणी आता मोबाइलची रिंग बनेपर्यंत लोकप्रिय झालीत. 

`पंचरंग` हा कबीर कॅफेचा अल्बम नुकताच लॉन्च झालाय. त्यात त्यांची नवी जुनी अकरा गाणी आहेत. `हा आमच्या प्रवासाचा एक टप्पा आहे फक्त. यश अपयश असं आम्ही काही मानत नाही. आम्हाला सोबत राहायचंय आणि त्यातून कबीर जास्तीत जास्त समजून घ्यायचाय`, रमन सांगतो. यशाच्या मागे न लागता ही तिशीच्या आतली पोरं फकिरीत मस्त आहेत. तरीही रूढ अर्थाने ज्याला यश म्हणतात, तेही खूप मिळवत आहेत. युरोपचा दौरा आटपून आजच्या घडीला ती अमेरिकेत गात आहेत. त्यांना घाई नाही. त्यामुळे लोकप्रियतेसाठी तडजोडी करायची त्यांना गरज वाटत नाही. ते मस्तीत गातात. मस्तीत नाचतात. ते नव्या जुन्या पिढीला आवडतंय. भारतीय परंपरेतल्या सर्वसमावेशक परंपरेला नव्या युगाच्या व्याकरणात बसवून कबीर कॅफेचा अध्याय लिहिला जातोय. ही फक्त सुरुवात आहे. सगळीकडे मोकळ्या आवाजाचा गळा दाबण्यासाठीची लगबग सुरू असताना कबीर कॅफेच्या यशाने अनेक नव्या सांस्कृतिक शक्यतांना जन्म दिलाय. 

3 comments:

  1. छान मांडले आहेस...कलेच्या प्रांगणात होणारे बदल आधी रूचत नाहीत, पण नंतर त्याचीच गोडी वाढत जाते.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सर कबीराबद्दलचा लेख वाचला, तिकडचे रॅप गाणारे आपल्याला धांगडधिंगा करताहेत असं वाटतं. पण त्यांच्या गाण्यातले बोल ऐकले तर ते काय आहे हे आपल्याला कळतं. आजच्या काळात काही सो कॉल्ड रॅपिस्ट आले आहेत. त्यात त्यांची पहिली वहिली आलेली गाणी सोडली तर सगळा भपका आहे त्यामुळे मी याकडे फारसा वळत नाही. पण कबीरांबद्दल वाचून आहे, आदर आहे आणि आदरापलिकडे जाऊन काही मुलं ख-या अर्थाने फकिरी जगताहेत, तीपण भारतातल्या चांगल्या मोठ्या शहरातली यावर विश्वासच बसत नाहिये. खूप हटके आहे हे.

    ReplyDelete