Monday, 29 January 2018

भारत देशा, जय बसवेशा !



आज २९ जानेवारी. गौरी लंकेश यांचा जन्मदिवस. त्यांचा खून होईपर्यंत त्यांचं नाव माहीत नव्हतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर किंवा कॉ. गोविंद पानसरे यांचंही नाव त्यांच्या खुनापर्यंत कर्नाटकात फार कुणाला माहीत असेल असं नाहीच. माझ्यासारख्याला माहीत नाही म्हणून यापैकी कुणाचंच काम कमी महत्त्वाचं ठरत नाही. 


गौरी लंकेश यांच्याविषयी वाचत गेलो. त्यांच्याबरोबर काम केलेल्या लोकांशी बोललो. हादरत राहिलो. मोदीविरोध हे त्यांच्या खुनाचं कारण नाहीच, हे कळत होतंच. मोदींवर टीका झाल्याने मोदीच मोठे होतात. कोणत्याही धर्मवादी नेत्याला पुरोगाम्यांकडून टीका हवीच असते. त्यामुळे त्याचं कारण वेगळं असणार होतंच. गौरी लंकेश यांचा खून लिंगायत धर्ममान्यता आंदोलनामुळे झालाय, हे माझ्यासाठी स्पष्ट होत गेलं. त्या स्वतः लिंगायत. एम. एम. कलबुर्गी सरांनी लिंगायत धर्माची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मांडणी केलीय. ती आता मराठीत पुस्तकरूपानेही आलीय. ती पाहिल्यावर त्यांचा खून कशासाठी झालाय, हे कळत जातं.