आज २९ जानेवारी. गौरी लंकेश यांचा जन्मदिवस. त्यांचा खून
होईपर्यंत त्यांचं नाव माहीत नव्हतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर किंवा कॉ. गोविंद पानसरे
यांचंही नाव त्यांच्या खुनापर्यंत कर्नाटकात फार कुणाला माहीत असेल असं नाहीच.
माझ्यासारख्याला माहीत नाही म्हणून यापैकी कुणाचंच काम कमी महत्त्वाचं ठरत नाही.
गौरी लंकेश यांच्याविषयी वाचत गेलो. त्यांच्याबरोबर काम
केलेल्या लोकांशी बोललो. हादरत राहिलो. मोदीविरोध हे त्यांच्या खुनाचं कारण नाहीच,
हे कळत होतंच. मोदींवर टीका झाल्याने मोदीच मोठे होतात. कोणत्याही धर्मवादी
नेत्याला पुरोगाम्यांकडून टीका हवीच असते. त्यामुळे त्याचं कारण वेगळं असणार
होतंच. गौरी लंकेश यांचा खून लिंगायत धर्ममान्यता आंदोलनामुळे झालाय, हे
माझ्यासाठी स्पष्ट होत गेलं. त्या स्वतः लिंगायत. एम. एम. कलबुर्गी सरांनी लिंगायत
धर्माची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मांडणी केलीय. ती आता मराठीत पुस्तकरूपानेही
आलीय. ती पाहिल्यावर त्यांचा खून कशासाठी झालाय, हे कळत जातं.
संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांच्यामुळे
महाराष्ट्राच्या विचारविश्वाला मिळालेलं लिंगायत विचाराचं अधिष्ठान समजून
घेण्यासाठी वार्षिक रिंगणचा विशेषांक केला. त्यानंतर तर लिंगायत विचारांचं महत्त्व
अधिकच समजत गेलं. गौरी लंकेश लिंगायत चळवळीच्या वैचारिकतेला आधुनिक चेहरा देत
होत्या. त्यांचं व्यक्त होणं धार्मिक कट्टरवाद्यांना अडचणीचंच होतं.
गौरी लंकेश यांचा खून झाला. त्याआधीच्या रविवारीच ३
सप्टेंबरला लातूरमध्ये लिंगायत समाजाच महामोर्चा झाला होता. महाराष्ट्रातला तो
पहिलाच लिंगायत मोर्चा होता. त्यापाठोपाठ सांगली आणि काल २८ जानेवारीला
कोल्हापुरात जंगी मोर्चे झाले. चार महिन्यांपूर्वी दिव्य मराठीच्या रविवार पुरवणीत
लिहिलेला लेख इथे शेअर करतोय.
…
अमित
शहांचा धर्म कोणता?
विकिपिडियात
त्यांच्याविषय़ी माहितीचं पान आहे. त्यात ते जैन बनिया असल्याचा पुसटसा उल्लेख आहे.
मात्र विकिपिडियावरच्याच प्रसिद्ध जैन व्यक्तींच्या यादीत मात्र राजकारण्यांमध्ये
त्यांचा नंबर पहिला आहे. जैन हा हिंदूंपेक्षा वेगळा धर्म आहे, असा निर्वाळा
केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने २०१४ मध्ये दिलाय. आयोगाने जैनांना अल्पसंख्याक
दर्जा दिलाय. त्याचा सरकारी फायदा लाखो जैन घेऊ लागले आहेत.
गंमत
अशीय की अमित शाह जैन असतील तर ते अधिकृत हिंदू नाहीत. त्यामुळे ते धर्माच्या
रकान्यात जैन लिहितात की हिंदू, हे एकदा कुणीतरी तपासून पाहायला हवं. एकतर शाह जैनांना
हिंदू धर्माचाच एक भाग मानत असतील. बौद्ध, जैन, शीख हे हिंदू धर्माचेच संप्रदाय
असल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. पण तसं शाह उघड बोलतील का? संघाच्या विचारांशी प्रामाणिक राहायचं तर जैनांना
अल्पसंख्याक दर्जा आणि त्यातून मिळणारे सरकारी फायदे सोडण्याचं आवाहन करतील का?
दुसरी
शक्यता ही शाह स्वतःला जैनधर्मीय मानत असतील. तर मग ते एका हिंदुत्ववादी पक्षाचे
अध्यक्ष कसे काय बनू शकतात? ते निवडणुकांमध्ये हिंदू म्हणून मतं मागतात. ते नैतिकदृष्ट्या जाऊ दे, राजकीयदृष्ट्या
तरी योग्य आहे का?
जैन धर्म वेद नाकारतो. अमित शाह वेद नाकारतात का? जैन धर्म देवाला मूर्तीरुपात पूजणं या
अर्थाने मूर्तीपूजा नाकारतो. ते अमित शाहांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांना अयोध्येतल्या राममंदिराचा
आग्रह धरता येणार नाही.
अमित
शाहांच्या जैन असण्यात आपल्यापैकी कुणालाच काही अडचण वाटत नाही. ते भाजप या
हिंदुत्ववादी पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कट्टर हिंदुत्ववादी
संघटनेचे अनुयायी असण्यात कुणालाच गैर वाटत नाही. संघानेही जैनांना अल्पसंख्याक
दर्जा देण्याच्या विरोधात मत दिलेलं नाही. एकीकडे श्रीमंत जैनांच्या बाबतीत हा उदार
दृष्टिकोन असणारा भारतीय जनता पक्ष लिंगायतांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता
देण्याच्या मात्र विरोधात आहे. त्यामुळे हिंदू धर्माची एकता धोक्यात येते म्हणे. त्यातून
लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा मुद्दा कर्नाटकच्या विधानसभा
निवडणुकांच्या आधी जोरात तापू लागलाय. भाजपचे कर्नाटकातले मुख्यमंत्रीपदाचे
उमेदवार बी. एस. येदियुरप्पा लिंगायत आहेत. लिंगायतांचंच बोट पकडून भाजपने
कर्नाटकात पाय रोवलेत. आता त्यांचा कोअर समर्थक असलेला लिंगायत स्वतंत्र धर्म
बनवण्याच्या मागणीवरून दोन हिश्श्यांत वाटला गेलाय.
लिंगायत महामोर्चा कोल्हापूर |
या
पार्श्वभूमीवर गेल्या रविवारीच लातूरमध्ये झालेला लिंगायतांचा महामोर्चा
महत्त्वाचा ठरतो. मराठा मोर्चांनी आखून दिलेल्या पॅटर्नवर मोर्चा यशस्वी करणं आता
सोपं वाटत असलं तरी ते सोपं नाही. पहिल्यांदाच एकत्र येणाऱ्या समाजासाठी तर कठीणच
आहे. लिंगायत ही हिंदू धर्मातली एक जात आहे, ही शंभरेक वर्षांच्या प्रचाराने
हाडीमासी घुसलेली धारणा बाजुला सारून स्वतंत्र धार्मिक अस्मितेची तयारी दाखवणं हे
व्यक्तिगत पातळीवरही अवघड आहे. ते स्थित्यंतर सामाजिक पातळीवर घडतंय. वारंवार
प्रयत्न करून गेल्या अर्धशतकात घडलं नव्हतं, ते आता घडतंय. जैनांना स्वतंत्र धर्म
म्हणून संवैधानिक दर्जा मिळाल्याने नव्या ओळखीचा मार्ग पहिल्यांदाच दिसू लागलाय.
यातलं सोशल मीडियाचं योगदानही महत्त्वाचं आहे.
उत्तम
नियोजन असलेल्या या मोर्चातील सहभागाचे वेगवेगळे आकडे छापून आलेले असले तरी किमान
२ लाख लिंगायत जमा झाले होते. फक्त महाराष्ट्रातलेच नाहीत, तर कर्नाटक आणि
तेलंगणामधलेही लिंगायत त्यात आले होते. लिंगायतांचे महत्त्वाचे चाळीसेक धर्मगुरूही
त्यात सहभागी होते. १०२ वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी मोर्चाचं नेतृत्व
केलं. `भारत देशा, जय बसवेशा`, `वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत`, `आम्ही लिंगायत, आमचा धर्म लिंगायत`, `लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म`, `जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय`, `लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता
मिळालीच पाहिजे`, या मोर्चात दिलेल्या घोषणा त्यांच्या
मागण्यांची ओळख होण्यास पुरेसा आहे.
मोर्चातली
विक्रमी गर्दी, त्यातल्या मागण्याचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व यापेक्षाही महत्त्वाचं
आहे की लिंगायत समाज पुन्हा एकदा बसवेश्वरांच्या विचारांच्या जवळ जातोय. नऊ
शतकांपेक्षा जास्त काळ लिंगायतांना बसवेश्वरांपासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्यावर
कितीही जोरात काठी मारली तरी पाणी तुटत नाही. तशी लिंगायतांचं पाणी बसवण्णांच्या
वळणावर जाणार आहेच. कारण मुळात बाराव्या शतकात बसवेश्वरांच्या सोबत शरण बनून जाणं
निखाऱ्यांवर चालण्यापेक्षा कठीण होतं. तरीही त्यांच्यासोबत १ लाख ९६ हजार शरण
होते, असा उल्लेख सापडतो.
बसवण्णा
करुणेचा सागर होते. त्या करुणेनेच ज्वालामुखीपेक्षाही दाहक विचारांना जन्म दिला
होता. ब्राह्मण घरात जन्मल्यामुळे धर्माच्या नावाने साध्या माणसांचं होणारं शोषण ते
पाहत होते. त्यांनी त्या शोषणावर घाव घातला. कळायला लागल्यावर त्यांनी मुंजीला
नकार दिला. बहिणीची मुंज का नाही, हा त्यांचा प्रश्न होता. त्यांनी जातपात नाकारली.
चातुर्वर्ण नाकारला. राजाचे मंत्री असूनही ते अस्पृश्याच्या घरी जेवत. ते कक्कय्या
ढोराला बाप आणि चन्नय्या मांगाला आजोबा म्हणत.
बसवण्णांनी
वेद नाकारले. देऊळ नाकारलं. देवळातली मूर्ती नाकारली. सर्व प्रकारचं कर्मकांडं
नाकारलं. आजच्या विद्रोही कवींना लाजवतील अशी ब्राह्मणांवर टीका करणारी वचनं
लिहिली. स्त्रियांना समतेचा आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. पुनर्विवाहाला संमती
दिली. मासिक पाळीतली शिवाशिव नाकारली. आदर्श संसदेचं मॉडेल ठरावं असा अनुभवमंटप उभारला.
त्याच मंडपात अस्पृश्य हरळय्यांच्या मुलाचं लग् मधुवरस ब्राह्मणाच्या मुलीशी
लावण्यात आलं. त्यामुळे `सैराट` झालं. भडकलेल्या व्यवस्थेने शरणांना
वेचून वेचून ठार केलं.
कर्मठ
ब्राह्मणी व्यवस्थेने जितक्या निर्दयपणे शरणांना मारलं, त्यापेक्षाही अमानुषपणे
बसवण्णांचा बंडखोर विचार संपवण्यासाठी कारस्थान केलं. लिंगायत धर्माला जात बनवलं. वीरशैव
धर्म बसवेश्वरांनी नाही तर पाच आचार्यांनी स्थापन केल्याचं लोकमानसावर बिंबवलं.
आचार्यांच्या द्वारे मठाची साखळी उभारून लिंगायतांमध्ये हिंदूंपेक्षा जास्त सोवळं
आणलं. सर्व प्रकारचे भेदाभेद घुसडले. खर्चिक कर्मकांडांची भर टाकून एकाच जातीच्या
जंगमांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. त्यांनी बसवेश्वरांना नंदीचा अवतार बनवलं.
तर नाथपरंपरेच्या विद्रोहाची परंपरा लिंगायत विचारांपर्यंत आणून ती वचनांमधून
मांडणाऱ्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांना तळ्यातला महादेव बनवलं.
विसाव्या
शतकात बहुजन लिंगायतांची मुलं शिकल्यावर त्यांनी आपल्या खऱ्या बापाचा शोध घ्यायला
सुरुवात केली. लपवून ठेवलेली बसवण्णांची आणि शरणांची वचनं शोधून काढली. मठाधिपती
सांगतात त्यापेक्षा बसवण्णांचा लिंगायत धर्म वेगळाच असल्याचं त्यांना कळू लागलं.
सनातन्यांचं आठशे वर्षांचं कारस्थान उघडं पडू लागलं. त्यांच्यातल्या एका पट्टीच्या
संशोधकाने तर लिंगायतांच्या ब्राह्मणीकरणाचा इतिहास आणि भूगोलच आरशासारखा लख्ख
दाखवायला सुरुवात केली. तुम्ही बदकं नाही, तर राजहंस आहात, हे बसवण्णांच्या
वचनांचा आधार देत लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. व्यवस्थेला या आधुनिक शरणाचं
अस्तित्वही खुपायला लागलं होतं. दोन वर्षांपूर्वी व्यवस्थेने या म्हाताऱ्याला
गोळ्या घालून ठार केलं. त्यांचं नाव होतं डॉ. मल्लेशप्पा कलबुर्गी.
कलबुर्गींची
एक सहकारी होती. देशभरातल्या पुरोगामी विचारांना, कार्यकर्त्यांना आणि संघटनांना
ती बसवण्णांच्या परंपरेशी जोडत होती, लिंगायतांमधल्या नव्या जागराशी जोडत होती. तो
वारसा तिला बसवण्णांवर नाटक लिहिणाऱ्या वडिलांकडून मिळाला होता. व्यवस्थेने तिला
एकटं पाडण्याचे खूप प्रयत्न केले. नक्षलवादी म्हणून बदनाम करण्याचे प्रयत्न केले.
अब्रूनुकसानीचे खटले चालवून तुरुंगात डांबलं. पण ती थांबली नाही. दुकानं सुरू
ठेवण्यासाठी व्यवस्थेला तिला संपवणं भाग होतं. कलबुर्गींसारखं तिलाही दारात गोळ्या
घालून ठार केलं. गौरी लंकेशही कलबुर्गींच्या मार्गाने गेल्या.
गौरी
लंकेश यांचं हौतात्म्य अनाठायी नव्हतं, हे सिद्ध करण्याची जबाबदारी लातूरला गोळा
झालेले लाखो लिंगायतांवर आहेत. ते आता तरी स्वतःला बसवण्णा, कलबुर्गी, गौरी
यांच्या विवेकाशी जोडून घेणार आहेत की वेगळा धर्म झाल्यावरही पोटजाती आणि
सोवळ्याओवळ्यात अडकून राहणार आहेत, यावर ते ठरणार आहेत.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर, खूप छान लिहिलंय...बसवण्णा तर ग्रेटच होते... हे आज कळलंय...
ReplyDeleteकलबुर्गी सर, लिंगायत धर्मातील मूळ समतेचा विचार मांडत होते . पंचाचार्यांच्या वारसदारांना हे खुपत होतं. त्यांचा सरांना विरोध होता . शिवलिंग शिवाचार्य यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात मोठे प्रस्थ आहे, पण त्यांना आधुनिक विचारांची मांडणी करण्यापेक्षा धार्मिक अंगाने बोलण्यात सोय वाटते
ReplyDelete.
SirSalute
Deleteसर, मस्त लिहिलंय. हिंदू धर्मात असे अनेक धर्म लपून राहिलेत असं वाटतंय.
ReplyDeleteखूप छान लिहलं आहे.
ReplyDelete