Friday 1 October 2010

उद्या बापूका बर्थडे

पुस्तकांत काहीही असो. शाळा असो की घर, मला तरी लहानपणी गांधीजींना शिव्या घालायच्या, नाहीतर उगाच टवाळकी करायलाच शिकवलं होतं. पण जसजसा हा माणूस भेटत गेला, तस तसं माझं मत बदलत गेलं. मला आज असं वाटतं, जगात दोनच प्रकारची माणसं आहेत. एक, गांधी ज्यांना पटलाय आणि दुसरा प्रकार गांधी ज्यांना समजलाच नाही.

गेल्या गांधी जयंतीला मी एक लेख लिहिला होता. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याचा. अकाऊंटंट असणा-या रुपेश नावाच्या  एका मित्राने सांगितलं माझा गांधीजींकडे बघायचा दृष्टिकोनच बदललाय. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट होतं. 

गेल्याच आठवड्यात प्रशांत पेडणेकर म्हणाला, गांधीजींविषयी सत्याचे प्रयोग नंतर चांगलं वाचलं तो तुझा गेल्यावर्षीचा लेख. ही स्तुती मनावर घेण्यासारखी नाही, हे मला माहितेय. ती मी एडिट करून घेतलीय. 

मूळ लेख गेल्यावेळेसारखाच कॉपी पेस्ट केलाय. लेखाचं नाव होतं, ब्रँड बापू. 

गोष्ट याच महिन्याच्या आठ तारखेची. अमेरिकेतल्या वेकफिल्ड हायस्कूलमधली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नववीच्या मुलांसोबत बोलत होते. तेवढ्यात लिली उभी राहिली, 'माझं नाव लिली. तुम्हाला कुणाबरोबर डिनर करायला सर्वात जास्त आवडेल? आत्ता जिवंत असलेल्या किंवा नसलेल्यापैकी कुणाबरोबरही...

प्रेसिडंट हसत म्हणाले, 'मला वाटतं ते गांधीजीच असतील. माझे खरे हिरो. पण आमचं डिनर जास्त वेळ चाललं नसतं. कारण ते खूपच कमी जेवत. ' सगळे हसले. इतकं सगळीकडेच छापून आलं. ओबामा त्यापुढे जे बोलले ते खूप छान आहे. 

'मी महात्मा गांधींकडून खूप प्रेरणा घेतलीय. त्यांनीच डॉ. मार्टिन ल्युथर किंगना प्रेरणा दिली. भारतात त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहिंसेचा लढा दिला नसता, तर अमेरिकेतलं मानवी हक्कांचं आंदोलनही तसं नसतं,'  त्यांनी गांधीजींच्या कामाचा अमेरिकेशी असलेला संदर्भ सांगितला. 

'केवळ स्वत:च्या चांगुलपणाच्या बळावर त्यांनी डोंगराएवढं काम करून ठेवलं. सर्वसामान्य लोकांचा स्वत:कडे आणि दुस-यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलून त्यांनी जग बदलून दाखवलं. ज्यांना असं वाटतं होतं की आपण काहीच करू शकत नाही, त्यांच्यातल्या ताकदीची त्यांनाच जाणीव करून दिली. आणि ज्यांना आपल्याकडे प्रचंड सत्ता आहे, असं वाटत होतं, त्यांना याची जाणीव करून दिली की लोकांना नाडणं हा सत्तेचा दुरुपयोग आहे', हा संदर्भ वैश्विक होता. 

'बदल घडवायचेत, क्रांती करायचीय. तर गांधीजींचाच मार्ग हवा. हाणामारीच्या नाहीतर पैशाच्या जोरावर बदल घडवणारे भरपूर असतात. पण आपल्या आत्मशक्तीच्या आणि नैतिक भूमिकेच्या जोरावर बदल घडवणाऱ्यांविषयी मला आस्था आहे. म्हणूनच अशांच्या बरोबर बसून गप्पा मारायला मला खूप आवडतं', डिनर विथ महात्माची ही कारणमीमांसा होती. 

ओबामांनी त्यांच्या ऑफिसातल्या भिंतीवर गांधीजींचा फोटो टांगलाय. त्यांनी लिहून ठेवलंय की हा फोटो त्यांना समाजातले बदल लोकांमधूनच घडतात, राजधानी वॉशिंग्टनमधून नाही, याची आठवण करून देतो. पण गांधीजींच्या भारतात सरकारी भिंतींवरचा गांधींचा फोटो इथल्या पुढाऱ्यांना आणि नोकरशहांना सत्तेच्या ताकदीच्या थिटेपणाची जाणीव नक्कीच करून देत नाहीत. 

हे सगळं आठवण्याचं कारण गांधी जयंती चार दिवसांवर आलीय. मुन्नाभाईच्या शब्दांत सांगायचं तर 'बापू का बर्थडे'. इलेक्शनच्या मोसमामुळे तो यावषीर् मोठ्या उत्सवात साजरा होणार. प्रचाराच्या भाषणांत नेतेलोक गांधीजींच्या आठवणींचा कढ काढणार. आणि शेकडो सकिर्ट कार्यर्कत्यांचा ड्राय डे फुल्टू ओलाचिंब होणार. गांधीजी होते तेव्हापासून आपण अशीच गांधीवादाची कत्तल करत आलोय. 

पण कधीतरी ओबामा. कधी ऍटनबरो. कधी मंडेला. कधी दलाई लामा. कान पिरगळून आपल्याला गांधीजींची आठवण करून देतात. नाहीतर शाळेची पुस्तकं आणि सार्वजनिक भाषणाशिवाय गांधीजींबद्दल फारसं चांगलं बोलण्याची आपल्याकडे पद्धत नाही. गांधीजी जिवंत असताना हिंदुत्ववाद्यांना कोणी विचारलं नाही. म्हणून गांधीजींचा खून करण्यात आला. पण तरीही ते संपले नाहीत. उलट आणखी मोठे आणि आणखी ग्लोबल होत राहिले. हे सगळं नैराश्य विषारी प्रचारात उतरत राहिलं. कसल्या कसल्या शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टी संशोधन म्हणून मांडण्यात आल्या. गांधीजींचा विरोधक म्हणून जिनांसारखा माणूसही यांना आपला वाटू लागला. 

गांधीजींची टिंगळटवाळी करणं सोपं होतं. कारण त्यांच्या पाठिशी ना कोणती जात,  ना प्रांत ना धर्म. मध्यमवर्ग वाढू लागला, तसं हे विषही जाणीवपूर्वक पसरवण्यात आलं. कारण बोलका आणि नवमध्यमवर्गाचं मत निर्माण करणारा वर्ग हाच होता. प्रात:स्मरणात गांधीजींचा तोंडदेखला समावेश करायचा. 'एबीसीडीईएफजी त्यातून निघाले गांधीजी'सारखी बडबडगाणी तयार करायची. आणि 'गांधीजीकी धोती में' सारखे खेळ पसरवायचे. एकटे हिंदुत्ववादीच कशाला, कम्युनिस्ट असतील नाहीतर आंबेडकरवादी, एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. आणि काँग्रेस, त्यांच्या माथी तर सर्वात मोठं पातक आहे. 

आज आपल्या दुर्देवानं खऱ्याखोट्या कोणत्याही अर्थाने गांधीजींच्या फिलॉसॉफीशी जोडणारा पक्ष आपल्यासमोर नाही. काँग्रेस तर नाहीच नाही. नथुरामने बापूंची हत्या एकदाच केली, पण काँग्रेसमधले गांधी टोपी घालणारे आणि तोंडाने गांधीनाम घेणारे काँग्रेसवाले बगलेतल्या सुरीने बापूंची हत्या रोजच करत आलेत. वर लाखो वार झालेला त्यांचा जीर्णविदीर्ण देह पन्नास वर्ष तसाच उघड्यावर ठेवलाय आणि त्याच्या टाळूवरचं लोणी दर निवडणुकांत खात आहेत. 

या काँग्रेसचा गांधींजींशी संबंध नाही. असलाच तर सोनिया आणि राहुल यांच्या आडनावापुरता. गांधीजींचे खरे नातू पणतू आफ्रिकेत नाहीतर मुंबईत रचनात्मक कामात शांतपणे स्वत:ला गुंतवत राहिले आणि गांधी घराण्याच्या नावाने दुसरेच सत्ता भोगत राहिले. नेहरू मोठे होतेच. पण त्यांच्या आणि गांधीजींच्या विचारांतला फरक मोठा होता, हे स्पष्टच आहे. बापूंची फिलॉसॉफी गाव आणि पूर्वेकडे तोंड करून उभी. तर चाचांची थेट त्याच्या उलट महानगरं आणि पश्चिमेकडे तोंड करून. तरीही त्या दोघांमध्ये त्यांना जोडणारा मानवतेचा झरा अखंड वाहत होता. पुढे त्यांच्या नेहरूंच्या वारसांनी हा झरा कसा आटेल याकडेच लक्ष दिलं. त्यातून मग नेहरूंचा वारसा आणि गांधींचा वारसा असा संघर्ष आणीबाणीच्या काळात उभा राहिला. इंदिरा नेहरूंचा वारसा सांगत होत्या तर जयप्रकाश गांधींचा. यातून काहीच निष्पन्न झालं नाही, हे आपलं मोठं दुर्दैव.


एवढं सगळं होत राहिलं तरी बापू नावाचा ब्रँड काही केल्या लोपला नाही. एखादा लगे रहो मुन्नाभाई आला आणि आपण पुन्हा दंग झालो. अगदी मोदींच्या गुजरातलाही आपला ब्रँड ऍबॅसिडर म्हणून गांधीजींचं नाव घ्यावं लागतंय. इकॉनॉमिक टाइम्सने या पंधरा ऑगस्टला एक बातमी केली होती. गांधी हा ब्रँड आजही भारतातल्या सगळ्या ब्रँडचा बाप आहे, असं त्यात साधार सांगितलं होतं. याच्यामागचं कारण शोधताना भारतातल्या टेलिकम्युनिकेशन क्रांतीचे जनक असलेल्या सॅम पित्रोदांच्या एका वाक्यापर्यंत जावं लागतं, 'आय बिलिव गांधी वॉज द मॅन ऑफ इन्फॉमेर्शन एज. ओपननेस, अॅक्सेसेबिलीटी, कनेक्टिविटी, नेटवर्किंग, डेमोक्रॅटायझेशन, डिसेंट्रलायझेशन इज वन हँड गांधीयन ऍण्ड अदर हँड इन्फॉमेर्शन टेक्नॉलॉजी', आणखी काय हवं? आयटी रेवोल्युशन अधिक चांगल्या प्रकारे समजलेला पित्रोदांइतका मोठा माणूस आपल्याकडे दुसरा नाही. 

आता फक्त एक करायला हवं. ते सरकारी भिंतींवरचे बापूजींचे जबरदस्तीने टांगलेले फोटो काढायला हवेत. पाचशेच्या नोटेवरचं गांधीजींचं चित्र काढून टाकायला हवं. त्याने उगाच सरकारचा काहीही संबंध नसताना गांधीजींना सरकारी बनवून टाकलंय. बापू जनतेचे आहेत. आणि सरकारशी जनतेशी काहीच घेणंदेणं नाही. अशी संधी मिळाली तर नव्वद टक्के लोक बापूंचा फोटो सरकारी भिंतींवर ठेवणार नाहीत. मग त्यांनाही कोर्टात सत्यावर होणारे बलात्कार पहावे लागणार नाहीत आणि सरकारी ऑफिसांमधला जनताजनार्दनावरचा अन्यायही असहायपणे बघत राहावा लागणार नाही. मग ओबामांसारखे लोक प्रेमाने ठेवतील त्यांच्या भिंतीवर बापू खुश असतील.

No comments:

Post a Comment