पाऊस येतोय हे इतरांना चातकामुळे कळत असेल, आम्हा मुंबईकरांना नालेसफाईमुळे कळतं. आणि दिवाळी आलीय ते बोनसच्या मोर्च्यांनी. या वाक्यानं जवळपास तेरा चौदा वर्षांपूर्वी मी एका लेखाची सुरुवात केली होती. पण आता बोनसचे मोर्चे निघत नाहीत. पण दिवाळी आलीय हे सांगायला सेल असतात, पोस्त मागणारे असतात. पोस्त या विषयावर गेल्या वर्षीच्या दिवाळीत एक लेख लिहिला होता. मॉसची ती कवर स्टोरी होती. मुंबई टाईम्सच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी अशी मांडणी होती. पण त्यादिवशी खूप एसेमेस आले वाचकांचे. लेख आवडल्याचं खूप जणांनी आवर्जून सांगितलं. दिवाळीत आणखी काय पायजे.
नेहमीसारखा मूळ लेख सोबत जोडलाय. लेखाचं नाव होतं. पोस्तः एक देणं. पहिला पॅरा हा इण्ट्रो आहे त्याचा.
घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत', हे खरंच. पण त्यासाठीची दिलदारी आणि खिसा दोन्ही आपल्याकडे नसतं. पण, दिवाळीचे चार दिवस हे देणा-याचे हात उधार घ्यायला काय हरकत आहे. दिवाळीची पोस्त त्यासाठी तर आहे. अंधार आहे तिथे दिवा उजळायला हवाच, सांगताहेत सचिन परब.
........................
आता पोष्टमन रोज भेटत नाही. एसेमेस, ईमेल, एसटीडी आणि कुरिअरच्या जमान्यात कुणी त्याची वाटही पाहत नाही. 'डाकिया डाक लाया' गाण्यातल्यासारखं आपण त्याच्यावर अवलंबूनही नाही. पूर्वी आपण पोष्ट ऑफिसातल्या बॉक्समध्ये पत्र टाकायला जायचो. आता पोष्टमन आपल्या बिल्डिंगमधल्या तळमजल्यावरच्या बॉक्समध्ये पत्रं टाकतो. त्यामुळे त्याचं पूर्वीसारखं दारावर येणं संपलंय. त्याबरोबर इतिहास घडवणारी आणि इतिहास टिकवणारी पत्रांची एक संस्कृतीही आपण विसरत चाललोय.
पण दिवाळी आली की त्याची आठवण करून द्यायला पोष्टमन दरवाजावर हजर होतो. त्याच्या हातात वही असते. हसत तो हॅप्पी दिवाळी म्हणतो. आपण त्याला पोस्त देतो. आता त्याचा आपल्याला फारसा उपयोग उरलेला नसतो. पण, तरीही त्याचे आपले ऋणानुबंध संपलेले नसतात. त्याने कुणाचं नोकरी लागल्याचं अपॉइण्टमेण्ट लेटर आणून दिलेलं असतं. कुणाचं लव्हलेटर. कुणाला दूरदेशी गेलेल्या सख्याची ख्यालीखुशाली कळवलेली असते. अडीअडचणीला त्याने आणून दिलेली मनीऑर्डरच उपयोगी पडलेली असते. लग्नाची आमंत्रणं त्याच्याकडूनच सग्यासोय-यांपर्यंत पोचलेली असतात. ते करणं त्याचं कामच असतं. त्याचा त्याला पगार मिळत असतो. हे सगळं खरं असलं, तरी त्यातून या सगळ्याचा आनंद पैशांच्या पलीकडे असतो. तो दिवाळीच्या सणाला पोस्तमधून व्यक्त होत असतो.
पोस्त हा शब्द पोष्टमनवरून आल्यासारखं वाटतं खरं. पण पोस्त थोडं वेगळं प्रकरण आहे. पूर्वी गावातले तरणेताठे एकत्र मिळून शिकार करायचे. एकीकडे मोठमोठ्या पातेल्यांमध्ये शिकार शिजायची. मटणाबरोबर खायला भात हवा, नाहीतर भाक-या. त्यासाठी दारादारांत जाऊन धान्य गोळा केलं जायचं. पोस्त मागितली जायची. घरातल्या लक्ष्म्या धान्य द्यायच्या. गावच्या माळावर एकत्र खाणंपिणं व्हायचं. नॉनव्हेज म्हटलं की थोडा गळा ओला व्हायला हवाच. मग पोस्त मस्तपैकी साजरी व्हायची. गावातल्या कुणा बड्या धेंडानं कधी कसली बक्षिसी म्हणून चिरीमिरी नाहीतर दारू दिली, की त्यालाही पोस्तच म्हटलं जायचं. धम्माल करण्यासाठी जमा केलेली वर्गणी म्हणजे पोस्त, असाही त्याला अर्थ आला.
पण या पोस्तला दिवाळी हा शब्द जोडला जातो, तेव्हा त्याचा अर्थ आणखी बदलतो. दिवाळी हा शब्द पोस्तला गावाच्या माळावरून शेतातल्या खळ्यावर घेऊन जातो. दिवाळी जवळ यायला लागली की शेताची कापणी झालेली असायची. खळ्यावर धान्य पोत्यांत भरून तयार व्हायचं. काळ्या आईच्या प्रेमाने गावाचा पोशिंदा असणारा शेतकरी समाधानी असायचा. वर्षभर गावाची सेवा करणारे सुतार, कुंभार, चांभार, महार असे बारा बलुतेदार जमा व्हायचे. ती तेव्हाची गावातली सर्व्हिस इण्डस्ट्रीच होती. शेतकरी प्रत्येकाला धान्यातली त्याची हक्काची वाटणी द्यायचा. मग उरलेलं धान्य बैलगाडीत घालून घरी जायचं.
आता गावांचं गावपण उरलं नाही. कितीतरी गावांची शहरं झालीत. गावांचा पोशिंदा शेतकरी होता. त्याची जागा नोकरदारांनी घेतली. बलुतेदार शेताच्या खळ्यावर यायचे. आता पोष्टमन, वॉचमन, ड्रायव्हर, गुरखा, मोलकरीण, घरगडी, माळी, सफाई कामगार, लिफ्टमन, गॅसवाले, गाडी धुणारे असे नवे अलुतेदार बलुतेदार आपल्या घरी येतात. गाव ते शहर अशा स्थित्यंतराबरोबर दिवाळीची पोस्त देणारे आणि घेणारे बदललेत.
दिवाळी आला की नोकरदारालाही बोनस मिळतो. सरकारी नोकरांना बोनस मिळतो. प्रायव्हेटवाल्यांना मिळतो त्याला इन्सेण्टिव्ह, टार्गेट वेरिएबल पे अशी नावं आहेत. आता बोनस हा अधिकार आहे. चळवळ्यांनी रक्त सांडून तो मिळवलाय. आमच्या कष्टातून कंपनीला फायदा होतो, तर आम्हालाही त्यात वाटा हवाच, असं भांडून बोनस मिळवलाय. त्याआधी हा मालकाच्या खुशीचा मामला होता. फार पूर्वी मालक हा पोसणारा होता. नोकरासाठी सर्वस्व होता. स्वामिनिष्ठा हे समाजमान्य मूल्य होतं. पण औद्योगिक क्रांतीनं त्याचंही रूप बदलवलं. पोसणारा मालक शोषणारा झाला. तेव्हा खुशीची बक्षिसी हा हक्काचा बोनस बनायलाच हवा होता.
पण आपण जसं कुठेतरी काम करत असतो, तसं कुणीतरी आपल्याकडे काम करत असतो. आपण एकीकडे एम्प्लॉयी असतो, दुसरीकडे एम्प्लॉयर. पण एका हाताने बोनस घेताना आपण हसतो. आणि दुसऱ्या हाताने पोस्त देताना तोंड वाकडं करतो. बोनस ऑर्गनाइझड् सेक्टरमधल्या कामगारांसाठी. पण त्यांचं काय, ज्यांचं पोट हातावर आहे? रोज कमवायचं आणि रोज खायचं त्या मजुरांचं काय? ज्यांचा महिन्याचा पगार कसाबसा पुरतो, त्यांनी दिवाळी साजरी करायचीच नाही का? अशा सगळ्यांसाठी पोस्त आहे. पोस्त मिळणा-यांचा तो अधिकार आहे. बोनससारखा तो कायद्याने मिळालेला नाही. पण तो प्रेमाचा अधिकार आहे. जिव्हाळ्याचा आहे.
श्रमाला प्रतिष्ठा देण्याची परंपरा आपल्याकडे नाही. सेवेला फक्त अध्यात्मात मान्यता आहे. वास्तवात नाही. प्लानिंग करणारे ते श्रेष्ठ आणि कष्ट करणारे कनिष्ठ, ही आपली समाजाची उतरंड. मग सेवा करणा-यांना प्रतिष्ठा असण्याची शक्यताच नाही. वर्षभर आपली सेवा करणा-यांना वर्षातून एकदा थोडं उचलून दिलं, तर काय बिघडतं? दिवाळीची पोस्त ही त्या श्रमांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करणं आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यारी छान प्रथा आहे.
आज आपण पोस्तच्या मागे असलेला हा उदात्त दृष्टिकोन विसरलोय. मागणारा अतिरेक करतो आणि देणारा माजोरडेपणा. त्यातून काहीच हाती लागत नाही. उलट दिवाळीच्या सणात ती कटकट होऊन बसते. पण यातला प्रेमाचा धागा तुटू दिला नाही तर संतोषाचा खळाळता झरा आपण नक्कीच अनुभवू शकतो.
देण्यात आनंद आहे. वाटल्याने वाढतं म्हणतात, ते खरं आहे. हसत दिलेल्या पोस्तमधून तो आनंद मिळवता येऊ शकतो. पोस्त ही एक संधी आहे आनंद मिळवण्याची. आपल्या देण्याने कुणाच्या तरी घरी माझ्या घरी दिवे उजळले आहेत, त्याचा आनंद आहेच. पण ज्यांच्या घरी अंधार आहे, त्यांचं घर कुणी प्रकाशमान करायचं? त्यांची जबाबदारीही आपलीच, नाही का?
.
* शं. ना. नवरे, ज्येष्ठ साहित्यिक
आपली कामं रोज करणा-या माणसांचे आभार आपण रोज मानू शकत नाही. आपला ड्रायव्हर वेळेवर येतो. मोलकरीण मनापासून जेवण बनवते. म्हणून आपलं सगळं सुरळीत होत असतं. आपण त्यांचं काही देणं लागतो नाही? दिवाळी आलीय. आम्ही आनंद साजरा करतोय. पण आमच्या आनंदाला तुम्हीही कारणीभूत आहात. तुम्ही आनंद साजरा करा. असं थँक्सगिव्हिंग असतं ही पोस्त म्हणजे. तुम्ही केवळ नोकर नाही. घरातल्या लहान मुलांसाठी नवे कपडे घेतो. बहिणीला भाऊबीज देतो. तशीच तुम्हाला ही पोस्त. तुम्ही माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात म्हणून. अशी आपलेपणाची भावना त्यात असायला हवी.
* विठ्ठल कामत, उद्योजक आणि मॅनेजमेण्ट गुरू
इंग्रजीतला टिप्स हा शब्द. यातली अक्षरं टीआयपीएस म्हणजे टू इन्श्युअर प्रॉम्प्ट सर्विस. भूतकाळातल्या कामाची कदर म्हणून वर्तमानात पोचपावती देणं. त्यातून भविष्यात उत्तम सेवेची खात्री. आपण पोस्त देतो ती माणसं वर्षभर आपल्यासाठी कोणतीही अपेक्षा न बाळगता राबत असतात. त्यामुळे आपण आपल्या कुवतीनुसार आणि त्यांनी केलेल्या कामानुसार काहितरी द्यायला हवं. पैसे किती देतो ते महत्त्वाचं नाही. पण त्यांच्या कष्टाची कदर करणं महत्त्वाचं. म्हणून पोस्त हसतमुखाने द्यायला हवी. त्यांनी कधी दिवाळी साजरी करायची? आपण ज्यांना पोस्त देतो तेही कुणाला तरी पोस्त देतच असतात. ती साखळी सुरू राहयला हवी. माणुसकी म्हणून कर्तव्य आहे ते आपलं.
* डॉ. स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू
पोस्त हवीच. पण घेणा-याने त्याचा अट्टाहास करू नये. देणा-यानेही आनंदाने द्यावे आणि घेणा-याने आनंदानं घ्यावं. कुणीही तोंड वाकडं करू नये. ही पोचपावती असते. पण तो करार नसावा. करार म्हणून दिवाळीला एक पगार एक्स्ट्रा देण्याची भाषा बरी नाही. पैसे हातात देण्याऐवजी त्याच्या मुलाची फी वर्षभर भरली तर? मी पोस्त देण्याऐवजी माझ्या मोलकरणीला रोज एक कप दूध द्यायचं ठरवलं किंवा आजारपणाचा खर्च देण्याचं ठरवलं. मी डॉक्टर आहे म्हणून करू शकले. प्रत्येकाने आपल्यानुसार ते ठरवावं. शाळेतल्या धड्यांत एका पैशात खोली भरणाऱ्या तीन भावांची गोष्ट होती. त्यात एक भाऊ गवताचे भारे आणतो. दुसरा आणखी काहीतरी. तिसरा दिवा आणून उजेडाने खोली भरून टाकतो. तसं आपणही आपला आसमंत प्रकाशाने भरून टाकायला हवा. पोच हे त्याचं एक माध्यम आहे.
No comments:
Post a Comment