Wednesday, 26 October 2011

पैसा सिर्फ पैसा नही है


आज लक्ष्मीपूजन. दिवाळीतला हा दिवस मला लहानपणापासून रिकामा रिकामा वाटत राहिला. म्हणजे नरकचतुर्दशीला कारटं फोडणं. पहिली आंघोळ. पाडव्याला साल मुबारक. भाऊबीजेला ओवाळणं ओवाळणी. पण लक्ष्मीपूजनाला आमच्या घरात काही घडत नसायचं. घरात लश्र्मीची पूजा झालेली मला तरी आठवत नाही. कदाचित घरात पुजण्याइतकी लक्ष्मी नसल्यामुळे असेलही कदाचित. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या काही आठवणी माझ्याकडे तरी नाहीत.

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला भलतीच गोष्ट आठवली. एक जाहिरात. आयएनजी लाईफ इन्शुरन्सची. 'पैसा सिर्फ पैसा नही हैं.' या जाहिरातीशी माझ्या एका कॉलमाच्या आठवणीही जोडलेल्या आहेत. मुंबई टाइम्समधे मीच माझा एक कॉलम सुरू केला होता. 'अॅड्यात्म' नावाचा. नव्या पानांमधे काहीतरी मोटिवेशनल मजकूर हवा होता. म्हटलं आपणच लिहूया. ही कल्पना बरेच दिवस डोक्यात होती. सारंग दर्शने फार पूर्वी काही दिवस मुंटामधेच काही दिवस ताओ ताऊ या टोपणनावाने छोटे छोटे तुकडे लिहायचे. ते डोक्यात होतं. पण हे स्पिकिंग ट्री पेक्षाही वेगळं हवं होतं. अॅड्यात्मला पर्याय नव्हता.

कधीतरी असाच अध्यात्म या शब्दाशी अध्यातमध्यात... अर्ध्यात्म... असं मनातल्या मनात खेळता खेळता अॅड्यात्म या शब्दापर्यंत आलो. नवा शब्द भेटला. मजाच आली. नागडं होऊन युरेका युरेका म्हणत नाचणंच बाकी होतं. टीव्हीवरच्या जाहिरातींनी आजवर आपल्याला खूप काही दिलंय. नवे विचार. वेगळ्या मांडण्या. बरंच काही. टीव्हीवरच्या बातम्या कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच आवडीने बघत आलोय. अशा जाहिरातींविषयी, त्याच्या टॅगलाईन पंचलाईनींविषयी सांगताना अध्यात्म मांडता येईल का? हे शोधायचं होतं. म्हटलं मजा येईल. करून तर बघुया. लोकांचा रिस्पॉन्स नाही आला तर करू बंद. त्यात काय.



पण लिहित राहिलो. तीसेक भाग लिहिले. टीव्ही आणखी डोकं उघडं ठेवून बघू लागलो. नव्या गोष्टी भेटू लागल्या. जुन्या जाहिराती नव्याने भेटत राहिल्या. कॉलम सुरू होण्याआधीच काही गोष्टी नक्की केल्या होत्या. एक सव्वादोनशे शब्दांपेक्षा जास्त लिहायचं नाही. पानात या कॉलमासाठी मोठी जागा द्यायची नाही. टॅगलाईन हीच हेडिंग ठेवावी. कारण लोक त्यामुळे रिलेट करतील. एक छोटा फोटो वापरायचाच. सोपं लिहायचं. बिलकूल कठीण शब्द आणायचा नाही. खोलात जातोय असं वाटलं की विषय सोडून द्यायचा. विषय सर्वांगाने मांडायला हवा असं नाही. फक्त नवे मुद्दे टाकत जायचे. विचार सूचवत जायचं. ज्यांना करायचाय ते करतील विचार. घ्यायचीय ते घेतील प्रेरणा. केलं तर आनंदच, नाही केला तरी वाईट वाटून घ्यायचं नाही.

पण पहिल्या तुकड्यापासूनच वाचकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांनी दखल घेतली याचंच आश्चर्य वाटत राहिलं. मी त्याचवेळेस रविवारी महाराष्ट्र टाइम्समधे 'विंडो सीट' हा कॉलम लिहायचो. आमच्या पत्रकारितेच्या धंद्यातले लोक खूप कौतूक करायचे. पण वाचक मात्र अॅड्यात्म जास्त वाचायचे. अनोळखी लोकांना तेव्हा माझं नाव सांगितलं की विचारायचे ते अॅड्यात्म लिहिता तेच का ते. एकदा दादरला एक जुना मित्र भेटला. त्याने त्याच्यासोबतच्या मित्राला माझी ओळख सांगितली तो अॅड्यात्म लिहितो तोच. हे अनेकदा व्हायचं. अनेकांनी त्याची कात्रणं कापून ठेवलीत. अनेकजण आजही आठवण सांगतात.

यातला पहिला तुकडा आयएनजी लाइफ इन्शुरन्सच्या 'पैसा सिर्फ पैसा नही हैं' या जाहिरातीवर लिहिला. भारतीयांचा पैशाकडे बघायचा दृष्टिकोनच निराळा आहे, असं ती जाहिरात म्हणत होती. खरं तर पैसा या विषयावर श्रीसूक्तापासून अपरिग्रहापर्यंत बरंच काही लिहिता आलं असतं. पण वाचलेलं नको लिहुया म्हटलं. वाटतं ते लिहुया. म्हणून लिहिलं. आता ब्लॉगवर कटपेस्ट करून टाकतोय. खरंतर हा कॉलम इंटरनेट या मीडियासाठीच होता. एका बाजुला जाहिरात बघावी आणि दुसरीकडे माझे त्यावरचे दोन शब्द वाचावेत असं मला वाटत होतं. ते आता मलाही अनुभवता येईल.

पहिल्या तुकड्याचा इण्ट्रो असा होता, अध्यात्म म्हणजे जगायची फिलॉसॉफी. सरावाने ती आपण देवळांमधे आणि धर्मग्रंथांमधे शोधतो. पण तिथे भेटतात धर्माचे सेल्स एक्झिक्युटिव्ज. मग सोळा आणे माकेर्टिंग असणा-या जाहिरातींत अध्यात्म शोधलं, तर काय बिघडतं? हे सांगणारा नवीन कॉलम.




पैशाने सगळं विकत घेता येत नाही,  हा आपला आवडता सुविचार. असं म्हणणा-यांना योग्य दुकानांचे पत्ते ठावूक नसतात,  हे त्यावरचं बहुधा मार्क ट्वेनचं उत्तर. आपले बुरखे फाडणारं. बोलताना, पैशाविषयी हाव नाही, असा आव आणायचा आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्याच मागे लागायचं, हेच आपण आतबाहेर बघत आलेले असतो.

पैशांकडे कसं बघायचं, हा मोठाच तिढा आहे. 'मेरे पास गाडी हैं, बंगला हैं, पैसा हैं. तुम्हारे पास क्या हैं?' हा प्रश्न आपल्याला अगदी मनापासून पटतो. पण आपण टाळ्या देतो, ते मात्र 'मेरे पास मां है'लाच. गरिबीचाच विजय आपल्याला भावतो. अगदी परवाचा 'दीवार' असो, कालचा 'वास्तव' किंवा आजचा 'स्लमडॉग मिलिओनेअर'. पैशांना फार महत्त्व न देता सामाजिक काम करणा-यांकडे आपण आदराने बघतो. पण त्याचवेळेस पैसेवाल्यांबद्दल आपल्याला आकर्षण असतं. या कात्रीत आपण सदैव अडकलेलो असतो.

आपल्या परंपरेनं संपत्तीला नाकारलेलं नाही. एखादा अपवाद वगळला तर सगळेच देव दागदागिन्यांनी मढलेले. पैशाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन ठेवून आम्ही त्याला देव मानलं. नारायण मिळवायचा तर त्यासोबत त्याची बायको म्हणजे लक्ष्मी हवी, असंही मांडलं. हे सगळं बाकीचे त्याला नरकाचे दार म्हणत असताना. पण 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारें वेच करी' हा व्यवहारातला बॅलन्स नीट राखता आला नाही आपल्याला. बाईला देव मानायचं आणि दुसरीकडे तिचं शोषण करायचं. तसंच इथेही झालं. म्हणूनच या देशात पैसा फक्त पैसा नाही, हे जाहिरातीत ऐकलं की आपण थबकतो. आपल्या कॉन्शसला थोडा धक्का बसतो. थोडा विचार करायला हवा यावर.

1 comment: