Wednesday 19 October 2011

वेड्यांचा सत्कार होतो आहे


अचानक ठरवलं आणि परवा चौदा तारखेला अमरावती एक्स्प्रेस पकडली. पंधराला सकाळी अमरावतीला पोहोचलो. अमरावती, मला आवडलेलं खूप छान शहर. निमित्त होतं चंदूभाऊंचा, चंद्रकांत वानखडेंचा एकसष्टीनिमित्त सत्कार. शहरातला सगळ्यात मोठा हॉल तुडुंब भरला होता. अख्ख्या विदर्भातून साधे साधे लोक आले होते. त्यात कार्यकर्तेच खूप. सगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या संघटनांचे. दिवाकर रावते आणि अनंत दीक्षित यांची भाषण सोडून कार्यक्रम अप्रतिम झाला. मायाताई, अमर हबीब, बच्चू कडू आणि चंदूभाऊ अशा सगळ्यांनीच छान भाषणं झाली. जीव लावण्याचाच तो सोहळा होता. समृद्ध करणारा दिवस होता तो.

उद्धव ठाकरे येणार होते. ते येऊ शकले नाहीत. कारण माहीत नाही. पण बरं झालं ते आले नाहीत ते. नाहीतर तुडूंब गर्दीचं श्रेय त्यांना गेलं असतं. चंदूभाऊंसाठी अबालवृद्धांची गर्दी हेवा करणारी होती. आज त्यांच्याकडे रुढार्थाने कोणतंही प्रतिष्ठेचं पद नाही. तरीही लोक आले. लोहचुंबकाने आकर्षून घ्यावं, तशी लोकांची रीघ होती. चंदूभाऊंच्या कृतार्थ आयुष्याची ती पावती होती. एका भणंग कार्यकर्त्यासाठी आणि ध्येयनिष्ठ पत्रकाराला आणखी पाहिजे तरी काय?


कार्यक्रमासाठी मुंबईहून निघताना लेख लिहिला होता. चंदूभाऊंवर लेख लिहायला बसलो. पण चंदूभाऊंविषयी त्यात फार थोडंच लिहिलं. असं असलं तरी सगळा लेख त्यांच्यावरच आहे. नवशक्तित चंदूभाऊंच्या एकसष्टाव्या वाढदिवशीच हा लेख छापून आला होता. मजा आली.

स्टिव जॉब्स. खूप मोठा माणूस. तो गेल्यावर त्याच्याविषयी जगभर खूप लिहून आलं. त्यात आनंद देणारी एक गोष्ट ठळकपणे समोर आली. स्टिव अगदी तरुणपणात भारतात आला होता. त्याच्यासोबत भारतात आलेल्या डॅनिअल कॉट्कच्या काही मुलाखती छापून आल्यात. त्यातून आणि इतरही लेखांतून त्याचा भारताशी ऋणानुबंध पुन्हा अधोरेखित झालाय.

तेव्हा स्टिव अठरा एकोणीस वर्षांचा असेल. सत्तरच्या दशकातले नीम करोडी बाबा हे अध्यात्मिक गुरू खूप प्रसिद्ध होते. बी हिअर नाऊ सारखी त्यांची पुस्तकं गाजत होती. ती वाचून स्टिव आणि डॅनिअल भारावले होते. अध्यात्मिक आनंदाच्या शोधात हे दोन मित्र भारतात पोहोचले. खादीचा सदरा आणि लुंगी घालून ते करोडीबाबांच्या नैनितालजवळच्या आश्रमात पोहोचले. पण बाबांचं देहावसान झालं होतं. मग ते हिप्पींबरोबर हिमालयात फिरले. उलटी जुलाबाने स्टिवला हैराण केलं. त्याचा ट्रॅवलर्स चेकही चोरीला गेला. तो निराश झाला. तो अमेरिकेला परतला. पण त्याची ही भारतभेट वाया गेली नव्हती. त्याला यातून जगण्याचा नवा साक्षात्कार झाला होता. जग सुंदर करण्यासाठी कार्ल मार्क्स आणि नीम करोडी बाबा या दोघांनी मिळून जे केलंय, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त थॉमस अल्वा एडिसन या एका शास्त्रज्ञाने केलंय. यातून नवा स्टिव घडला होता. त्याने नवं जग घडवण्यात आपलं योगदान दिलं.

पण विसावं शतक संपताना शतकातील सर्वात प्रभावशाली माणूस कोण असा प्रश्न टाइम मॅगझिनने स्टिवला विचारला होता. मात्र तेव्हा त्याचं उत्तर एडिसन नव्हतं. ते उत्तर होतं, मोहनदास करमचंद गांधी. आपल्या देशात आज स्टिवचा उदोउदो करणा-या अनेकांना गांधीजींची ऍलर्जी असली तरीही हेच सत्य होतं. विसावं शतक संपतानाच स्टिवने थिंक डिफरण्ट नावाने अपलच्या अठरा जाहिराती केल्या. त्यात सरतं शतक घडवणा-या सतरा जणांवर भाष्य केलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात फक्त दोघेच शास्त्रज्ञ होते. एक एडिसन आणि दुसरा आईनस्टाइन. बाकी बरीचशी कलाकारमंडळी, दोन उद्योजक, दोन विचारवंत लेखक, एक खेळाडू, एक महिला वैमानिक आणि दोन लोकनेते, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि महात्मा गांधी. आता स्टिवच्या जगण्याला वळण लावणा-या एडिसनविषयीच्या साक्षात्काराचा या सतरा जणांच्या त्याच्या निवडीशी मेळ जुळवणं कठीणच आहे.
पण या जाहिरातीत स्टिव्हने लिहिलेलं प्रसिद्ध कोटेशनवर नजर टाकली की थोडा प्रकाश पडतो, ही सगळी वेडी माणसं. बंडखोर. खरं तर उच्छाद घालणारी. चौकोनी चौकटीत न बसणारे गोल प्याले. त्यांनी जग वेगळ्याच नजरेनं बघितलं. नियम चुलीत घातले. त्यांच्या या दृष्टिकोनाला अनेकांनी मूर्खपणाचं ठरवलं. पण आम्हाला त्यात महानपण दिसतं. कारण जग बदलवण्याचा विचार करण्याचा वेडेपणा त्यांच्यात होता. आणि त्यांनी ते करून दाखवलं. ही सगळी माणसं शास्त्रज्ञ नसली तरी ही प्रयोग करणारी माणसं होती. त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रयोग केलेच. असे प्रयोग करणारे इतरही अनेक होते. ते यांच्यापेक्षा यशस्वीही होते. पण हे वेडे त्याच्याही पुढचे होते. ते स्वतःच्या जगण्यावर प्रयोग करत होते.

जगण्यावर प्रयोग कऱणं ही गोष्ट छोटी नाही. मोजून मापून यश नाही मिळवता येत त्यात. यशाच्या व्याख्याच इथे निराळ्या असतात. इडियट रँन्चोंचं हे जग आहे. ही वेडी माणसं स्वतःचं आयुष्य पणाला लावून आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. आपल्या आसपासही असे वेडेपीर असतात. ती नावं एवढी मोठी नसतात. त्यामुळे आपण त्यांची दखल घेत नसतो. तरीही ती पेरतच राहतात. आपल्याला त्यांचं मोठेपण कळत नाही. म्हणून मग स्टिवने निवडलेल्या वेड्यांचं मोठेपणही आपल्याला भिडत नाही. खरंतर स्टिवही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून सुरुवात आपल्या आसपास करायला हवीय. त्याशिवाय गत्यंतर नाही. अशावेळेस अंधारात दिवा दिसावा, अशी एक छोटी सुरुवात दिसते आहे. अमरावतीत आज दुपारी एक सत्कार आहे. कार्यकर्ते, विचारवंत, नेते, लेखक आणि पत्रकार अशी ओळख असलेले चंद्रकांत वानखडे यांना गौरवलं जाणार आहे. विदर्भाच्या कानाकोप-यातले कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते आणि साधी माणसं यासाठी एकत्र आलीत. अकरा जिल्ह्यांच्या वतीने अकरा लाख रुपयांचा निधी कृतज्ञता म्हणून देण्यात येणार आहे. सत्काराचा सोहळा फार जंगी नसेलही, पण त्याचा सांधा आपल्या सगळ्यांच्या आजशी आतून जोडलेला आहे.

आपल्याला आपल्या देशाला शिव्या द्यायला खूप आवडतं. आपल्या स्वातंत्र्यलढ्याने तळागाळात राबणारे हजारो कार्यकर्ते घडवले. पण आपण आपल्या गरिबीबद्दलच बोलत राहिलो. पुढे आणीबाणीविरुद्धच्या लढ्यातून निरलस कार्यकर्त्यांची एक मोठी फौज निर्माण झाली. डोळ्यासमोरच्या ता-यापुढे त्यांना पायाखालचे अंगार काहीच वाटत नव्हते. पण या हजारोंकडे आपण दुर्लक्ष करत होतो. आम्ही त्या क्रांतीचे प्रोडक्ट म्हणून लालू आणि मुलायम यांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडेच पाहत राहिलो. तरीही हे कार्यकर्ते कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवता वातीसारखे जळत होते. आज आपली नवी पिढी नव्या ग्लोबल जगाच्या डोळ्यात डोळे रोखून आव्हानांचा सामना करायला ठाकली आहे. अनंत अडचणी असूनही आपला देश महासत्तेची स्वप्न बघतो आहे. कोणी मानो अथवा न मानो, याचा पाया या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घडवला आहे. ग्रीनकार्डापायी इमान गहाण ठेवणा-या आयआयटीयन्सने हे घडवलेलं नाही. दिसेल ते ओरपणारे पुढारी आणि नोकरशहांचंही यात योगदान नाही आणि स्वतःच्या स्वार्थापुढे आंधळे असणा-या उद्योजकांनाही याचं श्रेय कुणी देऊ नये. प्रामाणिकपणे जन्मभर पेर्ते राहणा-या आंदोलकांची मेहनत आता कुठे उमलू लागली आहे. मागच्या पिढ्यांकडून मिळालेली तत्त्वनिष्ठा त्यांनीच शाबूत ठेवलीय. त्यागाचा मोहोर फक्त या वेड्या झाडांनाच येतो आहे. बंडखोरीचं वाण फक्त त्यांनीच जपलं आहे. मग त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या असतीलही. ते एकमेकांचे वैचारिक शत्रू असतीलही. पण या छोट्या मोठ्या बागांनीच भारतीय समाजातला ऑक्सिजन टिकवला आहे. चंदूभाऊंचा सत्कार त्यांचा एकट्याचा नाही. तो या सगळ्यांचाच आहे.

चंद्रकांत वानखडे. चंदूभाऊ. अमरावतीचेच. एका लग्नात आपल्याशी हसलेली मुलगी दिसू शकेल म्हणून नागपुरात एका शिबिरात पोहोचतात. जयप्रकाश नारायणांच्या तरुण शांती सेनेचं हे शिबिर. तिथे आपल्याच वयाच्या ध्येयवेड्यांची फौज भेटते. सुखाने चाकोरीत चालणा-या आयुष्याविषयी अनेक प्रश्न उभे राहतात. हा एक हुशार विद्यार्थी आपल्या उत्तम करियरवर कायमची फुली मारतो. मग वाचलेल्या, ऐकलेल्या सगळ्या महान तत्त्वज्ञानाची परीक्षा सुरू होते. ते स्वतःच्या जगण्याचे प्रयोग असतात. रुढार्थाने यश नसतंच कुठे. उलट एक भणंगपणा. कुठे एस्टॅब्लिश किंवा प्रतिष्ठित होण्याची चिन्हं दिसली तर त्याची सावलीही पडणार नाही इतकं दूर जायचं. हाच खरा प्रवास. सर्वोदय. आणीबाणीविरुद्धचा लढा. एसेम जोशींसमवेत केलेला देशभर संचार. छात्र युवा संघर्ष वाहिनीत तरुणांचं संघटन. मेटिखेडा या छोट्या खेड्यात राहून ग्रामविकासाचं काम. नंतर शेतकरी संघटनेनं उठवलेलं रान. तिथेही बंड. पुढे पत्रकार आणि संपादक म्हणून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न जगाच्या ऐरणीवर आणण्यात एक खूप मोठं योगदान.

या एकसष्ट वर्षांत केवळ संघर्ष आणि संघर्ष. पण हा स्वतःचा संघर्ष. आपण समाजासाठी काही करतो ही समाजसेवकी भूमिकाच नाही. इथे कुणावर उपकार नाहीत. तर स्वतःच एक समृद्ध आयुष्य जगायचं होतं, त्याची बांधिलकी. अन्याय दिसला की पेटून उठायचं. स्वतःच्या जगण्याशी न्यायाची भूमिका जोडून बघायची, असा हा प्रवास. त्यामुळे इथे यशाची प्रतिष्ठेची समीकरणं असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच आज होणारा सत्कार महत्वाचा आहे. तिथल्या भाषणांमधेही चंदूभाऊ स्वतःला सोलून तपासून बघणार आहेत. आपण सगळ्यांनी तिथे जायला हवं. स्टिवच्या जाण्याने गलबललेल्या प्रत्येकाने तिथे पोहोचायला हवं. 

1 comment:

  1. Admired the style of writing. Sachin takes us along through his words wherever he goes. Congrats!

    ReplyDelete