Friday, 29 June 2012

रिंगणचा पहिला कार्यक्रम

रिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण. 
 
थोडी अधिक माहिती 

डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत 

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे. 

सर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, तुकाराम दर्शन साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, लोकमान्य ते महात्मा मधून इतिहासाची बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


साठसंगत: एक प्रकट चिंतन असं शीर्षक असलेल्या या कार्यक्रमात एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ मोरे सरांची मुलाखत घेतील. या कार्यक्रमात अस्सल वारकरी पद्धतीच्या खेळाचा छोटासा तुकडा सादर होईल. शिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी मोरे सरांच्या एका नाटकाच्या एका तुकड्याचं वाचन करतील. तसेच त्याच्या काही कवितांचंही वाचन होणार आहे.

साठसंगतः एक प्रकट चिंतन
डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत

मुलाखतकारः राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा
दत्ता बाळसराफ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

स्थळः भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे.
दिनांकः १ जुलै २०१२, संध्याकाळी ६ ते ८

No comments:

Post a Comment