Thursday, 14 June 2012

तुझा माझा तुका


काल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.

मला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता. त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.


परवा शुक्रवार. ऑफिसात पोहोचलो. ऑफिसातली माझी एक सहकारी केबिनमधे आली. `तुकारामबघितला,  ती म्हणाली. बरं वाटलं. नवराबायको दोघेही पत्रकार. विशीतले. ऑफिसात पोहोचण्याआधी धावपळ करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला. मराठी सिनेमा असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो. वाटलं, तुकारामांची पुण्याई आहे अजून बक्कळ!

`बॉस, सिनेमा म्हणून आवडला. पण ओळखीचा तुकाराम नाही भेटला’, ती म्हणाली. पुन्हा बरं वाटलं. तुमच्या आमच्या डोक्यात फिट्ट बसलेले तुकोबा नाहीच भेटत सिनेमात. त्यामुळे धक्का बसतोच. बसायलाच हवा. नाही बसला तर वाईट वाटायला हवं. त्यामुळे बरं वाटलं. नव्या सिनेमातला नवा `तुकारामबंडखोर आहे. त्याची बंडखोरी त्याच्या लेकरांपर्यंत पोचूच नये म्हणून शेकडो वर्षं शेकडो बुद्धिवंतांच्या प्रतिभा राबल्यात. तरीही हा `तुकारामआपली अस्सल बंडखोरी घेऊन पुन्हा आलाय. तुम्हाला आम्हाला जागा करतोय. आजुबाजूला सगळं ढेपाळलंय. म्हणून तो जास्तच जवळचा वाटतो. काळजी नको. तुकारामांची पुण्याई आहे अजून बक्कळ!

तुकाराम. डोंगरापेक्षा उंच. आभाळापेक्षा मोठा. त्यांना कवेत घ्यायचं. असा विचार करणंपण अंगात कापरं भरवणारं. हे ये-यागबाळ्याचं कामच नाही. तरीही चाळीशीतल्या कलाकारांनी ती हिंमत दाखवली. नुसती हिंमतच केली नाही. तर शिवधनुष्य मोठय़ा ताकदीनं उचलून दाखवलं. त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मशाल पेटवायचीय, तर हात भाजणार माहीत असूनही निखारा कुणीतरी उचलायलाच हवा ना! दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक अजित आणि प्रशांत दळवी, निर्माते संजय छाब्रिया यांनी मशाल पेटवलीय. पुढच्या पिढय़ा याच्या प्रकाशात चालणार आहेत. हा फक्त सिनेमा नाही. त्यापेक्षाही खूप काही आहे.

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी विष्णूपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी आपल्याला `संत तुकारामदाखवले होते. त्यांना जसे दिसले होते तसे त्यांनी दाखवले. गोड गुबगुबीत. टिळकांसारख्या झुपकेदार मिशीचे. आजही तुकाराम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दिसतात ते विष्णुपंत पागनीसांचेच तुकाराम. तच बाराबंदी. तोच फेटा. तच गळ्यातली वीणा. तुकोबांची जिथे कुठे मूर्ती आहे, चित्र आहे. तिथे पागनीस आहेतच. अगदी देहूच्या गाथा मंदिरातली पाहताक्षणी जीव भरून उरणारी तुकोबांची महामूर्तीही `आधी बीज एकले म्हणत मांडी घालून बसलेल्या पागनीसबुवांचीच वाटते. आजच्या प्रत्यक्षातले, प्रतिमेतले आणि तुमच्या आमच्या डोक्यातले तुकोबा म्हणजे पागनीस, पागनीस आणि पागनीसच!

संत कसे दिसतात, हे आपल्याला माहीत नव्हतंच. ते दाखवलं सिनेमांनीच. त्यामुळे याबाबतीत महाराष्ट्रावर कोणा साहित्यिकाचा, कुणा नाटककाराचा, कुणा नटाचा, कुणा चित्रकाराचा, कुणा इतिहास संशोधकाचा, कुणा सामाजिक विचारवंताचा, कुणा राजकीय नेत्याचा सांस्कृतिक प्रभाव नसेल इतका एका `प्रभात सिनेमा कंपनीचा आहे. ज्ञानेश्वर माऊली कसे दिसत होते? असं म्हटल्यावर आपल्या डोक्यात चित्र उभं राहतं ते चॉकलेट हीरो शाहू मोडकांचंच असतं. आजचे माऊलींचे भक्त मनोभावे चिंतनातही धरत असतील ते कुरळ्या केसांचे, लालचुटूक ओठांचे, गोरेगोमटे शाहू मोडकच. तेच मग आळंदीपासून पंढरीपर्यंत आणि तुमच्या आमच्या देव्हा-यात माऊली म्हणून व्यापून राहतात. पंच्याहत्तर ऐंशी वर्षं या प्रतिमांवर ओरखडाही नाही आलेला.

दिसण्याबिसण्याचं आपण एकवेळ समजू शकतो. पण संतांच्या असण्याचं काय? `संत तुकारामात भेटलेले तुकोबा म्हणजे व्यवहाराचं काडीचंही ज्ञान नसणारा मूर्ख गणपत वाणीच. कुथत कुथत बोलणारा. मेणाहून मऊच काय, तर पार पातळ. कुणीही यावं, टपली मारून जावं. लोकांनी हाडतूड करून बिनकामाचा ठरवलेला मठ्ठ. ते तुकोबांचं कार्टूनच होतं. पागोटं आणि बाराबंदी घातलेला मिस्टर बीनच. कुणीही गाथा आणि थोडंसं डोकं उघडून चार पानं वाचली की ही पागनिसी तुकोबांची प्रतिमा खाडकन तुटून जाते. `वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा’, अशी गर्जना करणारा सिंह तिथे कडकडून भेटतो. `भले तो देऊ गांडीची लंगोटी’, म्हणणारा रोखठोक बंडखोर भेटतो. `देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा’, असं देवाच्या अस्तित्वालाच तोलणारा महान भक्त भेटतो. ओळीओळीत तो खाडकन मुस्काटात मारून जागं करतो. पण आपल्यासारखी साधीसुधी माणसं कशाला तो खराखुरा तुकोबा शोधायला जातो? कष्ट न करता भेटणारा तुकोबा तोच असतो प्रभातच्या सिनेमातला. शाळेच्या पुस्तकांत, नाटकांत सिनेमांत, गोष्टी कादंबरीत तोच भेटत राहतो. शेकडय़ातल्या नव्व्याण्णवांच्या डोक्यात गच्च शिरून बसतो तोच जुना तुकोबा. या पंच्याहत्तर वर्षांत तुकाराम नव्याने मांडला गेला नाही का? नक्कीच मांडला गेला. अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनीच नाही तर दि. पु. चित्रे आणि अरुण कोलटकरांसारख्या कवींनीही अस्सल तुकोबा मांडले. पण तो आम लोकांपर्यंत नाही पोहोचला. त्यासाठी एक नवा सिनेमाच हवा होता. हलवून हलवून बळकट केलेला खुंटा उचकटून काढणारा सिनेमा. चंद्रकांत कुलकर्णींचा नवा तुकाराम तसा आहे.

मग दामले फत्तेलालांनी तसा तुकोबा मुद्दामून मांडला का? ’माणूस’, शेजारी सारखे सिनेमे देणारे प्रभातवाले असं करतील वाटत नाही. ती सिनेमाच्या तंत्रात काळाच्या दहा पावलं पुढे असणारी माणसं होती. त्यामुळेच त्यांचा तुकाराम आपल्या डोक्यात इतका पक्का बसला. पण अभ्यासात ती चार पावलं मागेच असावीत. न्यायमूर्ती रानडेंच्या नेतृत्वात प्रार्थना समाजाच्या चर्चांत समोर आलेलं तुकारामांचं तत्त्वज्ञान तेव्हा उपलब्ध होतं. बाबाजी परांजपेंनी लिहिलेलं अस्सल चरित्रही होतं. राजारामशास्त्री भागवतांनी केलेली संतविचारांची नवी मांडणीही खरंतर तेव्हा सहज मिळण्याजोगी होती. पण त्यांना कुडमुडय़ा भाकड कहाण्यांमधलाच तुकोबा मांडावासा वाटला. ज्याच्या त्याच्या काळाचाही प्रभाव आणि मर्यादा माणसांना असतात. तशा त्यांना होत्या. ते त्या तोडू शकले नाहीत. पण त्यामुळे तुमचं आमचं मोठं नुकसान झालं.

`संत तुकाराममधे एक संत मांडायचा प्रयत्न आहे. इथे फक्त `तुकारामआहे. एक आकाशाएवढा मोठा झालेला माणूस आहे. तुझा माझा तुका. घरी आलो की बायकोनं प्रसन्नपणे स्वागत करावं, असं वाटणारा एक साधासुधा माणूस. पण ख-याला खरं म्हणायला न घाबरणारा तरुण. तुमच्याआमच्यातलाच एकजण. पण आपल्या अनुभवांना जागण्याचा प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता असणारा. इथे तो जगद्गुरू आणि संतश्रेष्ठ असण्याचं ओझं डोक्यावर घेतलेलं नाही. त्यामुळे इथे एकही चमत्कार सापडत नाही. दाबून टाकणारी फळ्यावरच्या सुविचारातली भाषा येत नाही. जे काय आहे ते साधंसरळ उलगडत जातं. तुकोबांविषयी पडणा-या प्रश्नांच्या गाठी सुटत जातात. वर्षानुवर्षाची जळमटं बाजुला काढून तुकोबा गळ्यात गळा घालून भेटतात.

ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. असं आजवर कधी झालं नाही. कित्येक महान इतिहासतज्ञांनी ओरडून सांगितलं तरी भालजी पेंढारकरांच्या आणि बाबासाहेब पुरंदरेंचेच छत्रपती शिवराय आपल्या डोक्यातून जात नाहीत. संभाजीराजे म्हटल्यावर आपल्याला `थोरातांची कमळाआणि `रायगडाला जेव्हा जाग येतेयांचीच आठवण होते. अशावेळेस सदानंद मोरे, आ. ह. साळुंखे, भालचंद्र नेमाडे अशा तुकोबांच्या विचारांची आणि व्यक्तित्वाची नव्याने मांडणी करणा-या अभ्यासकांची बोटं पकडून एखादा सिनेमा येतो, ही गोष्ट मोठी आहे. कितीही महत्त्वाची असली तरी जाडजूड पुस्तकं, प्राध्यापकांचे सेमिनार आणि अभ्यासकांच्या पेपराच्या संपादकीय पानांवरच्या चर्चा याच्या पलीकडे कोणतीच नवी मांडणी फार पुढे जाताना दिसत नाही. पारंपरिक प्रभाव आणि प्रतिमांना लोकप्रिय माध्यमांतून लोकप्रिय पद्धतीने आव्हान देण्याचं काम पहिल्यांदाच घडलंय.

प्रपंचापासून पाठ फिरवणारे, टाळकुटे, दैववादी, कर्मापासून पळपुटे अशी संतपरंपरेवर टीका सातत्याने झाली. `संत तुकाराममधून या परंपरेची प्रतिमाही अशीच उभी राहते. त्यावर नवा `तुकाराममुळापासून काट मारतो. यात तुकोबांचे मोठे भाऊ आहे. सावजी. ते देवाच्या शोधात संसारापासून दूर पळणारे संन्यस्त दाखवले आहेत. पण तो संन्यासाचा मार्ग तुकोबांचा नाही. वारकरी संतपरंपरेचाही नाही. हे यात ठळकपणे अधोरेखित केलेलं आहे. तुकोबांचा मार्ग रसरशीत जगण्याचा आहे. अनुभव जगता जगता, संघर्ष करता करता स्वतःला आणि देवाला शोधण्याचा आहे, असं हा सिनेमा सांगतो. बेचाळीसाव्या वर्षी तुकोबांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या पत्नी आवली गरोदर होत्या. शेवटपर्यंत छान आयुष्य जगणारा हा संत आहे, हे कुणीतरी सांगायला हवं होतं. ते इथे आलंय. यात चमत्कार नाहीत. इथे इंद्रायणीत बुडालेली गाथा आपोआप वर येत नाही. इथे वैकुंठातून आलेलं विमानही नाही. पण काही बिघडत नाही. यातलं नाटय़ जराही कमी होत नाही. उलट या चमत्कारांच्या कथांमधला खरा अर्थ समोर येतो. संताजी जननाडे महाराजांसारख्यांना घडवणं हा तुकोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हे समोर येतं. त्यामुळे कुणी पारंपरिक विचारांचे भाविक या सिनेमापासून दूर राहतील, असं वाटायची गरज नाही. हेच सांगणा-या गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या मागे लोक वेडय़ासारखे धावत नव्हते का?

कुणा सालोमालो किंवा मंबाजीबुवांच्या विरोधात तुकोबांचा वैयक्तिक संघर्ष नव्हता. संघर्ष होता तो बिनडोक कर्मकांडांच्या विरोधात होता. माणुसकीशून्य धर्माच्या विरोधात होता. आचरट जातिभिमानाच्या विरोधात होता. हे या सिनेमात स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्याबाबतीत सिनेमा बनवणा-यांच्या मनात कोणातीही शंका नाही. हे या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ मानायला हवं. म्हणूनच यात तुकारामशिष्या बहिणाबाई सिऊरकर मोठय़ा पडद्यावर पहिल्यांदाच भेटतात. क्वचित दोन चार लोकप्रिय अभंग सोडले तर त्यांची दखल घेतलीच जात नाही. सासूच्या जाचाला कंटाळलेल्या संत संखू आपल्याला दहा बाजूंनी वारंवार भेटल्यात. पण जातीने ब्राह्मण असूनही शूद्र गणल्या जाणा-या तुकोबांना गुरू मानलं म्हणून घरातल्यांपासून समाजापर्यंत सगळ्यांनी त्रास दिल्या गेलेल्या बहिणाबाईंना फार जागा मिळत नाही. ब्राह्मण्यविध्वंसक म्हणून प्रसिद्ध असणा-या अश्वघोषाच्या वज्रसूचीच मराठी अभंग अनुवाद करणा-या बहिणाबाईंची महती थोरच. पण त्यांचा मान त्यांना कधीच मिळत नाही. तो इथे मिळालाय. बहिणाबाईंचा वारसा तुकाराम सिनेमा पुढे नेतो. 

तुकोबांचं नाव घेत सरसकट ब्राह्मणांना झोडून काढणा-या कथित बहुजनवाद्यांना हा सिनेमा उत्तर देतो. आज जातीच्या नावाने मोठाच गलबला झालेला आहे. जातीच्या बाहेर बघणं भल्याभल्यांनी सोडून दिलेलं आहे. ज्यांना आदर्श मानावं अशांच्या पायाची माती जातीची असलेली दिसू लागलीय. अशावेळेस तुकोबांमधला बंडखोर मांडणा-या सिनेमाचे सगळे महत्त्वाचे कर्ते जातीने ब्राह्मण असावेत, याचं महत्त्व खूप आहेत. तुकोबांवर सिनेमा काढणा-यांची जात काढावी, यासारखा मूर्खपणा दुसरा नसेल. कारण तुकोबा कुणा एका जातीचे नव्हतेच. तरीही आज जातीत जगाला अडकवून ठेवण्याची यातायात आजूबाजूला सुरू असताना हे सांगण्याचा मूर्खपणा करणं गरजेचं होऊन बसलंय.
आचार्य अत्रेंनी महात्मा फुलेंवर सिनेमा काढला होता. तो चालला नाही. बामणांनी सिनेमा काढला म्हणून बहुजनांनी पाहिला नाही आणि फुलेंवरचा सिनेमा म्हणून ब्राह्मणांनी पाहिला नाही, असं त्याचं विश्लेषण स्वतः अत्रेंनी करून ठेवलंय. बंडखोर तुकाराम मांडताना ही भीती आहेच. कारण बंडखोर आहे म्हणून पारंपरिक बघणार नाहीत आणि तुकाराम आहे म्हणून बंडखोर बघणार नाहीत, असं वाटणं स्वाभाविक आहे. तरीही रिस्क घेऊन चंद्रकांत कुलकर्णी, दळवी बंधू, जीतेंद्र जोशींसारखे कलाकार पुढे आलेत. पण इथे अत्रे खोटे ठरणार आहेत. कारण महाराष्ट्रातलं बंडखोर चैतन्य जिवंत आहे. ते `तुकारामअपयशी होऊ देणार नाही.

याचा अर्थ असाही नाही की सिनेमात काही खटकत नाही. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे त्यातल्या बोलीची ढब. सावजीदादा गाढवं हरवतो तेव्हा भांडायला येणारा कुंभार अस्सल मावळी मराठी बोलतो. तसं बोलणारा तो एकटाच. ती सगळ्यांची भाषा असायला हवी होती. तुकोबांच्या घरातले सगळेजण वेगवेगळ्या हेल असणारं मराठी बोलतात. असं कसं? उमेश आणि गिरीश कुलकर्णींच्या सिनेमातल्या भाषेच्या कामाच्या पार्श्वभूमीवर हे खास जाणवतं. गाव माहीत नसल्यामुळे हे घडतं. बहिणाबाईंची गाय जर्सी आहे. तुकोबांच्या काळात जर्सी गाय नसणार हे उघड आहे. तसंच त्रास देतं सिनेमाचं संगीत. यातली गाणी चांगलीच आहेत. त्यांच्या चालीही छान आहेत. पण त्या अस्सल वारकरी नाहीत. अस्सल `तुकाराममांडणा-यांनी अस्सल वारकरी संगीतही मांडायला हवं होतं. उरस्फोड करणारा धावा ही वारकरी संगीताची खासियत. `देऊळमधल्या `देवा तुला शोधू कुटंया गाण्यात मंगेश धाकडे या तरुण संगीतकाराने याची झलक दाखवली होती. तसं काहीतरी हवं होतं. यातले शिवाजी महाराजही तसे लेचेपेचे आहेत. ते कोणाला खटकू शकेल. पण `मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमधे डोळ्यावर झापडं आलेले आणि घोडय़ावरून डुगूडुगू धावत चमत्कार करणारे शिवराय डोक्यावर घेणा-यांना याबद्दल बोलायचा काहीही अधिकार उरलेला नाही.

4 comments:

  1. योग्य शब्दात मांडले आहे.

    आपली ह्या पोस्टची लिंक खालील पत्त्यावर दिली आहे..
    हरकत नसावी.

    http://durit.wordpress.com/2012/06/20/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/

    ReplyDelete
  2. अगदी अगदी. हेच सगळं दाटून आलं होतं सिनेमा पाहिल्यावर. आपल्याला हवं तेच नेमकं कुणी म्हटलं, की जसं गार-गार वाटतं तसं वाटलं! आभार!
    तुम्ही सिनेमावर लिहा ना, मस्त लिहिता.

    ReplyDelete
  3. Guruchya blogcha bot pakadun ithvar aley. Aata pudhache post vachun comments deinach.

    Cinema mastach.

    ReplyDelete
  4. namaskar apan marmikpane lihile ahe ya cinema vishye anand zala ani apan sadhya " Navakal" che sampadak mhanun karayarat ahat he samajle . bhadakpane batmya yet nasawyat ashi apeksha karu shakto na amhi aplekadun

    ReplyDelete