Thursday 6 September 2012

ठाकरेंचं मूळ कुठलं? प्रबोधनकार नेमकं काय सांगतात?


बुधवारी दिवसभर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचे ट्विट गाजत होते. त्यात ते म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे (राज ठाकरेंचे आजोबा) समग्र वाङ्मय पाचव्या खंडाचे ४५ वे पान पाहा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारनेच हे प्रसिद्ध केले आहे. त्यात ठाकरे घराण्याचा प्रवास इतिहास बिहारमधील मगधपासून भोपाळ ते चित्तोडगड ते मांडवगड ते पुणे असा शोधता येतो.

महाराष्ट्राला आत्मभान देणा-या या महान विचारवंताचं डॉक्युमेंटेशन असणा-या prabodhankar.com  या वेबसाईटचं संपादन, संशोधन मी केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ही साईट आली होती. त्यामुळे अनेक पत्रकार मित्रांनी फोन करून माहिती विचारली. तीन टीवी चॅनलांनी इंटरव्यूही केले. त्यावेळी प्रबोधनकारांच्या झालेल्या थोड्याफार अभ्यासातून या ट्विटकडे बघताना समोर येणारे हे काही मुद्दे इथे मांडतो आहे. राजकारण बाजूला ठेवून निदान आपण तरी याकडे बघायला हवं.

-         - होय महाराष्ट्र सरकारने (महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने) प्रकाशित केलेल्या प्रबोधनकारांच्या समग्र वाङ्मय पाचव्या खंडाच्या पान ४५ वर या विषयाशी संबंध असणारी विधानं आहेत.

-         -  या खंडात प्रबोधनकारांची तीन पुस्तकं आहेत. त्यातील ग्रामण्याचा इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड या पुस्तकातील हा संदर्भ आहे. सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना अत्यंत महत्त्वाचा असा संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जाते. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेकांनी या पुस्तकाचे संदर्भ दिले आहेत, इतकं हे पुस्तक मोलाचं आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९१८ साली एका लेखात जातिभिमानातून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी समाजाची बदनामी केली होती. त्याला प्रबोधनकारांनी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी साधार उत्तर कोदण्डाचा टणत्कार हा ग्रंथ लिहून दिलं. त्याचाच पुढचा भाग म्हणावी अशी मांडणी १९१९ साली छापल्या गेलेल्या ग्रामण्याचा इतिहास या पुस्तकात आहे. ब्राह्मणांमधल्या जातिभिमान्यांनी अन्य जातींना शेकडो वर्षं धर्माच्या नावाने कसे दडपून ठेवले, याचा इतिहास या पुस्तकात आहे. त्या अनुषंगाने विविध जातींचा इतिहास यात आलेला आहे.

-          - त्यात प्रबोधनकार चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाचा इतिहास सांगतात. त्याचाच संदर्भ दिग्विजय सिंग यांनी दिला आहे. पाचव्या खंडाच्या पान ४५ मधील सगळाच्या सगळा मजकूर सोबत जोडलेला आहेच. या पानावरील प्रबोधनकारांच्या म्हणण्याचा गोषवारा असा आहेः मगध देशाचा (आताचा बिहार) राजा महापद्मानंद याच्या त्रासाला कंटाळून सीकेपींची अनेक कुटुंब नेपाळ, काश्मीर तसेच तालभोपाळ येथे स्थलांतरित झाली. तालभोपाळ येथे वसलेल्या सीकेपींच्या ऐशी कुटुंबांनी तिथल्या यवन राजाच्या आश्रयात मोठं यश मिळवलं. त्यातील ठाकरे आडनाव असलेल्या एका वीराने चित्तोडजवळ एक लहानसे संस्थानही स्थापन केले.

-         - अर्थातच हा इतिहास ठाकरे कुटुंबाचा नाही. तर सीकेपी समाजाचा आहे. ठाकरे कुटुंब दिग्विजय सिंग यांन सांगितलेल्या मार्गाने म्हणजे बिहार – भोपाळ – चित्तोड – मांडवगड – पुणे असे महाराष्ट्रात आले. असे प्रबोधनकारांनी फक्त इथेच नाही तर कुठेही म्हटलेलं नाही.

-         - पण सीकेपींचा ज्ञात इतिहासातले सगळ्यात जुने मूळ मगध म्हणजे बिहार इथले असल्याच प्रबोधनकार सांगतात का? तर त्याचं उत्तर होय असंच द्यावं लागेल. काही अभ्यासक हे मूळ काश्मिरात असल्याचं म्हणतात. पण प्रबोधनकारांच्या मते ते बिहारमध्ये आहे. ठाकरे हे सीकेपी असल्यामुळे प्रबोधनकारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे कोणते ना कोणते कधीना कधीचे पूर्वज बिहारमध्ये असावेत.

-         - पण ही गोष्ट नंद साम्राज्याच्या काळातील आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने नंदांना पराभूत करून साम्राज्य स्थापन केलं, हे आपण जाणतोच. मगध येथील हे नंद साम्राज्य इसवीसन पूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकातील आहे. म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, हेदेखील लक्षात ठेवायला हवे.

-         - कायस्थ हे मूळचे महाराष्ट्रातले नाहीत हे सांगायला दिग्विजय सिंग हवेत किंवा प्रबोधनकारांचा संदर्भ द्यायलाच हवा, याची काही गरजच नाही. कायस्थच नाहीत तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जातींच्या मुळांचा शोध घेताना ती महाराष्ट्राबाहेरचीच असल्याचं मांडलं गेलं आहे. त्याला मराठेही अपवाद नाहीत. पण इतिहासाला ब-याच अंशी अज्ञात असलेल्या या काळातली ही मूळं शोधण्यात तथ्यांपेक्षा तर्काचाच आधार जास्त आहे. हे स्वतःला सूर्यवंशी, चंद्रवंशी, रघुवंशी, यदुवंशी वगैरे म्हणवून घेण्यासारखंच आहे. महाराष्ट्रातल्या लोकवस्तीच्या खुणा अगदी पाषाणयुगात वगैरे सापडतात. तरी हजारो वर्षं इथला मोठा भाग दंडकारण्याचा म्हणजेच डोंगरद-या आणि जंगलांनी व्यापलेला होता. त्यामुळे इथली मोठी लोकवस्ती सिंधू - गंगा- यमुना- ब्रह्मपुत्रेच्या किना-यावरील सुपीक भागाच्या तुलनेत नंतरची असली, तर आश्चर्य नाही.

-        -  प्रबोधनकारांनी सांगितलेलं तालभोपाळ आणि दिग्विजय सिंगांनी सांगितलेलं आजचं भोपाळ एकच असल्याची शक्यता दाट आहे. पण मांडवगडचा उल्लेख प्रबोधनकारांनी केलेला नाही. तर तो कोकणातील मंडणगड असा आहे. पुण्याचा उल्लेख मला तरी सापडलेला नाही.

-         -  दिग्विजय सिंग सांगतात प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मयाचा खंड पाचवा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना प्रकाशित झाला. हे मात्र साफ चुकीचं आहे. तो खंड २००४ साली म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रसिद्ध झाला. तेव्हा प्रा. रतनलाल सोनग्रा हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. पण हे साहित्य छापण्याचा निर्णय मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच झाला होता. पहिले चार खंड युतीच्याच काळात छापले गेले. अत्यंत महात्त्वाचा हा पाचवा खंड छापण्याचा निर्णय मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला असावा, असे अनुमान त्यांना प्रबोधनकारांविषयी असलेल्या आदरामुळे करता येते.

-         -  मग इतिहासाला ज्ञात असलेल्या काळातील ठाकरेचं मूळ कुठलं? तर महाराष्ट्रातलंच. प्रबोधनकारांनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात याविषयी सविस्तर लिहिलं आहे. प्रबोधनकारांचा जन्म पनवेल इथला. तिथेच त्यांच्या चार पिढ्या झाल्या. त्यापूर्वी ते रायगड जिल्ह्यातल्या पाली इथले. ठाकरे मूळ पालीचेच. अष्टविनायकांतल्या बल्लाळेश्वराचे पाली ते हेच. हा गणपती मूळ ठाकरेंच्याच घराण्यात होता. तसंच पालीत ठाकरेंच्या नावाची एक मोठी विहीरदेखील आहे. मध्य प्रदेशातल्या कोणत्या तरी पालीचा हवाला देत प्रबोधनकारांना मध्य प्रदेशचं ठरवलं जातं. पण ते चुकीचं आहे. प्रबोधनकार शिक्षणासाठी काही काळ मध्य प्रदेशातल्या देवास येथे होते. तोच त्यांचा मध्य प्रदेशशी संबंध. ठाकरे यांचे एक पूर्वज शिवकाळात मालेगाव सटाणा मार्गावरच्या धोडप या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यावरून ठाकरेंचं मूळ नाव धोडपकर असं पडलं होतं. प्रबोधनकारांच्या वडिलांनी ठाकरे हे आडनाव लावण्यास सुरूवात केली. तसंच पुणे जिल्ह्यातील भोर येथेही ठाकरेंचा वंशपरंपरागत वाडा होता. हे सगळे उल्लेख महाराष्ट्रातलेच आहेत.

-          - हे इतिहासातले उल्लेख झाले. पण वर्तमानातल्या स्थानिक परप्रांतीय वादातून हा राजकीय धुरळा उडाला आहे, तो स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळण्याचा मुद्दा सर्वात आधी ऐरणीवर आणण्याचं काम प्रबोधनकारांनीच केलं. तेही शिवसेनेचा जन्म व्हायच्याही ४५ वर्षं आधी, १९२२ साली. तेव्हा मुंबईत नोक-यांसाठी दाक्षिणात्यांचे लोंढे येण्यास सुरुवात झाली होती. प्रबोधनकारांनी त्याविरुद्ध प्रबोधनमधून तोफ डागलीच. शिवाय या विषयाचा पाठपुरावा करून तेव्हाच्या चीफ सेक्रेटरीकडून सरकारी नोकरीत स्थानिकांनाच प्राधान्य मिळण्याचे लेखी आदेश मिळवले.

प्रबोधनकार समग्र वाङ्मय खंड ५, पान नं. ४५ वरचा हा मजकूर जसाच्या तसा,

।। श्री ।।

ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास

(चांद्रसेनीय कायस्थ प्रभू)

ग्रामण्य पहिले

तालभोपाळचें ग्रामण्य (शालीवाहन * शकापूर्वी ६५६ वर्षे

मगध देशाचा प्रख्यात क्षत्रिय राजा महापद्मानंद हा मोठा धनलोभी असल्यामुलें त्यानें आपल्या प्रजेवर अत्यंत भयंकर जुलूम करुन पैसा उकळविला. स्वत: क्षत्रिय असूनहि त्यानें इतर क्षत्रियांवर पैशांसाठी इतका पराकाष्ठेचा जुलूम केला कीं, पुराणांतरीं त्याला परशुरामाची उपमा दिली आहे. त्याच्या अनन्वित जुलमाला त्रासून हजारों क्षत्रिय वीर आपल्या कुटुंबांसह देशांतरास गेले. त्यावेळीं चाद्रसेनीय कायस्थ प्रभूंचीं बरीचशीं स्थायिक कुटुंबेंहि या प्रसंगीं स्वदेशत्याग करुन बाहेर पडलीं. त्यांपैकीं कित्येक नेपाळांत, कित्येक काश्मिरांत आणि सुमारें ८० कुटुंबें तालभोपाळ येथें येऊन राहिलीं. या वेळीं तेथें जुनाट यावनी सत्ता होती. तेथील अधिकारी यवन खरे, परंतु हिंदु लोकांवर त्यांची दयार्द्रदृष्टी होती. त्या ठिकाणच्या राजकारणी लोकांच्या सलजमसलतीनें हीं ऐंशीं कुटुंबें तेथें वस्ती करुन राहिलीं. ही मंडळी राजकारणांत व बुद्धिमत्तेत चांगली तरबेज आढळल्यामुळें या ठिकाणीं त्यांना लवकरच उत्तम प्रकारचा राजाश्रय मिळाला; आणि महापद्मानंदाच्या जुलमाची स्मृति हळुहळूं या नवीन राजाश्रयाच्या पडद्यामागे अंधुक अंधुक होत गेल्यामुळें या मंडळीनें तालभोपाळास कायमचीच वस्ती केली. परंतु किती झाले तरी गत स्वातंत्र्याचे राजकीय वैभव आणि दर्जा यांचे स्मरण या नवीन सुखावह परंतु परतंत्र स्थित्यंतरांतसुद्धा त्यांच्या मनोवृत्ति अस्वस्थ केल्याशिवाय राहिलें नाहिं. गत वैभव पुनश्च कसें प्राप्त होईल ही त्यांची इच्छा केव्हांहि नष्ट झाली नव्हती आणि त्या दिशेनें त्यांचे प्रयत्न सतत चालूं होते. ''ठाकरे'' या उपनांवाच्या कोणी एका चां.का.प्रभू वीरानें चितोडाजवळ एक लहानसें संस्थानही स्थापन केलें. यवनी राज्यकर्त्यांचा लोभ संपादन करुन कोणी जहागीरदार झाले, कोणी सरदार झाले, तर कोणाला लेखनवृत्तीवरच निर्वाह करावा लागला. त्यावेळीं बलदेवजी प्रभु व हरिलालजी प्रभु हे दोन गृहस्थ मोठे प्रसिद्ध असून या जातिचे पुढारी होते. राजदरबारांत त्यांचें वजन व मानमरातब मोठा होता. तथापि गतवैभवाच्या तोडीचे याहिपेक्षां उच्च असें राजकीय क्षेत्रांतील स्थान पुनरपि आपणांस प्राप्त व्हावें, याकरितां त्या देवभोळयांनीं आपल्या कुलगुरुंच्या हस्तें एक अनुष्ठान करण्यास सुरवात केली.


प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं साहित्य आणि कर्तृत्व यांचं समग्र डॉक्युमेंटेशन करणारी ही वेबसाइट दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याकाळात ५३ देशांमधील जवळपास चार लाख लोकांनी या साईटला भेट दिली. सध्या या साईटमधील त्रुटी दूर करून रिलाँचिंग कऱण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी १७ सप्टेंबर २०१२ रोजी प्रबोधनकारांच्या जयंतीच्या निमित्त नव्या डिझाइनमधील अधिक सोपी आणि अपडेटेड साइट वाचकांसमोर येईल. त्यानिमित्त दादर, कबुतरखाना येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे आजही प्रबोधनकार महत्त्वाचे का? ’ य़ा विषयावरील व्याख्यान आयोजित कऱण्यात आले आहे.

3 comments:

  1. प्रिय सचिन,

    वसुनिष्ठतेचं वावडं असणा-या आणि सोयीस्कर अर्थ काढण्याच्या वृत्तीमुळे (हे अगदी ठाकरे मंडळींनाही लागू आहे) असे अर्थाचे अनर्थ घडतायत. म्हणूनच तुमचं स्पष्टीकरण महत्त्वाचं. नाही तरी एकदा मूळावरच घाव (किंवा मूळाचा ठाव) घ्यायचा म्हटलं तर आर्यानार्य सिद्धांताला (हाही पूर्णत: सिद्ध झालेला नाही) गाठीशी घेऊन सगळ्याच तथाकथित उच्च जातींना 'बाहेरचं' ठरवलं जातंच. त्यामुळे हा आप'पर' भाव आमच्या राष्ट्रीय व महाराष्ट्रीय मानसिकतेत अधेमधे उफाळतोच.

    प्रसन्न जोशी

    ReplyDelete
  2. मा.सचिनजी...छान आपण कमीत कमी नेमकी भूमिका मांडण्यासाठी तरी पुढे आलात..आपले अभिनंदन....मला एक गोष्ठ यातून खटकते की. ठाकरे कुटुंबाची नाळ बिहारची नाही किंवा आहे असे ठामठेक कोण सांगू शकतो..दिग्गीराजाची नाळ महाराष्ट्राची आहे व तो मराठा आहे...पण मला वाटते बिहारची नाळ असली तरी कुठे बिघडते..ते मूळनिवासीच आहेत ना..मुळचा ढाचा कधी गळून पडतो..हे पिढयामध्ये कळत नाही...राज ठाकरेंची तरी प्रबोधनकारांच्यचा विचाराशी कुठे नाळ आहे..बाळासाहेबांची तरी कुठय हा एका पिढीतला फरक..मग सत्य कबूल केले की सगळे प्रश्न सुटतात...प्रबोधनकारांच्या विचाराच्या विरोधात दुसरी पिढी उभी राहिली...घरातील...बिहार कनेक्शन तर तकर् व इतिहासाचा विषय आहे...जगातील पहिले विद्यापीठ नालंदा बिहारात आहे..मगध..चा राजा..फरक काय पडतो.....

    ReplyDelete
  3. सर काही वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला के.सी. मध्ये शिकवत असताना, प्रबोधनकारांवरच सकाळ मध्ये लेख लिहला होता. त्यात असं म्हटलं होतं की प्रबोधनकारांनी आंबेडकरांची मुलाखत घेतली होती. आज दुर्दैवाने तो लेख माझ्याकडे नाही. पण त्यावर अधकि प्रकाश टाकू शकाल का?

    ReplyDelete