नामदेव ढसाळांची तब्येत ढासळल्याचं व्हॉट्सॅपवरून कळत होतं.
आता ती बरी होण्याच्या पलीकडे असल्याचंही कळत होतं. त्या रात्री उशिरापर्यंत
मित्रांशी संपर्कात होतो. सकाळी उठलो आणि एसेमेस बघितला. सगळं अपेक्षित होतं
तरीही आपण एकदम रिकामे झालो आहोत, असं वाटलं.
कॉलेजात असताना `आज दिनांक`मधे असायचो. तेव्हा
नामदेव पहिल्यांदा भेटले. मी आज दिनांकमधे सिनेमा टीव्हीवर लिहायचो. ते तुकडे
नामदेव ‘सत्यता’मधे घ्यायचे. माझ्या लेखांत काहीही संबंध नसताना डेबोनेअरमधले फोटो स्कॅन करून
टाकलेले मी बघितले. मी उडालो. बाकीच्या पानांत नामदेवांचं लिखाण असायचं. ते
काहीतरी वेगळंच होतं. कपिल पाटलांनी त्याच काळात नामदेवांचं ’या सत्तेत जीव रमत नाही’ काढलं होतं. मी
वाचून पुन्हा उडालो. हादरलो. मी त्यांचं मिळवून वाचत राहिलो. बरचसं वाचलं. मी वाचत
राहिलो. बदलत राहिलो. आपल्याकडे बघायचे नवे डोळे देणारा तो अनुभव
होता.