Friday 31 January 2014

सूर्यबाप !

नामदेव ढसाळांची तब्येत ढासळल्याचं व्हॉट्सॅपवरून कळत होतं. आता ती बरी होण्याच्या पलीकडे असल्याचंही कळत होतं. त्या रात्री उशिरापर्यंत मित्रांशी संपर्कात होतो. सकाळी उठलो आणि एसेमेस बघितला. सगळं अपेक्षित होतं तरीही आपण एकदम रिकामे झालो आहोत, असं वाटलं.
कॉलेजात असताना `आज दिनांक`मधे असायचो. तेव्हा नामदेव पहिल्यांदा भेटले. मी आज दिनांकमधे सिनेमा टीव्हीवर लिहायचो. ते तुकडे नामदेव सत्यतामधे घ्यायचे. माझ्या लेखांत काहीही संबंध नसताना डेबोनेअरमधले फोटो स्कॅन करून टाकलेले मी बघितले. मी उडालो. बाकीच्या पानांत नामदेवांचं लिखाण असायचं. ते काहीतरी वेगळंच होतं. कपिल पाटलांनी त्याच काळात नामदेवांचं या सत्तेत जीव रमत नाही काढलं होतं. मी वाचून पुन्हा उडालो. हादरलो. मी त्यांचं मिळवून वाचत राहिलो. बरचसं वाचलं. मी वाचत राहिलो. बदलत राहिलो. आपल्याकडे बघायचे नवे डोळे देणारा तो अनुभव होता.

सारे काही समष्टीसाठी मी नेमानं वाचायचो. या माणसाचा व्यासंग आणि नवं स्वीकारायची  तयारी बघून दिपून गेलो. सामनामधे लिहिल्यामुळे या मोठ्या ताकदीच्या लिखाणाला न्याय मिळाला नाही. त्यांच्या सगळ्याच गद्य लिखाणाकडे दुर्लक्षच झालं. एक दिवस ते अचानक मंत्रायलात भेटले होते. त्यांनी नवी गाणी लिहिली होती. आमचे एका जुन्या मित्रानं त्याला संगीत दिलं होतं. ते काहीतरी पॉप होतं. शिवाय भीमगीतंही होती. त्यांच्या भल्यामोठ्या गाडीत बसून ते सांगतानाचा त्यांचा उत्साह अजून आठवतोय.
प्रबोधनकार डॉट कॉमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी होते. त्यानिमित्तानं त्यांच्याशी छान गप्पा झाल्या होत्या. गेल्या वर्षी संत चोखामेळा यांच्यावर `रिंगण`चा अंक करायचा होता. नामदेवनी चोखोबांचा मुलगा कर्ममेळांना एका ठिकाणी मराठीतला पहिला विद्रोही कवी म्हटलं होतं. त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्कात होतो. या विषयावर लिहायचं म्हणून ते खूषदेखील झाले. श्रीरंग गायकवाड भेटायलाही जाणार होते. पण अचानक नामदेव हॉस्पिटलमधे दाखल झाले. सगळंच राहून गेलं. यंदा आषाढी एकादशीला रिंगणचा चोखोबांचा अंक काढायलाच हवा.
ते माणूस म्हणून मला असे तुकड्यातुकड्यात भेटले होते. भेटले, ते मस्त मोकळेढाकळे. त्यांचं राजकारण चुकीचं असेल, बरोबरही असेल. पण त्यांनी जोडलेली माणसं कायम त्यांची मित्र राहिली. मला खरं तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी, राजकारणाशी काहीच घेणंदेणं नाही. मला त्यांच्या शब्दांनी बळ दिलंय, हे मला माहितेय. ते माझ्यासाठी पुरेसं आहे. ते गेले त्यादिवशी मी गोवादूतात अग्रलेख लिहिला. तो सोबत कॉपीपेस्ट, नेहमीप्रमाणे. त्यात नामदेवांचा समग्र आढावा वगैरे नाहीच. नामदेव गेल्यावर त्यांचं लिखाण आठवताना काय वाटलं, तेवढं आहे फक्त.

टी. एस. एलियट यांच्या द वेस्ट लँडला कवितासंग्रहाला इंग्रजी कवितेत जे स्थान आहे, ते गोलपीठाया नामदेव ढसाळांच्या कवितासंग्रहाला फक्त मराठीच नाही तर एकूण भारतीय कवितेत आहे. एक दलितच अशी कविता लिहू शकतो. गोलपीठाला कोणतीही वाङ्मयीन पार्श्‍वभूमी नाही. कारण ती सर्व अर्थानं अस्पृश्यअसलेल्या स्रोतांतून उसळून आली आहे. कवितेच्या गालिच्याखाली इतर सगळे जे लपवू पाहत होते, तेच दाखवायचं काम या कवितेनं केलं. या कवितेला आता पंचवीस वर्षं झाली. त्यावरचं हे माझं अत्यंत विचारपूर्ण असं मत आहे. मला अत्यंत ठामपणे हे लिहावंसं वाटतं की नामदेवचं सुरुवातीपासूनचं साहित्य हे नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या तोडीचं आहे. आतापर्यंत्याचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. त्या प्रत्येकावर त्याच्या अद्वितिय जिनियसपणा मोहर आहे. मराठी समीक्षक हे त्याच्या समकालीन लेखकांपेक्षा पंचवीस वर्षं तरी मागे चालत असतात. नुकतेच कुठे ते नामदेवच्या मोठेपणाची दखल घेऊ लागलेत, पण पूर्वग्रह ठेवूनच. हा उतारा आहे, दि. पु. चित्रेंच्या पोएट ऑफ अंडरवर्ल्डया गाजलेल्या इंग्रजी लेखातला. उगाच कुणाचीही स्तुती करतील अशांमधले दि. पु. नाहीत. जगाने दखल घेतलेले ते प्रयोगशील कवी आणि जगभरातल्या साहित्याचे उत्तम भान असणारे समीक्षक. त्यांनी नामदेव ढसाळांची कविता नोबेलच्या तोडीची म्हणावी, याला मोठा अर्थ आहे. 
नोबेल खूपच लांबची गोष्ट राहिली आपण नामदेव ढसाळांना कधी ज्ञानपीठ पुरस्काराच्या चर्चेतही आणू शकलो नाही. त्यांच्या कोणत्याही पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला नाही. त्यातल्या त्यात त्याची भरपाई साहित्य अकादमीने त्यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन केली. देशाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं. तरीही दिपु म्हणतात तसं ढसाळांना त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाइतकं श्रेय कुणी दिलेलं नाही. मुख्य प्रवाहातल्या समीक्षकांना ते कळलेच नाहीत. साजूक तुपातले वाचायचं सवय असणाऱ्या आमच्यासारख्या निर्ढावलेल्या वाचकांना त्यांचा विद्रोह पेलवला नाही. एक कवी आणि विचारवंत म्हणून ढसाळांनी व्यवस्थेला गदागदा हलवलं. मौ, सत्यकथा वगैरेंच्या पांढरपेशी परंपरेला त्यांनी कायमचं बरखास्त करून टाकलं. ज्या गुळगुळीत फरशांवर थोरपणाची रांगोळी घालण्यात मराठी सांस्कृतिक जग रमलं होतं आणि रमूनच राहावं यासाठी प्रयत्न केले जात होते. त्या फरशांच्या चेंदामेंदा करून त्यांच्याखालची अस्सल कसदार मराठी माती पुन्हा एकदा जगासमोर आणणारा हा कवी होता. फक्त इंग्रजी येतं आणि पुस्तकं उपलब्ध असतात म्हणून जगातल्या पुस्तकांविषयी लिहिणारे महान साहित्यि, विचारवंत ठरत होते, असा तो काळ होता. तेव्हा खरोखर जागतिक दर्जाचं साहित्य लिहिणारा हा साहित्यिक होता. 
त्यात धगधगता अंगार होता. त्या विद्रोहात फोलफटं बेचिराख झाली आणि खरं सोनं झळाळून समोर आलं. सूर्यात हात घालून त्याची धग शाईत उतरवण्याची प्रतिभा या महाकवीकडे होती. त्या सूर्यानं आजवर अंधारात असणाऱ्या कोट्यवधी घरांत पहिल्यांदा उजेड पोहोचवला. त्यांच्या दाबून ठेवलेल्या आवाजांना त्या सूर्याने पहिल्यांदा शब्द दिले.
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो
तुमची आयबहीण
आजही विटंबली जाते हाटाहाटातून
मवाल्यासारखे माजलेले
न्मत्त निरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माण्से चौकाचौकांतून...
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
मरेपर्यंत राहायचे का असेच युद्धकैदी?
ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्याही आत्म्याने झिंदाबादची गर्जना केली
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो
आता या शहराशहराला आग लावीत चला!

विद्रोही कवी काय लिहिणार हे दाखवण्यासाठी मुक्तासिनेमात जब्बार पटेलांना ही गोलपीठातली कविता घ्यावी लागली होती. गोलपीठा आणि मुक्तात किमान दोन दशकांचं अंतर. तरीही त्यापेक्षा तरुण काही सापडलं नाही. जोपर्यंत विद्रोह आहे,  मराठी भाषा आहे, तोवर ते तरुणच राहणा. या तरुणाचे शब्द मातीतले होते. त्याची शैली मातीतली होती. 
ढसाळ आपल्या अनुभवांशी इमानदार होते. त्यांमुळे त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा सळ्यांच्या लेखी हा तरुण मूर्ख होता. हा तरुण लिहितो ते अश्‍लील, जातिवादी, हिंसक, असंस्कृत वगैरे वगैरे होतं. पण त्याच मूर्ख तरुणाने डोंगर हलवले. जे विकृत ठरवलं जात होतं, तेच आज महान ठरलं आहे, ठरणार आहे. जगाला दाखवण्यासाठी आधुनिक मराठी भाषेकडे हाच सूर्य आहे. ढसाळांचं निधन झालं म्हणून हा सूर्य अस्त झाला, असं म्हणायचं. पण हा सूर्य संपलेला नाही. जाण्याआधी त्यानं आपलं काम केलेलं आहे. त्याची किरणं मातीला आरपार भेदून लाव्हारसाला आलिंगनं घालत आहेत. त्यातून आजवर अंधारात असणारे नवे निखारे लिहिते झालेत. ते आपल्या सूर्यबापाला आज सलाम करत आहेत.

1 comment:

  1. त्याची किरणं मातीला आरपार भेदून लाव्हारसाला आलिंगनं घालत आहेत.... सुरेख

    ReplyDelete