Friday, 10 January 2014

आपल्या ब्लॉगचं पुस्तक आलंय

गेलं वर्षभर मी माझ्या ब्लॉगला विसरूनच गेलो होतो. माझा ब्लॉग मला सतत हाका मारत होता. जिवाच्या आकांताने बोलावत होता. शर्टाचा कोपरा खेचत आपल्याकडे ओढत होता. पण मी कृतघ्न. त्याने मला इतकं दिलं आतापर्यंत. तरीही मी त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हतो. आता तर त्याने मला आणखी एक गोष्ट दिलीय. नवं पुस्तक. ब्लॉगचं नवं पुस्तक आलंय. त्याचंही नावही हेच माझं आभाळ. आता आणखी कृतघ्नपणा नको.
`मी मराठी`त होतो तोवर ब्लॉगवर खूप लिहिलं. त्यानंतर नवशक्तिला गेलो. तिथे थोडंफार लिहिलं. त्यानंतर बऱ्याच उलथापालथी झाल्या. इथेतिथे बरंच लिहिलं. पण लिहिणं प्रामुख्यानं होत होतं ते श्रीलिपीतून. त्याचं युनिकोडात चांगलं कन्वर्ट होत नव्हतं. कंटाळ्याला नवं कारण मिळालं होतं. पण आता सगळा आळस झटकून ब्लॉगवर नव्या वर्षाची पहिली पोस्ट टाकतो आहे.

नवशक्तित असेपर्यंत तसा नियमित संपर्क होता ब्लॉगशी. अशीच कधीतरी सणकली आणि नवशक्तिची नोकरी सोडली. संपादकांनी मालकांचे तळवे चाटावेत आणि सहकाऱ्यांना लाथा घालाव्यात अशी अपेक्षा असेल तर कसं जमणार?  पण नवशक्तिच्या छोट्या नोकरीच्या काळात खूप शिकलो. काय करावं ते शिकलो आणि काय करायचं नाही ते आणखी पक्कं झालं. नोकऱ्यांच्या बाबतीत मी तसा विचित्रच. लहानपणी अभ्यास करताना उठून टाईमपास करायला लागलो की माझी आजी मालवणीत विचारायची, कुयले लागले का? म्हणजे ढुंगणाला काटे टोचतायत का? मला नोकरीत सगळं चांगलं चाललेलं असताना नेहमी कुयले लागत आलेत. निरनिराळ्या कारणांनी नोकरी सोडलीय. चुकीचं आहे, पण होत आलंय ते असंच.
नवशक्तिनंतर मी नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं. आधी एक डॉक्युमेंटेशनचं काम आलं. `रिंगण`चा संत नामदेव विशेषांक आला. नंतर `न्यूजरूम लाईव्ह` आलं. प्रबोधनकार डॉट कॉमचं रिलॉन्चिंग. `रिंगण`चं पुस्तक `महानामा`. ही हौसेची कामं होत होती आणि पोट भरण्यासाठीची इतरही कामं हातात होती. श्रेय प्रेय दोन्ही उत्तम सुरू होतं. नवी कंपनी रजिस्टर्ड करायची वगैरे प्लान सुरू होते. तेवढ्यात अचानक गोव्यातून एक ऑफर आली. गोवादूत या गोव्यातल्या एका पेपराचा संपादक बनायची ऑफर. ज्योती धोंड आणि सागर अग्नी या पत्रकारांनी चालवलेला पेपर हे ऐकूनच मी मोहोरलो. पत्रकारांच्या पेपरात काम करायचंच. दोन्ही माणसं आवडली. नव्या ठिकाणचा नवा अनुभव घ्यायचा होता. गोव्याला जाण्याचा निर्णय खूप सोपा होता. पण मुंबई सोडण्याचा निर्णय खूप कठीण. मी मुंबईशिवाय स्वतःचा विचारच करू शकत नाही. त्यामुळे निर्णय घेण्यात बराच वेळ गेला. तो घेतला.
२०१३च्या एप्रिलपासून इथे गोव्यात आलोय. बाकीबाब बोरकरांच्या कवितेत वाचलेला चांदणं माहेरा येणारा गोवा. गोवा आमच्यासाठी कधीच परराज्य नव्हताच. माझं मूळ गाव गोव्यापासून दीड दोन तासाच्या अंतरावर. भाषा जवळची. खाणंपिणं, रितीरिवाज खूपच सारखे. आमचे अनेक नातेवाईक पेडण्यापासून म्हापशापर्यंत. त्यामुळे परकं वाटत नाही. माझ्या आळसामुळे इथल्या शांत जगण्याशी लगेच जोडला गेलोय. लिहिणं सुरू आहे. पेपरमधे खेळायला मजा येतेय. त्यापेक्षाही नवं जग समजून घेण्यात धमाल आहे. कुयले लागू नयेत असं एकूण वातावरण आहे. आमेन.
तर, या माझ्या ब्लॉगचं... खरंतर आपल्या ब्लॉगचं, कारण तो माझ्या एकट्याचा उरलाय कुठे, तो आपल्या सगळ्यांचा झालाय... पुस्तक आलंय. माझे ज्येष्ठ मित्र संजय सोनवणी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभे होते. प्रचारासाठी गोव्याला आले होते. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. त्यात ब्लॉगचं पुस्तक करायचं नक्की झालं. हे बरेच दिवस रेंगाळलेलं काम केवळ त्यांच्यामुळे पूर्ण झालंय.
हे लिहायला घेतलं आणि माझ्यासमोर पांढऱ्या गोणीत पॅक केलेलं पुस्तकांचं कुरियर येऊन पडलं. माझं आभाळ. अजून उघडून बघायचंय. त्याचा कोरा वास आत भरून घ्यायचाच. त्याआधी लगेच हे पोस्ट करतोय. मी पुस्तकात `ब्लॉगोटोप` या नावानं लिहिलेलं मनोगत नेहमीसारखं कटपेस्ट करतोय. यापुढे मी सतत ब्लॉग लिहित राहावा, यासाठी तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे. त्या फक्त हव्यातच.

पुस्तकाचे वितरकः भारत बुक हाऊस, पुणे फोन 020 32548032/3 मोबाईल 9850784246
तसं हे माझं पहिलंच पुस्तक. महानामाआधीच आलंय. पण ते संपादन. सगळं मीच लिहिलेलं असं हे पहिलंच. त्यामुळे आधी लेकरू असूनही पुन्हा पहिलटकरणीचा आनंद. हे ब्लॉगचं पुस्तक. त्याचा आणखी आनंद. ब्लॉगवरची माझी पहिली पोस्ट सप्टेंबर २०१०ची. त्यानंतर ब्लॉगवर कधी रोज दोनदा लिहिलं. कधी वर्ष वर्षं थांबलो. पण हा ब्लॉग सतत न थांबता मला समृद्ध करत राहिला. माझी ओळख बनला. तो माझा ब्लॉग नव्या रूपात येतोय. पुस्तक बनून नव्यानं जन्मतोय. नवा अनुभव. नवा नवा आनंद.
ब्लॉगचं नाव, ‘माझं आभाळ’. पेपरांत वगैरे लिहित होतोच. मला माझं स्वतःचं काहीतरी लिहायचं होतं. त्यासाठी ब्लॉग आला. ब्लॉगवर अबाऊट मीच्या रकान्यात मी लिहिलंय, ‘लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज. पॅशन वगैरे. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे मी. माझ्या आभाळात माझ्या लिहिण्याशिवाय काही नव्हतंच?  ठरवलं,  माझ्या लेखांबद्दलच लिहायचं. दुसरं मी लिहिणार तरी काय? ‘मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो? म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्लॉगोटोप.अशी भूमिका बांधली. आणि आभाळात मोकाट हुंदडत राहिलो. माझे लेख आणि त्यावरचं टिपण. कधी छोटं कधी मोठं. माझं लिहिणं कुठून येतं ते शोधायचं होतं माझं मलाच. आधीच ब्लॉगचा फॉर्म खूप खासगी. त्यात विषय माझ्यापुरते. हे प्रकरण जरा जास्तच मोकळंढाकळं झालं. अनपेक्षित आणि जोरदार प्रतिसाद आला. कामाच्या धबडग्यात आनंद साजरा करण्याचं गाव बनलं माझा ब्लॉग माझ्यासाठी. फेसबुकमुळे मजा आणखी पसरली. मित्र कमेंट करू लागले. चर्चा रंगल्या. वाचकांची संख्या वाढली. मोठमोठी माणसं दाद देऊ लागली. फॉलोअर दोस्तलोक जमा झाले. मजाच मजा. 
आता पुस्तक ही आणखी नवी मजा. माझ्या लेखांचं पुस्तक व्हावं असं पहिल्यांदा सांगणारा विठोबा सावंत. सगळ्यात जास्त ब्लॉग लिहिले ते मी मराठीच्या काळात. तो माझ्या आतापर्यंतच्या करियरमधला सगळ्यात आनंदाचा काळ. त्याचं सगळं श्रेय माझा बॉसमित्र रवी तिवारीला. सोबतीला श्रीरंग गायकवाड होताच. तो माझ्या बर्‍याचशा ब्लॉगचा पहिला वाचक आणि फेसबुकावर पहिली कमेंट देणाराही. अमर हबीब, सुनील यावलीकर, पराग पाटील, संजय आवटे आणि संजय सोनवणी अशा सिनियर मित्रांची हौसलाअफजाई होतीच. हे सगळेच या पुस्तकाशी कुठेना कुठे जोडलेले आहेत, हा आणखी आनंद. प्रमोद चुंचूवार आणि सुनील तांबे यांच्या मैत्रीचा आधार सोबतीला होताच. नारायण बांदेकर आणि सुनील कर्णिक ही जाणकार जोडगोळीही मायेने पुस्तकाची विचारपूस करत राहिली. आधी हे पुस्तक माझे ज्येष्ठ मित्र अरविंद पाटकर काढणार होते. त्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.
सगळे सांगत होते पण खरंच पुस्तक करावं का, ठरत नव्हतं. तीनचार वर्षं जुने लेख ब्लॉगवर टाकल्यानंतरही त्याला भरघोस प्रतिसाद मिळत होता. निमित्त जुनी असली, तरी त्यानिमित्ताने त्यावरचं माझं आकलन शिळं झालेलं नाही, हे सुखावणारंच होतं. त्यावरून अनेकजण आपली मतं बनवत होते, बदलत होते. एका पोस्टमुळे आमच्या घरातल्या मार्गशीर्षातल्या गुरुवारांची पूजा बंद झाली. माझ्या एका जवळच्या मित्राने गुढीपाडव्याच्या हिंदूनववर्षाच्या शोभायात्रेत जाणं बंद केलं. सिद्धेश सावंत आणि त्याच्या मित्रांनी दहीहंडीवर डॉक्युमेंट्री बनवली. मी रिंगण’, ‘न्यूजरून लाइवसारया अंकांचे प्रयोग केले. त्याच्या प्रेरणाही याच ब्लॉगमधे आहेत. आपल्या लिखाणामुळे काहीतरी घडतंय यापेक्षा पत्रकारासाठी आनंददायी काहीच नसतं. खरंच.
त्यात अचानक अनिल अवचटांचा मेल आला. अंधारात दिवा दिसावा, तसे तुम्ही दिसलातअसं कौतुक त्यांनी केलं होतं. तेव्हा नक्की केलं. आता उशीर नको. तरीही उशीर झालाच. माझ्यासारखा आळशी माणूस देर आला दुरुस्त आला, हे काय कमी आहे. त्या दुरुस्त येण्याचं श्रेयही माझं नाहीच. ते प्रकाशनाची जबाबदारी उचलणार्‍या संजय सोनवणींचं. साहित्य संमेलन निवडणुकीच्या धबडग्यातही ते न विसरता मागे लागले. म्हणून हे जुळून आलं. सुनील यावलीकरांनी कव्हर प्रेमाने करून दिलंय. तितकाच जिव्हाळा मांडणी करणारे पुष्पराज पोपकर आणि बारकाईने वाचून देणार्‍या शिल्पाताई डोळे यांचाही होता. या आनंदाच्या वेळेस ज्योती धोंड आणि सागर अग्नी यांच्या पाबळाची आठवण काढल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीच. शिवाय बापजाद्यांशी काही संबंध नसलेल्या या धंद्यात वेळोवेळी रिस्क घेताना पाठिशी राहणार्‍या माझ्या घरातल्यांचे तर मोठे उपकारच. या सगळ्यांमुळे पार पडलं सगळं.
कॉलमशिवाय मी क्वचितच लिहिलंय. कॉलमचा दट्ट्या डोक्यावर असल्यामुळेच आळस झक मारत झटकावा लागला. ते कॉलम सुरू करणार्‍या संपादकांचेही उपकारच. सुनील पाटील, अशोक पानवलकर, महेश म्हात्रे, विनायक पात्रुडकर, संजय आवटे ही ती उपकार करणारी मोठी माणसं. शिवाय पत्रकारितेत पहिली संधी देणारे कपिल पाटील, मुकुंद कुळे यांनाही पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने नमस्कार करायला हवा.
हे मुळात पेपरासाठी लिहिलेले लेख. ते ब्लॉगमुळे इंटरनेटवर गेले. बहुसंख्य पोस्ट लिहिलेत ते मी टीव्हीत काम करत असताना. आता ते पुस्तकाच्या रूपाने पुन्हा प्रिंटमधे येताहेत. ही सगळी वेगवेगळ्या मीडियांची खिचडी आहे. मीच नीट थार्‍यावर नसणारा माणूस. इथे तिथे उड्या मारणारा. त्यामुळे हे होणार होतंच. हे होतंय ते चांगलंच होतंय. कारण येणारा जमाना खिचडीचाच आहे. मीडियाचा किंवा आणखी कसलाही संकर हा छानच असतो. फ्युजन होऊ द्यावं. त्याचं स्वागत करावं. त्यात या पुस्तकाचीही भर. आणखी एक आनंदाची गोष्ट. अशाप्रकारे ब्लॉग ते पुस्तक असं थेट माध्यमांतर करणारं हे आपल्या मराठीतलं कदाचित पहिलंच पुस्तक असावं. या सगळ्यामुळे भाषेची, शैलीची, व्याकरणाची, विषयांचीही खिचडी झालीय. तेवढं समजून घ्यावं.
ब्लॉगचं पुस्तक बनवताना काही ब्लॉगची निवड कराची होती. मला आवडलेले, सर्वाधिक वाचले गेलेले, सर्वाधिक कमेंट किंवा चर्चा झालेले लेख निवडले. पुस्तक करताना काही लेखांची नावं बदलली. थोडा मजकूर कमीजास्त केला. निवडलेले लेख विषयानुसार जमतील तसे रांगेत लावले.
या निवडीत काही सूत्र होतं का? खरं तर नाही. पण लेख लिहिताना, ब्लॉग लिहिताना आणि आता पुस्तक करतानाही एक गोष्ट डोक्यात फिट्ट आहे, ती म्हणजे आपली बाजू ही साध्या कष्टकरी माणसाची आहे. खरं तर हा सगळा शोध आहे माझ्या स्वतःचाच. माझी मुळं नेमकी आहेत करी कुठे? मी मराठी आहे, म्हणजे काय आहेमी भारतीय आहे, म्हणजे काय आहे? माझी मराठी भाषा कोणती? माझा काही धर्म आहे का, जात आहे का, देश आहे का? मला माझ्या संस्कृतीचं म्हणून जे दाखवलं जातं त्यातलं माझं खरं काय आहे? रेडीमेड उत्तरं होतीच. सोपीही होती. ती नकोत हा आगह मात्र होता. पांडुरंगशास्त्री आठवले ते प्रबोधनकार ठाकरे, सदानंद मोरे ते अमर हबीब आणि पु. ल. देशपांडे ते भाऊ पाध्ये असे माझ्यावरचे प्रभाव दोन टोकांवरचे. विचित्र वाटतं, पण आहे हे असं आहे. त्यात राहून आपली स्वतःची उत्तरं शोधायचा हा प्रयत्न. या पुस्तकात आहेत ती आज मिळालेली उत्तरं. चुकलीही असतील. बरोबरही असतील. चुकली तर त्यात काय? उद्या दुरुस्त करून घेऊ. शोधाशोध थांबलेली नाही अजून. आणि चुकलेली उत्तरं नाही दुरुस्त झाली तरीही काय बिघडतंय. मला नाही तर आणखी कुणा मित्राला सापडतील. आमचा छोटा रूद्र तर आता फक्त तिसरीत आहे.

सांगायचं संपलंय. फक्त दोन खुलासे उरलेत. मूळ लेख पेपरांमधे लिहिलेले आहेत. त्यापैकी कुणी जर त्याचे कॉपीराईट सांभाळून ठेवले असतील तर ते तसेच शाबूत आहेत. बाकी माझं जे आहे ते मोकळं आहे. कुणालाही त्याचं काय करायचं असेल ते करू शकता. दुसरी गोष्ट आता मी गोव्यातल्या गोवादूतया एका छान पेपराचा संपादक आहे. तिथे जाण्याआधीचं हे लिखाण आहे. या लिखाणाचा गोवादूतला त्रास होऊ नये, हीच कळकळीची विनंती. 

9 comments:

  1. sir...congrats......khup chaan lekhan aahe......
    balasaheb magade
    sub editor, Daily pudhari solapur

    ReplyDelete
  2. सर मस्तच... तुमच्या भाषेत बोलायच तर एकदम झक्कास..
    जय महाराष्ट्र..थेट..अचूक...बिनधास्त..मोठ्या चॅनलचा छोटा पत्रकार..
    ...DHANANजय अ. बंदुके ( तुमचा विद्यार्थी )

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. हार्दिक अभिनंदन!
    बाकी "गोवादूत"ला ह्या लेखनाचा त्रास होऊ नये अशी विनंती तुम्हाला करावी लागते ह्यातच सर्व काही आले!

    ReplyDelete
  5. Dr Sachin Shinde21 March 2014 at 14:11


    पंख लाभलेल्या आभाळाला बेस्टसेलर शुभेच्छा…!

    ReplyDelete
  6. मनाला भिडणारे अतिशय पारदर्शी लेखन करणाऱ्या तुम्हास प्रणाम . लिहित राहून आमचे प्रबोधन
    करीत राहावे ही विनंति.

    ReplyDelete