Friday 24 October 2014

हॅपी दिवाळी



दिवाळी आली की दिवाळी अंक येतात. दिवाळी अंक करणाऱ्यांना दिवाळीची भूणभूण सगळ्यात आधी लागते. मग ते लेखकांच्या मागे भूणभूण करतात. माझ्यासारख्या आळशी माणसाच्या मागे बरीच भूणभूण करावी लागते. यंदा आजारपणामुळे एकाही दिवाळी अंकात लिहिणं जमलं नाही. पण गेल्यावर्षी तीन चार ठिकाणी लिहिलं होतं. यंदाही पाच सहा अंकवाल्यांनी सांगितलं होतं. आमच्या `गोवादूत`च्या अंकातही लेख लिहिता आला नाही.

गेल्या वर्षीच्या `गोवादूता`त लेख लिहिला होता. परिवर्तन की आवर्तन नावाचा. लोकसभा निवडणुकांत काय होणार, असा धांडोळा घेतला होता. मोदी लाटेने एकदम तोंडघशी पाडलं. त्यामुळे ते काही शेअर करत नाही. पण त्याच अंकात एक संपादकीय लिहिलं होतं. फेसबूकवर काय काय हळवं हलकंफुलकं वाचत राहण्याचे दुष्परिणाम काय असतात त्यासाठी हे छोटं संपादकीय वाचायला हरकत नाही.
सगळ्यांना हॅपी दिवाळी...

दिवस संपला की रात्र येणारच. लॉग इन केलं की लॉग आऊट व्हावं लागणारच. भरती आली आणि ओहोटी आली नाही, असं होऊच शकणार नाही. आगे सुख तो पीछे दुख है. बॅटरी कितीही चार्ज केली तरीही डिस्चार्ज होणारच. एक शुक्रवार हीट तर दुसरा फ्लॉप. जगात जशी मॅटर्निटी होम, तशी स्मशानंही. एका डावात सेंच्युरी, दुसऱ्यात क्लीन बोल्ड. कधी ऑन कधी ऑफ. सायबा! जिंदगी अशीच चालू आहे आणि असणार.

यात नवीन काय? कळायला लागल्यापासून आपण सगळेच हे ऐकतो. घरात, शाळेत. कीर्तनात, सिनेमांत. गप्पांत, उपदेशात. गाण्यांत, पुस्तकांत. सलूनमध्ये, दवाखान्यात. सगळ्यांनी सगळीकडे हे ऐकलंय. कमीत कमी हजारदा तरी ऐकतो हे आपण. ऐकतो म्हणजे कळतं असं नसतंच. कळलं म्हणजे वळलं असं तर बिल्कूलच नाही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. उजेडात असताना आपल्याला वाटतं, काळोख कधी नव्हताच. तो कधी येणारही नाही. काळोखात असताना त्यात इतकं बुडून जातो की उजेडावरचा विश्वासच संपतो.

असंच कुठेतरी बुडालेलो असताना कुठूनशी दिवाळी येते. हळूच कानात सांगते, अरे, उजेड आणि काळोख दोघेही माझेच. कुणा एकावर प्रेम कशाला. या दोघांनाही मनापासून स्वीकारा ना! छातीशी बिलगून घ्या. जादू की झप्पी द्या आणि म्हणा त्यांना आय लव्ह यू! बघा, कसे आपले होतील ते. दोघेही तुम्हाला देतील भरभरून. एक आनंद देईल, दुसरा अनुभव. एक उमेद देईल, दुसरा भान.
दिवाळी आपली सांगत असते. सुरकुतलेल्या म्हातारीसारखी. तिच्या त्याच त्या दरवर्षीच्या उजेड आणि काळोखाच्या गोष्टी. पण आपण अडकलेलो असतो भलत्याच धामधुमीत. तिचं सांगण जरा कानात जीव आणून ऐकावं लागतं. वय झालंय तिचं फार. ती सांगते, दोघांनाही जवळ घ्याल तेव्हाच ते कळतील. घ्या जवळ, आणखी जवळ, जितकं घेता येत असेल तितकं.

दिवाळी सांगते तसं मी करतो. दोघांनाही जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. ते लगेच हातात सापडतात थोडेच. एक भेटला तर दुसरा पळतो. दुसरा सापडला तर पहिला पसार. हुलकावणीचा खेळ. दिवाळी पुन्हा सांगते, मस्तीखोर आहेत थोडे. पण चांगले आहेत. त्यांच्याशी दोस्ती केलात तर दगा नाही देणार. हळुहळू माझी त्यांची मैत्री होत जाते. अंतर संपत जातं. तेव्हा कुठे कळतं, म्हातारी सांगते ते खरंय. आपण त्यांना ओळखलेलंच नाही. ते दोघे वेगळे नाहीच. एकच तर आहेत. आपण उगाचच त्यांना दोन नावं दिलीत. उजेड आणि काळोख. हाक कोणत्याही नावानं दिली तर ओ एकाच आवाजात येतो. कसं कळलं नाही इतके दिवस आपल्याला?
आता दिवाळीच्या डोळ्यात थोडं समाधान दिसू लागतं. तिच्या लेकराशी माझी आणखी घट्ट दोस्ती होत जाते. आमची सोबत वाढत जाते. गप्पागोष्टी लांबत जातात. त्यानं मला, मी त्याला ओळखलेलं असतं. उरलं सुरलं अंतरही संपत जातं. एक दिवस अचानक बोलता बोलता तो गायबच होतो. मी त्याला शोधू लागतो. कुठे गेलास? मी विचारतो. हा काय इथेच, मीच उत्तर देतो. मी शहारतो. तो माझ्यातच असतो. अरे, एवढे वेडे होतो का आपण? उजेड, काळोख माझ्यापासून वेगळे नव्हतेच कधी. ते माझेच. ते माझ्यातच. मीच त्यांना शोधत होतो कुठेतरी दूर. मी पाठ केली तो काळोख आणि मी जिथे पाहिलं तो उजेड. मीच काळोख. मीच उजेड. मीच मी.

मी आपोआप डोळे मिटून घेतो. सगळं कसं उजळल्यासारखं वाटतं. लाखो दिवे पेटलेत सभोवती. आकाश नसतंच, मन सुखावणारी आतषबाजीच फक्त. वाटत राहतं, आता अमावस्येच्या अंध्याऱ्या रात्रीही शोधून सापडणार नाही, ज्याला आपण काळोख म्हणायचो तो.

माझ्या डोक्यावर सुरकुतलेली हात फिरतो. दिवाळी असते ती. छान हसत असते. तिला इतकं हसताना मी कधीच पाहिलेलं नसतं. म्हणते, हॅपी दिवाळी, अरे बावरल्यासारखा चूपचाप उभा कशाला आहेस. जा साजरा कर उत्सव, सण, सोहळा. हस, खेळ, नाच, गा, गोडधोड खा. नुकतेच कुठे दिवे पेटलेत. आताच कुठे दिवाळी सुरू झालीय. 

No comments:

Post a Comment