Saturday 21 March 2015

संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण वगैरे

संमेलनाच्या अध्य़क्षाचं भाषण देताना मी. सोबत विचारपीठावर महेश थोरवे
श्रीपाल सबनीस, हरि नरके, विनोद शिरसाठ आणि भूषण कदम
कधी कोणत्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणी परिसंवादासाठी वगैरे बोलावलं तरी मिळवलं, असं अजूनही वाटतं. तरीही माझासारखा पत्रकार पहिल्या अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनला. आयोजकांशी माझी ओळखदेख नव्हती, तरीही. दोन दिवसांचा हा अनुभव समृद्ध करून जाणारा होता. अनेक नवे मित्र जोडले. नवं ऐकता आलं. समजून घेता आलं. स्वतःला दुरुस्त करून घेता आलं. त्यात माझाही पीआर वगैरे झाला.

संमेलन सुरू असताना माझ्याशी फोनवर बोलताना आई म्हणाली की माणसं आहेत, म्हणजे तुझं पोट भरलं असेल. मी अध्यक्ष म्हणून हरि नरके सर मुद्दामून भाषण ऐकण्यासाठी आले होते. मला पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहणारे पराग पाटील आणि सुनील कर्णिक मुंबईहून आले होते. सोबत नारायण बांदेकरही होते. आमचे दत्ताभाऊ बाळसराफ मुंबईहून आले.
मला शाळेत भाषेची गोडी लावणाऱ्या स्नेहल मपारा मॅडम दोनच दिवसांपूर्वी पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. त्या आल्या होत्या. श्रीरंग गायकवाड तर आमचे चार दिवसांचे यजमानच होते. ते सहकुटुंब होते. माझे दोस्त सुनील तांबे, प्रशांत पेडणेकर यांच्यासोबत सिद्धेश सावंत होता. डोंबिवलीहून माझे मित्र संजय दळवीदेखील होते. अरविंद पाटकर होते. रविप्रकाश कुलकर्णी होते. संजय सोनवणी आले होते. ज्येष्ठ कवी अशोक थोरात आणि रामदास फुटाणे आले होते. प्रसाद शिरगावकर आवर्जून आला होता. कार्यक्रम पत्रिकेवर ज्यांची नावं होती, ते सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, संजय आवटे, विनोद शिरसाठ, सुभाष वारे, अभय टिळक, दगडू लोमटे, माधवी वैद्य, नीलेश राऊत, वैभव छाया, सुरेशकुमार वैराळकर, राजकुमार तांगडे, अमित नारकर, बालाजी इंगळे असे मान्यवर तर होतेच. या सगळ्यांसोबत मुक्ता आणि रुद्रही होते. उद्घाटनाच्या सुरुवातीला गर्दी कमी होती. पण लोक जमा होत गेले. शेवटीशेवटी तर अनेकांना उभं राहावं लागत होतं. माझं पोट दोन दिवस तुडुंब भरलं होतं. अजूनही भरलेलंच आहे.

संमेलनाचं आयोजन भारीच होतं. परिसंवाद, चर्चा, गझल आणि कविता छान झाल्या. मला वाटलं माझं भाषण सोडून सगळंच चांगलं झालं. पण माझं भाषणही खूप जणांना आवडलं. ज्यांना खात्रीने आवडणार नाही, असं वाटत होतं, त्यांनाही आवडलं. आता आवडलं नाही तर कुणी सांगत नाही, त्यामुळे मला वाटलं सगळ्यांना आवडलं. मी मांडलं त्यात नवं काही नव्हतं. पण जे होतं ते माझं होतं. माझं स्वतःच विचार करून करून लिहिलेलं. ते सगळंच बरोबर असेल असं नाहीच. त्यात चुका असणारच. त्या बदलायची तयारी आहेच ना. मी माझ्या नेहमीच्या भाषेत लिहिलं ते. उद्घाटनाच्या समारंभात वाचून दाखवलं. जागरणानं अस्वस्थ होतो. भूक लागली होती. एसी समोरून तोंडावर आपटत होता. पोटात गडबड वाटत होती. तरीही नेटाने वाचलं. पूर्ण एनर्जी टाकून वाचता आलं नाही. पण तरीही जेवढं जमेल तेवढं केलं. त्याची कसर समारोपाला भरून काढली. लिहून वगैरे लांबच, साधे मुद्देही मनात आणले नाहीत. जे वाटलं ते बडबडत गेलो. दणक्यात भाषण झालं. उद्घाटनाचं भाषण नीट न झाल्याचा एकच सल होता, तोदेखील माझ्यापुरता संपून गेला.

हे सगळं होऊ शकलं कारण टेकरेल. टेकरेल ही स्पर्धा परीक्षा आणि आयटीमध्ये मुलांना शिकवणारी पुण्यातली आघाडीची संस्था आहे. त्याचे प्रमुख भूषण कदम आणि महेश थोरवे यांनी आयोजनाचा सगळा भार उचलला होता. महेशचं वय अवघं २८. तरीही त्याने सगळं संमेलन स्वागताध्यक्ष म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचललं होतं. त्याचे मित्र हनमंत पवार, सचिन पवार आणि धनंजय झोंबाडे हे संमेलनाचे सूत्रधार. त्यांच्याशिवाय मारोती अवरगंड, इम्रान शेख, विठ्ठल कदम, श्याम येणगे, गणेश दळवी, बालाजी फड, कलीम अझीम असे कितीतरी मित्र दिवसरात्र राबत होते. या सगळ्या मित्रांमधलं आपापसातलं प्रेम, जिव्हाळा आणि समज हे या संमेलनाच्या यशाचं खरं कारण.

यांच्यातल्या कोअर ग्रुपने संमेलनाध्यक्षपदासाठी अनेक नावं काढली होती. त्यातून चार पाच नावं घेऊन ते त्यांच्या संपर्कातल्या मान्यवरांकडे गेले. अनेकांशी चर्चा झाली. त्यातून माझं नाव नक्की करण्यात आलं. माझा त्यांचा प्रत्यक्ष संपर्क काहीच नाही. तरीही त्यांनी मला बोलावलं. माझ्यासाठी तो आश्चर्याचा सुखद आघात होता. त्यातून मी अजूनही बाहेर पडू शकलेलो नाही. तीन रात्री जागून मी अध्यक्षपदाचं भाषण लिहून काढलं. शेवटचा हातच फिरवला की संपणार होतं. गेली सात आठ वर्षं इमानेइतबारे साथ देणाऱ्या माझ्या नेटबूकने मला अचानक दगा दिला. दोनेक तासाची झोप संपवून उठलो. पेन ड्राईववर भाषण कॉपी करायला गेलो. सिस्टम क्रॅश झाली होती आणि मी क्रॅक. रोजचा अग्रलेख, ऑफिसची कामं टळत नव्हतीच. ती करायची आणि रात्री पुन्हा भाषण लिहून काढायचं. मी जेरीस आलो होतो. पण सगळी ताकद लावली आणि पुन्हा एकदा रात्र जागून भाषण लिहून काढलं. दुसरा दिवस चुका काढण्यात आणि साफसूफ करण्यात गेला. त्यानंतर एक रात्र कसाबसा झोपून पुण्याला निघालो. तो थकवा अजूनही संपलेला नाही. उद्या रविवार आहे पूर्ण दिवस झोपून काढायचा ठरवलाय. त्याआधी काहीही करून हे भाषण ब्लॉगवर शेअर करायचं ठरवलंच आहे. आयोजक मित्रांनी भाषणाची पुस्तिका तयार केली होती. पण ती संपली.

त्यात छापून आलेल्या भाषणात काही वाक्य इथे तिथे असू शकतात. बाकी सगळं तेच आहे. कन्वर्ट करताना म, अर्धा य, पाय मोडलेला र यांची गफलत झालीय. शक्य तिथे नीट करून घेतलंय. तरीही राहिलेलं असेलच. जे आहे ते गोड मानून घ्या. आवडलं तर कळवलं नाही तरी चालेल. पण आवडलं नाही, पटलं नाही तर मात्र आवर्जून कळवा. दुरुस्त करून घ्यायला हवंच ना.


गोविंदा. आपला आवडता हिरो. त्याची एक जाहिरात पूर्वी नेहमी टीव्हीवर यायची. रूपा फ्रंटलाईन बनियन. ये आराम का मामला है. तुम्हालाही आठवत असेल ती जाहिरात. नाहीतर यूट्यूबवर सर्च मारून कधीही बघता येईल. ट्रेनमधे गर्दी असते. बनियन घातलेला गोविंदा त्या धक्काबुक्कीत असतो. पुढच्याला गोविंदाचा धक्का लागतो. तो गोविंदाला विचारतो, हिरो, तुने धक्का क्यों दिया. गोविंदा म्हणजे जबरदस्त टायमिंग. तो उत्तर देतो, माना की मैंने धक्का दिया. पर तुम्हें अच्छा नही लगा, तो तुने लिया क्यों.

परमपूज्य गोविंदानं सांगितलेलं हे तत्त्वज्ञान आपल्याला पूर्णपणे मान्य आहे. आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कुणी धक्का देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्यासारखा आपल्या मस्तीत मित्रांमधे जगणारा माणूस टेन्शन घेण्यावर विश्वास ठेवत नाही. टेन्शन देणं आपलं काम. पण आज मी टेन्शनमधे आहे.

आधी सदानंद मोरे सरांचा फोन आला. नंतर श्रीपाल सबनीस सरांचा. मुलं चांगली आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नाही म्हणू नकोस. सांगणारी माणसं मोठी आहेत. त्यामुळे अंगावर मूठभर मास चढलं. इगो मस्त सुखावला. नाही म्हणायचं कारण नव्हतं. मी गोव्यात. आयोजक पुण्यात. ओळखपाळख नसताना इतक्या लांबून मला शोधून काढतात. सांगा ना कुणाला बरं वाटणार नाही? पण सालं दुसरं मन घाबरलेलं होतंच. म्हणून मी सगळ्यांना पुण्यात येऊन भेटलो. बोललो. आणि आयशप्पथ सांगतो, माझी फाटली.

ही सगळी पोरं तिशीच्या आतली. कडक बोलणारी. विचार करणारी. त्यात आपण करतोय त्याविषयी गंभीर. माझ्यावर प्रेम करणार्‍या कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी निर्णय घेतला असेल, असं मला वाटत होतं. पण नाही. यांनी माझं सगळं वाचलेलं. माझी सगळीच कुंडली यांच्याकडे होती. बच्चे की जान लोगे क्यां,  मी मनात म्हणत होतो. यार,  आपल्याला इतकं प्रेमाने आणि गंभीरपणे कुणी फॉलो करत असेल, अशी शंकाही मला नव्हती. आपलं काम कुणासाठी तरी इतकं महत्त्वाचं आहे, याची जाणीव मला खरंच नव्हती. त्यामुळे टेन्शन आलं. त्यांनी एवढ्या मेहनतीनं हा डोलारा उभा केलाय. त्यांचा अपेक्षाभंग होऊ नये, याची भीती वाटते आहे.

संमेलनाध्यक्षांची भाषणं अशी नसतात. ती काही असं स्वतःचं चर्‍हाट सांगत नाहीत. हे मला माहीत आहे. पण माझाही नाइलाज आहे. मला हे असंच सांगता येतं. मला हे असंच महत्त्वाचं वाटतं. इथे मला तुमच्याशी जे काही नम्रपणे शेअर करावंसं वाटतं, ते मी बोलणार आहे. आणखी विचार करत राहिलो तर आणखी लोड येईल. आहे तसं गोड मानून घ्या, ही विनंती. आणखी एक गोष्ट,  मी सध्या गोव्यातल्या गोवादूतनावाच्या दैनिकाचा संपादक आहे. पण मी इथे बोलतोय ते माझं माझं म्हणून. गोवादूतशी त्याचा संबंध नाही.

मित्रांनो आणि मान्यवरांनो

मी इथे का उभा आहे, हे मला माहीत नाही. कारण मी काही तसा साहित्यिक वगैरे नाही. मी साधा पत्रकार. एक लिहिता पत्रकार. आजूबाजूला घडतं त्यावर व्यक्त व्हावंसं वाटणारा पत्रकार. पेपर, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल जिथे होईल तिथे मी व्यक्त होत राहतो. व्यक्त होणं ही माझी गरज आहे आणि लिहिणं ही माझी खाज. लिहीत राहिलो नाही तर मी एकतर कोमेजून जाईन,  नाहीतर फुटून तरी. लिहावं तर लागतंच. कामाचा भाग म्हणून लिहिणं सुरूच असतं. पूर्वी बातम्या लिहायचो, आता अग्रलेख लिहितो. पण मी काही कथा, कविता, कादंबरी, नाटक लिहिलं नाही. उद्या लिहीन असंही वाटत नाही.

मी पत्रकार आहे त्याबद्दल मला अत्यंत अभिमान आहे. माझ्या धंद्यावर मी मनापासून प्रेम करतो. अगदी मनापासून. माझं हे काम मला व्यक्त व्हायला जागा देतं. एकाच वेळेस हजारो जणांशी बोलायलाही देतं. जगभरातले अनुभव देत समृद्ध करतं. या कामामुळेच माणसांत राहता येतं. जमिनीशी बांधून राहता येतं. सगळ्या बाजूंनी जगणं समजून घेता येतं. स्वतःला शोधता येतं. शिवाय त्याचा पोटभर पगारही मिळतो. मानमरातब मिळतो तो वेगळाच.

पत्रकारितेच्या नावानं बोटं मोडणारे खूप असतील आपल्यामध्ये. त्यांची कारणं मी नाकारत नाही. पण मला हा विश्वास आहे, आपल्या समाजात जिथे कुठे, जे काही चांगलं घडतंय, त्या प्रत्येकात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आमचा म्हणजे पत्रकारितेचा सहभाग असतोच असतो. आमच्यामुळे क्रांती घडते किंवा समाज बदलतो, असा भ्रम ठेवण्यात अर्थ नाही. पण हो, आम्ही ठरवलं तर ते घडवण्यात आम्ही हातभार लावू शकतो. आम्ही खूप क्रिएटिव आहोत. एकाच वेळेस जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधता येणं, हे कौशल्य केवळ आमच्या क्रिएटिविटीशी, मिशनशी किंवा आत्मानंदाशी निगडीत नाही, ते आमच्या पोटापाण्याशी संबंधित आहे. आमच्या करियरशी संबंधित आहे. त्यामुळे आमच्या कळत नकळत भाषेचे, मांडणीचे, शैलीचे अनेक प्रयोग आम्ही करत असतो. मराठी भाषेला राखण्याचं आणि पुढे नेण्याचं काम आम्ही माध्यमातली माणसं करत आहोत. आम्ही लिहितो त्यावर त्याच संध्याकाळी कोथिंबिरीची जुडी गुंडाळून घरी येते. दिवसभर कष्ट केलेला एखादा कामगार नौटाकसोबत त्यातच चखणा गुंडाळून खात असतो. दुसर्‍या दिवशी सकाळी पोरं त्यावर पोट रिकामं करतात. हे सगळं मान्य आहे. आम्ही लिहितो ती उद्याची रद्दी आहे. ते लिटरेचर इन हरीआहे, हे मान्यच. पण तेवढ्यातच आमच्या अक्षरांनी कुठे कुठे बरंच काही करून ठेवलेलं असतं. 
     
आम्ही लिहितो ते समीक्षकांच्या पुस्तकानुसार साहित्य नसेलही कदाचित, पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकांपेक्षाही जास्त वाचलं जातं. खूपच जास्त. जगण्यावर अधिक प्रभाव पाडतं फक्त म्हणूनच महत्त्वाचं नाही. तर ते जगण्याच्या अधिक जवळ असतं म्हणून हत्त्वाचं आहे. पत्रकार नॉन फिक्शन म्हणजे अकथात्म चांगलंच लिहितात. बहुतांश प्राध्यापक लेखकरावांपेक्षा कितीतरी चांगलं. त्यात वैचारिक, चरित्र आणि प्रवासवर्णनही आली. आपल्याकडे आता नॉन फिक्शन पुस्तकं जास्त येतात आणि जास्त खपतातही. त्यातल्या हाऊ टू टाईप इन्स्पिरेशनल किंवा इन्फर्मेटिव पुस्तकांना फिक्शनवाले दुय्यम समजतात. तसं त्यांना सजू दे. पण ती पुस्तकं महत्त्वाची आहेत कारण त्याचा वाचक हा तरुण आहे. तो त्याच्या आकांक्षा त्यात पाहत असतो. त्यामुळे ते लिखाण समर्थ लेखकांच्या हातात असायला हवं. ती एक लेखनाची विधा मानायला हवी. स्वतंत्र आणि समर्थ साहित्यप्रकार. आपल्याकडे अशाप्रकारचं नॉन फिक्शनचे लेखक एकतर नेहमी लिहिते नसतात किंवा फक्त पैशांसाठी पाट्या टाकणारे असतात. त्यांची जागा पत्रकारांनी घ्यायला हवी. त्याचं अर्थकारण कदाचित परवडणारं नसेल, तरीही. तरुणांशी तरुणांच्या भाषेत बोलायची सवय असलेल्या पत्रकारांनी ते आपलेपणानं करायला हवं. पत्रकार लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचे जे खेळ रोज मांडतो तसे पुस्तकांतूनही मांडायला हवेत.

अनुवाद हे तर पत्रकारांचंच क्षेत्र आहे. पेपरातला उपसंपादक पीटीआयचे टेकच्या टेक ट्रान्स्लेट करून रोज रतीब घालत असतो. असा आठवडाभराचा रतीब एकत्र करायचा ठरवला तर एकाचं शंभर सव्वाशे पानांचं पुस्तक सहज निघू शकेल. पण तोच उपसंपादक वेळ काढून वर्षातून एखादं आवडलेलं पुस्तक अनुवादित करत नाही. तसं केलं तर शब्दाला शब्द जुळवून केलेल्या बाजारू आणि बंडल भाषांतरांना आळा बसू शकेल. त्यासाठी पत्रकारांनी पुस्तकाच्या जगात सजगपणे डोकावायला हवं. तिथे त्यांच्यासाठी अनेक आव्हानं आहेत. थोडाबहुत पैसाही आहे. अगदीच काही जमलं नाही तर आपल्याच पेपरांसाठी लिहिलेल्या निवडक लिखाणाची पुस्तकं काढावीत. ती केवळ हौस नाही, लोकांमध्ये राहणार्‍या आणि लोकांसाठी लिहिणार्‍यांचं लिखाण पुस्तकरूपाने नोंदवलं गेलंच पाहिजे.

या सगळ्याचा अर्थ पत्रकाराने फिक्शनकडे वळू नये असा नाही. पत्रकारितेच्या मांडवाखालून गेलेल्या अनेकांनी मराठी साहित्यात मानदंड उभे केलेत. मग ते आचार्य अत्रे असोत की भाऊ पाध्ये, सुरेश भट असोत की विजय तेंडुलकर, शांता शेळके असोत की अरुण साधू. मराठीतली पहिली कादंबरी यमुनापर्यंटनलिहिणार्‍या बाबा पद्मनजी कासारांपासून ही परंपरा अव्याहत सुरू आहे. जयंत पवार, प्रतिमा जोशी, आसाराम लोमटे, विष्णू वाघ, श्याम पेठकर, अजय कांडर असा या दर्जेदार परंपरेचा माग आजही काढता येतो, तो थेट अवधूत डोंगरे आणि वैभव छायापर्यंत. रोज लोकांमध्ये वावरणार्‍या पत्रकारांना समाजाचा राजकीय, सामाजिक पोत वेगवेगळ्या अंगांनी तपासायची सवय असते. त्यामुळे त्यांचं लिहिणं महत्त्वाचं ठरतं आणि लोकांनाही ते आवडतं. गेल्या काही महिन्यांतले इंग्रजीचे लिटररी फेस्टिवल पाहिले तर सर्वात लक्षवेधी उपस्थिती ठरली ती राजदीप सरदेसाई आणि आशुतोष यांचीच. राजकीय स्थित्यंतराचा वेध घेणारी या दोन पत्रकारांची पुस्तकं सर्वसामान्य वाचकांसाठी कुतूहलाचा विषय बनताना दिसली.

हा सगळा ट्रेण्ड पाहता पत्रकारांचं लिखाण हा उद्याच्या मराठी साहित्याचा एक मुख्य प्रवाह होऊ शकतो. सहाव्या वेतन आयोगाने प्राध्यापक शिक्षक असणार्‍या लेखकांचं लेखन निकस करायला सुरुवात केलेली दिसते. त्यांच्या लेखनाची संख्या वाढत असली तरी या उच्चमध्यमवर्गीय बनण्यासाठी उतावीळ झालेल्यांचा लोकांशी संपर्क संपत चाललेला आहे. प्राध्यापकांचं लिखाण प्राध्यापकांनी, प्राध्यापकांसाठी लिहिलेलं लिखाण बनत चाललं आहे. त्यामुळे शोषित, कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या बरोबरीने पत्रकारांनी मराठी साहित्याच्या पालखीचे भोई बनण्याची तयारी करायला हवी.

आज मराठी पत्रकारितेत असलेला माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीचा तरुण ही मराठी साहित्याच्याच नाही तर एकूण मराठी संस्कृतीच्या दृष्टीने मोठा असेट आहे. यातला बहुसंख्य तरुण साध्या कष्टकरी, शेतकरी घरांमधला आहे. त्याची पहिलीच पिढी ग्रॅज्युएट झालेली आहे. काही ठिकाणी तर तो पहिल्याच सुशिक्षित पिढीतला आहे. शिवार किंवा कारखान्यांपासन ते वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या ऑफिसांपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा आहे. माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे, या जिद्दीचा तो प्रवास आहे. त्यातही गावांतून आणि छोट्या शहरांतून हानगरांत आलेल्यांचा आणि मुलीचा विशेष उल्लेख कराला हवा. तंच आकांक्षांना झेपावणसाठी नवने आभाळ मिळत आहे. ही साध्या घरातली मुलं आज आपला ठसा उमटवत आहेत. पत्रकारितेचं व्याकरण नव्याने घडवत आहेत. त्याचं स्वागत व्हायला हवं. पण त्याची साधी दखलही कुणी घेताना दिसत नाही. डॉ. जयदेव डोळेंसारखे माध्यमांचे जाणकार अभ्यासक त्याची दखल घेतात, पण ही मुलं बहुजन घरांमधून आलीत त्यामुळे त्यांची सत्तेशी जवळीक आहे, असं तिरपागडं विश्लेषण करताना ते दिसतात. आमची नव्या पत्रकारांची पिढी स्वतःच्या ताकदीवर या मैदानात उतरली आहे. आमच्याकडे बापजाद्यांची मिरास नाही. आम्हाला कुणी गॉडफादर नाहीत. आमचे कष्ट, शिकण्याची तयारी, घुसण्याची जिगर, अंगभूत हुशारी, मातीची समज याच्या जोरावर आम्ही इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे आम्हाला कारण नसताना कुणाची पडलेली नाही, कुणाचीही. हा साध्याच माणसांचा यल्गारआहे की नाही, माहीत नाही. पण हा थोर गांडुळांचा भोंदू जमावनिश्चितच नाही.

हे मी पत्रकारितेतलं बोलतो आहे, कारण मी ते अनुभवलंय. लिखाणाच्या, साहित्याच्या इतरही क्षेत्रात असंच चित्र मला तरी दिसतं आहे. नव्या ऊर्मीने लिहिणार्‍या तरुणांमधे मला अगदी तसंच बळ भेटलं आहे. आधीच्या पिढ्यांपेक्षा आच्या पिढ्यांचं वेगळेपण म्हणजे आम्हाला कोणत्याही राजकीय सामाजिक विचारधारेची नसलेली पार्श्वभूमी. पुरोगामी, प्रतिगामी कोणत्याही. एण्ड ऑफ आयडियालॉजीनंतर पुढे आलेलो आम्ही सगळे. आम्ही वयात येत असताना रशियात लाल बावटा कोसळताना पाहिला. भारतात समाजवादी एकतर नगण्य किंवा लालूमुलायम होताना पाहिले. हिंदुत्ववाद्यांना बाबरीच्या मढ्यावरचं लोणी खाताना पाहिलं. आंबेडकरवाद्यांना भगव्यांच्या कुशीत घुसण्यासाठी स्पर्धा करताना बघितलं. गांधीवादी ही आमच्यासाठी नष्टप्राय झालेली प्रजातीच होती. पूर्वी चळवळीतली मुलं त्याच्या शबनम बॅगा घेऊन लिहिण्यात घुसायची. आता तसे फारसे कुणी नाहीत. आम्ही थोडे इथे तिथे झुकलेले असू पण तसे मोकळे आहोत. आम्हाला पुरोगामी वगैरे म्हणवून घेण्याची हौस नाही आणि प्रतिगाम्यांच्या धटिंगणशाहीचंही आम्हाला आकर्षण नाही. पुरोगाम्यांना आमच्यापर्यंत पोहोचण्याची ना ईर्ष्या उरली आहे ना बळ. प्रतिगाम्यांच्या खोट्या आक्रस्ताळी प्रचाराला नेहमी नेहमी बळी पडण्याची सवलत आमचा विवेक सोडाच, साधं इंटरनेटही आम्हाला देत नाही. 

आमच्या पिढीचा हा खुलेपणाच आमची सगळ्यात मोठी ताकद बनली आहे. आम्ही विचारांसाठी कुणाचा तरी दुस्वास करत जन्म घालवत नाही. मेंदूंच्या क्लोनचे कळप बनवून आम्ही त्याच्याबाहेरचं जगणं नाकारत नाही. आम्ही आमच्या चौकटी बर्‍यापैकी विस्कटून ठेवल्यात. एक आणि एक बरोबर दोनच यायला हवं, असं तुमच्या गणिताच पुस्तकांत लिहीलं असेलही, आणि ते बरोबरच असेल. पण आमची उत्तरं काहीही असू शकतात. तुमचे ठोकताळे जिवंत ठेवण्यात आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. त्यामुळे आमचं जगणं विचित्र वाटेल तुम्हाला, पण ते जिवंत फ्युजन आहे. सगळे रंग मिसळलेलं फुलपाखरू आहे ते. त्याच्याकडून एकाच फुलावर बसण्याची अपेक्षा नका ठेवू.

आम्ही काहीही करू शकतो. आम्ही `फ्रँड्री`सारखा सिनेमा सुपरहिट करू शकतो. आम्ही अवधूत गुप्तेने केलेली गणपतीची कव्वाली डोक्यावर घेऊ शकतो. आम्ही एका निवडणुकीत राज ठाकरेंना यशाचा कळस दाखवून दुसर्‍या निवडणुकीत थेट पाताळात नेऊ शकतो. अण्णा हजारेंसारख्या आऊटडेटेड वाटणार्‍यासोबत रस्त्यावर उतरू शकतो. नरेंद्र मोदींना नऊ महिन्यांतच दिल्ली किती दूर आहे, याची जाणीव करून देऊ शकतो. ऑस्ट्रेलियात हर हर हरल्यानंतर वर्ल्ड कपमध्ये पुनर्जन्म झाल्यासारखे जिंकू शकतो. शनिशिंगणापूरला जाणं बंद न करता मंगलयानाचं यश सेलिब्रेट करू शकतो. आम्ही काहीही करू शकतो. पण आम्ही हे असे आहोत, हे आम्हीच आधी समजून घ्यायला हवं. तसंच इतरांनीही आम्हाला समजून घ्यायला हवं.

याला कुणी विचारांचा स्वच्छंदीपणा म्हणेल किंवा स्वैराचारही. पण असं नाहीय. ही झाली बरीच पुढची गोष्ट. आम्हाला विचार नीट माहीतच नाहीत मुळात. कोणतीही विचारधारा आमच्यात घट्ट बसलेलीच नाही. याचे अनेक फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. त्यामुळे आमचा जगण्याचा अभ्यास तुंबलाय. खोलात शिरून जगणं समजून घेण्याइतपत सबुरी आमच्याकडे निर्माण होत नाही. एक खांब घट्ट न पकडल्यामुळे स्थिर उभं राहण्यासाठीची जमीन आम्हाला सापडत नाही. मला वाटतं आम्ही या सगळ्यातून नवा रस्ता शोधायला हवा. पण ते करताना मागच्या पिढ्यांसारखं आवर्तात अडकून पडायला नको. त्यासाठी आम्ही एक गोष्ट करायला शिकायला हवी, अस्सल विचार करणं. आमची नाळ कुठे पुरलीय, ती माती आम्ही शोधून काढायला हवी. आम्ही आमची परंपरा नेमकी काय आहे, ते समजून घ्यायला हवं. आम्हाला आमच्या खांद्यावर कुणाचंच रेडीमेड डोकं नको. प्रतिगाम्यांचं तर नकोच, पण पुरोगाम्यांचंही नको. आम्हाला आमचं आणि आमचंच डोकं आमच्या खांद्यावर हवंय. आम्ही आमच्या स्वतःसाठी प्रत्येकाचे स्वतंत्र विचार उभे करायला हवेत. मग ते चुकीचे, बरोबर कसेही असोत, पण ते आमचे प्रत्येकाचे हवेत. आम्ही आमच्या डोक्यावर घासून स्वीकारलेले आमचे विचार. आमची प्रत्येकाची आम्ही स्वतः तयार केलेली, आम्हाला नीट समजलेली विचारधारा. माझं चुकत असेल तर मी बदलायला तयार आहे. पण मला जे माझं वाटतं, त्यावर मी ठाम आहे, असं कुणालाही ठासून सांगू शकणारा विचारांचा खरेपणा आम्हाला हवाय. मला वाटतं खरा पुरोगामीपणा त्यातच आहे. खरा विवेकवाद त्यातच आहे. खरा परिवर्तनवाद त्यातच आहे. आणि त्यासाठी सर्वात सुपीक जमीन आज आपल्यासमोर आहे.

आपल्याला माहीत असलेल्या माणसाच्या इतिहासात आजच्यासारखा सुवर्णकाळ कधीच आलेला नव्हता. सर्वसामान्यांना उत्तम आयुष्य जगण्याची अशी संधी याआधी कधीच मिळालेली नव्हती. आमच्या प्राणप्रिय भारत देशातून कधी सोन्याचा धूर निघत असेलही, पण तेव्हा जातीच्या, धर्माच्या, कुळाच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या चौकटीतून साध माणसाला बाहेर पडणं प्रश्‍नच नव्हतं. आमचं खरं सोनं म्हणजे तो साधा माणूस. त्याला चमकण्यासाठी जागाच नव्हती कुठे. त्याला जगाच्या स्पर्धेत उतरण्याची संधी आज पहिल्यांदाच मिळालेली आहे. त्या स्पर्धेत त्याच्या गुणवत्तेचं सोनं उजळून निघतं आहे. सर्व बंधनं हळूहळू संपत चालली आहेत. आपलं आडनाव, आपल्या कातडीचा रंग आणि आपल्या बोलण्याचे उच्चार आपल्या विकासात अडथळे ठरणार नाहीत, अशा जगाच्या दिशेने आपण वेगाने चाललो आहोत. या प्रकाशाच्या युगात अंधारावर तेजाची लेणीआम्ही खोदू शकलो नाही, तर ती आमची चूक असेल. फक्त आमचीच.

आज नव्या पिढीतली प्रतिभावंत मुलं आपापल्या परीनं ही लेणी खोदण्यासाठी धडपडत आहेत. व्यक्त होत आहेत. लिहीत आहेत. नाटक सिनेमा करत आहेत. पण आमचा त्यातला प्रवास रडतखडत चालत असतो. मातीशी जोडलेले असल्यामुळे प्रतिभा आणि प्रज्ञा वगैरे म्हणतात ती असतेच आमच्यात. पण एकतर आमच्यात न्यूनगंड इतका असतो की आम्ही घाबरून व्यक्तच होत नाही. नाहीतर आमच्यावर पिढ्यानपिढ्या लादलेल्या पद्धतीनेच व्यक्त होत राहतो. अनुभवांशी इमान राखण्याची हिंमत आमच्यात नसते. आम्ही गोंधळतो. काहीजण या न्यूनगंडातून कमीजास्त बाहेर निघतात. त्यांचं व्यक्त होणं स्वाभाविकपणे आवडतं अनेकांना. त्याचं कौतुक होतं. तिथे आम्ही वाहवत जातो. अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं म्हणतात तसं. आम्हाला वाटतं आमचे हात टेकले आभाळाला. आम्ही जिथून आलेलो असतो त्या तुलनेत खरंच हात आभाळालाच काय, स्वर्गालाही टेकलेले असतात. पण ते खरं नसतं. त्यामुळे अत्यंत बहारदार सुरुवातीनंतर अचानक ब्रेक लागतो. आमच्याही नकळत. सर्वच क्रिएटिव क्षेत्रात हे घडताना दिसतं. तिथून अडचणींना सुरुवात होते. तोपर्यंत कौटुंबिक आघाडीवर लढण्याचीही धडपड सुरू झालेली असते. त्यात कुणी निराश होऊन किएटिविटीकडे पाठ फिरवतो आणि पोटापाणच गडबडीत अडकून जातो. कुणी नशेत स्वतःला बुडवून घेतो. कुणी ब्राह्मणांना शिव्या घालण्यापलीकडे काही करत नाही. कुणी त्यापुढे गेला तरी सत्ता किंवा पैशाच्या गोतावळ्यात अडकतो. कुणी हशा आणि टाळ्यांमध्ये रमून पडतो. इथे सावरण्याची सर्वात जास्त गरज असते. पण कसं सावरायचं ते आम्हाला माहीतच नसतं. आमच्या आईबापांनी ते आम्हाला शिकवलेलंच नसतं. कारण त्यांचा या जगाशी कधी संबंधच आलेला नसतो. आमची प्रतिभा सांभाळण्याचं, त्याला वळण देण्याचं प्रशिक्षण आम्हाला नसतंच. घरातून नाही, शाळांतून नाही आणि समाजातूनही नाही. बहुजन घरांतून आलेल्या मुलांच्या प्रतिभेच्या मढ्यांचे डोंगर आपल सगळंच आजूबाजूला वाढत चालले आहेत. खोटं वाटत असेल तर बंद डोळ्यांवर आणखी जाड कातडी ओढून घ्या.

मला वाटतं या सर्वसामान्य घरांमधल्या मुलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळणं, अनेक दृष्टीने महत्त्वाचं आहे. तो फक्त त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक करिअरचा भाग नाही. हे त्याच्यापलीकडे आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. विवेकाच्या बाजूने उभी राहू शकेल अशी मोठी फौज आजचा आपला समाज रोजच्या रोज कापून काढतो आहे. मला समाजाच्या सर्व धुरीणांना हात जोडून विचारायचंय, तुम्ही आमच्याकडे बघणार आहात की नाही? तुम्ही आमच्यासाठी खूप काही करू शकता. यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करावं, आम्हाला खरंच माहीत नाही, तुम्ही काही करू शकाल का?
मला वाटतं कदाचित ते उत्तर आपला दोस्त पांडुरंग सांगवीकर देऊ शकेल. पन्नास वर्षांपूर्वी जन्माला येऊन आजही तुमच्यामाझ्या गळ्यात हात टाकून उभा असलेला सांगवीकर वगैरे. ज्यांनी कोसलानंतरचे भालचंद्र नेमाडे वाचलेच नाहीत, ते कुत्सितपणे सांगत होते आता मराठीत ज्ञानपीठ मिळवण्यासारखं कुणीच नाही. पण त्याच ज्ञानपीठवाल्यांना सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने गौरव करावा असा माणूस मराठीत गवसला. सलमान रश्दी नेमाडेंना काहीबाही बोलले. मला तचं बरं वाटलं. रश्दी आज जगाचा लेखक आहे. त्यांना नेमाडेंच्या बोलण्याची दखल घ्यावीच लागली. असं भाषक लेखकांच्या बाबतीत अन्य कुठे होतं? ही नेमाडेंनी स्वतः कमावलेली ताकद आहे. नेमाडेंनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच प्रतिभावान मित्रमंडळी बरीच होती. लिटल मॅगझीन मुवमेंटवाली. ती अस्सल विचार करायची. जोरकसपणे मांडायची. आज पन्नास साठ वर्षांनंतर त्यातले फक्त नेमाडे उरले आहेत. अपवाद फार तर नामदेव ढसाळ आणि अरुण कोलटकरांचा करता येईल. पण नेमाडे नुसते उरले नाहीत तर ते मराठीच्या आणि भारतीय साहित्याच्या मुख्य प्रवाहातले आघाडीचे लेखक बनले. ते करताना त्यांनी स्वतःचा लेखकराव होऊ दिला नाही. आपल्याला हवं ते ते बोलतच राहिले, लिहीत राहिले. त्यांनी कधीच आपल्या भूमिका पातळ केल्या नाहीत. आपल्या अटींवर ते आहेत. देशाच्या सर्व भाषांतल्या लेखकांना त्यांनी व्यक्त होण्यासाठी बळ देणारं तत्त्वज्ञान दिलंय. ते पेरल्यानंतर तरारून फुलून आलेलं त्यांनी पाहिलंय. आजही ते लिहिताहेत. बारीक बारीक संशोधन करून लिहीताहेत. टीव्हीवर डोळे मिचकावून मोठ्या मोठ्या मिश्यांमधून आमच्या धारणांनाही धक्के देत आहेत. ते असं कसं काय करू शकले, शोधायला हवं, त्यांना विचारायला हवं. आमच्या धडपडीला आकार आणि आधार मिळू शकेल, नेमाडे सरांकडून काही समजून घेतलं तर.

आम्ही काही मित्र गोव्यात दोन दिवस नेमाडेंसोबतअसा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रभरातल्या प्रतिभावान मुलांनी नेमाडेंसोबत दोन दिवस घालवावेत. त्यांच्याशी बोलावं. हवं ते बोलावं. समजून घ्यावं. शिकून घ्यावं. व्याख्यानांमधून होणार नाही ते यातून होऊ शकतं. फक्त नेमाडेच कशाला, आज नेमाडेंसारखीच व्यापक दृष्टिकोन असणारी अनेक माणसं आहेत. बाबा आढाव आहेत. सदानंद मोरे आहेत. जयंत नारळीकर आहेत. आ. ह. साळुंखे आहेत. रावसाहेब कसबे आहेत. शरद जोशी आहेत. अमर हबीब आहेत. किशोरी आमोणकर आहेत. चंद्रकांत वानखडे आहेत. हेश एलकुंचवार आहेत. सतीश आळेकर आहेत. दत्ता भगत आहेत. श्याम मनोहर आहेत. अभय बंग आहेत. श्याम मानव आहेत. अशोक शहाणे आहेत. मेधा पाटकर आहेत. सुरेखा दळवी आहेत. गेल आम्वेट आहेत. भारत पाटणकर आहेत. अनिल काकोडकर आहेत. प्रकाश आटे आहेत. विनय हर्डीकर आहेत. भीराव पांचाळे आहेत. असे आणखीही कितीतरी. आपण अशांसोबत तरुणांची दोन दिवसांची जगण्याची संमेलनं आयोजित करू शकतो का? करून तर बघुया.

दोनच महिन्यापूर्वी अशीच नावं घेत हे असंच मी एका भाषणात मांडलं होतं. सावंतवाडीला फेब्रुवारीत अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन झालं. त्यात माझं भाषण झालं होतं. तेव्हा या नावांमध्ये आणखी एक नाव होतं. गोविंदराव पानसरे. आण्णा समोरच पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्यावर हल्ला झाला त्याला काल बरोबर एक महिना झाला. आता महिना झाल्यावर आपण सावरलो असू. पण त्या वेदनांना आपण शिळं होऊ देता कामा नये. धारदार विचार आणि बोथट भावनांनी आपण याआधीची युद्ध लढण्याचे प्रयत्न केले. हे पुन्हा घडता कामा नये. त्यामुळे आपला आक्रोश जिवंत ठेवायला हवा.       

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी अजून पकडले गेलेले नाहीत. पानसरेंचे खुनीही मिळणार नाहीत. डोळ्यासमोर शत्रू नाही म्हणून आपलं लढणं दिशाहीन व्हायला नको. एक सूर्यप्रकाशाइतकं साफ आहे की हे खून विचारांसाठी झालेले आहेत. त्यात आपण आपला बुद्धिभेद होऊ देता कामा नये. विचारवंतांना मारणारे प्रतिगामी अविवेकीच असतात. त्यापैकी धर्मांधच आजच्या काळात अशा हत्या करत आहेत. त्यांना आपण सोडायला नको. कोण काय करेल हे मला माहीत नाही, पण मी तरी त्यांना सोडणार नाही. सोडणार नाही म्हणजे काही तलवार हातात घ्यायची नाही, उलट विवेक हातात घ्यायचा. दाभोलकर, पानसरेंनी आम्हाला शिकवलेला विवेक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हाच त्याचा मार्ग आहे. काळोखाने काळोख संपवता येत नाही, त्यासाठी प्रकाशच लागतो. द्वेषाने द्वेष संपवता येत नाही, त्यासाठी प्रेमच लागतं, असं मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने सांगून ठेवलंय. ते डोक्यात घट्ट बांधून ठेवायला हवं. बांगलादेशातही दोन वर्षांपूर्वी अहमद रजिब हैदर आणि आता अविजित रॉय अशा दोन विचारवंतांचा खून झाला. तामिळनाडूत पेरुमल मुरूगनमधला लेखक संपवण्यात आला. चार्ली हेब्दोवर खुनी हल्ला झाला. सगळीकडे विचारवंतांना मारणार्‍यांचे धर्म वेगळे असतील पण धर्मांधता सारखीच आहे. जिथे जिथे आज विचारवंतांना संपवणं सुरू आहे तिथे धर्मांधता आहे. म्हणून मला वाटतं आजघडीला सर्वात कळीचा मुद्दा धर्म हा आहे. धर्म.
सॉक्रेटिसने ज्ञान मिळवण्यासाठी तीन पायर्‍यांचा मार्ग सांगितलाय. आयडेंटीफाय युवर डॉग्माज. तुमच्या धारणा म्हणजे पक्के विचार समजून घ्या. क्वेश्‍चन युवर डॉग्माज. त्यांना प्रश्‍न विचारा आणि खरं खोटं जाणून घ्या. आणि सर्वात शेवटचं, रिकन्स्ट्रक्ट युवर डॉग्माज. यातून तुमच्या ज्या धारणा तकलादू निघतील त्याच्या जागी नव्या धारणा उभ्या करा. आजच परिस्थितीत मी धर्माच्या बाबतीतल्या माझ्या धारणा तपासून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

आमचे चंदूभाऊ म्हणजे चंद्रकांत वानखडे पुरोगाम्यांचं धर्माविषयीचं वागणं गाय आणि गोचिडीचं उदाहरण देऊन सांगतात. हिंदुत्ववाद्यांमधले धर्मांध गोचिडीसारखे हिंदूंवर म्हणजे गायीच्या पाठीवर चिटकून बसलेले आहेत. आमचे पुरोगामी गोचिडीला काढून टाकण्याऐवजी गोचिडीला मारण्याच्या नावाने गाईलाच बदडत आलेत. त्यामुळे गायीला राग येऊ लागला तो मारणार्‍यांचा आणि रक्त शोषणारा परजीवी गोचीड मात्र आपला वाटू लागला. हिंदुत्ववाद्यांना आणि त्यातल्या धर्मांधांना उघडं पाडण्याऐवजी पुरोगामी मंडळी हिंदू धर्मालाच नाव ठेवू लागले. हेच जगभरातल्या मुस्लीम आणि ख्रिश्‍चनांमधल्या पुरोगाम्यांचंही झालं असावं. सर्वसामान्यांना धर्माचा आधार वाटतो. त्याच्याशी ते आपलं अस्तित्व बांधून ठेवतात. त्यांचं सगळं जगणंच धर्माशी आणि धर्मश्रद्धेशी जोडलेलं असतं. पुरोगाम्यांनी तो आधार त्यांच्याकडून खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वसामान्यांनी धर्म अधिकच कवटाळून घेतला. त्याचा फायदा धर्मांधांना होत आला आहे.
 
धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ माणूस बनायचं ध्येय चांगलंच आहे. पण बहुसंख्य पुरोगामी माणूसही बनले नाहीत आणि त्यांच्या हातातलं धर्म नावाचं हत्यारही कायमचं निसटून गेलं. हाती राहिलं पोथ्यांचं धुपाटणं. धर्माला नाकारण्याचं तत्त्वज्ञान थोरच आहे. भौतिकतावादाची पार्श्‍वभूमी, तर्क आणि विवेक याचाही सन्मान व्हायलाच हवा. धर्माला सत्ता आणि शस्त्राची जोड मिळाली की त्याचं किळसवाणं रूप घाबरवून टाकणारंच आहे, हे तर त्रिवार मान्य. हे सगळं खरं असलं तरी धर्म नाकारल्यावर पुरोगामी मंडळी धर्माला आपलं मानणार्‍यांपासून लांब गेली. आजही जात आहेत. तची इतरही अनेक कारणं आहेत. पण धर् नाकारणं हे त्यातलं एक मुख्य  कारण आहे. धर्म अफूची गोळी ठरवणार्‍यांपैकी बहुतेकांच्या दृष्टीने कळत नकळत सर्वसामान्य माणसं धर्मभोळी, अंधश्रद्ध, बावळट, प्रतिगामी, अविचारीच नाही तर मध्ययुगीन मानसिकतेचीही ठरली गेली. तुच्छतावादामुळे अनेक बुद्धिवाद्यांना अहंगंडानं ग्रासलं. कुणाला आपलं म्हणावं यापेक्षा कोण आपले नाहीत, यांचीच यादी मोठी बनत गेली. त्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटली. पुरोगाम्यांविषयी त्यांना आदर वाटत राहिला पण आपलेपणा संपला. आज पुरोगामी, सेक्युलर, विद्रोही, समाजवादी, कम्युनिस्ट हे शब्द बहुसंख्यांना आपले वाटत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हिंदुत्ववाद्यांशी चाललेल्या शर्यतीत आपला पराभव झालेला आहे, हे पुरोगाम्यांनी मान्य करायलाच हवं. हे थोडं जास्त वाटत असेल तर मागे पडलो आहोत, असं म्हणावं वाटल्यास. पण टाळू नका, प्लीज. इथे ला निवडणुकांतल्या पराभवाविषयी बोलायचं नाहीय. लोकांच्या पाठिंब्यांच्या आणि त्यापुढे सांगायचं तर सर्वसामान्यांना आपलं वाटण्याच्या बाबतीत पुरोगाम्यांचे हाल बघवत नाहीत. कारण लोकांसाठी प्रामाणिकपणे सर्वस्व वाहिल्यानंतर हे घडलेलं आहे.

सर्वसामान्यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला तरच सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हिंदुत्ववादी पक्षांना मतं दिली म्हणून कुणी धर्मांध होत नाही. दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचं फक्त स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांनाच वाईट वाटलेलं नाही. त्यात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारीही खूप साधी साधी माणसं आहेत. दाभोलकर, पानसरेंविषयी ज्यांना आपलेपणा वाटला ते आपले आणि ज्यांनी निर्लज्जपणे या खुनांचं समर्थन केलं ते आपले नाहीत. ही सीमारेषा आता नीट समजून घ्यायला हवी. त्या धर्मांधांना सोडू नये. पण त्याचवेळेस नव्यांना स्वीकारण्यासाठी बाहू पसरायलाच हवेत. अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त त्यासाठी दोन तीन छोट्या गोष्टी लागतील. सर्वसामान्य माणसाच्या शहाणपणावर भरवसा आणि आदर उभा करावा लागेल. तसंच माणसं बदलू शकतात यावर विश्वास आत आत झिरपवून पक्का करावा लागेल. कोणत्याही लेबलाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाला साद दिली, तर दगडही ओ देतो. क्त ती हाक मारण्याची ताकद कवाला हवी.

सावंतवाडीतल्या संमेलनाच्या तयारीसाठी गोविंदराव पानसरे गोव्याला दोनदा आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ते नसताना खूपच महत्त्वाची वाटते आहे. ते म्हणाले होते आपण कन्विन्सिंग द कन्विन्स्डआता थांबवायला हवं. म्हणजे जे पुरोगामी विचारांविषयी आधीच पक्के आहेत त्यांच्यासमोरच आपण तेच तेच विचार पुन्हा मांडत राहतो. आपल्या कार्यक्रमांना त्यामुळे त्याच त्याच लोकांचं कडबोळं जमा होत राहतं. आपलं वर्तुळ विस्तारत नाहीच, उलट आकुंचन पावत जातं. तेच ते ऐकून बहुतेक कन्विन्स्डही गळू लागतात. आणि आपण नव्यांपर्यंत पोहोचत नाही. आपण नव्यांपर्यंत पोहोचायला हवं.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर जुन्या त्याच त्या स्टिरिओटाइप विचारांना फारसा अर्थ उरलेला नाही. त्याच्याशी आणि त्यांच्या व्यूहरचनेशी लढून कसं संपवायचं, हे धर्मांधांना नीट कळलेलं आहे. मला वाटतं आज या महत्त्वाच्या वळणावर धर्माला स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. ज्यांनी ज्यांनी लोकांमधे राहून लोकांमधे खर्‍या पुरोगामित्वाचे कोंभ फुलवले, त्यापैकी कुणीच कधी धर्म नाकारला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबाराय, महात्मा फुले, गांधीजी, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, साने गुरुजी यापैकी कुणीच धर्माला नाकारलं नव्हतं. उलट धर्माने त्यांच्या चिंतनाचा आणि विचारांचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यांच्यापेक्षा आपण जास्त पुरोगामी आहोत, असं कुणाला वाटत असेल, तर सॉरी बॉस, तुमचा आणि आमचा मार्ग वेगळा आहे.

काहीही करताना ते आधी स्वतःच डोक्यावर घासून घ्यायला शिकवतो तो खरा धर्म. शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाविषयी आपुलकी उभा करतो तो खरा धर्म. सगळ्या लेबलांपलीकडे माणसाला माणूस म्हणून बघायला शिकवतो तो खरा धर्म. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्या खर्‍या धर्माची पताका विवेकवाद्यांनी हाती घ्यायला हवी. तसे झाले तर धर्माचे ढोंग धर्म म्हणून मांडणार्‍या धर्मांधांचे वांदे करता येतील. चिकित्सा करणार्‍यांनी धर्माला सोडलं त्यामुळे धर्माचं मैदान धर्मांधांच्या हातात गेलं. धर्म संकुचित होत गेला. ज्याने विवेक उभा करायचा तो धर्मच आज अविवेकी बनला आहे. प्रेम शिकवणारा धर्म हिंसक झाला आहे. आज जर धर्म असा असेल तर तो खरा धर्म नाहीच. खरा धर्म आम्हाला संतांनी सांगितलाय. खरा धर्म आम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलाय. खरा धर्म सांगणारी मोठी परंपरा आहे आपल्याकडे, नचिकेतापासून ते पतंजलींपर्यंतची, वाल्मिकीपासून लोकायतांपर्यंतची, श्रीकृष्णापासून भगवान बुद्धांपर्यंतची, गोरखनाथांपासून बसवेश्वरांपर्यंतची, निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंतची, नामदेवांपासून गाडगेबाबांपर्यंतची, तुकोबारायांपासून तुकडोजींपर्यंतची, जनाबाईंपासून मदर तेरेसांपर्यंतची, विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंतची, जोतिबांपासून बाबासाहेबांपर्यंतची ही सगळीच परंपरा खरा धर्म सांगत आलीय. तो धर्म व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे. विवेकाला पटणारा आहे. माणुसकीचा अर्थ सांगणारा आहे. अर्थातच यात अनेक परस्परविरोध आहेत. त्यामुळे यातलं सगळंच पटेल असं नाही. त्यातलं जे पटेल ते उचलावं, पटणार नाही ते सोडावं. पण उकिरड्यावरच्या कुत्र्यांनी लचके तोडण्यासाठी धर्माला बेवारस सोडू नये. कारण तो आपला आहे. आपल्या बापांनी तो आपल्यासाठी मांडून ठेवलाय. विचारधारा संपल्यानंतरच्या जगातल्या मोकळ्या विचारांच्या आम्हाला आमच्या भाषेत हे समजावून द्या. खरं सांगतो, आग होईल आग. मग धर्माला धर्मांधांच्या हातातून सोडवणं अशक्य नाही.  
 
मी आज महाराष्ट्राच्या बाहेर राहतो. देशभरातले अनेक मित्र सतत संपर्कात असतात. मला जेवढं कळतं, त्यानुसार आज देश महाराष्ट्राकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. देशातल्या आतापर्यंतच्या सर्वच स्थित्यंतरांत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. ती आजही महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे की नाही, हे माझ्यासारख्या महाराष्ट्राबाहेर राहणार्‍याला विचारा. धर्मांधांना ज्यांचं निव्वळ असणंदेखील खुपलं, ते दोन्ही विचारवंत आजही महाराष्ट्रातले आहेत. जोतिबांच्या पुण्यात दाभोलकरांना आणि शाहूंच्या कोल्हापुरात पानसरेंना संपवलं गेलं आहे. पण म्हणून संतांनी आणि विचारवंतांनी महाराष्ट्राच्या मातीची केलेली मशागत वाया गेलेली नाही. ज्ञानाचा एका’, ‘नाम्याचा तुकाआणि कबिराचा शेखाही आमची व्यापक परंपरा आहे. फक्त आज त्याला चोख्याचा भीमाही नवी जोड देण्याची आवश्यकता आहे. नव्या क्रांतीची ठिणगी फक्त आणि फक्त इथेच पेटली जाऊ शकते. महाराष्ट्र पुरोगामी नाही असं पानसरेंचं वाक्य सर्वत्र सांगितलं जातं. पण ते वाक्य तेवढंच नव्हतं. महाराष्ट्र पुरोगामी होता, आज तो पुरोगामी उरलेला नाही, पण आपल्याला त्याला पुन्हा पुरोगामी बनवायचं आहे, असं पानसरेंनी सांगितलं होतं. आपल्याला त्यांचं स्वप्न वास्तवात उतरवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र् पुरोगामी नाही, हे नकारात्मक पालुपद डोक्यात ठेवून आपल्याला हताश, निराश व्हायचं नाही. धर्मांधांना तेच हवंय. ते आपण होऊ दिलं, तर धर्मांध जिंकतील आणि आमचे दाभोलकर पानसरे हरतील. दाभोलकर पानसरेंना मारणार्‍यांनो, आता बस्स. पाणी डोक्याच्या वर गेलंय आमच्या. आता आमची सटकलीय. आम्ही महाराष्ट्राची पोरं आहोत. आमचा नाद करायचा नाय. आता करा फक्त उलटी गणती. दाभोलकर पानसरेंना आम्ही हरू देणार नाही. त्यांचा विवेक सर्वसामान्य माणसार्पंत पोहोचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करू. ते हरले तर आमचा महाराष्ट्र हरेल. महाराष्ट्राला हरवायला अजून कोणाची माय व्यालेली नाय.

आईबाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, ते आम्ही होऊ देणार नाही. हो साईबाबाच. टाइमपाससारया सिनेमाच्या डायलॉगमधे साईबाबा असेच पोहोचत नाहीत. आज साईबाबा महाराष्ट्रातल्या साध्यासुध्या लोकांच्या जगण्याचे आधार बनले आहेत. आणि कोण कुठला स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेणारा दीडदमडीचा उपटसुंभ येऊन आम्हाला साईबाबा पुजू नका म्हणून सांगत असेल, तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. ते कुठल्या धर्मसंसदेत सांगितलं जात असेल तर आम्ही चुलीत घालतो ती धर्मसंसद. आम्हाला बाकी काही माहीत नाही, या फकिरानं एका पडक्या मशिदीत आजचा देशातला सर्वात मोठा रामनवमीचा उत्सव साजरा करायला आम्हाला शिकवलेलं आहे. चमत्काराच्या आत जाणीवपूर्वक दडवून ठेवलेले साईबाबा आज आम्हाला हवे आहेत. ते साईबाबा नाकारणार्‍यांचं आणि दाभोलकर पानसरेंना मारणार्‍यांचं डोकं सारखंच आहे. गरिबांच्या सेवेत आयुष्य घालवणार्‍या मदर तेरेसांना मेल्यानंतरही बदनाम करत राहावं, इतकं घाबरणार्‍यांच्या डोक्याची ठेवणही त्यांच्यापेक्षा फारशी वेगळी नाही.

अशा डोक्यांना ठिकाणावर आणण्यासाठीचा एक फॉर्म्युला मला इतिहासाच्या पानांमधे दिसतो. मला वाटतं आपल्याला तपशीलवार माहीत असलेल्या इतिहासात दोन महापुरुषांनी हा फॉर्म्युला स्वतःच शोधून यशस्वी करून दाखवलाय. ते आहेत शिवाजी आणि गांधीजी. छत्रपती शिवराय आणि महात्मा गांधी हे परस्परविरोधी वाटावेत, इतकी त्यांची प्रतिमा गढूळ करून आपल्याला सांगितलेली आहे. दोघांचा काळ वेगळा आहे. दोघांची शस्त्र वेगळी आहेत. पण थोडं खरवडलं की या दोघांमधली अनेक साम्यस्थळं दिसतात. मला विचाराल तर आज भारतीय संस्कृती किंवा आयडिया ऑफ इंडियाटिकून राहिली, ती या दोघांमुळेच. आपल्या काळातल्या आपल्या लढ्यांत या दोघांनाही प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. ते त्यांच्या आधी आणि नंतर जवळपास कुणाला मिळालेलं नाही. असं बरंच काही शोधता येईल, शोधायला हवं. पण त्यातल्या दोन गोष्टी इथे अधोरेखित करायच्यात. एक या दोघाचाही सर्वसामान्य माणसांवरचा आणि सर्वसामान्य माणसांचा या दोघांवरचा गाढ विश्वास. निस्तेज पडलेल्या लोकांवर त्यांनी जणू जादूच केली. साधी माणसं त्यांचे सैनिक बनली. त्या साध्याच माणसांनी इतिहासात अजोड असा त्याग आणि शौर्य यांचं दर्शन घडवलं. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसमावेशकता. या दोघांच्याही विचारसरणीच्या चौकटी पोलादी नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीही जाऊ शकत होता. जात, धर्म, प्रांत असा कोणताही शिक्का त्यांच्यावर मारता येत नव्हता. त्यांच्याकडे सगळेच होते. सर्वच विचारधारांचे आणि सर्वच प्रकारचे लोक त्यांच्यासोबत गुण्यागोविंदाने राहत होते. तरीही ते सगळे मिळून एका दिशेने जात होते. आज या दोघांसारखा लोकलढा उभारायचा असेल तर त्यांच्या या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यातली इतरही सूत्रं शोधता येतील. शोधायला हवीत.

मला वाटतं शिवाजी आणि गांधीजी या दोघांनाही आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. खरे शिवाजी आणि खरे गांधीजी. या दोघांविषयी गैरसमजच फार आहेत. ते तोडायला हवेत. पानसरेंचं शिवाजी कोण होता?’ हे त्यासाठीचा आपला आदर्श आहे. आपण साहित्यिक असू तर आपण या दृष्टीने काम करू शकतो. ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांनी शिवाजी कोण होता?’ या विषयावर शंभर भाषणं देण्याचा संकल्प सोडला आहे. गोव्याहून त्याची सुरुवातही झाली आहे. आमचे सोलापूरचे काही मित्र एकत्र आलेत. त्यांनी याच विषयावर बोलण्यासाठी दहा बारा वक्ते तयार केलेत. ते पानसरेंचा शिवाजी घेऊन जिल्हा पिंजून काढणार आहेत. मला ही दोनच उदाहऱणं माहीत आहेत. असं राज्यभर घडत असेल किंवा घडू शकेल. या सर्व वक्त्यांसाठी आपण शिवाजी महाराजांवर शिबिरं आयोजित करू शकतो का? त्यांच्यासाठी महाराजांविषयी विविध संदर्भ असलेलं हँडबूक तयार करता येईल का? ‘शिवाजी कोण होता?’ हे छोटं पुस्तक आहे. स्वस्त आहे. पानसरेंना जाऊन आता फक्त महिना झालाय. पुढच्या अकरा महिन्यांत या पुस्तकाच्या एक लाख प्रती विकायच्या असा विचार आपण करू शकतो का? ‘दाभोलकर कोण होते?’, ‘पानसरे कोण होते?’ अशी या दोघांची चांगली चरित्र लिहायला हवीत. शिवाय लहान मुलांसाठी, कुमारांसाठी सोप्या भाषेत छोटेखानी चरित्रही हवीत. प्रयत्न केला तर हे दोघे शाळेच्या पुस्तकांतही पोहोचू शकतील. पानसरे गेली काही वर्षं सातत्याने शत्रुमित्रविवेकाविषयी बोलत असत. माओच्या एका सिद्धांताचा संदर्भ देत ते कार्यकर्यांनी आता नेमकं काय करायला हवं ते सांगत. त्यांच्या समग्र साहित्यातले संदर्भ, माओचा मूळ सिद्धांत, त्यांची भाषणं शोधून काढत या विषयावर एक छोटी पुस्तिका तयार होऊ शकेल कदाचित. ते खूपच मोलाचं होईल. दाभोलकरांच्या खुनानंतर आपण सनातन संस्थेविषयी बरंच बोलतो आहोत. पण सनातन काय आहे, हे सांगणारं नीट डॉक्युमेंटेशन मात्र आपण केलेलं नाही. गांधीजींच्या खुनानंतर तीन चार दशकांनी त्या कॉन्स्पिरसीवर पुस्तकं यायला सुरुवात झाली. जगन फडणीसांचं एका महात्म्याची अखेर’, . दि. फडकेंचं नथुरामायण’, सदानंद मोरेंचं लोकमान्य ते महात्मा’, तुषार गांधींचं लेट्स किल गांधीही त्याची महत्त्वाची उदाहरणं. ही पुस्तकं आपल्या नकळत खूप काम करत आहेत. अशी पुस्तकं दाभोलकर, पानसरेंच्या खुनाविषयी नाही का लिहिली जाऊ शकत? ‘हू किल्ड करकरे?’ आलं, तसं हू किल्ड दाभोलकर?’ आणि हू किल्ड पानसरे?’ का नको?

या विषयाशी थेट संबंध नाही, पण लेखक म्हणून आपल्याला काय करता येईल, यासाठी माझी एक टू डू लिस्ट आहे. ती जाता जाता सांगतो. त्यातले रिंगणआणि प्रबोधनकार डॉट ऑर्गसारखे प्रयोग आम्ही मित्र करून पाहत आहोत. पण लिस्ट मोठी आहे. हजारो ख्वाहिशे ऐंसी की हर ख्वाहिश पे दम निकले. हिंदुत्ववाद्यांनी खूप मेहनत घेऊन स्वामी विवेकानंदांना हायजॅक केलंय. त्यांना त्यातून सोडवण्यासाठी वैचारिक लेखनाच्या पातळीवर काही प्रयत्न झालेत. पण ते कादंबरी, नाटक या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येऊ शकेल. भारतीय संस्कृतीला ब्राह्मणी म्हणून बाजूला सारणं खूप सोपं आहे. पण ब्राह्मणी ठरवल्या जाणार्‍या या संस्कृतीत ब्राह्मणांच्या तुलनेत बहुजनांचं योगदान फारच मोठं आणि महत्त्वाचं आहे. तशी इतिहासाची मांडणी काही होऊ शकते का? ऋषींचं मूळ शोधता येईल का? वयाच्या तिशीत भांबुर्ड्याला रेल्वेखाली जीव देणारे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत यांच्यावर एखादी कादंबरी किंवा नाटक लिहिलं जाऊ शकतं का? राजारामशास्त्री भागवत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर, धर्मानंद कोसंबी, सत्यशोधक रा. ना. चव्हाण अशा महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला ललामभूत ठरणार्‍या पण दुर्लक्षित असलेल्या विचारवंतांची पुस्तकं आज आपल्यासाठी उपलब्ध नाहीत. पण त्यांची ई बूक्स तयार होऊ शकतात. ती करण्यासाठी कुणी पुढे येईल का? आणि हो, साईबाबांची फिलॉसॉफी नेमकी काय आहे, हे चमत्कारांच्या पुढे जाऊन कुणीतरी मांडायला हवंच ना?

मी थोडा इतिहासात रमणारा असल्यामुळे माझ्या लिखाणाच्या कल्पना या अशा आहेत. तुमच्या डोक्यातली पुस्तकं वेगळीच असतील. ती यायला हवीत. त्यासाठी आपण सगळ्यांनी खूप लिहायला हवं. पण जे लिहू ते आपल्या भाषेत हवं. जे लिहू ते आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असायला हवं. त्यामागे नुसती प्रबळ ऊर्मी नको तर मेहनतही हवी. मजकुराइतकीच त्याची मांडणीही महत्त्वाची आहे, त्यामुळे शैलीवरही आपण काम करायला हवं. लोकनाथ यशवंत माझे आवडते कवी आणि जवळचे ज्येष्ठ मित्र. त्यांची एक कविता आहे,

अंधार झाल्यावर आमची टोळी
शहरात जिथतिथे पत्रके चिटकवायला लागली.
आम्ही डोळ्यात तेल ओतून
चिकी आणि पत्रके संपविली.

उद्या नेमके काहीतरी होणार या उत्साहात
आमच्या निजेल्या शरीरात नवचैतन्य.

भिंती बोलू लागल्या.
रस्तेही बोलू लागलेत सकाळ झाल्यावर.

शहर मात्र नेहमीसारखे शान्त.
आमचा उत्साह निस्तेज.
लोक आपआपल्या कामात.

हप्ता झाला तरी कुठे काहीही नाही,
काही काहीच नाही,
सगळे पूर्वीसारखे गुपचूप.

काल संथ शहरात फेरफटका मारल्यावर
एक जाणवलं.
आता लोक समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालूनच पुढचं बोलतात.

ही कविता ला बळ देते. मला वाटतं आपण आपलं लिहीत राहावं. त्याचा काय प्रभाव पडेल याची चिंता न करता. लिहितानाचा आनंद आणि अस्वस्थता छान एन्जॉय करावी. आपण लिहितो ते आपल्या नकळत आपलं काम करत राहतं. हे काही हवेतलं नाही, तर माझ्या थोड्याबहुत अनुभवाच्या आधारे सांगतो आहे. फक्त त्यासाठी अट एकच आहे. आपलं लिखाण ग्रेट नसलं तरी चालतं, फक्त ते सच्चं मात्र असायला हवं.  

10 comments:

  1. सचिनसर..व्वा किती पोटतिडीकेने सगळं मांडलत..!
    फारच छान..समग्र आढावा घेणारं पण वर्तमानाशी
    नाळ तुटू न देणारं आपलं लेखन खरोखरच ग्रेट..!

    ReplyDelete
  2. सचिनसर..व्वा किती पोटतिडीकेने सगळं मांडलत..!
    फारच छान..समग्र आढावा घेणारं पण वर्तमानाशी
    नाळ तुटू न देणारं आपलं लेखन खरोखरच ग्रेट..!

    ReplyDelete
  3. सचिनसर..व्वा किती पोटतिडीकेने सगळं मांडलत..!
    फारच छान..समग्र आढावा घेणारं पण वर्तमानाशी
    नाळ तुटू न देणारं आपलं लेखन खरोखरच ग्रेट..!

    ReplyDelete
  4. सचिनसर..व्वा किती पोटतिडीकेने सगळं मांडलत..!
    फारच छान..समग्र आढावा घेणारं पण वर्तमानाशी
    नाळ तुटू न देणारं आपलं लेखन खरोखरच ग्रेट..!

    ReplyDelete
  5. खरंच, हजारो ख्वाहिशे पुन्हा प्रफुल्लीत झाल्या.

    ReplyDelete
  6. vichar kasa karava yacha uttam dhada tumhi dilat Sachin saheb. khup dhanyavad.

    ReplyDelete