यंदा
जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत
घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता.
ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.
यास्मिन
शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत
घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा
विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही
दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप
आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.
लेख
लिहिताना यास्मिनजींशी फोनवर बोललो. आपण एका नव्वद वर्षांच्या बाईशी बोलतोय, असं
एक क्षणही वाटलं नाही. त्यांच्याशी थोडक्यात झालेली बातचीत, महेश म्हात्रेंनी
त्यांची घेतलेली मुलाखत आणि राम जगताप यांच्या अक्षरनामा वेबसाइटवरचा
त्यांच्यावरचा लेख, यांचा आधार घेऊन हा छोटासा लेख लिहिलाय. तो तुमच्यासाठी
कटपेस्ट. त्याचा मी काढलेला इण्ट्रो असा होता, `क्लिष्ट मानलं जाणारं व्याकरण फक्त
सोपंच नाही तर सुंदरही असू शकतं हे मराठीतल्या नव्या पिढ्यांना कळलं ते यास्मिन
शेखांमुळे. त्यांना राज्य सरकारचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार घोषित
झालाय. त्यानिमित्ताने.`
यास्मिन
शेखांनी त्यांच्या आठवणी लिहायला हव्यात आणि नीला उपाध्येंनी त्यांच्यावर लिहिलेला
लेखही शोधून ऑनलाइन टाकायला हवाय.
.....
`एक
मुसलमान बाई आपल्याला मराठी कसं शिकवणार?`, बीएचं वर्ष सुरू झालं. मुंबईतील
शीवच्या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजातल्या मुलांना प्रश्न पडला होता.
पण प्राध्यापक वर्गात आल्या आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. ज्येष्ठ
पत्रकार नीला उपाध्ये यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. फक्त या
विद्यार्थ्यांनाच नाही, तर अनेकांना असेच प्रश्न असतात. `तुम्ही कसं काय इतकं छान मराठी बोलता?`, नाव आडनावांच्या पूर्वग्रह आणि
अज्ञानामुळे हा प्रश्न तर ठरलेलाच असतो. नितळ सुंदर मराठी बोलणाऱ्या बाईंचं नाव
असतं यास्मिन शेख. नुकताच राज्य सरकारचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार
घोषित झाल्यामुळे आता कदाचित असा प्रश्न विचारण्यांची संख्या थोडीशी का होईना कमी
होऊ शकेल.
`माझं
लग्न मुसलमान माणसाशी झालेलं असलं तरी मी धर्म नाही बदललेला. मी ज्यू आहे हो`, यास्मिन मॅडम हसत हसत खुलासा करतात.
तरीही अनेकांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह दूर झालेलं नसतं. पण कोकण
किनारपट्टीवरच्या बेने इस्रायलींची संस्कृती माहीत असणाऱ्यांना असे प्रश्न पडणार
नाहीत. धर्माने ज्यू असला तरी मराठी मातीत एकरूप झालेला हा समाज मराठीलाच आपली
मातृभाषा मानत आलेला आहे. मराठी संस्कृतीत त्याने महत्त्वाचं योगदानही दिलेलं आहे.
२१
जून १९२५. यास्मिन शेखांचा जन्म नाशिकच्या मिशनरी हॉस्पिटलात झाला. माहेरचं नाव
जेरूशा रूबेन. त्यांचे आजोबा गुरांच्या दवाखान्यात डॉक्टर होते आणि वडील सार्वजनिक
बांधकाम खात्यात अधिकारी. आईचं नाव रूथ आणि वडिलांचं नाव जॉन रूबेन. वडील फार
शिकलेले नव्हते. तेव्हाची पाचवी म्हणजे आताची नववी. आईचंही शिक्षण अर्धवटच
राहिलेलं होतं. तिला शिकायची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला इंग्रजी
शिकवण्यासाठी घरी शिक्षिका नेमली होती. आई वडील दोघांचीही वाचनाची आवड मुलगी जेरूशाला
वारसा म्हणून मिळाली. घरी खूप पुस्तकं असायचीच, पण भाषेची गोडी लावली ती शाळेने.
वडिलांच्या
बदलीमुळे पंढरपूरच्या आपटे स्कूल आणि विक्टोरिया ज्युबिली हायस्कूलला त्या दुसरी
ते मॅट्रिक शिकल्या. आपटे स्कूलमधले चळेकर सर मराठी इतकं छान शिकवत की छोटी जेरूशा
कायमची भाषेची विद्यार्थिनी बनली. कऱ्हाड, वाई इथे काही वर्षं राहिल्यानंतर त्या
पुण्यात एस. पी. कॉलेजात शिकल्या. तिथे श्री. म. माटे यांचासारखे गुरू असल्याने
त्यांचा भाषेकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन मिळाला. पुढे मुंबईतल्या एसआयईएस
कॉलेजात जवळपास तीन दशकं मराठीचं अध्यापन करताना श्री. पु. भागवतांसारखे निष्णात
संपादक सहकारी म्हणून लाभले. मूळ नाशिककर असल्यामुळे वसंत कानेटकरांकडूनही त्यांना
शिकता आलं.
अनेक
थोरामोठ्यांचा सहवास लाभला तरी यास्मिन शेख यांचं वैयाकरणी आणि भाषाशास्त्रज्ञ
म्हणून व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व स्वतंत्र आहे. शहरांऐवजी अस्सल मऱ्हाठी मुलखात
बालपण गेल्यामुळे मराठीच्या रसरशीतपणाशी त्या जवळून परिचित होत्या. विविध
संस्कृतींच्या व्यापकतेचे संस्कार पेलून त्या प्रत्यक्ष जगत होत्या. कॉलेजात शिकवत
असतानाच त्यांनी डेक्कन कॉलेजात आधुनिक भाषाशास्त्राचा अभ्यासक्रमही पूर्ण केला
होता. आधीच्या भाषाशास्त्रज्ञांसारखा त्यांचा पिंड संस्कृतवर पोसलेला नव्हता.
त्यांनी उच्चशिक्षणासाठी कधीच संस्कृत हा विषय घेतलेला नव्हता. त्यामुळे मराठीच्या
व्याकरणाला आणि भाषाशास्त्राला त्यांना मराठी म्हणून पाहता आलं. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही दोन पुस्तकं
त्याची साक्षीदार आहेत.
`मराठी व्याकरणाचे नियम तयार करणारे बहुतेक
संस्कृतज्ञच होते. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या संज्ञा सर्वसामान्यांना कळणं कठीण
होतं. मी एकदा बीएच्या वर्गात विचारलं होतं की सामान्यरूप म्हणजे काय? तेव्हा उत्तर आलं होतं की एखादी
सामान्य दिसत असेल तर ते सामान्यरूप. त्यामुळे व्याकरणाविषयी लिहिताना
विद्यार्थ्यालाही समजेल अशा सोप्या शब्दांत लिहिण्याचा मी प्रयत्न केला, ` यास्मिनजी सांगतात. व्याकरणाचे सरकारी
नियम सर्वसामान्यांना कळत नाहीत. म्हणून ते सोपे करून सांगण्याची कल्पना मराठी
भाषा विकास मंडळाच्या वसुंधरा पेंडसे नाईकांची. ती आकाराला आली यास्मिन शेख
यांच्या `मराठी
लेखन मार्गदर्शिका` या पुस्तकामुळे. `मराठी शब्दलेखनकोश`ही असाच मराठी लिखाणासाठी मार्गदर्शक ठरला. या दोन्ही पुस्तकांचं बोट
धरून मराठी लिहिणाऱ्यांच्या काही पिढ्या घडल्या आहेत. एरव्ही क्लिष्ट मानलं गेलेलं
व्याकरण हे फक्त सोपंच नाही तर सुंदरही असू शकतं, हे या पुस्तकांनी दाखवून दिलंय.
मराठी
ही ठरलेल्या नियमांनुसार लिहिली जावी असं त्यांना वाटतं. पण त्याविषयी त्या दुराग्रही
नाहीत. सध्या असलेले काही नियम काळानुरूप बदलायला हवेत, असंही त्यांना वाटतं. `ग्रांथिक किंवा लिखित भाषा ही बोली
भाषेपेक्षा वेगळी असणारच. भाषेत शुद्ध अशुद्ध काही नसतं. आपलं व्यक्तिगत मत काही
का असेना तज्ज्ञांनी ठरवून दिलेल्या आणि सरकारने मान्य केलेल्या नियमांचं पालन
करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. प्रत्येकाने आपले नियम तयार करून लिहिले
तर भाषिक अनागोंदीच होईल.` असं त्यांचं मत त्या स्पष्टपणे सांगतात. त्यासाठी त्या आग्रहीदेखील
आहेत. हा प्रयत्न फक्त पुस्तकीही नाही. चांगलं मराठी शिकवण्यासाठी त्या सतत
प्रयत्न करत आल्या आहेत.
मातृभाषेचं
अंगिकारलेलं व्रत आज ९१व्या वर्षीही त्या निष्ठेने निभावत आहेत. `आजही मला शंका विचारण्यासाठी दूरदूरून
फोन येत असतात. अगदी स्वित्झर्लंड आणि अमेरिकेहूनही फोन येतात. मी माझ्या हातातलं
काम सोडून त्यांच्या शंकांचं निरसन करते. ते मला माझ्या मातृभाषेचं काम वाटतं. मला
काही येत नसेल तर ते शोधते आणि संबंधितांचं पत्र लिहून समाधान करते,` त्या सांगतात. गेल्याच वर्षी पायाचं
ऑपरेशन झाल्यामुळे त्या आळीपाळीने त्यांच्या उच्चविद्याविभूषित मुली डॉ. शमा आणि
प्रा. रुकसाना यांच्या घरी राहतात. त्यामुळे घरच्या लॅंडलाइन फोनवरून सुरू असणारं
हे विद्यादान थोडं थांबलेलं आहे. आता त्यांचा मोबाईल नंबर जसजसा पसरतो आहे, तसंही
हे सत्र त्यावरही सुरू झालं आहे. शिवाय `अंतर्नाद` या मासिकासाठी व्याकरण सल्लागार
म्हणूनही त्या सक्रिय आहेत.
२७
फेब्रुवारी २०१७ रोजी यास्मिनजींना भाषा अभ्यासक पुरस्कार समारंभपूर्वक दिला जाईल.
`आता
मृत्यू जवळ आला आहे. इतक्या उशिरा दखल घेतली गेली, तरी त्याचा मला अत्यंत आनंद
झाला. हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वस्वी अनपेक्षित होता. मी कोणत्याही
पुरस्कारासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. कारण मातृभाषेची सेवा हे माझ्यासाठी व्रत
आहे. मातृभाषा आपल्यापरीनं समृद्ध करत राहणं, हाच माझ्या जीवनाचा हेतू आहे.
भाषाशास्त्र आणि व्याकरण हे माझ्या अभ्यासाचे आणि आनंदाचे विषय आहेत.` त्यांची ही प्रतिक्रिया त्यांच्या
जीवननिष्ठेचं सार सांगणारी आहे.
शांतपणे
काम करत राहणं हा यास्मिनजींचा स्वभाव आहे. त्या स्वतःविषयी कधीच काही लिहित
नाहीत. पण त्यांच्या ९१ वर्षांच्या समृद्ध आयुष्यात व्याकरणाच्या पलीकडेही खूप
काही आहे. त्यांनी त्यांच्या आठवणी लिहून काढायला हव्यात. स्वतःविषयी लिहायचं नसेल
तर मराठीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षीदार म्हणून तरी त्यांनी ते लिहायला
हवं.
No comments:
Post a Comment