अविनाश दुधे माझा
मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी
त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव
संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी
काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे
माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने
अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप
मोठा आहे.
टोकाच्या
उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा
स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या
प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं
लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना
पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून
घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा
आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड
मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत
आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.
सुरुवात नागपूर तरुण
भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो
त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची
नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या
बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी
लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला
घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला.
नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा
सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन
थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही
गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला
विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का?` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते
लिहिलंय.