Friday 24 March 2017

तळवलकर मला भेटले


मटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन
गोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.
..........

छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.


पण ती काही तळवलकरांशी पहिली भेट नव्हती. इतर लोक ज्याला झोपडपट्टी म्हणतात अशा बैठ्या चाळींतल्या माझ्या घरात महाराष्ट्र टाइम्स का यायचा ते मला कधीच कळलं नाही. आमच्या पप्पांना कितीदा तरी विचारलं तरी त्यांनाही ते माहीत नव्हतं. माझा जन्म ७७ सालचा. त्याआधी पंधरा वर्षं म्हणजे पहिल्या अंकापासून मटा आमच्या घरी येत होता. पेपर म्हणजे आमच्यासाठी मटाच. तो नसेल तर दुसरा कुठलाही नको म्हणून आमच्या घरचे पेपरवाल्याला सांगायचे. त्याच्याकडे पाचशे पेपरची तरी लाइन होती. त्यात आमचा एकमेव मटा असायचा. मटामधला संदर्भ शोधत शोधत लांबून लांबून लोक यायचे आमच्याकडे. मला बऱ्यापैकी कळायला लागल्यापासून मी मटा वाचतोय. पेपरचा एक संपादक असतो आणि तो मोठा माणूस गोविंद तळवळकर या नावाचा असतो, हे मला माहीत होतं. तो माणूस मला माझ्या न कळत घडवत होता. माझ्या घरात तळवलकरांचा मटा येत नसता तर मी पत्रकार नसतो नक्की.

तळवळकर हेच मटाचे पहिले संपादक आहेत, असंच मला वाटायचं. त्यांना मटा द्वा. भ. कर्णिकांसारख्या जाणकार माणसाकडून मिळाला. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्या रा. के. लेलेंनी नोंदवलंय की मटाच्या पहिल्या दिवसाची प्रिंट ऑर्डर ७५ हजारांची होती. मला वाटतं असं भाग्य तोवर महाराष्ट्रात तर नाहीच, देशात आणि जगातही खूप कमी पेपरांना लाभलं असेल. ते भाग्य, जमीजमायी मजबूत टीम आणि पाच सहा वर्षांचा जमाजमाया पेपर तळवळकरांना संपादक म्हणून हातात मिळाला. ते मटाच्या पहिल्या दिवसापासून सहसंपादक होते. अग्रलेख फारसं कुणी वाचत नाही असं कर्णिकांना वाटायचं आणि तळवळकरांसाठी अग्रलेख हे अभिव्यक्तीचं सगळ्यात मोठं साधन होतं. ह. रा. महाजनींनी तळवळकरांच्या लोकसत्तेतल्या पहिल्या दिवशी अग्रलेख लिहायला लावला, अशी आख्यायिका आहे. ते मटाचे संपादक बनेपर्यंत अग्रलेखांवर त्यांची मांड पक्की बसली होती. त्यांच्या अग्रलेखांचा दरारा इतका जबरदस्त होता की ते संपादक असेपर्यंतचा काळ मराठी पत्रकारितेतलं तळवळकर युग मानायला हवं किंबहुना मानलं गेलं.

आचार्य अत्रे युगाचा अस्त होत असताना तळवलकरांच्या कारकीर्दीला बहर आलेला दिसतो. अत्रे हे अजस्र व्यक्तिमत्त्व होतं. राजकारण, समाजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रांत त्यांचं कर्तृत्व बहरलेलं होतं. त्यांच्यासारखंच सभासंमेलनं गाजवणं हा संपादकपदाचं काम मानलं जात होतं. त्याला तळवलकरांनी उभा छेद दिला. त्यांनी मराठी पत्रकारितेत संपादकपणाचे आधुनिक मानदंड उभे केले. वर्तमानपत्र या आपल्या हातातल्या माध्यमाच्या ताकदीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते त्यांना पुरेसं वाटत होतं. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातल्या चळवळी पत्रकारितेचं ओझं फेकून दिलं. निव्वळ पत्रकारितेसाठी पत्रकारिता करण्याचा तटस्थपणा त्यांनी मराठीत आणला. एकूण मराठी पत्रकारितेलाच आधुनिकतेकडे घेऊन जाण्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. त्यांच्या लिखाणाने माझ्या पिढीपर्यंतचे संपादक घडवलेत, ही एकच गोष्ट त्यांच्या आधुनिकतेची साक्ष द्यायला पुरेशी आहे.

आज क्षणोक्षणी माहितीचा विस्फोट होतोय. साखळी वर्तमानपत्रांच्या आवृत्त्यांची गर्दी झालीय. टीव्ही इंटरनेटसारख्या नव्या माध्यमांनी वर्तमानपत्रांसमोर आव्हानं उभी केलीत. अशावेळेस एखाद्या वर्तमानपत्राला मटाने तळवळकरांच्या काळात मिळवलं होतं तसं स्थान मिळवणं शक्य नाही. तेव्हाचं जग पूर्णपणे वेगळं होतं. आताचं वेगळं आहे. तेव्हाच्या संपादकपदाची कामं वेगळी होती. आता वेगळी आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकारितेला शिव्या देत तळवळकरांचं मोठेपण सांगणं सोपं आहे. पण तशी तुलना केली नाही, तरच तळवळकरांचं कर्तृत्व अधिक नेमकेपणानं शोधता येतं.

तळवळकरांचे चांगले अग्रलेख आपल्याला आजही पुस्तकांमधून वाचता येतात. कोणत्याही बऱ्या लायब्ररीत त्यांची पुस्तक मिळतातच. कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. सोपी वाटणारी मस्त मराठी त्यात सापडते. लेखांची मांडणीही घोटीव आणि बांधीव. एखादा शब्द जरी बाजुला केला तरी सगळा लेख गडगडत खाली कोसळेल असं वाटायला लावणारी. जुन्या आणि नव्या शब्दांचा नेमका वापर. आणि हेडिंग! क्या बात! ती टोकदारपेक्षाही तीक्ष्ण म्हणावीत अशी. कधी कुणी त्यांना गावलाच तर अख्ख्या अग्रलेखांतही तो तीक्ष्णपणा उतरायचा. भाषा संयत पण समोरचा रक्तबंबाळ होऊन जायचा. विद्या बालनच्या कहानी सिनेमात एक कुटुंबवत्सल चेहऱ्याचा खुनी आहे. तो विद्या बालनलाही रेल्वे रुळांवर ढकलायचा प्रयत्न करतो. आठवतोय? त्याचं ते अचानक हिंस्र बनणं अंगावर काटा आणतं. तसंच तळवळकरांचे धारदार अग्रलेख वाचताना वाटतं. ते एकदम अंगावर येतात. या लेखांनी तेव्हा काय खळबळ माजवली असेल याचा अंदाज बांधता येतो.

हे त्यांच्या लिखाणचं ठळक वैशिष्ट्य मानायला हवं. त्यामुळेच तळवलकरांवर लोकमान्य टिळकांचा प्रभाव असल्याचं ढोबळ विधान सर्रास केलं जातं. मटामधल्या बातमीतही ते आहे. पण तो प्रभाव त्यांच्या अग्रलेखांच्या नाट्यमय रचनेपुरता मर्यादित होता. फारतर शीर्षकांमध्ये आणि आकर्षक वाक्यरचनांमध्ये तो शोधता येतो. त्यांच्यावरचा वैचारिक प्रभाव टिळकांचें वैचारिक विरोधक असणाऱ्या न्यायमूर्ती रानडे आणि त्याहीपेक्षा गोपाळकृष्ण गोखलेंचा आहे. तळवळकरांनी तिघांवरही पुस्तकं लिहिलीत. त्यातून गोखलेंच्या नेमस्त, मवाळ पण विद्वत्त्वापूर्ण विचारांचा घट्ट प्रभाव दिसून येतो. फक्त लिखाणावरच नाही तर त्यांच्या एकूण विलायती डोंबिवलीकर स्वभावशैलीवरही तो असावा.

महात्मा गांधी हे गोखलेंना गुरू मानत असले तरी गोखलेंच्या महाराष्ट्रीय अनुयायांनी गांधींना कधीच आपलं मानलं नाही. गोखलेंच्या भारत सेवक समाजाचं साधं सदस्यत्वही गांधीजींना मिळू दिलं नाही. टिळकही या गोखलेपंथीयांच्या फार आवडीचे नव्हते. मुंबई पुण्यातला हा उच्चविद्याविभूषित पांढरपेशा वर्ग पुढे थेट पंडित नेहरूंच्या प्रेमात पडलेला आढळतो. गांधींना बायपास करून नेहरूंकडे जाणं हा ट्रेंड त्या काळातल्या पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीय विचारवंतांमध्ये आढळतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळाचा इतिहास मांडणारी त्यांची पुस्तकं वाचताना तळवळकरही त्याला अपवाद नसल्याचं आढळतं. मग ते `सत्तांतर`सारखा दस्तावेज असो की `नवरोजी ते नेहरू` आणि `नियतीशी करार` असो. `वेल्थ विदाऊट वर्क`, `नॉलेज विदाऊट कॅरेक्टर` अशी सात सामाजिक पापं गांधीजींनी सांगितलीत. त्यात `नेहरू विदाऊट गांधी` हे नवं पापंही जोडायला हवं. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उदयाला आलेल्या नवमध्यमवर्गाला गांधींपासून दूर नेण्याचं काम तळवळकर आणि त्यांच्या पिढीकडून अजाणतेपणी झालं असावं. कुमार केतकरांनी मटात तळवलकरांवर लिहिलेल्या लेखात गांधीजींचा दोनदा उल्लेख आहे खरा, पण गांधी हा तळवलकरांवरचा मुख्य प्रभाव असल्याचं त्यांच्या पुस्तकांमध्ये तरी सापडत नाही. वार्धक्यात बालपणीचे संस्कार जागे होतात असं म्हणतात. तळवलकरांवर त्यांचे काका गोपीनाथ तळवळकर यांनी लहानपणी गांधीवादी संस्कार केले होते.

ज्ञान, कर्म, भक्ती हे त्रिविध मार्ग भारतीय परंपरेत सांगितलेले आहेत. त्याच्याशी थेट जोडता येत नसलं तरी संपादकांच्या काम करण्याच्या पद्धतीशी त्यांची तुलना होऊ शकते. थेट संपादकानेच लोकांमध्ये जावं. त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला वाचा फोडावी. त्याचबरोबर इतर सार्वजनिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्यात. हा तोवरचा यशस्वी संपादकांचा धोपटमार्ग होता. मराठीत ही कर्ममार्गाची परंपरा टिळकांपासून अत्रेंपर्यंत आणि त्यानंतर माधव गडकरींसह त्यांच्या प्रभावातल्या इतर संपादकांनी ताकदीने चालवली. दुसरी भक्तीची परंपरा ही एखाद्या विचारधारेला, राजकीय पक्षाला, तत्कालीन नेतृत्वाला किंवा मालकांना प्रमाण मानून केलेल्या संपादकपणाचा मार्ग मानता येईल. त्याची उदाहऱणं वेगळी देण्याची गरज नाही. तळवलकरांचा संपादनमार्ग हा शुद्ध ज्ञानमार्गी होता. आपण अधिकाधिक ज्ञान मिळवावं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवावं. हीच त्यांच्या संपादकीय लिखाणाची मूळ प्रेरणा होती. प्रबोधन वगैरे गोष्टींपेक्षाही उत्तमोत्तम गोष्टी आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची अद्भूत अशी असोशी त्यामागे होती. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांनी जगभरातले आधुनिक विचारप्रवाह पचवले होते. ते शेवटपर्यंत जगभरातलं नवनवीन संशोधन वाचत होते. ते आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवत होते. ती आपली पॅशन जोपासण्यासाठी अत्यंत अनुरूप व्यवसायात असल्याबद्दल त्यांना समाधान होतं.

महाराष्ट्राच्या पत्रकारितेत दोन वृत्तपत्रांच्या जन्माचा काळ त्यांचं महत्त्व अधोरेखित करतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या एक्स्प्रेस समूहाचं `लोकसत्ता` सुरू झालं आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र टाइम्स. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी टाइम्स समूहाने मराठी वृत्तपत्र सुरू करावं, ही कल्पना यशवंतराव चव्हाणांची. ती अपेक्षा तळवळकरांनी पूर्ण केली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीवर त्यांनी आपला प्रभाव टाकलाच. पण साहित्य, संगीत, नाट्य, सिनेमा, क्रीडा अशा सांस्कृतिक अंगांनाही त्यांचा अभिजात स्पर्श झाला. जगभरातली उत्तमोत्तम पुस्तकं, सर्व महत्त्वाचे विचारवंत आणि शीतयुद्धकालीन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केलं. आम्ही विचार देतो, फक्त बातम्या नाही, असं मटा जाहिरातींमध्ये सांगू शकला ते तळवकरांमुळेच. 

यशवंतराव चव्हाणांशी असलेलं त्यांची मैत्री महाराष्ट्राच्या घडणीत महत्त्वाची ठरली. एकमेकांच्या सत्तेचा स्वार्थी फायदा उचलणं हा दोघांचाही स्वभाव नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राच्या जे भल्याचं वाटलं ते त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी एकमेकांची पाठराखण केली. तळवळकरांचा तो पांठिंबा सुरुवातीच्या काळात शऱद पवारांनाही मिळाला. आपण वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केलं ते तळवलकरांचा अग्रलेख वाचूनच, असं शरद पवारांनी अनेकदा नोंदवलंय. `हे राज्य जावे ही श्रींची इच्छा` या तळवलकरांच्या प्रसिद्ध अग्रलेखात यशवंतरावांचा आदेश आलेला आहे, अशी पवारांची भावना होती. पुढे बहुदा यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना तळवलकरांनीही ते खरं असल्याचं सांगितलं होतं.

महाराष्ट्रातील राजकारणाविषयी काही अडचण आली तर तळवलकरांशी चर्चा करावी, असा सल्ला इंदिरा गांधींनी राजीव गांधींना दिला होता म्हणे. ते खरंही असू शकतं. जागतिक परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहू शकण्याची त्यांची समज तेवढ्या ताकदीची होतीच. शिवाय काँग्रेस हा एक पक्ष म्हणून नाही तर सर्वसमावेशक, उदारमतवादी विचारधारा म्हणून त्याचे संरक्षण करायला हवं, अशी भावना तळवलकरांच्या अग्रलेखातून दिसून येते. कट्टरांना तर त्यांनी फोडून काढलंच पण पुरोगाम्यांच्याही कोत्या राजकारणावर त्यांच्या अग्रलेखांतून टिकेचा आसूड सातत्याने उगारलेला दिसतो. 

मैत्री आपल्या कामाआड येऊ न देण्याइतपत मोठी माणसं तेव्हा होती. संपादकपदाच्या शेवटच्या टप्प्यात, विशेषतः मुंबई दंगलींच्या काळात तळवलकरांनी बाळासाहेब ठाकरेंवर लिहिलेले अग्रलेख निखाऱ्यासारखे होते. ते वाचताना त्यांची बाळासाहेबांशी छान मैत्री होती, हे खरंच वाटत नाही. बाळासाहेबांनीही त्यांच्या शिवराळ भाषणांमधून तळवळकरांना सोडलं नाही. ते तळवळकर–गडकरींना गोंद्या-म्हाद्या म्हणून डिवचायचे. आज मोदी जमान्यात सोशल नेटवर्किंगमध्ये ज्याला ट्रोलिंग म्हणतो, ते बाळासाहेब तेव्हा करत होते. हिंदुत्वाच्या नादी लागलेल्या सर्वसामान्य वाचकांच्या मनावरचा तळवलकरांचा पगडा काही प्रमाणात कमी करण्यात बाळासाहेब यशस्वी झाले होते. झालं ते वाईट झालं, तरी तसं झालं खरं.

यशवंतरावांबरोबरच शरद पवार, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, मे. पुं. रेगे असे दिग्गज तळवलकरांच्या नियमित बैठकीत असत. त्यांच्यासह अनेक थोरामोठ्यांचं लिखाण फक्त मटातूनच प्रसिद्ध होत असे. त्यातून मटा ठरवेल तेच श्रेष्ठ असं एक समीकरण घडत गेलं. सिनेमा, संगीत, नाटक, साहित्य याविषयीची मराठी शहरी मध्यमवर्गाची अभिरूची तळवलकरांचा मटा घडवत होता. एखाद्या वर्तमानपत्राच्या प्रभावाचा तो परमोच्चबिंदू होता. यामुळे अनेक प्रतिभावंत घडले. पण त्यापेक्षाही जास्त प्रतिभावंतांच्या मनात कायमचे न्यूनगंडही निर्माण झाले. मुंबई पुण्याबाहेरच्या प्रतिभावंतांवर तसंच मध्यमवर्गीय जाणिवेच्या पलीकडे असणाऱ्या कलानिर्मितीवर आणि विचारविश्वार अन्याय झाल्याची भावना त्यातून निर्माण झाली. तळवलकरांचा मटा महाराष्ट्रापर्यंत जगातलं सर्वोत्तम पोहोचवत होता, हे खरं. पण त्याचा या महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टीकोन शहरी, मध्यमवर्गीय आणि अभिजनी होता, हेही विसरता येणार नाही. त्यांच्या मटातून महाराष्ट्राला युरोप, अमेरिका आणि रशिया कळला. पण त्याच मटाला महाराष्ट्र कळला होता का, शंकाच आहे. त्या महाराष्ट्राशी बहुदा त्याचं काही घेणंदेणं नव्हतंच.

राम गणेश गडकरींचा पुतळा उखडल्यानंतर तळवलकरांनी साप्ताहिक साधनात दोनेक महिन्यांपूर्वी एक लेख लिहिला. अमेरिकेत राहून लिहिलेला तो लेख वाचनीयतेच्या निकषावर सरसच होता. पण आज महाराष्ट्रातल्या तरुणांच्या एका मोठ्या गटात या विषयावर कसा आक्रोश आहे, याचं सोयरसूतक त्या लेखाला नव्हतं. या वयात त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं योग्य नाही. तरी आज पुस्तकांमध्ये उपलब्ध असलेल्या त्यांच्या लिखाणातही ते सोयरसूतक अपवादानेच सापडत. असं असलं तरी त्यांच्या लिखाणाचं मोल तसूभरही कमी होत नाही. त्या मर्यादा त्यांच्या काळाच्या होत्या. १९२५ साली डोंबिवलीत जन्मलेल्या तळवलकरांनी त्यांना असलेल्या चौकटीच्या बाहेरचंही खूप काही वाचकांसमोर आणलं. त्यांची उदारमतवादाशी, सेक्युलॅरिझमशी, आधुनिकतेशी आणि महाराष्ट्राशी असलेल्या बांधिलकीमुळे ते फारच मोठे ठऱतात.   

संपादकपदावरून गेल्यानंतर तळवलकरांचे अनेक समकालीन विस्मृतीत गेले. पण त्यांचं तसं झालं नाही. महाराष्ट्रापासून इतक्या दूर, कोणतंही पद नसताना ते महाराष्ट्राशी संवाद साधतच राहिले. त्यांची ज्ञानमार्गावरची निष्ठा बिल्कूल कमी झाली नाही. ते केवळ वाचण्यासाठी नवनवीन वाचत राहिले आणि मराठी वाचकांना त्याचा परिचय देत राहिले. शेवटची अनेक वर्षं ते `साप्ताहिक साधना`त सातत्याने लिहित होते. तो मोठाच ठेवा आहे. कारण त्यांनी त्यात जे लिहिलंय ते मांडू शकणारं आजतरी मराठीत दुसरं कुणी नाही. त्यातील बहुदा चार्ल्स डिकन्सवरच्या एका लेखातले काही मुद्दे शब्दांसह कोणतंही श्रेय न देता अग्रलेखात वापरण्याचा मोह गिरीश कुबेरांसारख्या आजच्या संपादकालाही आवरला नाही. त्यातून नव्वदीतही टिकवून ठेवलेल्या तळवलकरांच्या ज्ञानमार्गावरचं मोठेपण अधोरेखित झालं.


बाकी एक सांगायचं राहिलं. माझ्या लहानपणी आमच्या परिसरात येणाऱ्या पाचशे पेपरांपैकी एकच मटा असायचा. आता किमान दीडदोनशे तरी मटा असतातच. पण नुकतेच पेपर चाळू लागलेल्या माझ्या मुलाला मला बालपणी सापडले होते तसे तळवलकर सापडत नाहीत. ते आजच्या मटातून कधीचेच दूर गेलेत. त्यांचा हा प्रभाव घालवण्यात मटात काम करताना माझाही अगदी किंचितसा पण हातभार होताच. त्याबद्दल अभिमान बाळगावा की खंत करावी, याविषयी मी खूपच गोंधळात आहे. 

8 comments:

  1. खूप छान लिहिलत. मी सुद्धा वर्धेजवळच्या एका खेड्यात लहानपणी वडिलांमुळे म टा वाचायचे . भाषा कठीण वाटायची पण हे काहीतरी चांगलं लिहिलंय व आपल्याला ते समजायला हवं अशी असोशी असायची. नंतर कळत गेले की संपादकांमुळे म टाचं हे स्टँडर्ड आहे व गोविंदराव तळवलकरांची महती कळली. महाराष्ट्र वैशिष्ट्यपूर्ण आहे तो अशाच विवेकी, पुरोगामी, निर्भीड विचारवंतांमुळे.तुम्ही छान मांडलेत.
    गोविंदराव तळवलकरांना हार्दिक अभिवादन!

    ReplyDelete
  2. तळवलकरांवर तीन चार लेख काल परवा पासून वाचतो आहे, 'आता निघायला हवे'.. लोकसत्ता मधल्या लेखानंतर तुमचा लेख पण वेगळा वाटला.

    ReplyDelete
  3. मस्त, आपला लेख वाचून तळवलकरांच्या क्षेत्रात आपण थोडसं काम केलं, करतोय, याचं अगदी छोटं समाधान वाटलं.

    ReplyDelete
  4. सर, छान झालाय लेख

    ReplyDelete
  5. संपादकपदाचा बाज , त्यांची शान आणि त्यांचा दरारा... सारे नेमक्या शब्दात टिपणारा हा लेख आजच्या पत्रकार म्हणविणाऱ्या सर्वांनी वाचावा असाच आहे.

    ReplyDelete
  6. मी सेकंड लास्ट पॅरेग्राफात उल्लेख केलेला अग्रलेख प्रशांत दीक्षितांनी लिहिला होता, असं लोकसत्तातून एका मित्राने कळवलंय. गिरीश कुबेरां विषयी गैरसमज नकोत, म्हणून हा रिप्लाय.

    ReplyDelete
  7. सचिन ; खूप छान लिहिलयस !!!
    ** ‎अशोक करंबेळकर‎

    ReplyDelete