Friday, 10 March 2017

दिल हैं हिंदुस्तानी


अविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.

टोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.

सुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का?` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.


मोदींच्या दिग्विजयामुळे अनेक पुरोगामी मित्रमंडळी अधिक उत्साहात लढण्यासाठी तयार होताना दिसताहेत. पण निराश होणाऱ्यांची संख्याही कमी नाही. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या भाजपच्या विजयामुळे तर हे कोमात जाताना दिसत आहेत. असं निराश होण्याची फारशी गरज नाही, असं मला वाटतं. असे चढउतार तर होतच असतात. मला वाटत नाही अविनाश निराश झाला असेल. म्हणूनच त्याला माझा लेख आवडला. तुम्हालाही आवडेल बहुतेक.

बाकी माझा लेख आहे म्हणून नाही, पण मीडिया वॉचचा अंक मस्त झालाय. बुकगंगावर उपलब्ध आहे. विकत घेऊन वाचाच.
........

एक मोदी जिंकले. तुफान मताधिक्याने जिंकले. त्यांचा पक्ष नगरपालिका निवडणुकांमधे जिंकला. त्यांच्या त्रासदायक निर्णयांनाही पाठिंबा मिळाला. फक्त म्हणून आपण भारतीय आता कट्टर ठरतो आहोत.

आपल्या देशात इंटरनेट असणारे किती? त्यात फेसबुकवर असणारे किती? त्यात अक्टिव असणारे किती? त्यापैकी मोदींचे भक्त म्हणून मैदानात उतरणारे किती? त्यातले पगारी नोकरदार किती आणि खरे मोदीभक्त किती? हा हिशेब किती सोपा? तरीही आपण भारतीय, त्यातही मध्यमवर्ग आता असहिष्णू ठरतो आहोत.  
   
आपल्यातले विचारवंत काहीही सांगोत. पण खरं हे आहे की आपण आहोत तसेच आहोत. कुणी महापुरुष जन्मोत की कुणा देवाने अवतार घेवो, आपण काही बदलत नाही. आपण दगडाला चिकटून राहणारी लव्हाळी. महापुराने वृक्ष कोसळतात. लव्हाळी तशीच राहतात. आहोत तसंच राहणं, हा आपला राष्ट्रीय गुणधर्म आहे. आम्ही बदलत नाही, आम्ही फक्त प्रभावित होत राहतो.

आपल्यात डावे आहेत, उजवे आहेत, पण त्यापेक्षा मधले खूप मोठ्या संख्येने आहेत. कधी वारं डाव्या बाजूला असतं. कधी उजव्या बाजूला असतं. आपण बहुसंख्य मधले फार मनावर नाही घेत ते. हजारो वर्षांच्या इतिहासात आपण अनेक आक्रमणं झेललीत. जगात असे अनेक देश आहेत, मुसलमानांची आक्रमण झालं की ते मुसलमान झालेत. ख्रिश्चन आल्यावर ख्रिश्चन बनलेत. आपण या सगळ्यांच्या आक्रमणांना, सत्तांना गिळून टाकलंय कधीचंच. इथे येऊन हे जगावर सत्ता गाजवणारे धर्मही बदलून गेले. आपण हिंदू धर्माचं काय केलंय, ते कुणालाच माहीत नाही. हा धर्म आहे की नाही, अशी त्याची परिस्थिती करून ठेवलीय. हिंदू धर्मात इतका बदल झालाय की त्याचं मूळ स्वरूप मी सांगतो तसंच आहे, असं छातीठोक सांगणारा एकतर मठ्ठ किंवा मार्केटिंगवालाच असणार.

भगवान बुद्ध आले की आपण करुणेच्या प्रभावात वाहून गेलो. आद्य शंकराचार्य आले की आम्ही भगवान बुद्धांना विसरून गेलो. नंतर आम्ही दोघांनाही लक्षात ठेवलं नाही, हे त्यापेक्षा जास्त सत्य. आपण म्हणालो की आपल्यावर बुद्धांचा प्रभाव आहे, तर तेही खरं आहे. आपण म्हणालो की बुद्धांचा प्रभाव आमच्यावर नाही. तर तेही खरंच आहे. तेच शंकरायार्यांबाबतही. आपण सगळ्यांमधलं चांगलं - वाईट स्वतःपाशी ठेवून घेत पुढे सरकतो. नावं बदलतात, स्वरूप बदलतं. आपल्यातला चांगुलपणा टिकून राहतो. आपल्यातला वाईटपणा टिकून राहतो. ती आपली `जगण्याची समृद्ध अडगळ` आहे. म्हटलं तर आपण तिच्या जिवावर जगतो. म्हटलं तर तिला पावलोपावली फाट्यावर मारतो. आपल्या सहिष्णुतेचे दाखले इतिहासाच्या पानोपानी सापडतात. त्याचवेळेस असहिष्णुतेची पराकाष्ठा असणारी अस्पृश्यताही आपण हजारो वर्षं जोपासलीय. कुणी सहिष्णू म्हणून गोंजारत राहिलं किंवा अत्याचारी म्हणून लाथाडत राहिलं. तरी आपण आहोत हे असेच आहोत.

हजारो वर्षांत किती आले आणि किती गेले. विश्वामित्र आणि वसिष्ठ. राम आणि कृष्ण. चार्वाक आणि व्यास. बुद्ध आणि शंकराचार्य. महावीर आणि मनू. कपिल आणि पतंजली. चाणक्य आणि अशोक. गोरखनाथ आणि बसवण्णा. नामदेव आणि कबीर. ज्ञानेश्वर आणि थिरुवल्लूवर. अकबर आणि राणाप्रताप. शिवराय आणि औरंगजेब. नानक आणि मीरा. तुकाराम आणि चैतन्य. फ्रान्सिस झेवियर आणि मोईनुद्दीन चिश्ती. अहिल्याबाई आणि टिपू सुलतान. राममोहन राय आणि सय्यद अहमद. विवेकानंद आणि रवींद्रनाथ. गांधी आणि टिळक. जोतिबा आणि आंबेडकर. नेहरू आणि जीना. गाडगेबाबा आणि कृष्णमूर्ती. जयप्रकाश आणि इंदिरा. आपण सगळ्यांना पुरून उरलोत. महापुरुषांचं असं होलसेल उत्पादन झालेला दुसरा देश नसावा. या सगळ्यांचा प्रभाव आपल्यावर आजही आहे. म्हणून अशा कुणामुळे आपण मुळापासून बदललो असंही नाही. अशावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आपण भारतीय बदललोय, असा दावा कुणी केला, तर खरं कसं मानायचं?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जीव तो केवढा? स्वयंसेवकांच्या पलीकडे किती लोकांना त्याचं नीट नाव तरी माहीत आहे? त्यांच्या एका स्वयंसेवकाला पंतप्रधान झाल्यानंतर जगभर भाषणात सांगता येईल असा एकही विचारवंत या संघटनेत झालेला नाही. ज्याचं कर्तृत्व जागतिक पातळीवर सांगता येईल असा एक कार्यकर्ता, नेताही यांच्यापाशी नाही. चरखा चालवून स्वातंत्र्य मिळवता येत नाही, असं इतके वर्ष कुजकटपणे सांगितल्यानंतर आता त्यांनाच चरख्यापाशी पोझ द्यावी लागतेय. ते प्रचंड मेहनत करतात, यात वाद नाही. आपलं, आपल्या जातीचं अस्तित्व संपेल असं वाटून ते घाबरलेले आहेत. ते घाबरलेलेच राहावेत अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते. त्यांच्या अस्तित्वाला आव्हान मिळेल अशी सकारात्मक कामं आपल्या समाजात घडतच राहतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीत आश्चर्य वाटावं असं सातत्य आहे. तप केलं तर राक्षसालाही वर मिळतो, असं आमची संस्कृतीच सांगतो. संघाला त्यांच्या कष्टाचं फळ तर मिळणारच. त्यांना काही काळ सत्ता तर मिळणारच. पण प्रत्यक्षात सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते भाजपचे पुढारी तरी संघाचं सगळंच ऐकतात कुठे? वारं आधी उजवीकडून डावीकडे वाहत होतं, तसं आता डावीकडून उजवीकडे वाहणारच. ते गंभीरपणे घेणाऱ्यांपैकी आपण नाही. आपल्यापाशी असलेल्या महापुरुषांच्या यादीसमोर संघ म्हणजे किस झाड की पत्ती. आपण या मोठाल्या महापुरुषांमुळे नाही बदललो तर संघामुळे बदलणार आहो का?

प्रलय आला तरी जग संपत नाही, ही आमची मानसिकता. आणि काँग्रेसचं राज्य गेल्याने काही प्रलय आलेला नाही, हे आम्हाला पक्कं माहीत आहे. इथे साठ वर्षं काँग्रेस जिंकून येत होती म्हणून हा देश काँग्रेसी नव्हता कधी. काँग्रेसला मत दिलं म्हणून आपण सेक्युलर बनत नाही आणि भाजपला मतदान केलं म्हणून आपण हिंदुत्ववादी ठरत नाही. आपण आपणच राहतो. इथे काँग्रेसचा कार्यकर्ताही भाजपला मत देतो आणि भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसला जिंकून देण्यासाठी धडपडतात. इथे प्रत्येक डाव्यामध्येही एक उजवा असतो आणि प्रत्येक उजव्यामध्येही एक डावा. थोडं फार डावं उजवं करता येतं एवढंच.

आपण भारतीय कट्टर झालो आहोत म्हणून काँग्रेस हरली, असा निष्कर्ष निव्वळ चुकीचा आहे. काँग्रेस तिच्या कर्माने मरतेय. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली अल्पसंख्यकांना भगव्याची भीती दाखवत राहायची. दलितांना सवर्णांची भीती दाखवत राहायची. अल्पसंख्यक आणि दलितांचं फक्त तोंडाने लांगूलचालन करायचं. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी करायचं मात्र काहीच नाही. आम्ही भारतीय मुलं जन्माला घालतो, ते काँग्रेसलाच मतदान करायला, असं वाटून ते स्वतःला हवा तसा भ्रष्टाचार किंवा अनाचार करायला मोकळे मानत असतील. तर भ्रमाचा भोपळा फुटला ते बरंच झालं.

डावे आणि समाजवादी तर त्यांच्या चुकांमुळेच आकुंचत आहेत. हे वेगळं सिद्ध करावं लागणार नाही इतकं वास्तव आहे. त्यात भाजपचा किंवा संघाचा काही करिश्मा नाही. संघाने पसरवलेले गैरसमज त्याला कारणीभूत नाहीत. जिथे डावे लोकांमध्ये राहून झगडताहेत, तिथे ते संपलेले नाहीत. केवळ विचार चांगले म्हणून कुणी निवडणुका जिंकत नाही? आपल्या मतदानाचा कल आजही उजव्यापेक्षा डावीकडेच जास्त आहे, हे लोकसभेनंतर प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसलंय. बिहारने तर त्यावर शिक्कामोर्तब केलंय. तुम्ही तुमचा कस दाखवा, कल तुमचाच असेल. पण आज आहेत तशा राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून समोर आणलंत की तो तोल उजवीकडे जाणं स्वाभाविक आहे.

आपण लव्हाळी. साधी माणसं. आपण बरं आणि आपलं काम बरं. नरेंद्र मोदींसारखा कुणी काही करायला जातो. धाडस करतोय असं दाखवतो. काळा पैसा संपवायचं म्हणतो. आपल्याला बरं वाटतं. कारण यांच्या आधी तीन चार पंतप्रधानांना काही करायचंय असं कधी वाटलंच नव्हतं आम्हाला. त्यामुळे मोदींच्या उपद्व्यापापायी आम्ही झालेला त्रास सहन करतो. आम्ही त्यांच्या भाषेवर भाळतो, असं म्हणा हवं तर. राजीव गांधींपासूनचे सगळे पंतप्रधान आमच्या भाषेत बोलतच नव्हते. त्यांना इंग्रजी पेपरांमधे चमकणाऱ्यांची आस होती. त्यांची मानसिकता सूटबूटातली होती. एखादा अपवाद वगळला तर ते इंग्रजीतून विचार करणारेच होते. अशावेळेस एक चहावाला पंतप्रधान बनून आपल्या भाषेत बोलत होता. आवडण्यासारखंच होतं ते. आपल्याला त्याचं ऐकायला आवडत असलं तरी आपल्याला फार बोलायला आवडत नाही. म्हणून आपण बदललोय असं मानू नका. आपण कट्टर झालोय असं मानू नका.

आपण सहन करतो म्हणून आपल्याला माज आवडतो असंही नाही. माज उतरवणं हा आपला सार्वजनिक छंद आहे. सत्ताधाऱ्यांचा माज उतरवणं तर आपण कर्तव्य म्हणून नित्यनेमाने करत आलेलो आहोत. आताच्या सत्ताधाऱ्यांचा माज वाढलेलाच आहे. सत्ता नवीन आहे त्यांना. दिल्लीत त्यांचा माज उतरला. पाठोपाठ बिहारमध्ये उतरला. तसा पुढेही उतरत राहीलच. काळजी नको. त्यांचा पराभव हा आपल्या रोहित वेमुलाला मिळालेला न्याय होता. आपल्या अखलाखला मिळालेला न्याय होता तो. कित्येक असहिष्णू गोष्टी काँग्रेसच्याही सरकारात घडलेल्या आहेत. भाजपच्या राज्यातही घडत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून काँग्रेसच्या राज्यात झाला. कॉ. गोविंदराव पानसरेंचा खून भाजपच्या राज्यात झाला. काँग्रेसला धडा मिळाला आहे. त्यांच्यासारखंच प्लॅंचेटचे खेळ यांनीही केले. तर यांनाही धडा मिळेलच. सनातन संस्थेच्याही पापाचे घडे भरलेलेलेच आहेत. त्यांचीही घसरण सुरू झालेलीच आहे. इथलं पाप इथेच भरावं लागतं, हे सनातन सत्य आहे.

आमच्याकडे सगळ्यांचे माज उतरवून मिळतात. मराठा संघटनांचा माज उतरलेला आहे. ब्राह्मण संघटनांचा माज उतरवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. दलित संघटनांचाही तो उतरवला जाईल. उद्या ओबीसी संघटनांना माज आला तर त्यांचाही तसाच उतरवला जाईल. इथे शाही इमामाचा माज उतरवला जातो आणि तेवढ्यात आनंदाने शंकराचार्यांचाही माज उतरवला जातो. कट्टर हिंदुत्ववादी असोत की कट्टर मुसलमान, कट्टर उजवे असोत की कट्टर डावे, आपण भारतीय त्यांची बिनपाण्याने हजामत करत आलो आहोत.

हा माज, ही कट्टरता नाही आवडत आपल्याला. हीच आमची ताकद आहे. जगाला बदलवणाऱ्या भल्याभल्या कट्टरांना आपण बदवलवलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तर आजवर खूपच बदलवत आलाय. काहीजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपरिवर्तनीय संघटना म्हणतात. ते अज्ञान ऐकून संघाचेच धुरीण मनातल्या मनात खुश होत असतील. गोळवलकरांनी घडवलेला संघ आणि देवरसांच्या काळात बदललेला संघ, या दोन वेगळ्या संघटना वाटाव्यात इतका बदल त्यात झालाय. हे त्यांच्या विरोधकांनाही कळलेलं नाही. ते गोळवकरांची पुस्तकं दाखवून देवरसांच्या संघाला शिव्या देतात. ते ऐकून आजचे संघवाले हसतात आणि दुर्लक्ष करतात. भगवान बुद्धांच्या प्रभावाला संपवता संपवता शंकराचार्यांवरच प्रच्छन्न म्हणजे लपलेले बुद्ध असल्याची टीका होऊ लागली. बुद्धांची ही थोरवी होती. तेच संघाचंही झालंय. गांधींचा प्रभाव संपवता संपवता त्यांनीही गांधीवादाचा मुखवटा घातलाय. त्यांची सगळी सेवाकार्य ही गांधीजींच्या प्रकल्पांची नक्कल आहे. डॉ. दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद तर गांधीवादातल्या सोयीच्या पानांची झेरॉक्स कॉपी आहे. हिंदूंची ही संघटना आज काही मुसलमानांना राष्ट्रीय मानून त्यांची संघटना बांधायचा प्रयत्न करतेय. संघटना बांधायची म्हणजे ओंजारणं गोंजारणं आलंच. बदलाची सुरुवात कधीच झालेली आहे.

सत्तेचे लगाम उच्चवर्णीयांच्या हाती असावेत यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या हायकमांडची तडफड सुरू आहे. सत्ता ज्यांच्या नावाने मिळाली ते मात्र ओबीसी आहेत, ही त्यांची अडचण आहे. कमंडलाने मंडलाला मागे टाकलं असं वरवर वाटत असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. मंडलाशिवाय कमंडलाला सत्ता मिळणार नाही, हे आजचं वास्तव आहे. कमंडलाला त्यासाठी बदलावं लागलेलं आहे. आता आहेत त्यापेक्षाही वेगाने यापुढे बदलावं लागणार आहे. कुणाच्याही जातीचा माज आपल्या देशात दीर्घकाळ चालत नाही. कुणाच्याही धर्माच्या नावाने चालणारी कट्टरता आपल्या देशात दीर्घकाळ चालत नाही. त्यामुळे बाहेरून नावं तीच राहतात. आतून सगळं बदललेलं असतं. संघाचंही काही वेगळं होणार नाही. संघवाल्यांचं आकलन तर इतकं तोकडं आहे, की त्यांना हा बदल कळणारदेखील नाही. त्यांनी हा बदल स्वीकारला नाही तर ते पुन्हा पूर्वी होते तसे बाजूला फेकले जातील. त्यांनी बदल स्वीकारला तर त्यांच्यातले कट्टर बाजुला फेकले जातील. कट्टर संपणार नाहीत, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांना आपण परकं मानलेलं नाही. त्यांचं अस्तित्वही आपण मान्य केलेलंच आहे. हे बहुसांस्कृतिक सहअस्तित्व जगाला आपल्याकडून शिकायचं आहे म्हणे.

आपण भारतीयांनी असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजवर खूप बघितलेत. त्यांना गिळून आपण ढेकरही दिलेला नाही. हे आज ना उद्या होणारच आहे. त्यासाठी आताच आपण सगळे कामालाही लागलेले आहोत. आता हे कसं कसं घडतंय, ते मात्र बघत राहायला हवं डोळे उघडे ठेवून. असे कित्येक संघ येतील, जातील. आपण मात्र आहोत असेच असणार आहोत. कट्टरता न आवडणाऱ्या आणि माज उतरवण्यासाठी तत्पर असणाऱ्या आपल्या मानसिकतेला आपल्यातली विचारवंत वगैरे मंडळी उदारमतवादी, सहिष्णू म्हणोत हवं असल्यास. आपल्याला कोण काय म्हणतंय, याचा फार विचार नाही करत आपण. कारण तो फक्त शब्दांचा खेळ असतो. आम्ही आहोत, तसं आम्ही आम्हाला स्वीकारलेलं आहे. शाहरूख खान, जुही चावला या थोरांनी एका सिनेमात सांगितलंय ते आम्हाला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मान्य आहे,

हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी
अपनी छत्री तुम को दे दे कभी जो बरसे पानी
कभी नये पॅकेट में बेचे तुमको चीज पुरानी
फिरभी दिल है हिंदुस्तानी, दिल हैं हिंदुस्तानी

4 comments:

  1. सचिन भाऊ,जबरदस्त आकलन... आवडलं. खूप काही बदललेलं नाही हे समजून खूप दिलासा वाटला.

    ReplyDelete
  2. सर...खूप शांत वाचण्याची आणि आकलन करण्याची आवश्यकता आहे. खूपच हटके

    ReplyDelete
  3. सर खूप मार्मिक पने लिहता खर सांगू का आज प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे साधा सरळ आजुबाजुचा विचार करण्याची गरज आहे

    ReplyDelete
  4. Present Indian political trends are deeply acknowledged and analyzed from third eye. Lge rho Sachinji


    ReplyDelete