Friday 12 May 2017

शाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक

जवळपास एका वर्षाने गोव्याला गेलो. २२ एप्रिल शनिवारी समृद्धीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जायलाच हवं होतं. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकरांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. गोव्याच्या सत्त्व टिकवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून राजेंद्रभाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पौर्णिमाताईंचाही त्यात हातभार आहे. त्यांची मुलगी समृद्धी आता १६ वर्षांची झालीय. ती कधीच शाळेत गेली नाही. निसर्गाच्या शाळेतच शिकली. कॉलेजलाही शिकायचं नाही म्हणते. पण शिकणं थांबलेलं नाही. मी संपादक म्हणून तिच्याकडून करून घेतलेल्या कॉलमचं पुस्तक झालंय. पुस्तकाची प्रस्तावना या साऱ्या प्रक्रियेविषयीच आहे प्रामुख्याने. गोव्यात जाऊन तू काय केलंस, असं कुणी विचारलं तर माझ्याकडे आता समृद्धीचं पुस्तक आहे.
सोबत प्रस्तावना जोडलीय. कुणाला हे पुस्तक हवं असेल तर संपर्कः तुळशीदास राऊळ – 9049912168,  8999421974
...


`गोवादूत`चा संपादक म्हणून मी गोव्यात नवा नवा पोचलो होतो. माझे एक सहकारी विठ्ठल पारवाडकर यांच्या नाटकांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. विष्णू वाघांच्या हस्ते प्रकाशन आणि मी प्रमुख पाहुणा. कार्यक्रम संपल्यावर वाघांनी एका बारा तेरा वर्षांच्या मुलीला स्टेजवर बोलावून घेतलं आणि माझी ओळख करून दिली, `ही माझी गोव्यातली सर्वात आवडती कवयित्री, समृद्धी.` गोवा तसं छोटं गाव असल्यामुळे एकमेकांची घाऊक कौतुकं करण्याची रीत आहे. पण वाघ त्याला अपवाद आहेत. त्यांनी सांगितलेलं खरंच होतं, मनापासून दिलेली शाबासकी होती ती. तोवर मी ही समृद्धीने लिहिलेलं पेपरांमध्ये वाचत होतोच. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकर या लोकांसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्याची ही हुश्शार लेक. 

तिन्ही केरकरांना भेटण्यासाठी मी केरीला गेलो तो समृद्धीविषयी मनात खूप प्रश्न घेऊनच. ती कधीच शाळेत गेली नाही का?  तिला स्वतःच जावंसं वाटत नाही, की आईबाबांचा तसा हट्ट आहे? शाळेत जात नाही, मग शिकते काय आणि कसं? कमी वयात ती एवढं छान, सोपं आणि मुद्देसूद कसं काय लिहिते, की आईबाबा त्यावर संस्कार करून पेपरांकडे पाठवतात? केरकरांच्या भरल्या घरात समृद्धीला यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्याव लागलं नाही. बाकीच्या मित्रांबरोबर खूप गप्पा मारणारी समृद्धी आमच्याशी बोलताना थोडी दबूनच होती. फक्त ती काय काय करते ते दाखवत होती. मित्रांसोबत साजरा करत असलेला नाताळ. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धा. पर्यावरणावरच्या नृत्यनाटिकेची तयारी. तिने लिहिलेली पुस्तकं. सहलीसाठी येणाऱ्या मुलांना जंगलाची ओळख करून देणं. या सगळ्यातून माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपोआप उमगत होती. 


घरभर कुठेकुठे चिटकवलेली चित्रं लक्ष वेधून घेत होती. ती एका बारा तेरा वर्षांच्या मुलीनं काढली असतील यावर विश्वास बसत नव्हता. तिची आणखी चित्रं पाहिली. जवळपास सगळीच चित्रं निव्वळ सुरेख होती. तिला जे म्हणायचंय ते चित्रं नेमकं सांगत होती. विशेषतः त्यातला तोल भारावूनच टाकणारा होता. स्वतःला चित्रकार म्हणवणाऱ्या भल्याभल्या लोकांचं प्रपोर्शन अनेकदा पाहणाऱ्याला खटकतं. इथे मात्र प्रत्येक चित्रात समतोल चोख होता. चित्रातल्या सगळ्याच गोष्टी जिथे हवेत तिथे आणि जितक्या आकाराच्या हव्यात तितक्याच. वर किंवा खाली जागा सुटलीय, एकाच बाजुला गर्दी झालीय, असं एकाही चित्रात नव्हतं. माणसं, प्राणी, झाडं, सगळे कसे एकमेकांच्या तुलनेत जेवढे हवेत तेवढेच. कुणाचाही एखादा अवयव लहान किंवा मोठा नाही. डोकं समतोल असेल तरच असा समतोल चित्रात उतरू शकतो. आमच्या शहरातल्या शाळा असं ताळ्यावर असलेलं डोकं घडवू शकत नाहीत. त्यासाठी निसर्गाचीच शाळा हवी. 

समृद्धी निसर्गाच्या शाळेत शिकतेय, ते आमच्या लहानग्या वाचकांपर्यंतही जावं, असं वाटून गेलं. तिचं प्रत्येक चित्र एक गोष्ट सांगणारं होतं. समृद्धीने एक गोष्ट लिहावी आणि त्याचं चित्र काढावं किंवा चित्र काढून त्याची गोष्ट सांगावी, अशी कल्पना मांडली. समृद्धीने होकार दिला. त्यानंतर दर आठवड्याला समृद्धीचं चित्र आणि गोष्ट ऑफिसात पोहोचू लागली. तिचा तुळशीदास काका मायेनं चित्रं स्कॅन करायचा. वेळात वेळ काढून टाइप करून ठेवायचा. समृद्धीच्या गोष्टी आमच्या `किलबिल` पानाचं आकर्षण बनल्या. जवळपास दीड वर्षं हा सिलसिला सुरू राहिला, असं मला वाटतं. आता या चित्रगोष्टी पुस्तकरूपाने येत आहेत, याचं समाधान आहे. 

त्या त्या आठवड्यात वाचलेल्या या गोष्टी आनंद देऊन गेल्या होत्या. समृद्धीच्या समृद्ध जाणीवांविषयी आदर वाढवत गेल्या होत्या. आता त्या एकत्र वाचताना हा आनंद आणि आदर अधिकच वाढला आहे. गोव्याच्या एका टोकाला असणाऱ्या छोट्याशा खेड्यात राहणारी समृद्धी या गोष्टींतून जगाची भाषा बोलते. तिची भाषा मराठी असली तरी या गोष्टींमधल्या संवेदना ग्लोबल आहेत. जगातल्या कोणालाही आपल्या वाटाव्यात अशा लोककथांचा वारसा घेऊन ती लिहिते आहे. जातक कथा, बृहत्कथासार, इसाप, पंचतंत्र यांच्याशी ती आपलं नातं सांगते आहे. खरं तर या थोर कथा जिथून आल्या, त्या निसर्गातूनच समृद्धीच्या कथा आलेल्या आहेत. अगदी फर्स्टहँड आणि थेट मातीतून. 

समृद्धी निसर्गाच्या कुशीत लहानाची मोठी झाली आहे. बेगडी संस्कारांपासून ती दूर आहे. ती झाडांशी गप्पा मारू शकते. प्राणी पक्षी तिच्याशी बोलतात. एखाद्या फुलपाखरासारखी ती जंगलात भिरभिरत असते. अगदी रात्रीही ती मोकळं होऊन रानावनांत फिरते. हे करताना तिला अनेक प्रश्न पडतात. पाऊस पडतो तरी कसा? गोगलगाईच्या पाठीवर शिंपला येतो कुठून? सुतार पक्ष्याच्या चोचीला धार कुणी काढली? सुरणाला एलिफण्ट फूट आणि गुंजीच्या बियांना कावळ्याचे डोळे का म्हणतात? रातराणीचा सुगंध रात्री का येतो? गाढव आणि सशाचे कान मोठे का? कोकिळेचा आवाज इतका गोड कसा काय? सापाला पाय का नसतात? कावळा काळा कसा झाला? धीवर पक्षी मासे का पकडतो? सुगरण सुंदर घरटं बांधायला कुठे शिकली? फुलपाखरांना रंग कोण देत असेल? मोराला नाच कुणी शिकवला? कुत्र्यांना पाळण्याची सुरुवात कधी झाली असेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं समृद्धी निसर्गालाच विचारत असवी बहुदा. तिला निसर्गाने दिलेली उत्तरंच गोष्टी बनून आपल्यासमोर आली असावीत. 
कधीकधी तर एकदा मिळालेल्या उत्तराने तिचं समाधान झालेलं नाही. सुतारपक्ष्याच्या चोचीचं रहस्य वेगळ्या पद्धतीने शोधून काढण्यासाठी तिने दोन गोष्टी लिहिल्यात. तेच गणपतीच्या गोष्टीचंही आहे. त्याहीपुढे जाऊन तिचे प्रश्न निसर्गाच्या नवलाईपुरते राहत नाहीत. मृत्यूनंतर माणसाचं काय होणं चागलं, या मोठमोठ्या विचारवंतांना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न तिने परोपकारी `अशोकाचं झाड`, `तुळशीचं लग्न`, `सुगंध रातराणीचा`, `आधारवड` या गोष्टींमधून देण्याचा प्रयत्न करते. 

हेच प्रश्न विचारणं तिला प्रतीकांमागचे अर्थ शोधायला लावत असावं. समृद्धीची आई डॉ. पौर्णिमा केरकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सांस्कृतिक संकल्पनांमागील सत्यापर्यंत पोहोचण्याचा समृद्धीचा प्रयत्न हा त्यांच्याच संस्कारांचा परिणाम आहे. गणपतीचा जन्म आणि महिषासूराचा वध या पौराणिक कथांचे तिने लावलेले अर्थ अचंबित करणारे आहेत. ते बारकाईने वाचायला हवेत. कोणताही धर्म, जात, विचारधारा किंवा वाचन यामुळे येणारे पूर्वग्रह तिच्यापाशी नसल्यामुळे ती नितळपणे या गोष्टींकडे पाहू शकली आहे. ती या कथांना निसर्गाशी जोडून पाहते आहे. पिढ्यानपिढ्या सांस्कृतिक पारतंत्र्य लादण्यासाठी वापरण्यात आलेल्या या कथांचं शोषणमूल्य यामुळे एकतर संपलं आहे किंवा त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यातून कथांच्या मूळ गाभ्यापर्यंत जाण्याची एक पायवाट दिसते आहे. पण हे दरवेळेला जमलेलंच आहे असंही नाही. तुळशीचं लग्न हा वरवर साधा वाटणारा उत्सव असला तरी त्यामागे बरीच सांस्कृतिक गुंतागुंत आहे. त्यामुळे त्याची उकल करण्यात समृद्धीला वेळ द्यावा लागणार आहे. नाताळाची कथाही तोकडी झाली आहे. 


`पावसाचा जन्म` या गोष्टीत समृद्धी सरस्वती या विद्येच्या देवतेला वनदेवता बनवते. खरी विद्या जंगलातूनच मिळते, हा तिचा अनुभवच तिने इथे मांडला असावा. सणांच्या गोष्टींच्या गोष्टी सांगून ती थांबत नाही. ती जुन्या सणांना नवे पर्याय देते. झाडं कापण्याऐवजी नवी झाडं लावून होळी साजरी करण्यासाठी तिचा आग्रह आहे. फटाक्यांचा तिला तिटकारा आहे. फटाके फोडू नयेत, हे बिंबवण्यासाठी ती टोकालाही जाते. तिचे वडील प्रा. राजेंद्र केरकर पर्यावरण जपण्यासाठी लढणारे मोठे कार्यकर्ते आहेत. जीव पणाला लावून त्यांनी निसर्गाचं रक्षण केलं आहे. त्यांचा प्रभाव समृद्धीच्या अनेक गोष्टींतून जाणवतो. राजेंद्र केरकरांचं व्यक्तिमत्त्वच `पाणी वाचवा` या कथेत उतरलं आहे. `भरारी घेतली धीवराने` या गोष्टीतले कॅमेरा आणि पक्ष्यांच्या फोटोंचं पुस्तक असणारे बाबाही दुसरे तिसरे कुणीच नाहीत. नवनवे रस्ते शोधण्याची त्यांची आवड `वासराची करामत` या गोष्टीत सहजपणे येते. आपला गोवा सौंदर्य हरवत असल्याची राजेंद्रभाईंची वेदना `स्वच्छतेच्या संकल्प` या कहाणीत अनुभवता येते. अंधश्रद्धांना त्यांनी केलेला विरोध तर अनेक कथांमधून डोकावलेला आहे.

मुळात माणसाचा निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी संबंध नेमका कसा असायला हवा, याविषयी विचार या कथांमधून मांडलेला आहे. प्रेमाच्या आधारावरच माणूस आणि पर्यावरणातील नातं परस्परपूरक बनू शकतं, याची खात्री या चित्रगोष्टींना आहे. या गोष्टींमधले प्राणी आणि माणसं चुकतात. पण सिनेमा आणि कार्टूनसारखं कुणीच खून का बदला खून म्हणत नाही. आपल्याला एकमेकांसोबत मैत्रीनेच राहायचं आहे, याचं भान यांना आहे. त्यामुळे चांगुलपणावरचा विश्वास हा या कथांचा गाभा बनला आहे. इथला संघर्ष दोन पात्रांमधला नाही, तर द्वेष आणि प्रेमामधला आहे. कौर्य आणि मैत्रीमधला आहे. अंतिम विजय हा प्रेम आणि मैत्रीचाच झालेला आहे. 
सहज वाचता वाचता या गोष्टी खूप काही शिकवून जातात. पण यात कुठेही शहाणपणा शिकवण्याचा, बोध देण्याचा, तात्पर्य काढण्याचा भाव नाही. बहुतांश गोष्टींनी गंमत सांगण्याचं मूळ कर्तव्य पार पाडलेलं आहे. निसर्गाच्या सहवासात नम्रता येतेच. समृद्धीच्या शैलीत ती आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव पडतो. अर्थात यातल्या सगळ्याच कथा परिपूर्ण आहेत, असं नाहीत. काही भरकटल्या आहेत. काही अर्धवट सुटल्या आहेत. काही पसरट झाल्या आहेत. त्यावर अधिक काम होणं गरजेचं आहे. अधिक चांगली शीर्षकं देता येऊ शकतात. पुस्तकाची मांडणीही अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. ते शिकवू शकणारे आईबाबा आणि निसर्ग समृद्धीकडे आहेच. त्यातून समृद्धी अधिकाधिक समृद्ध होईल आणि आपल्यालाही समृद्ध करेल, याची पक्की खात्री आहेच. 

समृद्धीच्या चित्रगोष्टींविषयी लिहिता आलं, यासाठी समृद्धी, पौर्णिमा आणि राजेंद्र केरकर तसंच तुळशीदास राऊळ यांचे आभार.

3 comments:

  1. सर, प्रस्तावनेतून समृद्धी साकारतेय. तिला पाहू शकतो, इतकी जान ओतलीय. ती आणखी समृद्ध होत जाओ.....!!!! पण ती शाळेत का नाही गेली? आमच्या आजऱ्यात देखील एक इन्द्रजीत आहे. राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या 'न पेटलेले दिवे' मध्ये भेटतो तो. म्हणून.....? बाकी पुस्तक मिळवितो.

    ReplyDelete
  2. सर.समृद्धी चे निसर्गात एकरुप होणे.... आणि त्यातून निर्माण झालेली चित्र आप्रतिमच...लेखणी देखील समृद्धशाली !

    ReplyDelete
  3. सर.समृद्धी चे निसर्गात एकरुप होणे.... आणि त्यातून निर्माण झालेली चित्र आप्रतिमच...लेखणी देखील समृद्धशाली !

    ReplyDelete