Monday, 29 May 2017

आम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज

सत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी लोकमतमध्ये वाचली आणि धक्काच बसला. महाराज मुलाचं नाव धर्मपाल ठेवण्याइतके धार्मिक आहेत. ते लोकांमध्ये राहतात. आधुनिक पुरोगाम्यांसारखे लोकांना तोडत नाहीत. जय गुरुदेव म्हणत परंपरेशी नातं घट्ट पकडून ठेवतात. ते देवाधर्माच्या नावाने शिव्या देत नाहीत, त्यामुळे सनातन्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताच येत नाही. राज्य सरकारने त्यांना प्रबोधनकार पुरस्कार दिलाय, इतके ते सगळ्यांना स्वीकारार्ह आहेत. प्रबोधनाचा खरा मार्ग त्यांना सापडला आहे. म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं अधिक धक्कादायक आहे.

महाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट आहे. त्याने हल्ला का केला, आपल्याला कळलेलं नाही. त्याचं बॅक्ग्राऊंड काय, कळलेलं नाही. ती शोधण्याइतकी तसदीही आपण घेत नाही. आमच्या संवेदना मेल्यात कधीच्याच. आमचे हात, पाय, डोकं, मन सगळं बधीर झालंय. सत्यपाल महाराज, हल्लेखोरापेक्षा जास्त आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला माफ करा. इतर कुणाला नसेल तर निदान मला तरी माफ करा. मी काहीच कामाचा नाही हो. सॉरी.
गोवन वार्तामधे लिहिलेला लेख थोडे बदल करून पुढे कटपेस्ट करतोय.
...


१२ मे. नायगाव, दादर पूर्व. बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम. सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम. नेहमीसारखीच भरगच्च गर्दी. कार्यक्रमाचं औचित्य महाराजांच्या आवडीचं.  कीर्तन छान रंगणार होतंच. कीर्तन संपलं तसं अनेकजण भेटून जात होते. नव्या रितीनुसार फोटो आणि सेल्फ्या काढल्या जात होत्या. त्यात तोंडावर रूमाल बांधून आलेला कुणाल जाधव नावाचा एक तरुण. त्याने अचानक चाकू काढला. महाराजांच्या पोटावर वार केला. हल्लेखोर सरावलेला नव्हता बहुदा. कारण त्याच्या चाकूची मूठ तुटली. आयोजक धावले. हल्लेखोराला पकडलं. पोलिसांच्या ताब्यात दिलं. महाराजांनाही लगेचच केईएम हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं. वेळेत योग्य उपचार झाले. महाराज बचावले.

अकोला जिल्ह्यातल्या अकोट या शहरात राहणारे सत्यपाल महाराज हे पुरोगामी विचार मांडणारे कीर्तनकार. असहिष्णुतेमुळे गाजणाऱ्या सध्याच्या वातावरणात हल्ल्यामुळे प्रसिद्धी मिळवणं सोपं होतं. पण महाराजांना तसा विचारही त्यांना सूचला नाही. त्यांनी महापालिकेच्या हॉस्पिटलात शांतपणे उपचार घेतले. पाच दिवसांनंतर ते अकोटमध्ये परतले. त्यानंतर वर्तमानपत्रात बातम्या आल्या. महाराष्ट्रभर निषेधाची पत्रकं काढण्यात आली. सरकार, पोलिसांना निवेदनं देण्यात आली. अकोल्यात भजन सत्याग्रह सुरू आहे. तोवर हल्लेखोराला कोर्टाकडून जामीन मिळाला. सत्यपाल महाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट सुटलाय. महाराजांनी त्याला कधीचंच माफ केलं असणार, हे नक्की.

सत्यपाल महाराज चिंचोळकरांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कुठेही असला तरी गर्दी हाऊसफुल्ल होते. ते कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्या कार्यक्रमाचा थाट पारंपरिक नसतो. ना ते अभंग सोडवत पूर्वपक्ष उत्तरपक्ष मांडत, ना ते आख्यान गातात. ते साधी सोपी सिनेमातील गाण्यांच्या चालीवरची भजनं गातात. त्यातली बहुतांश स्वरचित असतात. त्यातही फार आरोह अवरोहाला जागा नसते. जोडीला असते तडतड वाजणारी खंजिरी. गेल्या शतकात खंजिरी या छोट्या डफाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रबोधनाचं हत्यार बनवलं होतं. सत्यपाल महाराजांनी त्याच खंजिरीचा वारसा चालू ठेवलाय. चार वर्षांचे असताना तुटलेल्या घागरीच्या काठाला कागद लावून त्यांनी खंजिरी बनवली होती. तेव्हापासून तेच त्यांचं आवडीचं खेळणं होतं. त्यांनी एकाच वेळेस सात खंजिरी वाजवण्याची अनोखी कला विकसित केली. ते सप्तखंजिरीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांचा हात लागला ही खंजिरी विजेसारखी नाचू लागते. त्याच्या जोडीला लोकांच्या जगण्याशी जोडलेली गाणी येतात. गाणी गाता गाता महाराज त्याचं निरुपण करतात. ते निरुपण असलं तरी संस्कृतप्रचुर सोडाच पण शहरी मराठीतही नसतं. मस्त वऱ्हाडी गंध असलेला गावरान थाट महाराष्ट्रभरातल्या कष्टकऱ्यांना आपला वाटतो. त्यात नेहमीच्या जगण्यातले किस्से असतात. महाराज अभिनय करत करत परफेक्ट टायमिंग टाकत धो धो हसवतात. हसत हसत कधी ते श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन टाकतात कळतच नाही. साध्या माणसाचं दुःख हे त्यांच्या कीर्तनाचा केंद्रबिंदू असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुंडाबळी, स्त्रीभूणहत्या, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, ग्रामविकास, पर्यावरण, जातिभेद असे विषय ते सहज मांडतात. आपण बिनडोक रूढीपरंपरांना प्रश्न विचारू शकतो, ही जाणीव ते खेडोपाडी करून देत असतात.

नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं सांगणाऱ्या संत नामदेवांनी साडेसातशे वर्षांपूर्वी कीर्तनाला संवादी करून वारकरी कीर्तनपद्धतीची सुरुवात केली. विसाव्या शतकात या मोकळ्याढाकळ्या संवादकलेला नागरी शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न होत असतानाच संत गाडगेबाबांनी त्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. त्यांचे समकालीन तुकडोजीबाबांनी या कीर्तनाला खंजिरीभजनाचा नवा पैलू जोडला. वारकरी परंपरेशी धागा जोडलेल्या या दोघांच्याही कीर्तनपरंपरेचा आधुनिक अविष्कार सत्यपाल महाराज आज सादर करत आहेत. सत्यपाल महाराजांचं कीर्तन हे वारकरी कीर्तनाचं हे वऱ्हाडी रिमिक्स वर्जन आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सत्यपाल महाराज देवाधर्माच्या विरोधात बिलकूल बोलत नाहीत. ते अंधश्रद्धांवर मात्र जोरदार हल्ला चढवतात. गाडगेबाबा, तुकडोजीबाबा यांच्याबरोबरच फुले, शाहू, आंबेडकरी विचारपरंपरेचा वारसाही ते उघडपणे सांगतात. पोथ्या वाचण्यापेक्षा देशाच्या राज्यघटनेचं पारायण करा असं सांगतात. दरवर्षी आपल्या गावात सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करतात. त्यांच्यामुळे कित्येक तरुण आंतरजातीय विवाह करू लागलेत. हजारो जणांनी त्यांची कीर्तनं ऐकून दारू सोडलीय. तेरावं आणि श्राद्धाला कित्येकांनी मूठमाती दिलीय. सच्ची भक्ती असेल तर धार्मिक कर्मकांडं नकोत आणि पुरोहितही नकोत, असं त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलंय. व्रतवैकल्यं आणि उपासतापासांचा फोलपणा कळल्यामुळे अनेक महिलांनी ती सोडून दिलीत. ते शिक्षणाचं महत्त्व सांगतात. प्रत्येक कार्यक्रमात गरीब मुलांसाठी पुस्तकं, कपडे घेऊन जातात. कार्यक्रमात आलेल्या शाली गरिबांना तिथल्या तिथे वाटून टाकतात.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. सत्यपाल महाराजांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी त्यांचं देहदान केलं. मुलगा डॉक्टर बनला तर त्याला गावातच दवाखाना काढून गरिबांची सेवा करायचा वसा दिला. अफाट गर्दीचे कार्यक्रम करूनही ते खर्चापुरतं मानधन घेतात. पोटापाण्यासाठी ते अकोटच्या बाजारात रस्त्यावर बनियन विकतात. इतका मोठा चाहतावर्ग, अनुयायीवर्ग असतानाही ते साध्या घरात आणि साध्या कपड्यांत राहतात. कार्यक्रमासाठीही त्यांची वेषभूषा बदलत नाही आणि रोजच्या बोलचालीतली भाषाही बदलत नाही.

महाराजांचं फाटकं आयुष्य पारदर्शक आहे. दोष दाखवण्यासाठी त्यात जागा नाही. ते जे सांगतात, ते संतांनी आधीच सांगितलेलं असतं. त्यामुळे त्यांना धर्मविरोधी म्हणता येत नाही. महाराज खंजिरी वाजवत हजारो माणसांची डोकी बदलवतात, ते थांबवता येत नाही. अशावेळेस जीवघेणा हल्ला करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला, तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. महाराज घाबरणारे नाहीत. ते थांबलेलेही नाहीत. हल्ल्यानंतर त्यांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम सुरूही झालेत. इथे पोलिस हल्लेखोराचा पत्ता सांगत नाहीत. हल्ल्याची कारणं सांगतात, ती पटण्यासारखी नाहीत. आम्ही पत्रकारही ती शोधून काढू शकत नाही, इतके दुबळे झालोत. त्यामुळे आम्ही फक्त माफी मागू शकतो. सत्यपाल महाराज, माफ करा. तुमच्यावर हल्ला झाला तरी आम्ही हात बांधून शांत बसलोत. आम्ही काहीच करू शकत नाही.

3 comments:

  1. Had a opportunity to attend his Kirtan. .though then I wasn't aware ..Thankyou Sachin for leaving that burnt ..even journalism has failed to give justice to Maharaj ...
    Very insightful article ..
    How can I get Maharaj Satya pal number ..we are associated with a village in Karjat ..would like to invite him for kirtan on Guru pornima

    ReplyDelete
  2. मार्मिक थप्पड.....!!!👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. इथेही हल्लेखोर बहुजन तरुणच, हे विशेषच....!!!

    ReplyDelete