गोव्यात असं कधी
होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं
गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी? गोवा वरून
इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या
लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल
गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा
उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम
सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण
घातले.
वाघ भाजपचे आमदार
झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या
पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या
विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी
असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी
अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला
अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी
भूमिका ठामपणे मांडत राहिले.