Tuesday 10 October 2017

१२०८ बेस्ट सेलर


गुरुनाथ नाईकांच्या आजारपणाची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियातून त्यांना मदत करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना चांगली मदत केलीय. या मदतीमागे नाईकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेल्या कामाचीही पार्श्वभूमी कारणीभूत असू शकते. या सगळ्याच्या बातम्या येत होत्या. ते सगळं वाचताना मला सारखी सारखी त्यांची `गाठभेट` आठवायची. गोव्यात `गोवादूत`ला असताना मी `गाठभेट` नावाचा कॉलम चालवायचो. एखाद्या मान्यवराला भेटून त्याचं व्यक्तिचित्र लिहायचो. मजा आली त्यात.

गुरुनाथ नाईकांचीही `गाठभेट` चांगली झाली. आमच्या पुष्पराज पोपकरांकडून मुद्दाम तो मजकूर मागवून घेतला. या कॉलमात फक्त पांढरी बाजू असायची. परिचय करून देण्यापलीकडे यात काही नसायचं. नाईकांच्या कौटुंबिक गुंतागुंतीविषयी मला नंतर अनेकांनी मुद्दामून माहिती दिली. मला त्यात रस नव्हता. मी त्यांच्या कादंबऱ्या फक्त पाहिल्यात. कधीच वाचल्या नाहीत. एक कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या जडणघडणीत मला इंटरेस्ट होता. तेच फक्त या लेखात आहे. गेल्या पिढीतल्या पत्रकारांची होणारी फरफट त्यात आलीय. या लेखानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार करून मदत दिली होती.


अशा गोव्यातल्या चाळीसेक मान्यवरांवर लिहिलेले लेख आहेत. दोनशेहून अधिक पानांचं पुस्तक होऊ शकेल इतका ऐवज आहे. खरंतर पुस्तक टायपिंग, कव्हर आणि लेआऊट होऊन तयारही आहे. फक्त आमचा प्रकाशक मित्र त्याच्या उपद्व्यापांत अडकलाय आणि मीही. त्याच्याकडे सध्या बहुधा पैसेही नसावेत. माझ्याकडेही पुस्तकासाठी नाहीत. त्यामुळे पुस्तक राहिलंय. बघू कधी होतंय ते!

मूळ लेखाला दिलेला इण्ट्रो असा होता. `सर्वसाधारणपणे लेखक आपल्या सगळ्या पुस्तकांची मिळून एकूण बाराशे पानं छापून आली तरी समाधानी असतो. गुरुनाथ नाईकांनी तर प्रत्येकी शंभर ते दोनशे पानांच्या बाराशे आठ कादंबऱ्या लिहिल्यात. त्यातल्या जवळपास सगळ्या वाचकप्रिय आहेत. पण त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबर्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं आहे.`

लेख नेहमीप्रमाणे मुळाबरहुकूम कटपेस्ट. साधारण २०१३ला हा लेख लिहिला असावा. जुने संदर्भ आहेत तसेच ठेवलेत. गोव्यातल्या माणसांचे आणि ठिकाणांचे संदर्भ माहीत नसले, तरी जोडून घेतल्यावर कळतील असे आहेत. गोव्यातले वाचक महाराष्ट्रातले संदर्भ जोडून घेतात, तसं आपण महाराष्ट्रातल्यांनीही करायला हवं.
....

त्यांच्या साहित्यावर कुठे परिसंवाद होताना दिसणार नाही. कुठल्या वाङ्मयीन म्हणवणार्या नियतकालिकांत त्यांच्यावर लेख छापून आलेले नाहीत. वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांनी त्यांच्या कादंबर्यांची कधी फारशी दखल घेतलेली नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही ते कधी दिसलेले नाहीत. मोठमोठ्या समीक्षकांना त्यांच्या लिखाणावर लिहावं, असं कधी वाटलेलं नाही. त्यांच्या विक्रमी साहित्यावर कुणाला संशोधन करून पीएचडी मिळवाविशी नाही. कुणी त्यावर शोधिनबंधही लिहिलेले नाहीत. एवढंच काय पहिल्या फळीचे प्रकाशकही त्यांच्या वाटेला कधी गेलेले दिसत नाहीत. तरीदेखील मराठी पुस्तकं असलेल्या कोणत्याही लायब्ररीत गेलात तर वाचकांनी आणून दिलेल्या आणि घेऊन जाणार्या वाहत्या पुस्तकात त्यांचं नाव असतंच. त्यांची पुस्तकं लायब्रर्यांमधल्या कपाटांमध्ये धूळ खात राहत नाहीत. त्यांच्या कादंबर्यांना गेली चाळीस वर्षं सतत वाचकप्रियता मिळते आहे. सर्वसामान्य वाचकांना रोजच्या कटकटींतून दोन घटका हमखास मनोरंजन देणार्या त्यांच्या कादंबर्या मराठीतल्या खर्याबेस्ट सेलरआहेत. अशा एक दोन नाही तर एक हजार दोनशे आठ कादंबर्या लिहिणारे विक्रमी कादंबरीकार म्हणजे गुरुनाथ नाईक.

गुरुनाथ नाईकांच्या कादंबर्यांनी करमणूक झालेले शेकडो जण पाटो पणजी पुलावरून रोज जात असतील. त्यातल्या क्वचितच कुणाला पाटो गवर्नमेंट कॉलनीत नाईक राहतात हे माहीत असेल. पर्रीकर सरकारने त्यांना दोन वर्षांपूर्वी हा फ्लॅट राहण्यासाठी दिला. ते, त्यांच्या पत्नी आणि मुलगा असे तिघं तिथे राहतात. गेल्याच वर्षी त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलीय. आठवड्याभरापूर्वीच ते शिरोडा आयुर्वेदिक हॉस्पिटलातून घरी आलेले. त्यांचं आजारपण आणि पुस्तकांच्या बाजारातल्या सध्याच्या मंदीमुळे थांबलेलं उत्पन्न यामुळे आलेली हलाखी त्या घरात सगळीकडे दिसत राहते.

तिथे सगळी श्रीमंती आहे एका अंधार्या कोनाड्यात. नाईक दरवाजामागचं एक डुगडुगतं कपाट उघडून दाखवतात. वरपासून खालपर्यंत पुस्तकंच पुस्तकं. एकाच पुस्तकाची एकच प्रत. तरीही सगळंकपाट गच्च भरलेलं. काही पुस्तकं समोर उभी केलेली. त्यांची तेवढी दिसणारी कव्हर. ‘ऑपरेशन ईगल’, ‘पहिला घाव’, ‘जहाजाचे पिशाच्च’, ‘रक्तरंजित सिंहासन’, ‘अज्ञान ग्रहावरून’, ‘भ्रमिष्ट सुंदरी’, ‘माणूस खाणारे यंत्र’, ‘खुनी जलसा’, ‘सोनेरी गरुडअशी एकापेक्षा एक अद्भूत नावं असलेल्या कादंबर्या. त्यात वेगळी वाटणारी दोन तीन पुस्तकं. एकरणनिपुण छत्रपती शिवरायहे महाराजांवरचं पुस्तक. दुसरी दोन, ‘अल कैदाआणिइस्लामी ड्रॅगनही ओसामाविषयीची पुस्तकं.

महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला चेक गुरुनाथ नाईक यांना देताना
मी साखळीचा. जन्म १९३८. मी चार वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी पोर्तुगीजांविरुद्ध बंड केलं. त्यांचं नाव विष्णू नाईक. त्यांना विष्णू नावानं कुणीच ओळखायचं नाही. सगळे त्यांना पोकोच म्हणायचे. कुर्टी-फोंड्याचे सहकारी, सदाशिवगडचे देसाई असे त्यांचे दोन मित्र होते. त्यांनी बंडासाठी बंदुकी गोळा केल्या होती. पोलिसांनी धाड घातली. सगळंच फिसकटलं आणि आम्ही गोवा सोडून बेळगावजवळ लोंढ्याला आलो. व्हर्नाक्युरल फायनलम्हणजे सातवीपर्यंतचं माझं सगळं शिक्षण तिथेच झालं. त्यांनी आधी धारवाडला काताचा कारखाना सुरू केला. पण भागीदारांनी फसवलं. नंतर रेल्वेचं कँटिन चालवायला घेतलं. मात्र अर्धांगवायूचा झटका आला. पुन्हा फरफट सुरू. तीन बहिणी लग्नाच्या होत्या. आम्हाला काम करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मोठा भाऊ मिलटरीत गेला आणि मी बेळगावात मिळेल ती छोटी मोठी कामं करू लागलो.’ नाईक आपल्या बालपणाविषयी सांगतात. लहानपणापासून सुरू झालेली ही फरफट आजवर थांबलेली नाही. त्यात अधूनमधून आनंदाचे दिवस दिले ते पुस्तकांनीच.

बेळगावात त्यांनी लोकांच्या घरचं पाणी भरण्यापासून कामं केली. इथे तिथे कामं करताना छापखान्यातल्या कामात मन रमलं. रंगभूमीवर तोंडाला रंग लागली की जसा निघत नाही तसाच छापखान्याची शाई हाताला लागली की निघत नाही म्हणतात. ते नाईकांच्या बाबतीत खरं असावं. बेळगावच्या मराठा हायस्कूलात शिकत असतानाच ते बाबूराव ठाकूरांच्यातरुण भारतया पाक्षिकासाठी बातमीदारी करत. तिथून ते १९५७ साली पुण्याला गेले. नागपूरचातरुण भारतपुण्याहून निघणार होता. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केल्याची पार्श्वभूमी होतीच. . वि. केतकरांसारख्या भक्कम संपादकाच्या हाताखाली ते तयार झाले. पण फार काळ तिथे टिकले नाहीत. पुण्याहून नाशिक. दादासाहेब पोतनिसांचागावकरी`. त्यांनीच औरंगाबादलाअजिंठासुरू केला. त्याच्या पायाच्या दगडांमध्ये नाईक प्रमुख होते. पण तेवढ्यात मायभूमीची हाक आली. गोव्यातगोमंतकसुरू झाला. पहिले संपादक बा. . सातोस्करांचं बोलावणं आलं. द्वा. . कर्णिकनवप्रभेत आले. त्यांनी बोलावून घेतलं.

तेव्हाची पत्रकारिताच वेगळी होती. आज वाचकांना वेळ नाही. तेव्हाचे वाचक बरेच रिकामे होते. तेव्हा गोव्यात वाचक नवीन होतेच पण पत्रकारही नवीन होते. सगळेच चाचपडत होते. सातोस्करांसारखा माणूस खूप विद्वान. त्यांना दैनिकाचा अनुभव नव्हता. ते अग्रलेख लिहिला की मोकळे व्हायचे. पण तेव्हा पत्रकारिता हे व्रत होतं. त्यात प्रामाणिकपणा होता. त्या काळात आम्ही घडलो. त्यामुळे खूप कमी पैसे मिळूनही पत्रकारितेशी बेईमानी करण्याचा विचारही कधी आला नाही. एका वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक असताना एक मोठा राजकारणी माझ्याकडे आला. एक बातमी छापू नका, तीस हजार रुपये देतो म्हणाला. मी शांत राहिलो. तो गेल्यावर मी सांगितलं आतल्या पानावरची त्याच्या विरोधातली बातमी पहिल्या पानावर मोठ्या पॉइंटात छापा. दुसर्या दिवशी तो बोंबलत आला. मी त्याला सांगितलं, इथे पत्रकार विकले जात नाहीत.’ हे सगळं वाचायला बरं वाटत असलं तरी नाईकांना पत्रकारितेतून पैसा मिळाला नाहीच. त्या काळात पगार तुटपुंजे होते. जास्त पगारासाठी त्यांनी पेपर बदलले असावेत. तरीही बरा पगार कधी हाती आला नाही.

नाईकनवप्रभात असताना काळात पुण्याला एक नवा पेपर काढण्याची तयारी सुरू झाली होती. त्यासाठी ते पुण्याला गेले. पण तो पेपर निघालाच नाही. पुन्हा जुन्याच पेपरांत काम करून जुनाच पगार त्यांना नको होता, ‘मी प्रेस लाईनला कंटाळलो होतो. पुण्याला प्रकाशकांना भेटलो. ‘सदानंद प्रकाशनचे सदानंद खाडिलकर म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं दोन कादंबर्या लिहून दे. मी देतो म्हणालो. पण काहीच सुचत नव्हतं. सिनेमा लागला होता, ‘किस द गर्ल्स अँड मेक देम डाय’. ती एका शास्त्रज्ञाची आणि गुप्तहेराची कथा होती. मी तो सिनेमा अर्धाच बघितला. बाहेर आलो आणि लिहायला सुरुवात केली. ‘मृत्यूकडे नेणारे चुंबनआणिशास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढअशा दोन कादंबर्या दोन दिवसांत लिहून दिल्या. काही काम नव्हतं म्हणून बेळगावला घरी आलो. मागोमाग प्रकाशकाचं पत्र आलं, कादंबर्या वाचून गरगरलो आहे. लगेच पुण्याला या. एका कादंबरीत मजकूर कमी पडतोय.’ ते १९७५ साल होतं. प्रकाशकाने रोख पैसे हातात दिले. दोन्ही कादंबर्या बाजारात आल्या आणि तुफान चालल्या.

त्यानंतर नाईकांनी मागे वळून काय, डोकं वर काढूनही बिघतलं नसावं. सकाळी साडेपाचला लिहायला सुरुवात करायची. रात्री उशिरापर्यंत लिहित राहायचं, असा क्रम सुरू झाला. दोन तीन दिवसाला एकेक कादंबरी लिहणं सुरू झाले. तेव्हा बाबूराव अर्नाळकरांचे काळा पहाड सारखे नायक गाजत होते. अकराशे कादंबर्या लिहिणार्या अर्नाळकरांशी स्पर्धा करणं सोपं नव्हतं. अशाच प्रकारच्या प्रणयरम्य कादंबर्या लिहिणारे एस. एम. काशीकरदेखील गाजत होते. पुढे सुहास शिरवळकर आणि बाबा कदम यांच्या कादंबर्यादेखील हातोहात खपल्या. या स्पर्धेत नाईक फक्त तगलेच नाहीत तर गाजलेही. अर्नाळकरांसारखे नाईकांचेही नायक गाजले. ‘कॅप्टन दिप’, ‘गोलंदाज’, ‘शिलेदार’, ‘शब्दवेधीअशा त्यांच्या नायकांच्या कादंबर्या बाजारात आल्या की लोकांच्या उड्या पडायच्या.

एका महिन्यात अशा सात सात मालिकांच्या कादंबर्या बाजारात यायला लागल्या. पण प्रकाशकांच्या हातून पैसे मिळत नव्हते. त्यांच्या दादागिरीला कंटाळूनशिलेदार प्रकाशनचा जन्म झाला. अल्तिनोच्या अकबर अली बिल्डिंगमध्ये राहत्या घरून प्रकाशनाचं काम चालायचं. रोज व्हीपीचे गठ्ठे महाराष्ट्रात जायला लागले. पण पणजीच्या पोस्ट ऑफिसातल्या लोकांना इतकं काम करायची सवय नव्हती. ते व्हीपी स्वीकारायचे नाहीत. मुंबईला तक्रार केली. नाईक राहत असलेल्या इमारतीत त्यांच्यासाठीचं खास पोस्ट ऑफिस सुरू झालं. पुढे नाईकांनी गोवा सोडल्यावर ते पोस्ट ऑफिस सांत इनेजला हलवण्यात आलं.

पैसा भरपूर येत होता. पण स्वभाव व्यवहारी नव्हता. कौटुंबिक उलथापालथ झाली. कर्ज काढून वेलिंग-साको इथे सुरू केलेला अत्याधुनिक प्रिटिंग प्रेस बंद करावा लागला. गोव्यातून कफल्लक होऊन त्यांनी मुंबई गाठली. वसईला पुन्हा कादंबर्या लिहिणं सुरू झालं. त्यात माधव गडकरींच्या मैत्रीमुळेलोकसत्ताचं कामही मिळालं. वसईत ठीकठाक सुरू असतानाअजिंठ्याचं बोलावणं आलं. पुन्हा औरंगाबाद. दोन वर्ष तिथे चांगलं सुरू होतं. ‘लोकमतऔरंगाबादेत आलं. ‘लोकमतनेअजिंठाची सगळी माणसं आपल्याकडे ओढली. नाईक एकटे उरले. पोतनिसांनीअजिंठाबंद केला. तेवढ्यात आमदार विलासराव खरात जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे नवं दैनिक सुरू करत होते, ‘दुनियादारी’. याच नावाने गुरुनाथ नाईकांनी सुहास शिरवळकरांच्या एका कादंबरीचं बारसं केलं. तिने पुढे इतिहास रचला.

जालन्यातल्या दोन वर्षानंतर नाईक विलासराव देशमुखांच्या `एकमत`मध्ये गेले. ज्येष्ठ पत्रकार तुकाराम कोकजे कार्यकारी संपादक होते. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी हट्ट धरून नाईकांना `एकमत`मध्ये आणलं. पुढे १४ वर्षं ते लातूरचे बनले. नाईक सांगतात, कोकजे असेपर्यंत मी सहसंपादक आणि नंतर कार्यकारी संपादक होतो. मला पगार होता फक्त साडेचार हजार. विनंत्या करूनही विलासराव ऐकले नाहीत. एकदा कंटाळून मी कोल्हापुरातपुढारीला आलो. तिथेही विलासरावांनी फोन केला, माझा कार्यकारी संपादक का पळवलात? ‘पुढारीच्या मालकांनी स्वतःची गाडी करून मला लातूरला पाठवलं. पण विलासरावांनी पगार काही वाढवला नाही.’

लातूरला असताना नाईकांना मणक्याचा त्रास सुरू झाला. स्थिरस्थावर झालेलं आयुष्य पुन्हा रसातळाला गेलं. दोन वर्षं स्वतःच्या पायावर उभं राहता येत नव्हतं. विलासरावांनी काहीच मदत केली नाही. दोन वर्षांच्या औषधोपचारांत जमा केलेली सगळी पुंजी संपली. पुन्हा वसई गाठली. पुन्हा उपचार सुरू ठेवले. कुठेच यश लाभलं नाही. शेवटी एक्युपंक्चरनं कसंबसं बरं वाटलं. वसईत राहणं परवडत नव्हतंच. त्यामुळे पुण्याजवळ मुळशीला एक पत्र्याची झोपडी भाड्याने घेतली. तिथे पुन्हा लिहिणं सुरू. चारही बाजूंनी गळत्या छतामध्ये बसून पुन्हा कादंबर्या लिहिणं सुरू झालं.

तिथे मला एक मित्र शोधत शोधत आला. बीडला एक पेपर सुरू करायचा होता. सगळा सेटअप तयार होता. माणसांना सहा महिने पगार दिला जात होता. पण पेपर सुरू करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. मी तिथे गेलो. तिसर्या दिवशी पेपर सुरू केला. ‘लोकाशानावाचं दैनिक तिथे दोन वर्षं रुजवलं. पण तेवढ्यात पुन्हा नष्टचर्य सुरू झालं.’ २००४ सालचीलोकाशाही त्यांची अखेरची नोकरी ठरली. ते एका कामानिमित्त पुण्यात गेले असताना मेंदूला एका बाजूने होणारा रक्तपुरवठाच मंदावला. त्यामुळे स्वतःची ओळखच ते विसरून गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना कसंबसं शोधलं. पुन्हा उपचार सुरू झाले. पुन्हा हॉस्पिटल सुरू झालं. सगळी पुंजी संपली.

गोवा राज्य सरकारच्या कृपेने नाईकांना आता गोव्यात डोक्यावर छत तरी मिळालंय. म्हातारपण आणि आजारपणामुळे आता लिहिणं, पत्रकारिता सगळं थांबलं आहे. कादंबरीत शोभाव्या अशा संघर्षाचा हा नायक वार्याशी झुंज देतो आहे.



No comments:

Post a Comment